*आपली लालपरी*
हल्लीच एक वाक्य ऐकलं होतं कि "या लाल परीने नुसती माणसे नाही तर कितीतरी स्वप्नही पोहोचवली आहेत." याच लाल परी विषयी थोडसं माझ्या मनातलं आणि तिच्यासोबतचे माझे काही अनुभव.
एक गंमत अशी, आपण प्रेमात असलो की लालपरी म्हणतो आणि रागात असलो की लाल डब्बा. रागात असल्यावर बस ही स्त्रीवाचक न राहता पुरुषवाचक होऊन जाते.
"झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया" हे असं आम्हां कोकणातल्या मुलांना म्हणता आले नाही. त्यावेळी कोकणात होतं रेल्वे नव्हती आणि कोकण रेल्वे सुरू व्हायच्या आधीच आमची पिढी मोठी झाली.
त्यामुळे आमच्यासाठी गावी जाण्यासाठी मुख्य साधन एसटी ची बस हेचं होते. हे लाल परी वगैरे नाव नंतरच पण गावी कसं जाणार? असे विचारलं तर एसटीने हे आमचे उत्तर ठरलेले असायचे.
ही एसटी म्हणजे फार जिव्हाळ्याचा विषय होता त्यावेळेला. अगदी आधी आरक्षण वगैरे करून जाण्याची पद्धत फार कमी होती. आधी स्टॅन्ड वर जाऊन आपल्याला कुठे जायचे आहे तिथे जाणाऱ्या त्या बसची चौकशी करायची. स्टॅन्ड वर जाऊन उभं राहायचं, मग आपली बस आली की आपली बोचकी घेऊन त्या गर्दीतून वाट काढत जागा अडवायचची, अगदी आपली जागा आरक्षित केलेली असेल तरी त्या सीटवर पोहोचायलाही दिव्य करायला लागायचं.
मी अगदी लहान असताना म्हणजे साधारण मला कळायला लागल्यापासून, मला आठवतंय माझ्या आईचे आजोळ कल्हे, कर्नाळ्यापासून तीन किलोमीटरवर. माझे आजोबा मला मैत्री पार्कच्या एसटी स्टँडवर घेऊन जायचे आणि मग तिथे कोकणात जाणारी कुठलीही बस मिळाली की त्यात बसायचो, कधी कधी तर चालकाच्या शेजारी बसूनही आम्ही प्रवास केला आहे. अगदी सुट्टीच्या काळात, मे महिन्याचा काळात या लाल पर्या अगदी तुडुंब भरलेल्या असायच्या, मग मिळेल ते वाहन पकडून, याच्यात बसून आमची स्वारी पनवेलच्या बाळा मामाकडे अर्थात कल्हे ला पोहोचायची.
आम्ही लहान असताना संध्याकाळची एसटी पकडायचो गावी जायला. त्यावेळेला त्या आवाज करणाऱ्या, वळणावर पूर्ण वाकडी होणाऱ्या एसटीमध्ये ही छान गाढ झोप लागायची. कधी चुकून जर जग असेलच, तर त्या वेळी घाटाची वळणे घेताना पोटात डचमळायला लागायचं. बऱ्याच वेळा आमची एसटी ही भल्या पहाटेच तरेळेला पोहोचायचो.
असंच लग्नानंतर माझ्या गावचा प्रवास करताना अचानक पणे मला माझ्या आत्ये सासूबाई एसटीमध्ये भेटल्या. आपल्यासारखं अजून कोणीतरी असं एसटीने प्रवास करतेय म्हटल्यावर मन सुखावलं होतं.
एसी गाडीने प्रवास करणारे प्रवासी थोडे उच्चभ्रू किंवा उच्च मध्यम वर्गीय माणसं. त्यामुळे बाजूला बसलेल्या व्यक्तीशीही पूर्ण प्रवासात काही बोलणं होतच असं नाही. झालेच तर अगदीच जुजबी. फारच कमी वेळा पूर्ण प्रवास गप्पा मारणाऱ्या व्यक्ती असतात. तसंच आता प्रवासात लोकांना बोलण्यात गुंगवून, भूल घालून लुटलं जातं. या भीतीनेही एकमेकांशी संवाद साधणं कमी झालं असावं बहुधा.
आता ट्रेनमध्ये शिरलं , आपल्या सीटवर आपला अंथरूण पसरलं, की लगेच झोपून जायचे.अगदीच गाडी लेट झाली आणि खूपच लांबचा प्रवास असला तर मग थोडाफार संवाद होतो.
बऱ्याच वेळा असं होतं की एसटीचा प्रवास म्हणजे गरीब लोकांचा, किंवा ज्यांना महाग तिकिटं परवडत नाही असं हल्ली रूढ झालंय काही अंशी. पण या प्रवासात माणसं खूप छान बोलतात, मोकळ्या गप्पा मारतात असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. बऱ्याच वेळा माझ्या शेजारी कोणीतरी वयस्कर बाई येते. मग ती तिच्या मुलांबद्दल, सुनांबद्दल, नातवंडाबद्दल सगळं सांगते. आणि मग त्यांना ज्या थांब्यावर उतारायचे असेल तिथं उतरवायची जबाबदारी आपसूकच आपल्यावर. मध्यंतरी फलटणच्या बसमध्ये एक आजीबाई भेटल्या. मुलगा खारघरला राहणारा आणि मुलगी कांदिवलीला राहणारी दोघांबद्दल त्या इतकं भरभरून बोलत होत्या. तसंच एप्रिल महिन्यात ते त्यांच्या तिकडच्या आमदाराने आयोजित केलेल्या अयोध्या ट्रीप ला जाणार होते हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून जात होता. हे सगळं मला सांगताना त्यांना काही वावगे वाटले नाही. आणि मलाही ते सगळं ऐकायला मजा वाटली.
अजून एक प्रसंग असा की माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं कोल्हापूरला. त्या गावाचे नाव होतं मढीलगे खुर्द. आदल्या दिवशी रात्री कोल्हापूरला जाणारी ट्रेन पकडली. कोल्हापूरला उतरल्यानंतर त्या गावाला जाणाऱ्या ट्रॅक्स मध्ये चौदा जण कोंबतात म्हटल्यावर, आम्ही आमचा मोर्चा एसटी स्टँड कडे वळवला. आणि गारगोटीला जाणारी बस आम्ही पकडली. नेमकी माझ्या आईला आणि मुलीला उलट्या बाजूची जागा मिळाली, त्यांना बस लागते म्हणून आम्ही जागा बदलून घेतली. गोळी घेतल्यामुळे दोघी झोपल्या आणि त्यांचा प्रवास बऱ्यापैकी सुखकर झाला. त्या एसटी मधला प्रत्येक स्क्रू वाजत होता. तो ड्राइवर पूर्वी पायलट होता की काय अशी शंका यावी इतकी तो गाडी जोरदार चालवत होता. रस्त्यात येणारा एकही खड्डा किंवा गतिरोधक त्याने चुकवला नाही. तो एक दीड तासाचा प्रवास हा आम्हाला रात्रभराच्या ट्रेनच्या प्रवासापेक्षा जास्त मोठा आणि लक्षात राहणारा ठरल. जेव्हा आम्ही सगळळे त्या गावी उतरलो त्यावेळेला एसटीच्या प्रत्येक भागाप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग ही खिळखीळा झाला होता.
आता पिरंगुट पुणे येथे घर घेतल्यापासून या बसशी माझा जरा जास्त संबंध यायला लागला. हल्ली परिस्थिती थोडीशी बरी असल्यामुळे शिवनेरी किंवा सेमी लक्झरी (हिरकणीने) प्रवास केला जातो. पण परतीच्या प्रवासात बस बुकिंग न करता, मिळेल ती बस पकडायची असे साधारण ठरलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा माझ्या नशिबाने लाल परी नशिबात येते. एकदा तर अशी गंमत झाली की आमच्या बसचा दरवाजाच निखळला चांदणी चौकात एक माणूस चढताना. तो काढून बस मध्येच मागे ठेवला. पुणे ते मुंबई पूर्ण प्रवास आम्ही बिना दरवाजाच्या त्या एसटीने केला.
असाच एक एसटीच्या प्रवासातला छान अनुभव. चांदणी चौकातून एका एसटीत बसले. शेजारी एक आजी बाई बसल्या. थोड्याच वेळात माझा डोळा लागला, हायवेवर गाडी पोहोचली आणि डोळे उघडले तर शेजारी वेगळीच बाई बसली होती. तेव्हा कळलं यांची एसटी पंक्चर झाली म्हणून त्यांना आमच्या गाडीत घेतलं होते. त्यानंतर खाण्यासाठी आमची गाडी थांबली, तेव्हा आमच्या ड्रायव्हरच्या असं लक्षात आलं आमची ही एसटी पंक्चर आहे. मग आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या गाड्यांमध्ये जिथे जागा असेल तिथे पाठवण्यात आलं. आमच्या बस मध्ये एक मुलगी होती, एकटीच प्रवास करत होती साताऱ्याहून. तिच्याकडे तिचा फोनही नव्हता. म्हणून तिने माझ्या फोनवरून तिच्या आईला फोन केला. सुरुवातीला आम्हाला थोडी शंका आली, नंतर मी स्वतः तिच्या आईबरोबर बोलले. आणि मग तिला सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. अगदी शेवटच्या स्टॉप वर उतरेपर्यंत मी तिच्या आईच्या संपर्कात होते. तिची आई तिला भेटल्यावर तिने मला फोन केला. गंमत म्हणजे आजही तिची आई माझ्या संपर्कात आहे.
एक मात्र खंत आहे सीझनच्या वेळेला या फुल जाणाऱ्या या बसेस इतर वेळी तशा थोड्या रिकामी असतात. एसटी महामंडळ तोट्यात चाललंय ही सबब देऊन बसेस नीट मेंटेन करत नाहीत. ही एक गोष्ट आहेच, पण आपण माणसं सुद्धा ती बस आपल्या तीर्थ रूपांचीचं असल्यासारखी, पण तरीही काही खर्च निघाल्यासआपल्या खिशाला चाट पडणार नाही, असे समजून वाटेल तसं वागतात. खिडक्याच काय धडाधड बंद करतील, त्या सीटवर काय काय सांडवून ठेवतील, लहान मुलं त्या सीट चे कव्हर काय फाडतील. कधी कधी त्या बस ची कचरा कुंडी करून ठेवतात. आणि पानाची, गुटखा खाऊन पिचकारी मारणारे तर अतिशहाणेंच.
आपण प्रवाशांनी आणि एसटी महामंडळाने थोडसं या लाल पऱ्यांकडे लक्ष दिलं तर त्यात खरंच पऱ्यांसारख्या चालतील.
आता नवीन लाल परी आली आहे. पण त्याच्यात ती मजाच नाही, कारण त्या पूर्वी सारख्या मजबूत नाहीत. त्यांच्या खुर्च्या ही पुश बॅक आणि त्या मानाने तकलादू. आधीच्या दणकट खुर्च्याची मजा राहिलेली नाही.
या लाल परीचे ड्रायव्हर मात्र एकदम जबरदस्त असतात. खिळखिळी झालेली गाडी ही ते अतिशय शिताफीने आणि सहजतेने चालवतात. घाट रस्त्याची वळणे ही अतिशय कलात्मकतेने ते घेतात. हिरव्याजर्द घाटात, काळ्या डांबरी रस्त्यावरून वळणे घेत जाणारी लालपरी पाहणे हे एक वेगळेच नयन सुख.
फार कमी वेळा आपण असं ऐकलं असेल की या बसेस चा अपघात झाला. बऱ्याच वेळा हे अपघात होण्याचं कारण ही बहुतांश वेळा समोरच्याची चूक असते.
अजून एक या एसटी ड्रायव्हरची खासियत अशी की ते कुठल्याही दुसऱ्या गाडीला आपल्या पुढे जाऊ देत नाही. त्यांची गाडी ज्या रस्त्यावर चालली असेल तो रस्ता त्यांचाच मालकीचा असल्यासारखा ते गाडी चालवतात. एकदा आम्ही सावंतवाडीला गेलो होतो. तेव्हा डेपोतून बाहेर येणारी लालपरी आणि आमची गाडी एकाच वेळेला त्या रस्त्याला लागली. आम्ही खूप वेळा प्रयत्न केळे पण तरीही अगदी महामार्ग येईपर्यंत त्या बस वाल्याने आमच्या गाडीला काही पुढे जायला दिलं नाही.
आजही बाजाराच्या दिवशी त्या त्या गावची ही लाल परी माणसांनी तुडुंब भरलेली असते. पूर्वी तर बऱ्याच वेळा सकाळी मुख्य स्थानकाकडे येणारी एक आणि संध्याकाळी पुन्हा गावात जाणारी एक अशा दोनच बस असायच्या, कदाचित आज ही असतील. आणि बाजाराच्या दिवशी एखादी दुपारच्या वेळेस गावात येणारी. त्यामुळे लोकं चातकासारखी या बसची वाट बघत असत. हल्ली गावातही सगळ्यांकडे गाड्या आल्यामुळे हल्लीच्या पिढीला यातली गंमत कळत नाही हे नक्की. अजूनही काही भागांमध्ये कित्येक लोकांचे दळणवळणाचे एकमेव साधन एसटी आहे. याला काय म्हणावे?
या बसची वाट बघत असताना ही मजा यायची, तिथे असणाऱ्या दुकानातन गोळ्या घे, चॉकलेट घे, बिस्कीट घे अशी खरेदी चालायची. कोकणातली माणसं खडकडे लाडू, खाजा, तळलेले गरे अशी जय्यत खरेदी करतात बहुतेक अजूनही. प्रत्येक स्टॅन्ड च्या शेजारी एक उसाच्या रसाचे दुकान हवेचं असा अलिखित नियमच आहे बहुदा. मग उसाचा रस पिणे ही पर्वणीच असायची.
मी सुरुवातीलाच लिहिलेलं वाक्य " या लाल परीने बरीच स्वप्नही पोहोचवली आहेत. " हे किती खरं आहे. ज्या काळात चाकरमाननी मुंबईला आले त्याकाळात ही लाल परीच होती त्यांना मुंबईकडे आणणाऱी आणि काही झालं की त्यांना गावी नेणारी. या लालपरीचा प्रवास ही खिशाला परवडणारा होता. मुंबईत येऊन पैसे कमवायचे, गावी पक्के घर बांधायचे, आई-वडिलांना थोडे सुखाचे दाखवायचे, अशी बरीच स्वप्न उराशी बाळगून, महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागातून मुलं शिक्षणासाठी नोकरीसाठी मुंबई पुण्यात येत होती ती या लाल परीनेच. कधी कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना थेट बस नसली की मजल दरमजल करत आपल्या इस्पित स्थळी पोहोचायचे.जिथं वीज ही पोचली नव्हती तिथं आपली ही बस पोहोचत होती. बऱयाच शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांनीच नाही तर त्यांच्या शिक्षकांनी ही याच बस मधून प्रवास केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो, या लाल परीने खरंच खूप स्वप्नही पूर्ण केली आहे.
या लाल परीतून प्रवास करणारी प्रत्येक व्यक्ती ही गरीब असेलच असे नाही. एक मात्र निश्चित ही लाल परी स्वतः खिळखिळीत झाली असली, तरी तिने बऱ्याच लोकांच्या पाठीचा कणा मजबूत करायला मदत नक्कीच केली आहे हे मात्र सत्य.
सौ. मिलन राणे - सप्रे





