महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात एक प्रहसन होते श्रद्धांजली ची घाई म्हणून. अतिशय उत्तम प्रहसन.
हल्ली सोशल मीडियाचा सुळसुळाट इतका वाढलाय की लोकं कुठलाही विचार न करता धडाधड पोस्ट टाकत सुटतात. ती पोस्ट खरी आहे की खोटी आहे याची शहानिशा ही करत नाहीत.
फेसबुकवर, व्हाट्सअपवर काही व्हिडिओ व्हायरल होतात, म्हणजे कुठेतरी जरा पाऊस पडला असेल, तर त्या पावसाचं रौद्ररूप दाखवणारा एक तरी व्हिडिओ लगेच सगळीकडे वायरल होतात. तो व्हिडिओ एकतर त्या ठिकाणचा नसतोच किंवा असलाच तरी तो खूप जुना कधीचा तरी असतो. आणि तोच व्हिडिओ आत्ताच असं झालंय म्हणून सगळीकडे पसरवला जातो.
अगदी शिकलेल्या माणसांनाही पोस्ट टाकायची इतकी घाई असते ना की जराही विचार न करता एखादी पोस्ट टाकतात. आपण त्यांना दाखवून दिलं की ही पोस्ट आत्ताची नाहीये, किंवा सांगितले की पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पोस्ट टाकू नको तरीही ही माणसं ती पोस्ट डिलीट तर करत नाहीत. वर निर्लज्जपणे अशीच काहीतरी पोस्ट पुन्हा पोस्ट करतात.
तसंच एखाद्या अपघाताची पोस्ट किंवा कुठे मोबाईल फुटून माणसं जखमी झाल्याची, किंवा मुले चोरीला नेतात अशा पोस्ट सर्रास आपल्या ग्रुप वर पोस्ट करतात. अर्थात एखाद्याचा मन असतं कमकुवत, सगळेच काही स्ट्रॉंग असतात असं नाही. त्यामुळे अशा पोस्ट टाकताना आपण थोडासा विचार करायला हवा.
मला आठवतंय आमचा एक सोशल ग्रुप आहे, त्या ग्रुप वर अशीच एका बाईने पोस्ट टाकली होती. म्हणजे एका आजाराबद्दल अत्यंत चुकीची माहिती होती. त्या महिलेला सांगितले की ही पोस्ट चुकीची आहे डिलीट करा. तर त्या बाईने ती डिलीट केलीच नाही वर इतका वाद घातला. ती मान्यच करायला तयार नाही की हे चुकीचं आहे. अशाच बऱ्याच पोस्ट असतात घरगुती उपायांच्या , सगळ्याच चुकीच्या असतात असे नाही पण आपण स्वतः ते केले नाही किंवा कुणी प्रत्यक्षात अनुभव सांगितला नाही तर ती पोस्ट करू नये इतकी साधी विचार शक्ती ही नसते.
तसंच अशा ही पोस्ट असतात,व ज्या पोस्ट असतात कोणाच्यातरी दुसऱ्यांच्या आणि त्या स्वतःच्या नावे खपवल्या जातात. काही जुन्या लेखकांच्या नावाने ही त्या पोस्ट शेअर केल्या जातात. म्हणजे काही पोस्ट तर इतक्या खालच्या दर्जाच्या असतात एखाद्या दिग्गज लेखकांनी ते लिहिलं असेल विश्वासच बसत नाही. किंवा लेखक एवढं सुमार दर्जाचा लिहू शकत नाही यावर आपला पूर्ण विश्वास असतो, तरीही काही महाभाग माणसं अशा पोस्ट अगदी राजरोसपणे सगळीकडे पसरवत सुटतात.
अजून एक प्रकार असतो फ्री गिफ्ट पोस्ट चा. १० जणांना पाठवा मग तुम्हाला हे फ्री मिळेल... काही लोकं बिनदिक्कत सगळ्यांना पाठवतात. अगदी ज्यांच्याशी कधी इतर संवाद नसतो त्यांना ही. हे लक्षातच घेत नाहीत की हल्लीच्या जगात कुणीच काही फुकट देत नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत मोजावीच लागते.
कधी कधी वाटतं की पूर्वीच्या काळात पेपर हे एक माध्यम होते ना तेच बरे होते, म्हणजे पेपरमध्ये बातमी आली की लोकांना कळायचे काय झालंय,कसं झालंय, कुठे झालं. हल्ली जरा कुठं खुट्ट झाले तरी ती बातमी अख्ख्या दुनियाभर पसरते. विचारही केला जात नाही की या बातमीने कोणावर काय परिणाम होतील.
या सोशल मीडियाचे जेवढे चांगले उपयोग आहेत, तेवढेच वाईट. त्याचा उपयोग कोणी कसा करायचा, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. पण तरीही आपल्या पोस्टने कोणाला त्रास होणार नाही किंवा कोणाचं काही नुकसान होणार नाही याची छोटीशी खबरदारी तरी ते पुरेसं आहे.
सौ. मिलन राणे - सप्रे🖋️
No comments:
Post a Comment