शुभेच्छा
आजकाल या सोशल मीडियामुळे अगदी पेव फुटलं आहे या शुभेच्छांचे. म्हणजे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीला लोक शुभेच्छा देत असतात.
पूर्वी कसं होतं लोकं दिवाळी, दसरा, नववर्ष, वाढदिवस लग्नाचा वाढदिवस, तसेच काही ठराविक सणांना आणि ठराविक दिवसांनाच आपण एकमेकांना शुभेच्छा देत असू. पण हल्ली या सोशल मीडियामुळे अगदी आठवड्याच्या प्रत्येक दिवसाच्या शुभेच्छा असतात. अगदी रविवार ते शनिवार सगळ्याच दिवसांच्या. एकही दिवस सुट्टी नसते बरं का. 😄😄
मला आतापर्यंत कधीच आठवत नाही कि महिन्याला येणाऱ्या संकष्टी, एकादशी, विनायकी चतुर्थी सकट अगदी सगळ्या दिवसांच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. पण या दिवसांनाही शुभेच्छा देण्याचे नवीन काहीतरी लोण आलंय. म्हणजे त्या दिवसाची संबंधित त्या देवाचा फोटो आणि खाली संकष्टी, एकादशीच्या शुभेच्छा.
मला कळतच नाही की हे कशाला. नुसता फोटो पाठवला तरी भावना पोचतात की.
त्यात अजून धन्य ती माणसे जी लिहितात हॅप्पी अमुक दिवस, हॅप्पी तमुक दिवस. अरे! लिहा की मराठीत... सण आपला ना मग इंग्रजीच्या कुबड्या कशाला? त्याही अर्ध्या.
गंमत अशी असते वाढदिवसाला शुभेच्छा, किंवा इतरही शुभेच्छा देताना लोकं आधीचा मेसेज कॉपी करतात (अगदी भावपूर्ण श्रद्धांजली पण ). म्हणजे हल्ली तर ग्रुप मुळे असं झालं आहे की एकाने मेसेज टाकला, की मनात नसताना ही काहीजण शुभेच्छा देतात, नाईलाज असल्यासारख्या. का तर बाकीचे काय म्हणतील? अशा दिवशी ग्रुप वर कधीही एक शब्द न बोलणारी माणसे ही हजेरी लावतात.
त्यात काही जण त्याबाबतीत ही भेदभाव करतात. म्हणजे एखाद्याला शुभेच्छांचे लांबलचक मेसेज, किंवा भरपूर ईमोजी. आणि एखाद्याला कुणीतरी जबरदस्ती केल्यासारख्या अगदीच आटोपत्या.
हल्ली आपण वाढदिवसाच्या किंवा त्यांच्या स्पेशल दिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या, तर राग धरून राहणारी माणसेही आहे. मला कळत नाही एखाद्या व्यक्तीने शुभेच्छा नाही दिल्या तर आपला तो दिवस जायचा राहतो का? कधी कधी एखाद्या व्यक्तीला आठवण असते, पण त्या व्यक्तीची त्यावेळची परिस्थिती अशी असते की ती तुम्हांला शुभेच्छा देऊ शकत नाही. असा एक प्रसंग मला आठवतोय, माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून तिने ग्रुप सोडला. कारण काय तर म्हणे ठराविक लोकांच्या मुलांनाच शुभेच्छा देतात. आता जर एखाद्याचा लक्षात राहिला तर देतो, नाही राहिला तर नाही देत. आपल्या मित्र मैत्रिणींनी आपल्या मुलांना शुभेच्छा दिल्या नाहीत तर वाढदिवस आपण करायचा थांबतो का? मला तर असं वाटतं की, आपल्या जी जवळची माणसं असतात त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असतात. आणि ज्यांना मनापासून शुभेच्छा द्याव्याशा वाटत नाही जे फक्त तोंड देखील शुभेच्छा देतात त्यांनी त्या न दिलेल्या चांगल्या नाहीत का?
कधी कधी असं होतं आपण फोटो बघून त्या व्यक्तीला आपण त्या गोष्टीसाठी मग वाढदिवस असो लग्न असो शुभेच्छा देतो. बऱ्याचदा त्या मनापासून असतात पण काही वेळा नाईलाजास्तव. आता पहिलेच आहे तर न बोलणे चांगले दिसत नाही म्हणून. तर काही इतके चांगले असतात की कुणाचेही चांगले झालेले असले की. तोंडभरून कौतुक करतात. तर काही अगदी माहित असूनही टाळतात.
खरंतर आपण जितक्या लोकांना शुभेच्छा देतो त्यापैकी किती जणांशी आपण मनापासून जोडलेले असतो? हा खरंच संशोधनाचा विषय आहे. प्रत्येकासाठी वाढदिवसाला मोठे मोठे मेसेज पाठवणारे काहीजण असतात, पण त्यातले किती जण आपल्याला फोन करतात आठवणीने?
मला अशा लोकांचा खूप राग येतो जे वाढदिवसाला फोन केल्यावर म्हणतात सॉरी हा मला तुझा वाढदिवस लक्षात नाही राहिला. बरोबरच आहे आपल्याला काही सगळ्यांचे खास दिवस पाठ नसतात. पण जी माणसे तुमच्या साठी कष्ट घेत आहेत त्यांचे खास दिवस लक्षात ठेवायला काय हरकत आहे? आज सगळे हाताशी तर आहे , मोबाईल मध्ये ही टाकून ठेवता येते की. तुमच्या महत्वाच्या मीटिंग, तुमच्या साहेबांच्या किंवा तुम्हांला उपयोगी (कामासाठी ) पडणाऱ्या लोकांचे ठेवताच ना वाढदिवस किंवा इतर खास दिवस लक्षात? जेव्हा ४ वेळा आपण पुढाकार घेतल्यानंतर ही समोरून काडीचेही प्रयत्न होत नसतील तर आपणही थांबलेलं बरं नाही का?
अगदी रोज गुड मॉर्निंग, गुड नाईट, दररोजचा शुभ दिवसाचा मेसेज पाठविणाऱ्यांपैकी किती जण आपल्याशी वर्षातून एकदा तरी फोनवर बोलतात?
आपली चौकशी करतात? आपल्या सुखदुःखात सहभागी होतात? बहुतेक वेळा असे मेसेज आपण उघडून ही बघत नाही. या फक्त कोरड्या शुभेच्छा कशासाठी?
वाटलंच बोलावेसे तर उचला फोन आणि करा कॉल. समोरच्याशी केलेला पाच मिनिटांचा संवाद त्या व्यक्तीला तुमच्या रोजच्या मेसेज पेक्षा जास्त लक्षात राहील.
एकेमकांच्या संपर्कात राहण्यासाठी या फॉर्वर्डेड मेसेजपेक्षा विचारपूस करण्यासाठी पाठवलेले एक वाक्य जास्त महत्वाचे, आणि जवळचे वाटतं. या कृत्रिम जगातून बाहेर येऊन प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा देण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे..... कारण बोलून दाखवत नसले तरी मायेच्या स्पर्शाची सगळयांनाच उणीव जाणवतेय.
सौ. मिलन राणे - सप्रे 🖋️





