डिटॅचमेंट आजच्या घडीचा एक गोंडस शब्द, दूरावा ठेवण्यासाठी. हल्ली काहीजण सतत असं म्हणत असतात कुठल्याही गोष्टीला अटॅच राहायचं नाही डिटॅचमेंट जास्त महत्त्वाची असते. आपल्याला डिटॅच होणं जमलं पाहिजे. असेच हल्ली सगळीकडे ऐकायला मिळते.
डिटॅचमेंट मग ती कुणाशीही असू देत, कपड्यांशी, वस्तूंशी, नोकरीशी, किंवा अगदी माणसांशी ती जमायलाच हवी असे काहींचे अगदी ठाम मत असते.
हल्लीच्या या फास्ट जगात डिटॅच राहणे खरंच गरजेचं आहे असं वाटून जातं कधी कधी. पण खरंच सगळ्यांसाठीच इतकं सोपं आहे का?
आमची पिढी (काही अपवाद सोडले तर )किंवा आमच्या आधीच्या पिढ्या आपल्या आज्या पणज्या यांना असं डिटॅच होणं जमत नव्हतं, पण तरीही त्यांचं आयुष्य सुंदर आणि सुसह्य होतं. सुसह्य यासाठी म्हणते की हल्ली म्हणतात की अटॅचमेंट ठेवल्या की जगणं नकोसे होतं स्वतःचेही आणि दुसऱ्याचेही. पण एक अंतर ठेऊन नाती ठेवली की ती छान आयुष्यभर टिकतात. कुठेही अती जवळीक नकोशी होते हे आपल्याला ही कळतेच.
आजही आपल्या आजी, पणजी, पूर्वजांच्या काळापासून चालत आलेल्या साड्या, घरात वापरायची भांडी वापरताना किती अभिमानाने सांगतो की हे माझ्या आजीच्या काळाचे हे माझ्या पणजीच्या काळाचे हे कितीतरी पिढ्या आधीपासून आमच्याकडे चालत आलेलं आहे.
अगदी आपले सोन्याचे दागिने जितके जुने तितके जास्त सुंदर आणि तितकच सोनं बावनकशी खरं. कपड्यांच्या बाबतीत ही तसेच, सहा महिन्यात कपडे जुने होतात, ते टाकून द्यायचे. पण आधीच्या सोन्या चांदीच्या जर असलेल्या साड्या, लग्नातले शालू किती छान दिसतात आजही. ते वापरायची आणि आपले म्हणून जपायची वृत्तीच हळूहळू नाहीशी होतेय असे वाटायला लागले आहे.
घरात कचरा नको म्हणून घरातल्या बऱ्याचशा गोष्टी विकून टाकतो किंवा जुन्या मोडून नव्या घेतो. आणि नंतर अँटिक गोष्टी आपल्या घरात हव्या म्हणून जुन्याच गोष्टी बाहेरून विकत घेतो असा काहीसा मूर्खपणा ही करतात काही लोक. घरातल्या अँटिक गोष्टींतून आपल्या आईचा , आपल्या आजीचा , आपल्या आधीच्या सगळ्या पिढ्यांचा एक वारसा त्यातनं पुढे आलेला असतो.
जसं गोष्टींच्या बाबतीत आहे तसेच माणसांच्या बाबतीतही कुठेही अडकून पडायचं नाही,मूव्ह ऑन व्हायचं. खरंच एखाद्या व्यक्तीपासून दुरावल्यानंतर त्या व्यक्तीला विसरणं इतकं सोपं असतं?
आपल्या आधीच्या पिढ्या एकमेकांना किती धरून होत्या. त्यांच्यातही भांडणं , मतभेद, वाद अगदीच नव्हते असं नाही. पण तरीही काही सण असो, कुणाचं लग्न असो किंवा कोणी गेलेलं असू दे अशावेळी सगळे तिथे जमायचे, भेटायला जायचे. आजारपणात काय किंवा कुठल्याही मंगल कार्यात काय मदत म्हणून आपल्या आत्या, मावश्या, काकू किंवा एखादी भाची, बहीण अशा स्त्रियांना मदतीला बोलावलं जायचं. आणि या व्यक्ती यायच्या ही घरातलं सगळं जमवून.
कुणी गेल्यावर पुरुष मंडळी सगळ्या कार्याला मदतीला असायची. काही वर्षांनी खांदा द्यायला ४ माणसे मिळणे ही कठीण होऊन जाईल.
आता काही काही वेळा हे कळवणही होत नाही, ना चांगले ना वाईट. पैसे मोजले की इव्हेंट प्लॅनर सगळं करून देतात. जन्मापासून अगदी शेवटपर्यंत सगळ्याला माणसे मिळतात म्हणे हल्ली. कधी कधी वाटते याच लांब राहण्याच्या आणि आपल्याला आपली स्पेस हवी या हट्टामुळे अथश्री सारख्या सोसायटी ची कल्पना उदयास आली असावी.
आताशा या सोबतच एक नवीन शब्द गवसला आहे... तो म्हणजे टॉक्सिक. लांब जाण्यासाठी या शब्दाचा नेहमीच आधार घेतला जातो. पूर्वी घरात असलेले त्रास सहन करूनही बायका संसार करत होत्या, नाती टिकवली जात होती. अगदी अन्याय सहन कराच असे नाही, पण आताच्या घडीला समजून घेण्याची तयारीच नसते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ही इगो धरून बसतात आणि मग त्यातूनच सुरुवात होते आशा टॉक्सिक नात्यांना आणि पर्याय उरतो फक्त डिटॅचमेंटचा. ही आताच्या काळाची खंत आहे.
उराशी सगळेच कवटाळून बसायचे नाही हे कितीही खरं असले तरीही... काही जुन्या गोष्टी या वारसा म्हणून नक्कीच जपायच्या असतात. एखाद्या व्यक्तीपासून डिटॅच होणे कदाचित काही वेळा सोपं असू शकते..... पण बऱ्याच वेळा आठवणींनापासून स्वतःला वेगळे करता येतं नाही हे मात्र खरं.
पण डिटॅचमेंट पेक्षा स्पेस देऊन ठेवलेली अटॅचमेन्ट कधीही चांगलीच नाही का?
सौ. मिलन राणे - सप्रे 🖋️
No comments:
Post a Comment