आजच्या पुणे टाइम्स (महाराष्ट्र टाईम्स) मध्ये आलेला माझा लेख. इतके भारी वाटतेय♥️ (८ डिसेंबर २०२४)
लहानपणापासूनचं स्वप्न स्वतःचं एक छोटसं घर असावं, स्वकष्टाच्या कामाईने घेतलेलं. आणि घराला एखादी छोटीशी बाल्कनी असावी. पिरंगुट पुणे येथे घेतलेल्या फ्लॅटमुळे माझी दोन्ही स्वप्न पूर्ण झाली, मुख्य म्हणजे छोटयाशा बाल्कनीचे.
पिरंगुट च्या घरी गेल्यावर, दिवसातला माझा बराचसा वेळ बाल्कनीतच घालवते मी. अगदी सकाळी उठल्यापासून , रात्रीचा मिट्ट काळोख होईपर्यंत. या पूर्ण दिनचक्रात निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा तिकडे अनुभवता येतात.
समोर छानसा , छोटासा डोंगर , वर मोकळं आकाश, आणि खाली नागमोडी , वळणावळणाचा घाट रस्ता असे विहंगम दृश्य.
त्या डोंगरा आडून हळूहळू होणारा सूर्योदय. सूर्य उगवायचा आधी आकाशात दिसणाऱ्या त्या गुलाबी, तांबड्या, सोनेरी छटा. एकदा का सूर्यदेव डोक्यावर आले की अंग भाजणरं ऊन. अंधारात चंद्रोदय व्हायच्या आधी डोंगराच्या कडेवर दिसणारी ती सुंदर रुपेरी छटा. मग एकामागून एक डोकावणाऱ्या एक एक तारका. आणि त्यामागून येणारा तो चांदोमामा. काळ्यामिट्ट आभाळात चंदेरी प्रकाश.
पावसाळ्यात तर निसर्गाच्या रूपाने डोळ्याचं पारणे फिटते. समोर हिरव्यागार झाडांची शाल पांघरलेला डोंगर, भरून आलेलं आभाळ , भुरुभुरु पडणार पाऊस आणि त्या डोंगरातून वाहणारे छोटे छोटे झरे. घाटरस्त्यावर दूरपर्यंत दिसणारा तो पाऊस. थंडीत, पावसाळ्यात धुक्याची चादर पांघरलेला तो रस्ता आणि डोगर. त्या चदारीतून डोकावणारी हिरवीगार झाडे.
गॅलरीत खुर्ची टाकून बसले की रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नुसत्या गाड्या बघत बसले तरी वेळ निघून जातो. लहानपणी रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या मोजायची एक गंमत होती ती ही अनुभवता येते इथे. रात्रीच्या वेळी रहदारी कमी झाली की शांत निवांत रस्ता आणि पाहायचा. घाटातून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचे लाईट बघताना ही मजा येते. रांगेत दिसणारे ते एकीकडे लाल आणि दुसरीकडे पांढऱ्या रंगाचे प्रकाश. नागमोडी जाणाऱ्या गाड्या.
दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी अगदी ओळीने दिवे लावून., आवडती ठिपक्यांची रांगोळी काढून मनाप्रमाणे गॅलरी सजवता आली.
आमच्यासाठी एक हक्काचा सेल्फी पॉईंट झाला आहे तो. निरभ्र आकाश असो की भरून आलेलं आभाळ दरवेळी फोटोसाठी एक नवीन बॅकग्राऊंड मिळते.
काहीच न करता अगदी पायावर पाय टाकून नुसते सुस्त, निवांत पडून राहायचे. धकाधकीच्या जीवनातून तेवढाच आराम. लिखाणासाठी अगदी उत्तम जागा.
अगदी समोरसमोर घरे असणाऱ्या मुंबईत अर्धे आयुष्य घालवताना कधी वाटलं नव्हतं की स्वतःच्या घराच्या बाल्कनीतून असा सूर्योदय, निसर्ग पाहायला मिळेल. पण कधी कधी स्वप्न सत्यात उतरतात. फक्त जिद्द, चिकाटी, मेहनत आणि स्वतःवर विश्वास हवा.
मी जर चित्रकार असते कितीतरी चित्रांना जन्म देता आला असता. पण चित्रकार नसले लिखाण करते एखादी कविता मात्र तिथे सुचून गेलीये
माझी सगळ्यात आवडती जागा, आवडता कप आणि आपल्या सर्वांचे आवडते पेय....चहा आणि काळ्या मेघांनी भरून आलेलं आभाळ. असे असताना काही सुचलं नाही तर नवलच . त्या वेळी सुचलेल्या दोन ओळी.
माझ्या मनासारखे
भरून आलेलं आभाळ
आपल्या प्रेमसारखा
बहरलेला हिरवागार डोंगर
रिमझिम बरसणाऱ्या
पावसाचे गार गार तुषार
हातात तुझ्या आठवणींनीनी
रंगवलेला सुंदरसा प्याला
त्यात तुझ्या स्वभावासारखा
कडक तरीही गोड चहा
कमी आहे ती
फक्त प्रत्यक्ष सोबतीची.........♥️
झुंजूमंजू पहाट,
शांत निवांत वाट,
वाफाळत्या चहा सोबत,
गोड मैत्रीची सुरवात❤️
सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

खूप छान वाचनीय असा लेख. 🙏🏻
ReplyDelete