Tuesday, 17 October 2017

मला भावलेली झी मराठी वरील मालिका - श्रीयुत गंगाधर टिपरे

मला भावलेली झी मराठी वरील मालिका - श्रीयुत गंगाधर टिपरे 

खूप अप्रतिम मालिका . ती मालिका कमी आणि आपल्याच घरातले चित्रण जास्त वाटायचे.   प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात आजी आजोबा हवे असतात. आपले लाड पुरवणारे , गोष्टी सांगणारे आणि छान छान खाऊ देणारे. असेच शिऱ्या आणि शलाकाचे लाडके आजोबा  श्रीयुत गंगाधर टिपरे म्हणजे "आबा". नातवा इतकेच नाती वरही प्रेम करणारे. तिच्या करियर आणि भविष्यासाठी निर्णय घ्यायला मदत करणारे , शिऱ्या चे क्रिकेट चे वेड जपणारे आणि त्याचा बरोबर कधी कधी खोडकर होणारे आबा. सुनेला मुलीप्रमाणे वागवणारे आणि मुलाच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे. 

आबांचा मुलगा शेखर टिपरे. नोकरी आणि घर एवढेच विश्व. एकदम मध्यमवर्गीय माणूस. खूप साधा सरळ. मुलांशी संवाद साधणारा त्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला पाठिंबा देणारा आणि वेळ पडल्यावर रागावणारा हा बाबा. अगदी बघताना आपल्या वडिलांनीच आठवण यावी. शेखर चे ऑफिस चे मित्र अगदी घरच्यासारखे. त्यांचे ऑफिस च्या टी टाइम मध्ये चहाच्या टपरीवर चहा प्यायला जाणे. कोणालाही आपल्या ऑफिस चे आठवण यावी असेच वातावरण. शेखर खूप शांत आणि संयमी. 

आबांची सून म्हणजे श्यामला टिपरे. एक साधी सरळ गृहिणी. घर संसार, तिची मुले , सासरे आणि नवरा इतकेच विश्व आहे तिचे. घरातल्या सगळ्यांची काळजी घेणे हे तिचे परमकर्तव्य. तरीही मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणारी. मायेने जवळ घेणारी तर शिऱ्याचा चुकांवर रागावणारी. आपली मुलगी शलाका हिची आई कमी आणि मैत्रीण जास्त. सासऱ्यांना वडिलांप्रमाणे जपणारे हि लघवी सून. 

आबांचा लाडका नातू आणि त्यांच्या खोडकरपणाचा भागीदार "शिऱ्या". आपल्या घरात जसा एकादे भावंडं असते ना खूप मस्तीखोर तरीही लाडके असा हा "शिऱ्या".  इतर मुलांसारखे ह्याला हि क्रिकेट चे खूप वेड. म्हणून दार वेळी घरच्यांचा ओरडा हि खातो. आई ने काही काम सांगितले कि ते करायचा कंटाळा पण खेळायला म्हटले कि तयार.  घरात असलेले आजोबा म्हणजे त्याची ढाल. काही असेल तरी सगळे आधी आबांना सांगायचे आणि मग  आबांकडून घरच्यांना. चूक झाली तरी आबांना माहित होते म्हणून आपला बचाव करायला मोकळा. तरीही घरातल्या प्रत्येकाचा आदर करणारा आणि आज्ञानधारक मुलगा. 


टिपरे घरातली लाडोबा म्हणजे शलाका टिपरे. नटण्या मुरडण्याची आवड असणाऱ्या या मुलीला करियर हि त्याच क्षेत्रात करायचं आहे. खूप मनमिळावू शांत मुलगी . आपली कामे सांभाळून आईला जमेल तशी मदत करणारी. आई बाबांची लाडकी. भावाशी वाद झाले तरी त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी हि मुलगी. 


श्रीयुत गंगाधर टिपरे-"आबा" -दिलीप प्रभावळकर . त्यांच्या "अनुदिनी" या कादंबरीवर आधारलेली हि मालिका. केदार शिंदे यांची निर्मिती आणि तितकेच सहज दिग्दर्शन. झी वरच्या सर्वोतोकृष्ट  मालिकांपैकी हि एक. 


दिलीप प्रभावळकर - श्रीयुत गंगाधर टिपरे उत्तम अभिनय. त्यांनी रेखाटलेल्या ८०-८५ वर्षाच्या वृद्धाची भूमिका अप्रतिमच. त्याच्या बोलण्याची ती ढब काही वेगळीच. किती जणांना अजूनही त्यांच्या बोलण्याची नक्कल करावीशी वाटते. 

राजन भिसे- शेखर टिपरे. मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखाची साकारलेली भूमिका अतिशय सुंदर. बघताना आपले वडील आठवावेत इतकी जिवंत. 

शुभांगी गोखले- श्यामला टिपरे. आई , सून , बायको असावी तर अशी इतका छान अभिनय. साडीचा पदर खोचलेला आणि अंबाडा अगदी आईची आठवण. स्वयंपाक घराबाहेर येताना त्याच पदराने घाम पुसण्याची प्रत्येक गृहिणीची सवय. खूप बारीक बारीक गोष्टी अगदी खुलून मांडल्या आहेत. 

विकास कदम- शिऱ्या टिपरे . आपल्या घरातला वाटावा इतका जिवंत अभिनय. आज हा नवीन काय घोळ घालणार अशी नेहमीच उत्सुकता. आजोबांशी असलेली त्याची मैत्री पाहून कितीतरी मुलांनी आपल्या आजोबांशी मैत्री केली असेल. 

रेश्मा नाईक - शलाका टिपरे. आपणही हिच्यासारखेच असावे असे कितीतरी कॉलेज कन्यकांना वाटले असेल. साधी, सरळ, सोज्वळ आणि सुंदर अशा सगळ्याच गोष्टी शलाका मध्ये. 

त्या मालिकेचे शीर्षक गीत हि किती निराळे होते. " सोयम तोयंम ताना नुंम तू तानांनी " हेच बोल आणि संगीत. पण त्याचे चित्रीकरण इतके सुंदर होते कि ती पात्र सगळी डोळ्यासमोर यायची. नुसते शीर्षक गीत ऐकून मालिका पाहायची इचछा व्हायची.

एकंदरीतच हे कुटुंब आपल्या आसपासचे वाटावे इतके खरे. मनाला भावणारे. आपले विश्व विसरायला लावून आपण अगदी त्यांच्यात सामावून जातो इतके अप्रतिम कलाकृती. म्हणूनच माझ्याच काय तर झी च्या सगळ्याच प्रेक्षकांना हि मालिका नक्कीच भावली असणार

Tuesday, 10 October 2017

त्या एका पत्राचे उत्तर

प्रिय मित्र,
       बरे झाले त्या दिवशी माझे एक काम तुझ्या ऑफिस जवळ होते आणि तू मला तुझ्या ऑफिस मध्ये येऊन भेटायची परवानगी दिलीस. काय मस्त गप्पा झाल्या आपल्या. फोनवर नीट नाही बोलता येत त्यापेक्षा समोरासमोर गप्पा जास्त छान होतात. आणि मूख्य म्हणजे मला तू मलाच लिहिलेल्या पत्रा बद्दल कळले. कसला आहेस रे तू चक्क ६ महिने ते तसेच ऑफिस च्या लॉकर मध्ये ठेवलेस.  मी आले नसते तर पत्र तसेच राहिले असते आणि मग तू फाडून टाकले असतेस.
खूप छान लिहीलं आहेस. वाचताना थोडेसे हसू आलेच त्याबद्दल सॉरी. पण वाचताना मन अगदी भूतकाळात गेले. किती सुंदर आठवणी लिहिल्या आहेस तू. अगदी सगळे डोळ्यासमोर आले. मला तुझ्या इतके काही सगळेच आठवत नाहीये पण वाचता वाचता काही गोष्टी सहज लक्षात आल्या.
      खरे सांगायचे तर मला अगदीच कळलं नव्हते असे नाही पण लक्षात आले होते की तू माझ्याकडे सतत पाहत असतोस. आणि ते आवडत ही होते की आपण कुणासाठी तरी स्पेशल आहोत. ते वयच असते ना अल्लड या सगळ्या गोष्टींनी भारावून जाणारे. आणि काय रे शहाण्या मला डेंजर म्हणतोस तू ही काही अँग्री यंग मॅन पेक्षा कमी नव्हतास  जरा काही आले की हमरी तुमरी वर यायचास. किती वेळा तरी शाळेच्या मैदानात भांडताना पाहिलेय मी तुला आणि तुझ्या मित्रांना. शाळेतही शिक्षकांना काय कमी त्रास दिलात का तुम्ही. काय एक एक गोष्टी  ऐकायला यायच्या तुमच्या... बापरे!!!! काय टारगट ग्रुप होता तुमचा आता बदलले सगळे ती गोष्ट वेगळी.  मला ही ना तू सेंड ऑफ च्या दिवशी घातलेला वांगी कलर चा शर्ट आठवतो. माझा आवडता रंग म्हणून लक्षात राहिला बहुतेक. खरे सांगू तर सेंड ऑफ च्या दिवशी तू येऊन काहीतरी बोलशील असे वाटले होते पण तू काही आला नाहीस भित्री भागूबाई.  तुझे मित्र तुला चिडवतात मी बाजूने गेले की कुजबुजतात सगळे काळात होते आणि त्याची गम्मत ही वाटत होती. हळू हळू तू ही मला आवडायला लागला होतास हे आता मी कबूल करते. हे फक्त माझ्या एकाच मैत्रिणीला माहीत होते. त्यादिवशी मलाही वाटले होते की आता काही आपली भेट नाही आणि तुझे ते चोरून पाहणे ही नाही.
      ज्या दिवशी मलाही फोन आला ना आपल्या गेट टू गेदर चा त्यादिवशी मी ही खुश होते इतक्या वर्षांनी सगळे भेटणार होते आणि तू ही. मस्त वाटले खूप बोलता नाही आले पण नंबर मिळालं होते सगळ्यांचे. मी खूप दिवस वाट पाहिली पण तू काही कॉल केला नाहीस शेवटी मीच कॉल केला.  थोड्याफार फरकाने माझी ही अवस्था सारखीच होती. तुझ्याशी बोलून छान वाटतं होते. मलाही आठवतेय मी पहिल्यांदा तुझ्या गाडीत बसले तेव्हाच. आमची मैत्रिणींची बडबड सुरू होती आणि तू एकटाच बिचारा ड्राइवर सारखा. तरीही डोळ्याच्या एक कोपऱ्यातून तुझे माझ्याकडे बघणे जाणवत होते. मनातल्या मनात खूप हसू येत होते. तुला एक सांगू का तू काही बोलला नाहीस, तरी तुझे डोळे बरेच काही बोलून जातात. आपल्या प्रत्येक पिकनिक किंवा गेट टू  गेदर च्या वेळी तुझे माझ्या आसपास असणे सगळ्यांच्याच लक्षात येत होते. मला कधी कधी खूप हसू यायचे तुझे.
        ए!! तू म्हणालास ते अगदी खरंय त्या चॅट पेक्षा हे पत्र मस्त ऑपशन खरेच खूप मस्त वाटते लिहिताना आणि जास्त मोकळेपणानं लिहिता येते. आपण बहुधा शाळेत लिहिली त्यानंतर पत्र लिहिलीच नसतील ना कुणाला? हा बेस्ट मार्ग शोधल्यास तू. तसा हुशारच आहेस तू आणि स्मार्ट सुद्धा.
         मला ना तुझे खूप कौतुक वाटते की इतक्या सगळ्या गोष्टी होत्या पण तू अजिबात बोलला नाहीस. आणि मुळात तुझे प्रेम नव्हते हे स्पष्ट केलेस. हे पत्र एकआर्थी मला वाचायला मिळाले ते बरेच झाले. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यामुळे सगळे चिडवतील किंवा तू काहितरी गैरसमज करून घेशील म्हणून मला ही आता तुझ्याशी बोलणे टाळायाला नको. आता अगदी छान मोकळं मोकळ वाटतेय.
         शाळेनंतर आपण बऱ्याच वेळा समोरासमोर आलो पण कधी बोललोच नाही ना..मला तर तुझे शाळेतले रूप आठवून भीती वाटायची बोलायला यायची. आणि नंतर लग्न संसार करिअर यात गुंतून गेल्यावर हळू हळू विसर पडला. त्या गेट टू गेदर च्या निमित्ताने आठवण झाली सगळी. आता खूप बदलला आहेस तू. खूप समजूतदार आणि केअरिंग झाला आहेस. दर वेळी तुझे नवीन रूप समोर आले.  
       खरेच पण शाळेचे दिवस काही वेगळेच म्हणजे सगळेच असायाचे अभ्यासाचे टेन्शन , बाईंचा धाक, मजा मस्ती आणि प्रेमप्रकरणं सुद्धा. बहुतेक  पहिले प्रेम किंवा तुझ्यासारखी पहिली आवड हि शाळेतलीच असेल. आपल्या बॅच ला हि असे किती जण असतील ना ज्यांना कुणी ना कुणी आवडत असेल. मला ना तुझे पत्र वाचताना आताचा तो नवीन चित्रपट "ती सध्या काय करते " आठवला. तुझ्यासारखेच त्या पिच्चर च्या हिरो चे. शाळेतले पहिले प्रेम. हा आता तुझे प्रेम नाही म्हणता येणार इतकेच बाकी सगळे सारखेच. तीच हुरहूर , तेच चोरून पाहणे, आणि मुळात सगळे फक्त मनातल्या मनात ठेवणे. फक्त तो बोलला स्पष्ट आणि तू लिहून काढलेस इतकेच. पण खरेच मस्त मला तर खूप स्पेशल वाटते आहे. कुणाला तरी आपण आवडणे आणि ते हि इतकी वर्ष हे किती मस्त आहे. एकदम झकास !!!!. आणि मला तसे खूप जण म्हणतात कि तुझे स्माईल छान आहे पण तू बोलल्यावर जास्तच आवडायला लागले माझे मलाच. 
   तू म्हणालास तसे नक्कीच मला हि आयुष्यभर तुझी एक चांगली मैत्रीण बनून राहणे खूप आवडेल. आणि तू हि लक्षात ठेव कि काही गैरसमज झाले तर तू हि परस्पर निर्णय नको घेऊ. आम्ही मुली जरा रडूबाई असतो ना म्हणून. आणि माझी एक अट आहे हा आपण जेव्हा कधी भेटू त्या वेळी तू मला न विसरता एक चॉकलेट घेऊन यायचे. 
तुझी प्रिय मैत्रीण,
    ए पण एक मात्र नक्की आपण कुठल्याही वयाचे असलो तरी आपली आवडती व्यक्ती आपल्या समोर आली की पोटात आपोआपच फुलपाखरे उडायला लागतात.

आणि तू हि हसू नकोस पत्र वाचताना. आणि आपण ना ह्यापुढे ६ महिन्यातून एकदा तरी पत्र लिहू एकमेकांना तेवढीच गम्मत. 


Monday, 25 September 2017

मंदार

*मंदार*
खरे तर याच्या विषयी काय आणि किती लिहायचे हा खूप मोठा प्रश्न. आमची मैत्री कधी झाली नीटसे आठवत नाही. पण दहावीच्या सुट्टीत अमितच्या घरी केलेली मजा आठवते आहे. कदाचित तीच आमची पहिली नीट झालेली भेट.
त्यानंतर आमची बऱ्याच वेळा भेट झाली पण ती नुसतीच hi hello पर्यंत मर्यादित होती. मंदार चे घर साने काकूंच्या  शेजारी होते त्यामुळे अशा भेटी होत होत्या. पण पुढे हीच मैत्री इतकी घट्ट होईल असे वाटलेच नव्हते.
२००८ मध्ये जेव्हा आमचे पाहिलं गेट टू गेदर झाले तेव्हा आमचे काही जास्त बोलणे झाले नाही सगळेच पहिल्यांदा भेटत होते त्यामुळे प्रत्येकाशी मोजकेच बोलणे झाले. त्यावेळी प्रत्येकाचे फ़ोन नंबर घेतले . पण तरीही २००८ ते २०१० आमचे जास्त काही बोलणे किंवा भेटणे झालेले मला आठवत नाही. २०११ मध्ये जेव्हा त्याच्या नवीन घरी गेलो होतो तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या आणि तेव्हा वाटलं की आपण शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी भेटले पाहिजे आणि तिथून सुरू झाला आमच्या टीम १९९२ चा प्रवास.
कधी कधी मंदार चा खूप राग ही येतो. नुसता बॉसिंग करत असतो. हे कर ते कर नुसत्या ऑर्डर्स देणार. आणि मग त्याचा फॉलो अप . इतक्या वेळा एकच गोष्ट विचारेल की मग मी तर वैतागून सांगते तूच कर ना सगळे. आणि कधी तर असा वागतो की जगात हाच एकटा बिझी आहे बाकी रिकामी. पण तरीही तो आणि मी अगदी मनापासून काम करतो आमच्या ग्रुप साठी. ग्रुप मध्ये कार्यक्रमाचे मेसेज टाकणे , सगळ्यांना आठवण करून देणे बरीच कामे तोच करतो. कधी कल्पना त्याची कृती माझी तर कधी कल्पना माझी कृती त्याची. आता तर आम्ही एकमेकांना इतके ओळखतो की बऱ्याच वेळा त्याच्या आणि माझ्या कल्पना बऱ्याच वेळा सारख्याच होतात.
दाखवताना असे दाखवतो की मी कुठलीही गोष्ट सिरियसली घेत नाही पण तसा हळवा आहे. कुणी आजारी असो किंवा  कुणाचे काही झालेले असो याला जायला जमले नाही तरी फोन करून हा नक्की चौकशी करणारच.  कधी कधी  तो इतका पॅनिक होतो की बस मी आजारी पडले तर कार्यक्रम पुढे धकलूया म्हणत होता. एखादी गोष्ट नाही म्हटली की लगेच जाऊ दे मग सगळे कॅन्सल करू हे उत्तर ठरलेले. इमोशनल ब्लॅक मेल करणे कोणी याच्या कडून शिकावे. पण तरीही एक खूप चांगला, काळजी घेणारा आणि सगळ्यांना जोडून ठेवणारा आहे. मला जास्त अभिमान वाटतो की हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात तो त्याचा आई वडिलांच्या सोबत आहे आणि खूप छान सांभाळून आहे. अर्थात त्यात त्याला त्याच्या बायकोची म्हणजे मनालीची ही तितकीच उत्तम साथ आहे. मुख्य म्हणजे ती आमच्या मध्ये  ही अगदी मिसळून जाते.  मंदार बद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे त्याने " देहदान" केले आहे आणि आमच्या समोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
‌२०१४  मध्ये जेव्हा आम्ही सगळ्या शिक्षकांना बोलावून स्नेहसंमेलन करणार होतो तेव्हा काही कारणाने आमच्यात खूप वाद झाले होते . किती तरी दिवस आमचा अबोला ही होता. त्यानंतर जवळपास ६ महिने आम्ही एकमेकांशी नीट बोलतही नव्हतो. असे वाटत होते की कदाचित आता काही परत पूर्वी सारखे होणार नाही. एकमेकांना खूप बोलून सगळे आरोप प्रत्यारोप करून आम्ही मोकळे झालों होतो. पण आमच्या अबोलयाचा परिणाम जेव्हा जाणवायला लागला तेव्हा आम्ही दोघांनीही माघार घेतली.  हीच वेळ असते की ज्या वेळेला आपली मैत्रीची भावना आपल्याला सावरते. आणि एका गेट टू गेदर च्या निमित्ताने आम्ही परत बोलायला लागलो.  मैत्री च्या परीक्षेत आम्ही शंभर पैकी शंभर गुणांनी पास झालो. अशी तर लुटुपुटूची आमची बरीच भांडणं होतात रागाने कधी मी तर कधी तो ग्रुप ही सोडतो पण ते तेव्हढ्यापुरताच असते. आपल्याला कोणीतरी मस्का मारावा ही निव्वळ भावना. राग वैगरे प्रकार नाही.  आमचा ग्रुप जिवंत ठेवण्यामागे मंदार चा खूप मोठा वाटा आहे. सतत काही न काही बोलणे असतेच ग्रुप वर. मी केलेल्या कुठल्याही पोस्ट वर त्याचे कंमेंट नाही असे होतच नाही. मलाही त्याचे काही कंमेंट नाही आले तर चुकल्या सारखे होते. कोणाची फिरकी कशी घ्यायची हे त्याला पक्के ठाऊक आहे. मला तर चिडवून चिडवून बेजार करतो. आता आम्हाला एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करायची इतकी सवय झालीय की त्याने एखादी गोष्ट मला न सांगता दुसऱ्या कुणाकडून कळली तर वाईट वाटते. माझ्याशीच असे नाही तर प्रत्येकाशी त्यांचे संवाद सुरू असतात. पण तरीही कधीतरी सिक्रेट ठेवतोच. 

‌इथे ना एक गंमत सांगावीशी वाटतं अमित ला मंदार ला डिफेकटिव्ह पीस म्हणतो  मलाही आधी नवल वाटायचे असे का?? पण त्याची छोटी छोटी १०-११ ऑपरेशन झाली आहेत. काय सहनशीलता ....बापरे. कदाचित त्यामुळे तो अर्धा डॉक्टर झालाय😊😊.

‌मंदार मध्ये एकच बदल हवा त्यानें थोडे धीर धरायला शिकायला हवे. कधी कधी यामुळे तो आम्हाला सगळ्यांना धारेवर धरतो.

‌पण तरीही  एक चांगला मित्र , भाऊ ,मुलगा वडील आणि नवरा मला वाटतं सगळ्याच भूमिका तो व्यवस्थित पार पडतोय .
‌जोपर्यंत टीम १९९२ आहे तोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत किंवा जोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत तोपर्यंत  टीम १९९२ ची धुरा अशीच सांभाळत राहणार.👍

Wednesday, 20 September 2017

एक पत्र

प्रिय मैत्रीण ,

खरंतर पत्र लिहिण्याची काही गरज नाही आणि आताच्या मेसेजच्या जमान्यात अगदी आऊटडेटेड तरीही पत्र ते पत्र टाइप करण्यापेक्षा लिहून जास्त छान व्यक्त होता येते असे मला वाटते. . जे काही आहे ते आता आपण समोरासमोर बोलू शकतो इतकी मैत्री आपल्यात आता नक्कीच झाली आहे. पण तरीही काही गोष्टी अशा नाही जमणार मला तुझ्यासमोर बोलायला . अर्धे अधिक तर मी तुला पहिले कि विसरूनच जातो, तरी मला बोलल्याचे समाधान . म्हणून हा उपाय मस्त तुझ्यापर्यंत नाही पोचले तरी मला आपले बोलल्याचे समाधान. तू त्या दिवशी विचारात होतीस ना कि सांग बरे दोन चार आठवणी. आता सांगतो पण कंटाळू नकोस हा आणि हसू तर अजिबात नकोस. कारण तुझ्या स्माईल वरच तर फिदा झालो ना मी. आठवत नाही पहिल्यांदा तुला कुठे पाहिले ते. पण एक दिवस शाळेच्या गेटजवळ मुलींच्या घोळक्यात तुला  खळखळून हसताना पहिले आणि संपलोच मी. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी खूप वेगळीच वाटलिस तू इतर मुलींपेक्षा. आणि त्यानंतर मात्र माझा एकही दिवस गेला नाही कि मी तुला शोधले नाही. कधीतरी चोरून तर कधी समोरासमोर तुला पाहणे हा छंदच झाला होता माझा. शाळा सुटताना , भरताना अगदी मधल्या सुट्टीत सुद्धा फक्त तुला बघण्यासाठी माझा सगळं आटापिटा असायचा. मित्रांच्या किती शिव्या खाल्ल्या  आहेत ते माझे मलाच माहित. तू मला आवडतेस हे जवळजवळ सगळ्या वर्गालाच ठाऊक झाले होते . कदाचित तुलाही त्याची कल्पना आलीच होती. पहिल्यांदा मला कुणीतरी इतके आवडले होते आणि कुणीतरी आवडणे हि चूक नाही. म्हणून माझ्या खास मित्रांमध्ये मी हे बोललो हि होतो. त्यामुळे त्यांचे मला तुझ्यावरून चिडवणे अंमळ जास्तच वाढले होते. 

मला चांगले आठवतेय शाळा सुटताना एका मुलाने तुला धक्का मारला होता. कसले झापले होतेस तू त्याला. तुझ्या बरोबर तुझ्या दोन चार मैत्रिणी हि आल्या मग त्याला ओरडायला . तेव्हा मात्र थोडी भीती वाटली होती कसली डेंजर मुलगी आहे असे वाटले होते क्षणभर. मी हि तुझ्या मागे पुढेच असायचो शाळा भरताना आणि सुटताना त्या मुळे  थोडे टेन्शन आले होते. शाळेतही कुठल्या शिक्षकांनी काही  आणायला सांगितले कि जाता येता माझी नजर तुझ्या वर्गावर जायची. कधीतरी तू दिसायचीस कधीतरी नाही. मग थोडेसे नाराज व्हायला व्हायचे. तू शाळेला दांडी मारलीस कि माझा जीव मात्र कासावीस व्हायचा. मग दहा वेळा काही ना काही कारणाने आवारात दहा फेऱ्या व्हायच्या. 

आता अगदी आपण दोघेही संसारात व्यवस्थित रमलोय तरीही तुझ्याविषयीची ओढ किंवा आवड कमी झाली नाही. तुझ्या बरोबर लग्न करावे किंवा साधा रोमान्स करावा असे स्वप्नातही वाटले नाही. तुझे आसपास असणेही आवडायचे मला. मला अजूनही तू आपल्या सेंड ऑफ च्या दिवशी नेसलेली ती जांभळ्या रंगाची हिरव्या काठाची साडी आठवतेय. किती गोड दिसत होतीस तू त्यात. असे वाटत होते कि दिवस संपूच नये. कारण त्या नंतर शाळा हि बंद म्हणजे तुझे दिसणेही बंद मन कासावीस झाले होते. नंतर परीक्षेच्या काळात आपलीच शाळा सेन्टर असल्यामुळे दिसलीस तू पण त्या दहावीच्या परीक्षेच्या टेन्शन मध्ये बाकी काही सुचत नव्हते. 

त्यानंतर कॉलेज , जॉब लग्न सगळे होईपर्यंत आपले काही कधी भेटणे झालेच नाही. कधीतरी रस्त्यात एकमेकांसमोर आल्यावर एक स्माईल इतकेच . पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात तुझी छबी नेहमीच राहिली. तुला पूर्णपणे विसरलो असे कधी झालेच नाही. नंतर एक दिवस फोन आला " अरे !! आपल्या दहावीच्या बॅचचे गेटटुगेदर आहे. आणि मन परत भूतकाळात गेले. त्या निमित्ताने  तू परत भेटशील म्हणून त्या मित्राचे हजार वेळा आभार मानले असतील मी.  ज्या वेळी तुला पहिले ना त्या लाल रंगाच्या ड्रेस मध्ये किती छान दिसत होतीस. आणि तुझे ते हसू जसेच्या तसे सगळे विसरायला लावणारे. त्या दिवशीही माझ्या मित्रांनी मला काही सोडले नाही तुझ्या वरून चिडवणे सुरूच होते. त्या ऑकवर्ड स्थिती मुले तुझ्याशी धड बोलताही आले नाही मला. असा राग आला होता त्या मित्रांचा पण तरीही त्यादिवशी आपण सगळ्यांचेच फोन नंबर घेतले होते त्यामुळे एक आनंद होता मनात. पण तरीही तुला फोन करायचे हिम्मत काही झाली नाही. पण ज्या दिवशी तुझा फोन आला बापरे!!!! ऑफिस च्या खुर्चीत जवळ जवळ उडालोच होतो मी. किती बालिशपणा तरीही मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पहिल्यांदा तुझा आवाज ऐकला मस्त वाटले. अगदी नॉर्मल गप्पा मारून ५-१० मिनिटात फोन ठेवलास तू. मी मात्र आठवडाभर त्याच विश्वात होतो. कदाचित बायकोलाही ती गोष्ट जाणवली असेल. त्यानंतर मात्र बऱ्याच वेळा आपल्या छोट्या छोट्या भेटी होत होत्या. मला अजूनही आठवतेय तू पहिल्यांदा जेव्हा माझ्या गाडीत बसली होतीस पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होतास. तुला घरी ड्रॉप करेपर्यंत माझ्या काळजाची धडधड काही थांबत नव्हती. तू मात्र बडबड करण्यात दंग होतीस. तू, तुझी बडबड आणि तुझे हसू समोरच्याची पार विकेट घेते. 

पण तरीही एक गोष्ट सांगू का तू इतक्या मुलांशी बोलतेस अगदी मोकळेपणाने. शाळेतही तुला एका मुलाच्या नावाने चिडवायचे पण कधीही मला राग नाही आला. किंवा जळफळाट हि नाही झाला. तू माझी होतीस माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी. एकतर्फी प्रेम नाही म्हणता येणार तरीही अव्यक्त प्रेम म्हणता येईल. आता तर आपण इतके छान बोलतो. महिन्यातून कधी कधी तर आठवड्यातून हि बोलणे होते आपले. अगदी आपल्यात काही नसले तरी तुला गमवायची भीती वाटायला लागली आहे मला . तुझ्याबरोबर असताना ना का कुणास ठाऊक अगदी तरुण झाल्यासारखे वाटते. सगळे त्रास टेन्शन विसरायला होतात. तुझी बडबड ऐकत राहावीशी वाटते आणि तुझे हसू पाहत राहावेसे वाटते. एक विनंती आहे तुला समज उद्या देव ना करो आपल्यात काही गैरसमज झाले तर काही न बोलता बोलणे बंद नको करू. जमले तर बोलून किंवा भेटून गैरसमज दूर करू.  पण न बोलता मला न कळवता परस्पर निर्णय नको घेऊस इतकीच विनंती.  कारण माझ्या आयुष्यातली माझी पहिली आवड आणि माझी एक चांगली मैत्रीण मला गमवायची नाही. मैत्रीची हि अस्पष्ट रेषा ना ओलांडता सगळे सांभाळून अगदी मरेपर्यंत मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. कारण तुझे असणेच माझ्या साठी खूप जास्त महत्वाचे आहे. 

तुझाच एक मित्र, 

ता. क. :  व्याकरणाच्या चुका काढू नकोस आणि अक्षर पाहून किंवा लिहिलेलं वाचून हसू नकोस प्लिज







Tuesday, 19 September 2017

निरागस मैत्रीचे रूप...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स १५. ०९. २०१७ )

आम्ही आमच्या शाळेचे 

आम्ही चेंबूर च्या " आमची शाळा " चे १९९२ बॅच चे विद्यार्थी. आमच्या पैकी बरेच जण अजूनही चेंबूर मध्ये असल्यामुळे भेटीगाठी होत होत्या. एप्रिल २०१३ ला आमचा वॉट्सअँप चा शाळेचा ग्रुप बनवला.  आणि त्यानंतर  आम्ही  २९ जुन २०१३  ला चेंबूर ला आमच्या शाळेजवळच पहिल्यांदा भेटलो.  १९८८ मध्ये इयत्ता पाचवी  झाल्यावर मी चेंबूर ची आमची शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेले, नंतर तब्बल  २५ वर्षांनी मला माझे बालमित्रमैत्रिणी  भेटले. काय क्षण होते ते. इतक्यावर्षानंतर प्रथमच.. आम्ही साधारण ११ जण होतो त्यावेळी. बरेच जण बदलले होते तर काहींच्या चेहऱ्यात अजिबात बदल नव्हता अर्थात वय वाढल्याच्या खुणा थोड्या फार खुणा प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसत होत्या. त्यातले काही जण हि शाळा किंवा कॉलेज सोडल्यावर प्रथमच एकमेकांना भेटले होते.  पुन्हा भेटण्याच्या निमित्तानं सगळेच परत एकदा बालपणात रमून गेले होते. सगळ्या जुन्या आठवणी निघत होत्या , काहीत मी होते तर काहीं मध्ये मी नव्हते. मनातून थोडे वाईट वाटत होते कि मी बरेच काही मिस केले याचे. पण त्या पुनर्भेटीचा आनंद काही औरच होता.  त्यानंतर आम्ही दर ३ महिन्यातून एकदा भेटतोच. ' फ्रेंडशिप डे ' च्या निम्मिताने एक पावसाळी पिकनिक असतेच.  खूप मज्जा करतो आम्ही अगदी वय विसरून लहान मुलांसारखी मज्जा करतो.  अशा वेळी अगदी खूप व्यस्त असलेले आमचे बरेच मित्र मैत्रिणी आवर्जून वेळ काढून येतातच. दर वेळी अजून कुणीतरी नवीन मित्रमैत्रिण आमच्या सोबत असते. खूप छान वाटते जेव्हा मित्र मैत्रिणीची संख्या कमी न होता ती वाढत जाते.  आणि प्रत्येक वेळी आठवणींच्या आल्बम मध्ये नवनवीन आठवणींची भर पडत जाते. खरंच शाळेत झालेली ती निरागस मैत्री कायम तशीच राहते कारण तेव्हा जातपात , गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो. आमची हि मैत्री अशीच कायम निरागस आणि घट्ट राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . 




Saturday, 5 August 2017

मैत्री



"मैत्री" शब्द उच्चरला तरी आपल्या समोर बरीच माणसे येतात. लहानपणापासून अगदी म्हातारे होईपर्यंत आपली बऱ्याच जणांशी मैत्री होते. शाळेत, आजूबाजूला, कॉलेज मध्ये, मग नोकरी शेजारी, ट्रेन मध्ये, अगदी रोज येण्या जाण्याच्या रस्त्यावर सुद्धा आपली एखाद्याशी मैत्री होते. ह्या सगळ्या मध्ये प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या खूप जवळचे होते. त्या व्यक्तीला  आपण आपले सगळे त्रास, आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. ती हि व्यक्ती तितक्याच आत्मीयतेने आपले ऐकून हि घेते. प्रत्येक वयात झालेली मैत्री हि वेगळी  असते. बालपणीची,शाळेतली निरागस मैत्री, कॉलेज मध्ये थोडासा विचार करून केलेली,आई वडिल्यांच्या धाकाने मोजक्याच लोकांशी केलेली मैत्री. मग ऑफिस मध्ये ८ तास ज्याच्या सोबत काढतो त्यांच्याशी आपसूकच होऊन जाते ती मैत्री. मग शेजारी ज्यांच्या कडे " आमचा गॅस येणार आहे , घ्याल का जरा?" अशा काहीश्या  संवादाने सुरु होते ती मैत्री.  कधी कधी आपण त्या व्यक्तींना दुखावतो हि , कधीतरी आपण दुखावले जातो पण तरीही त्या व्यक्ती पासून आपण दुरावत नाही. 

मैत्री म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची मैत्रीची व्याख्या वेगळी.  कुणासाठी  फोन वर तास तास बोलने  म्हणजे मैत्री, तर कुणासाठी विकेंड ला हँगआउट करणे म्हणजे मैत्री. सध्याच्या ह्या वर्चुअल जगात मैत्री धरून ठेवणे बरेच सोप्प झालेय. कुठल्याही सोशल साईट वर ग्रुप करायचा आणि मग तिथे सगळ्यांशी मेसेजेस ने टच मध्ये राहायचे. पण याच साईट वर २४ तास ऑनलाईन असणाऱ्यां या मित्र मैत्रिणींना प्रत्यक्षात भेटायचे म्हटले तर बऱ्याच वेळा जमतच नाही. सातासमुद्रा पार राहणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींशी जोडून राहण्याचा हा उत्तम पर्याय असेलही पण खरंच आपण मनापासून असे किती जणांशी जोडलेले असतो. मैत्री म्हणजे तरी काय " "निखळ आनंद ' . ज्यांच्या सानिध्यात आपण आपले " मी " पण  हरवून बसतो ती खरी मैत्री. कितीही भांडलो तरी एका हाकेला धावून येणे म्हणजे मैत्री. तो बोलत नाही तर मी का बोलू असे ना करता " साल्या तुला काय धाड भरलीय ?? ना बोलायला....  " असे हक्काने विचारणे म्हणजे मैत्री. 

मैत्री दिनाच्या निमित्ताने एकमेकांच्या हातावर दोरे बांधून हल्ली मैत्री व्यक्त करतात. मला तर हसायलाच येते दुसऱ्या दिवशी ह्यांची मैत्री केराच्या टोपलीत जाते. हातावर पेनाने नाव काय लिहितात. त्यापेक्षा मनावर नाव गोंदवले तर ते कायम नाही का राहणार? अशी नुसती दिखाऊ मैत्री काय कामाची ? आपल्या आयुष्यात बरेच मित्रमैत्रिणी असतात, पण ज्यांच्याकडे आपण आपले मन मोकळे करतो असे जिवाभावाचे अगदी मोजकेच. लांब जाऊनही जे नेहमी हृदयाच्या जवळ असतात असे फार थोडेच,  कधी कधी बालपणापासून एकत्र असून एखाद्याशी आपली गट्टी जमत नाही तेवढी कधीतरी अचानक आपल्या आयुष्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीशी जमून जाते. 

मैत्रीचे दुसरे नाव म्हणजे " विश्वास". जिथे विश्वास नाही तिथे मैत्री टिकूच शकत नाही. मैत्रीत रोज भेटणे गरजेचं नसते पण जेव्हा भेटतो तेव्हा विरह काळाचा पत्ता न लागता एकरूप होणे म्हणजे मैत्री. " अरे!! आम्ही रोज बोलतो , he is or she is my good friend" असे म्हणणाऱ्या व्यक्तीला हि अडचणीत आपल्यावर सगळ्यात आधी जी व्यक्ती डोळ्यासमोर येते ती त्याची खरी मैत्री. आपला मित्र किवा मैत्रीण आपल्याशी कितीही भांडली असेल तरी हि सुखदुःखात आपल्यासमोर तीच व्यक्ती येते. पण मैत्री तरी कुठे आपण ठरवून करतो ती हि आपोआपच होते ना? असे म्हणतात मैत्री होण्यासाठी गुण नाही दुर्गुण जुळावे लागतात कधीतरी वाटते खरंच आहे कि काय हे जेव्हा शाळेत मित्रांसोबत केलेला दंगा आठवतो. 

मैत्री म्हणजे एखाद्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणे, नुसते स्वीकारणं नाही तर त्या दोषांना सुधारणे. नाही पटले म्हणून पटकन ब्रेक अप करता येतो प्रेमात, पण मैत्री अशी सहजासहजी तुटत नाही. आणि तुटलीच तर एक चांगला मित्र किंवा मैत्री गमावल्याची जाणीव मनाला आयुष्यभर सलत राहते. मैत्रीत नेहमीच समोरच्याला आपली चूक सुधारायची संधी देतो आपण. 

एक समीकरण मात्र पटत नाही कि एक मुलगा आणि एक मुलगी कधी मित्र बनू शकत नाही. जर एखाद्या मुलाला खूप मैत्रिणी असतील किंवा एखाद्या मुलीला खूप मित्र असतील तर ते काय प्रत्येकाच्या प्रेमात पडतात? एखादा मित्र आणि मैत्रीण एकमेकांना खूप जवळचे असले म्हणजे त्यांचे नाते मैत्रीपलीकडचे आहे असे समाजणे चूक नाही का?  मैत्रीला कशाचीच अट नसते ना वयाची ना स्त्री पुरुष अशा लिंगभेदाची. आपल्यापेक्षा खूप वयाने खूप जास्त असणारी व्यक्ती हि आपली मित्र असू शकते ना. मन जुळली आणि आपोआप मैत्री होते. मग वेळ काळ जागा याचेही बंधन नसते. 

वयाच्या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला कुणाची ना कुणाची गरज लागते ज्यांच्या कडे आपण व्यक्त होऊ शकतो. अशी हि मैत्री प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी. आपल्यातले लहान मूल  जपणारी. आपले प्रत्येक दुःख सुखकर करणारी अशी हि मैत्री."  मैत्रीत प्रेम नसले तरी प्रेमात मात्र मैत्री नक्कीच हवी. 

एक अक्षरही ना बोलता डोळ्यातले भाव वाचते ती " मैत्री", " मी ठीक आहे" असे म्हणताना आपल्या मनातली वादळे ओळखते ती  " मैत्री", काहीही ठीक नसताना , आपल्या पाठीवर विश्वासाने हात ठेवून " सगळे ठीक होईल" असा विश्वास देते ती  " मैत्री", स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रुना थांबवून समोरच्याचे डोळे पुसते ती  " मैत्री", सगळे मतभेद भांडण विसरून आपल्याला मनापासून स्वीकारते ती  " मैत्री", दुःखात एकटेपणात ज्या आठवणींनींनी ओठांवर हसू फुलते ती  " मैत्री". 

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्पयावर मला भेटलेल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना , २५ वर्ष लांब राहूनही मला अजिबात ना विसरणाऱ्या , मी त्यांची बालमैत्रीण नसूनही मला त्यांच्यात मिसळून घेऊन मला आपलेसे करून घेणाऱ्या , माझ्या चुका , माझी बडबड सगळ्या कडे दुर्लक्ष करून मला एक चांगली मैत्रीण बनवणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. 











Thursday, 20 July 2017

स्त्री

आपण कितीही पुढारलो ना तरी स्त्री पुरुष हा भेद आपल्या मधून जाणे फार कठीण आहे. जाईल पण अजून बरीच वर्ष लागतील त्या गोष्टीला. आताही बघितले तर स्त्रीभृण हत्या थांबण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, किती जनजागृती केली जाते तरीही हे प्रमाण काही कमी होत नाही. असे पाहायला गेलो तर टीव्ही मालिकांचा आपल्या आयुष्यावर किती तरी मोठा पगडा असतो . पण त्यातल्या वाईट गोष्टी पटकन घेतल्या जातात. पण त्याच मालिकांमध्ये मुलगी झाली म्हणून आनंद साजरा करणे हे मात्र बरेच जण नाक मुरडून पाहत असतील. मी मेल्यावर मुलगाच मला अग्नी देणार अशीच धोरणा साधारणपणे सगळी कडे आहे. पण आज प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली मुलगी आपल्या आई बाबाना अग्नी देऊ शकत नाही का ? मधली आहे म्हणून मुलीने अग्नी द्यायचा नाही तोच जर दोन बहिणींच्या मध्ये मुलगा असता तर त्या मधल्या मुलाने अग्नी दिलेला चालतो. पण आयुष्यभर सांभाळणाऱ्या मुलीने नाही. किती विचित्र पद्धती आहेत ना आपल्याकडे?

अजूनही बाई म्हटली कि ती अबला च असाच गृह केलेला असतो. आजही बलात्काराच्या , छेडछाडीच्या कितीतरी घटना आपण वाचतो ऐकतो. यात प्रत्येक वेळी एक स्त्रीच असते जी छळली  जाते.  आतापर्यन्त आपण अशा किती घटना ऐकल्या आहेत कि ज्यात  ४-५ मुलींनी मिळून एका मुलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला? किंवा २-३ टारगट मुलींनी एखाद्या मुलाची छेड काढली ? नाही !!!!! अशी एकही घटना आपल्या ऐकिवात नसते. ज्या स्त्रीच्या उदरातून तुम्ही जन्म घेता तिचाच विनयभंग करताना शरम नाही वाटत?  पुरुषांना वाटत स्त्री बद्दल आकर्षण तसे स्त्री ला नाही वाटत? पण ती तिच्या मर्यादा ओळखून असते.  

स्त्री ला सगळीकडेच बंधनात ठेवण्याचा प्रयत्न असतो. एखादा पुरुष कामानिमित्त ऑफिस मध्ये थांबला तर तो कामसू त्याची कामा प्रति श्रद्धा आणि तेच जर एखादी बाई थांबली तर हिला काही घरदार नाहीच नुसते कामाचे नाटक करत असते . आणि नाही थांबली तर हिलाच का एकटीला घरदार आम्ही काय रस्त्यावर पडलोय अशी धारणा.  पुरुष अर्ध्या चड्डीत कुठेही फिरू शकतो, उधडाबंब राहू शकतो. तेच जर एखाद्या मुलीने छोटे कपडे घातले तर तिला पाहून यांच्या नको त्या भावना जागृत होतात. आणि मग अगदी आशाळभूत नजरेने तिचे निरीक्षण केले जाते. मग याना ना स्वतःच्या वयाचे भान असते ना लाज असते.  हेच स्वभावात हि एखादा पुरुष जर १० बायकांशी बोलत असेल तर किती मनमिळावू, किंवा कोणी त्याच्याशी बोलत असेल तर त्याचे व्यक्तिमत्वच किती छान कि सगळ्यांना हवासा वाटतो. पण हेच जर त्या जागी एखादी बाई असेल तर ती ना तसलीच आहे सतत पुरुषांमध्ये असते. काही लाज शरम नाही तिला. जरा मर्यादा ठेवून वागायचे सगळ्यांशीच काय ते गोड गोड बोलायचे.  आणि त्यातही मग बऱ्याच जणांचा ग्रह असा होतो कि हि काय आपलीच आहे. आणि तिच्याशी वाटेल तसे वागायला मोकळे. तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून ती आपल्याशी चांगली वागते नाही  हा विचार यांच्या डोक्यात येतच नाही. आणि मग ती त्याच्याशी अशी वागते मग माझ्याशी का नाही म्हणून तिला छळायला  हि तयार. एखाद्या पुरुषाचे जर लग्नानंतर संबंध असतील तरी बऱ्याच वेळा पत्नीला ते स्वीकारावे लागतात . पण याच गोष्टीचा स्त्रीने विचार करणे हि पाप.

इतकंच कशाला तर दुकानातून समान घेतल्यावर उरलेले पैसे देताना काही लोक चावट स्पर्श करायला ही मागे पुढे पाहत नाहीत. रस्त्याने चालताना हाताचा कोपरा मुद्दाम बाहेर काढून स्पर्शसुख घेणाऱ्यांची  ही कमी नाही. बाई जरा सुंदर असली की यांचा लाळ घोटेपणा सुरू. सगळ्या बाजूने नुसत्या हापापलेल्या नजरा. एखाद्या स्त्री ला मदत केली की तिच्याकडून वेगळ्याच प्रकारच्या परतफेडीची अपेक्ष् करणारे लोकही कमी नाहीत. अशाच आंबटशौकीनां मुळे स्त्री ला नको त्या व्यवसायात ढकलले जाते.

कुठल्याही नात्यामध्ये सहनही स्त्रीलाच करावे लागते. प्रत्येकाला प्रेयसी मॉडर्न आणि बायको मात्र साडीतलीच हवी असते.  लग्न आधी तिचे काही असल्यास ह्यांना त्रास का तर स्त्री च्या व्हर्जिनिटी चा पुरावा असतो. मग तुमचे काय ? हे दहा जणींना फिरवून नामानिराळे. यांच्या व्हर्जिनिटीचा पुरावा काय? तिने मात्र नवऱ्याला असेल तसे स्वीकारायचे. आणि स्वतः मात्र संशयी नवऱ्याचा आयुष्यभर मर खायचा. नवऱ्याचे व्यसनही हे रोजचेच आहे म्हणून सोडून द्यायचे. तिला हि हजार त्रास असतात पण तिने व्यसन करणे पाप. विवाहित स्त्री ने परपुरुषांशी बोलणे हि चालत नाही आपल्याकडे.  बायको असो कि प्रेयसी प्रत्येकाला ती आपली खाजगी मालमत्ता वाटते. तिने आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाशी हसून बोलणे, जवळीक साधणे  याना नकोसे असते. याना मात्र कुणाशीही कसेही वागायचा परवाना मिळालेला असतो. काही वेळा तर असे असते की एकाने तिला नाकारले तर दुसरा दिला आपुलकी चा खांदा द्यायला तयार जसे तिचे प्रेम म्हणजे बस ची सीट एक जण उठले की दुसरा बसायला तयार.  तिच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारे ही कमी नाहीत.

आज किती तरी ठिकाणी फक्त एक स्त्री आहे म्हणून तिच्या बोलण्याला महत्व दिले जात नाही. हे काम बाईने होणार नाही म्हणून तिला मागे टाकले जाते. आज सगळ्या ठिकाणी आपला ठसा उमटवून पण स्त्री नेहमी उपेक्षितच असते.  प्रत्येक पुरुष वाईट असतो असे नाही पण समाजातले ७५% लोकांची विचारधारणा स्त्री बद्दल सारखीच असते. 

एकच सांगणे आहे कि स्त्री ला एक वस्तू म्हणून बघणे सोडून द्या . तिचा आदर करा.  तिला मुक्तपणे जगू द्या. तिच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढणे सोडा. तिला तिची स्पेस द्या. ती लक्ष्मी आहे तिला तसेच तेव्हा. तिने जर  कडकलक्ष्मी चे रूप धारण केले तर मग तिच्यापासून तुमचे रक्षण कुणीच नाही करू शकत. 







Friday, 7 July 2017

प्रिय अंकुश.......

आपल्या प्रिय अभिनेता किंवा अभिनेत्री ला पत्र लिहावे असे बऱ्याच जणांना वाटत , मलाही वाटायचे नेहमी. असाच माझा हा प्रयत्न माझ्या लाडक्या अभिनेता " अंकुश चौधरी" याला पत्र लिहिण्याचा. हे वाचून तुम्हालाही तुमच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण येतील. 


प्रिय अंकुश ,

खूप दिवसापासून इच्छा होती तुला पत्र लिहायची. तशी तुला आतापर्यन्त बऱ्याच जणींनी पत्र लिहिली असतील. खरे तर तुला "अहो जाहो" केले पाहिजे कारण तू सेलिब्रिटी आहेस ना. पण मी तुला "अरेच " म्हणणार कारण तू आम्हाला नेहमी आमच्यातलाच वाटतो. आणि  कदाचित आपण साधारण सारख्याच वयाचे आहोत.

माझ्या आयुष्यातले पहिले नाटक , शिवाजी मंदिर ला पाहायला गेले होते नवीनच नाटक जेमतेम १२-१३ प्रयोग ते नाटक होते " ऑल द बेस्ट". ते नाटक पहिले आणि तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले. तुझे दिसणे , उंची, ऍक्टिंग  सगळेच भारी होते.  त्यानंतर फक्त तुझ्यासाठी म्हणून ते बऱ्याच वेळा पहिले.  बऱ्याच वर्षांनी मराठीत असा देखणा ऍक्टर  आला.त्यानंतर तुझा आलेला एकही सिनेमा मी चुकवला नाही. त्या काळात फार कमी मुली अशा असतील कि ज्यांना तू आवडत नसशील.  त्यावेळी बड्या बॉलीवुड स्टार च्या जोडीने तुझीही पोस्टर्स मुलींनी आपल्या कपाटात लावली असतील.  आणि किती तरी जणींच्या स्वप्नांवरही अधिराज्य केले असशील. 

कधी कोणी विचारले  की तुझा आवडता अभिनेता कोण तर साधारण पणे बॉलीवूड मधल्या एखाद्याचे नाव अपेक्षित असते पण मला कोणी विचारले तर एक क्षणाचाही विलंब न करता माझे उत्तर असते "अंकुश चौधरी".


तुझे प्रत्येक काम छान असते मध्ये काही वेळा त्यात एकसुरीपणा आल्यासारखे वाटत होते पण त्याच वेळी वेगळया धाटणीचे सिनेमे करून तुझी अभिनयक्षमता सिद्ध केलीस. आता तर तुझा अभिनय जास्त परिपक्व वाटतो. तुझ्या बऱ्याच भूमिका सामान्य माणसाला आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. यंदा कर्तव्य आहे मधला राहुल ,मातीच्या चुली मधला विशाल , सावरखेड एक गाव मधला राहुल आणि डबल सीट मधला 'अमू'   असे वाटत कुणीतरी आपल्या च आजूबाजूची ही व्यक्ती आहे. तू साकारलेल्या DSP आणि सत्या , प्रत्येक कॉलेज मध्ये असा कोणीतरी एक सिनिअर असतोच ज्याला अख्ख कॉलेज टरकून असते. आणि आताच तुझा ' ती सध्या काय करते' मधला 'अनूराग' कसला दिसला आहेस तू त्यात एकदम भारी. तुला पाहताना सगळ्यांच आपले जुने प्रेम आठवले असेल. आणि माझ्या सारख्या किती जणींना असे वाटले असेल की 'अरे  यार त्या तन्वी च्या जागी मी असायला हवे होते. ' शेवटच्या त्या गच्ची वरचा सीन पाहताना नकळत डोळ्यात पाणी येते. जत्रा मधल्या "ये गो ये मैना"वर कैती छान नाचाला आहेस. आणि दिसण्याच्या बाबतीत तर तुझी तोडच नाही. दर वेळी ते गाणे पाहताना काळजचा ठोका चुकतोच. मराठीतला रोमँटिक हिरो कोण म्हटले तर पहिले नाव तुझेच येते डोळ्या समोर.  असे कितीतरी सिनेमे आहेत कि ते पाहताना असे वाटते कि " या भूमिकेसाठी अंकुश हवा होता" जास्त मजा अली असती.  

पण नुसते रोमँटिक सिनेमेच नाही तर 'रिंगा रिंगा' ' गैर ' मधले तुझी अँटी हिरो, आणि ' पोरबाजार ' मध्ये तू साकारलेली माहिती निगेटिव्ह भूमिका सगळेच अफलातून.  झकास मधल्या तुझ्या तीन भूमिका किती छान निभावल्यास तू. दगडी चाळ मधला सूर्या  त्या काळी  खरेच अशा चुकीच्या ठिकाणी अडकलेल्या मुलांचे चित्र तू तंतोतंत उभे केलेस आणि चेकमेट मधला विशाल,त्यातही   तुला त्रास दिला म्हणून त्या कै . विनय आपटे चा हि राग यायचा   , ते माझ्या आवडत्या कलाकारांच्या यादीत असले  तरीही .  कुठलेही काम असो तुझी स्टाइल काही वेगळीच. कसे आहे ना आपण सामान्य माणसे पटकन रिलेट करतो सगळ्याला. आणि टीव्ही , सिनेमा म्हणजे आपला सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे.  

कुठल्याही अवॉर्ड च्या वेळी तुझ्या बरोबर  अगदी एखाद्या सिनियर कलाकाराचे नामांकन असेल ना तरी मला वाटते कि हे बक्षीस तुलाच मिळायला हवे. ज्यावेळी तुला सलग ३ वर्षे " महाराष्ट्राचा  स्टाइल आयकॉन " हा पुरस्कार मिळाला ना तेव्हा कसले भारी वाटले होते. कुठल्याही अवॉर्ड फंक्शन च्या वेळी जर तुझे नामांकन असेल  तर मी सतत देवाचा धावा करत असते कि तुलाच अवॉर्ड मिळू दे. जसे क्रिकेट च्या वेळी इतर लोक करत असतील ना तसे.  आभाळमाया, हसा चकटफू मधला साधा मुलगा . महाराष्ट्राचा स्टाइल आयकॉन किती भारी.  मला तर तू हिंदी सिनेमांच्या हीरोंपेक्षा  भारी वाटतोस.  

ज्या वेळी आम्ही कॉलेज ला होतो तेव्हा टीव्ही  आणि थिएटर शिवाय पर्याय नव्हता. एकदा तुझा नाटक व सिनेमा पाहून पोट  भरत नव्हते.  आता काय यू ट्युब वर कधीही बघता येते. तुझा "ती सध्या काय करते" मी १० वेळा तरी पहिला असेल. तुझी कुठलीही मूवी  टीव्ही वर लागली कि आमच्या घरातल्या रिमोट वर फक्त माझेच अधिराज्य असते. ऍडव्हर्टाइज च्या वेळी हि चॅनेल बदलायला देत नाही.  आणि हल्ली तर मी थिएटर मध्ये फक्त मराठी सिनेमेच पहाते . आणि तुझे जवळ जवळ ९०% सिनेमे मी थिएटर लाच पाहिलेत.  कुठल्याही चॅनेल वर जर तू आलास तरी माझी मुलगी ओरडून सांगते " मम्मी अंकुश" आणि मी हातात असेल ते काम सोडून तुला पहायला धावत बाहेर येते. इतकेच काय तर तुझ्या वाढदिवसादिवशी माझा डीपि हि तुझाच फोटो असतो.  वयाला ना सजणारी कृती असते पण काय करणार तुझी जादूच अशी आहे कि बस......... 

तुझ्यावर टीका करणारे लोक हि भेटलेत भरपूर. पण मला असे वाटते जसे एका चांगल्या डॉक्टर चे पण कुणाकुणाला वाईट अनुभव येतात. मग तुला नवे ठेवणारे लोक असणे साहजिक आहे ना. आणि माणूस जितका मोठा आणि प्रसिद्ध तितके त्याचे टीकाकार जास्त.  पण कोणी काही म्हणो तू ज्यांना आवडतो त्यांच्या वर या गोष्टीचा काडीमात्र फरक पडत नाही.  तुला गम्मत सांगू मी एकदा तुझी तुलना एका मोठ्या अभिनेत्याशी केली तर सगळे हसायला लागले मला पण काय करणार माझ्या साठी तू कुठल्याही महान अभिनेत्या पेक्षा कमी नाही ना !!!!!

सगळ्यांची असती ना तशी माझी हि एक इच्छा आहे कि एकदा तरी तुला भेटून तुझ्या सोबत सेल्फी घ्यायचा आहे. अर्थात हे काही शक्य नाही. पण झाले तर जमिनीपासून दोन इंच वर असेन  मी नक्कीच. खरेच तू माझे पहिले "क्रश" आहेस, आणि आवडता अभिनेता हि. अशीच छान छान कामे करत रहा . आणि आमच्यासारख्या तुझ्या चाहत्यांना सतत टीव्ही वर दिसत राहा. 


तुझीच एक चाहती,
मिलन 


इतके सगळे लिहून झालेय तरी  अजूनही वाटतेय " किती सांगायचंय तुला , किती सांगायचंय  तुला  ......... "









Wednesday, 21 June 2017

मी कोण होणार??


जरा कुठे मुलं शाळेत जाऊ लागलं की जो तो विचारतो "मोठा होऊन तू कोण होणार बाळा?"  मग ते बाळ ही आई बाबांनी  शिकवल्या सारखे बोलते की "मी अमुक होणार !!मी तमुक होणार!!". बिचाऱ्या त्या जीवाला माहीत ही नसते की त्या पेशा ची जबाबदारी काय आहे त्याला फक्त माहीत असते की आपण आपल्या पालकांसारखे मोठे होणार.  आपल्याला कुणीतरी मोठे व्हायचे आहे या आनंदात तो छोटासा जीव असतो पण पुढे जाऊन त्याला कशा कशाला सामोरे जायचे आहे याची मात्र त्याला बिलकुल कल्पना नसते. आपण सगळेच या प्रश्नांना सामोरे गेलो आहोत. 

प्रत्येकाचे कोणीतरी रोल मॉडेल असते. क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींमधील लोकं जास्त असतात कारण आपल्या देशात या दोन गोष्टीना इतर कशापेक्षा हि जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे साधारण कुणाला हि विचारले कि तुला काय काय व्हायचे आहे तर मुलांमध्ये जास्त मला "सचिन" किंवा "विराट" किंवा एखाद्या क्रिकेटर चे नाव घेतो.  आपण कोण होणार हे तर ठरवतो पण कारण त्या वेळेला आपल्याला त्या व्यक्तीची प्रसिद्धी , तिचे सगळ्याच माध्यमात पॉप्युलर असणे, पैसे दिसत असतात पण त्यामागे लागणारी मेहनत, हवा असणारा आत्मविश्वास हे सगळे आपल्याकडे आहे का? हा विचार करण्याचे वय नसते ते. आणि त्यात काही पालक हि मुलांच्या या बाळबोध विचारांना खतपाणी घालतात. 

आपल्या कडे पहिल्या पासूनच शिकवले जाते कि मोठे होऊन डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे. आणि त्या साठी त्या मुलाच्या हात धुवून मागे लागले जाते. त्याला झेपत नसलेलं ओझे मुलावर टाकले जाते आणि मग काही जण फक्त मानसिक त्रास भोगतात. व्हायचे असते कुणीतरी वेगळे आणि होतात कुणीतरी वेगळे. स्वतःच्या इच्छा मारून पालकांच्या इच्छेखातर वेगळा मार्ग निवडावा लागतो. 

सगळ्यांचाच कल  पैसे आणि प्रसिद्धी असणाऱ्या पेशांमध्ये असतो. पण त्या साठी खंबीर मनाचीही आवश्यकता असते. त्या ठिकाणी असणाऱ्या रॅट रेस मध्ये आपला कितपत निभाव लागणार आहे हे नाही पहिले जात. आणि नंतर डिप्रेशन किंवा आत्महत्या हे पर्याय निवडले जातात.  आपण किती वेळा ऐकतो वाचतो अशा बातम्या पण त्याच्यावर हळहळ व्यक्त करतो, त्या व्यक्तीला दोष देतो आणि सोडून देतो पण त्यावर विचार मात्र करत नाही.  आपल्या पाल्याने काय व्हावे हे ठरवण्यापेक्षा त्याला नक्की काय व्हायचे आहे हे पहिले तर कदाचित त्याच्या आवडीच्या क्षेत्रात तो सर्वोत्कृष्ट  असेल. 

मी एकदा टीव्ही वर पहिले होते एक अभिनेत्री म्हणाली होती कि " जे कराल ते इतकं उत्कृष्ट करा कि दुसरे कोणी त्याला करताना दहा वेळा विचार करेल. म्हणजे कांदा चिरला तरी इतका सुंदर  चिरा कि दुसरे कोणी  तसा चिरणार नाही ". "मी अमुक होणार मी तमुक होणार "असे प्रत्येक जण म्हणतं आणि आपणही " वा छान!!!" हा असे म्हणून त्याला शाबासकी देतो. पण कुणी हा विचार का करत नाही कि मी " मी होणार". 'मी कुणासारखा तरी आहे या पेक्षा कुणीतरी माझ्यासारखं व्हायला हवे अशी मी माझी ओळख निर्माण करेन' या गोष्टीत जास्त आत्मविशास आहे ना. आपण प्रत्येकाने मुलांच्या मनात हि भावना रुजवली पाहिजे.  कुठल्याही क्षेत्रात जा पण तिथे स्वतःचा ठसा उमटावा. मी कुणाच्या तरी आखून दिलेल्या मार्गावर चालणार कि मी स्वतः स्वतःचा मार्ग आखणार हे आपण ठरवायचे असते. 

" शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात" अशी विचारसरणी असते आपली. आता पर्यन्त आपण कधी ऐकले नसेल कि एखादे बाळा म्हणते कि मला " शिवाजी व्हायचे आहे". अगदी गड किल्ले सर करणारे नको पण निदान अन्यायाविरुद्ध लढणारे तरी शिवाजी बनवा कि मुलांना . एकुलत्या एक मुलाला सैनिक होऊ द्यायचे नाही असाही विचार करणारी लोक आहेत, तर शिवाजी होणे दूरच. 

" मी कुणीतरी होणार " यापेक्षा " मी एक चांगली व्यक्ती होणार" असे जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवू ना त्यावेळी खऱ्या अर्थाने " मी कोण होणार ?? " या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडेल. 


Saturday, 10 June 2017

पावसाळा


उन्हाच्या गरम काहिली नंतर सगळ्यांच्याच मनाला गारवा देणारा ऋतू . पावसाळा हा सगळ्यात रोमँटिक ऋतू आहे असे म्हटले पाहिजे. नुसते वातावरण जरी पावसासारखे झाले तरी मन प्रसन्न होते. कडक ऊन्हानंतर अंगावर पडणारा पहिला पावसाचा थेंब एक सुखद अनुभव देऊन जातो. पहिल्या पावसानंतर येणार तो मातीचा मंद सुगंध , त्या सुगंधाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, जणू मातीचे आणि अवकाशाच्या मिलनाचे निम्मित आहे हा पाऊस. आणि त्या स्पर्शाने हि धरतीची मोहरून गेली आहे एखाद्या प्रेयसी सारखी. पहिल्या पावसानंतर वर्षभर त्या सुगंधाची वाट पाहावी लागते अगदी प्रेयसीला प्रियकराची पाहावी लागते तशीच . 

पावसाची रूपं हि भरपूर कधी कधी आईच्या माये सारखा हळुवार, कधी बाबांच्या रागासारखा  मुसळधार, कधी प्रेयसी सारखा प्रेमळ आणि रोमँटिक, तर कधी कधी रागावलेला , सगळे उध्वस्त करणारा एखाद्या आतंकवाद्यासारखा. पण कधीतरीच तो आपण उग्र रूप दाखवतो , नेहमी असतो तो हळुवार, धुंद आणि हवाहवासा वाटणारा.  

पावसाची सुरवात म्हणजे  मुलांसाठी सगळेच नवीन ... नवीन वर्ग, पुस्तक, नवीन ड्रेस. आणि गम्मत म्हणजे पाऊस खूप पडला म्हंणून शाळेला मिळणारी सुट्टी. रेनकोट घालून, पाठीवर दप्तर घेऊन त्या पावसाच्या पाण्यात उड्या  मारत जाणारी,  साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी  छोटी छोटी मुले पहिली कि आपल्याला हि लहान व्हावेसे वाटते.    तसे आपल्या सगळ्यांचं हा पाऊस आवडतो. कारण कधीतरी मोठ्यांनाही याच्या मुले ऑफिस ला दांडी मारता येते. "अरे नाही रे आमच्या कडे खूप पडतोय पाऊस, गुढघाभर पाणी झालीय सोसायटी समोर आज नाही येणार ऑफिस ला !!!" असे म्हणून ऑफिस ला बुट्टी मारायची. आणि घरी बसून मस्त पैकी गरमागरम भजी आणि  वाफाळत्या चहा चा आस्वाद घ्यायचा. 

"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे " खरेच पावसामुळे सगळी कडे कसे हिरवेगार होऊन जाते. याच ऋतूत असते ती भाज्यांची रेलचेल,  वेगवेळ्या प्रकारच्या फक्त या ऋतूत मिळणाऱ्या काही खास भाज्या. याच ऋतूत येतात आपली सण , नागपंचमी, गौरीगणपती , गोपाळकाला आणि असे बरेच. सगळ्यांना एकत्र आणणारे आणि आपला उत्साह वाढवणारे हे सण.  

या पावसात " वर्षा सहलींचा" सपाटा असतो. आणि मग गुगल वर "places to visit in rainy season " हे सर्च केले जाते. ठिकाणे ठरवली जातात आणि मग झुंडीच्या झुंडी लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर अशा ठिकाणी निघतात.  पण खरेच या पावसाळी पिकनिक ची मजा काही औरच. मुसळधार पावसातून मित्र मैत्रिणीनं सोबत गाडीतून लांब फिरायला जाणे म्हणजे स्वर्ग सुखचं. प्रेमीयुगुलांसाठी तर हा खूपच खास ऋतू. एका छत्रीत एकमेकाना सांभाळत , लाजत, एकत्र भिजण्याची  मजा काही औरच.  पाऊस पडत असताना मुद्दाम छत्री न घेता पावसात भिजायचे आणि मग रस्त्यावर उभे राहून गरमागरम भाजलेले मक्याची कणसे खायची हि गम्मत तर प्रत्येक जण अनुभवतोच मग ते शाळेत जाणारे मुल असो कि ऑफिस मध्ये बॉस असलेला ५०शी चा माणूस असो. 

कधी कधी मात्र कंटाळा येतो या पावसाचा. रस्तात होणार चिखल, हातातल्या पिशव्या , छत्री , कपडे सगळे सांभाळताना होणारी कसरत फार कंटाळवाणी असते.  त्यात पावसामुळे जर ट्रेन बंद झाल्या तर अजूनच राग येतो. खरे तर राग माणसांवर असतो पण आपण दोष मात्र त्या पावसाळा देतो. कधी तरी अवेळी केलेल्या आगमनामुळे होणारी धावपळ. आणि मग ओलेत्या अंगाने ऑफिस मध्ये करावे लागलेले काम.  पण तरीही आपण सर्वच या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो अगदी चातक पक्षासारखी. 

पावसामुळे जशी झाडे, रस्ते आणि सगळ्याच गोष्टींवर साचलेली धूळ पाण्याबरोबर वाहून जाते आणि सगळे स्वच्छ होते तसेच आपण हि वर्षातून एकदा तरी आपल्या मनावरची धूळ , क्लेश, मरगळ, द्वेष, सगळे धुवून स्वच्छ मनाने सगळ्याची नव्याने सुरवात केली पाहिजे. आणि पावसात जशी सगळीकडे प्रसन्न करणारी हिरवळ असते तसे आपले मनही प्रसन्न केले पाहिजे. 

देवा कडे इतकीच प्रार्थना आहे कि दरवर्षी इतका मुबलक पाऊस पाड कि आमच्या कुठल्याही शेतकरी राजाला आत्महत्या करायची वेळ नको येऊ दे. आणि इतका हि नको जास्त पाडूस कि त्यात सगळ्यांची घरंदारं वाहून जातील. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करून पर्यावरण जपायचे. 

हे सगळे वाचताना आपल्या सगळ्यांना एक गाणे नक्कीच आठवायला हवे..... 


येरे येरे पावसा , तुला देतो पैसा 
पैसा झाला खोटा , पाऊस आला मोठा  ....... 






Thursday, 8 June 2017

ट्रेन मधून पर्स पडली अन ....... (महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स ०८. ०७. २०१७)

अजूनही आठवतो तो दिवस २१ सप्टेंबर २००८, रविवार होता सकाळी बँकेतून पैसे काढले ऑफिसचे आणि धावत ट्रेन पकडली. ट्रेन सुटणार होती म्हणून शेवटच्या बाराव्या डब्यात चढले. रविवार असला तरी बऱ्यापैकी गर्दी होती ट्रेन ला. एकाच स्टेशन नंतर उतरायचे म्हणून मी दारातच उभी होते. गाडी माझ्या उतारायाच्या स्टेशन ला लागतच होती इतक्यात मागून कुणीतरी बॅग ओढल्यासारखे वाटले आणि माझ्या बॅगचा बेल्ट तुटून बॅग खाली ट्रॅक मध्ये पडली. बापरे !!!ऑफिस चे पैसे, मोबाइल, माझे पाकीट, पास सगळेच त्यात. ब्रम्हांड आठवले, आपल्या पैशाचे काही नाही पण ऑफिस चे पैसे, जास्त नव्हते  पण तरीही उगाच आपल्यावर नको तो आळ येणार या विचारानेच धडकी  भरली. गाडी प्लॅटफॉर्म ला लागत होती पण  मला काही राहवेना आपण शेवटच्या डब्यात आहे हे विसरूनच गेले आणि ७व्या डब्याच्या इथेच चालत्या ट्रेन मधून उतरायला गेले. ट्रेन च्या गती मुळे  धाडकन खाली प्लॅटफॉर्म वर पडले. ट्रेन मधले आणि प्लॅटफॉर्म वरचे सगळेच ओरडायला लागले. समोर एक आजोबा म्हणाले " अग! अक्कल नाही का उडी मारतेस ?" मी फक्त " माझी पर्स" इतकंच म्हणून उठून धावत सुटले. दोन्ही गुढघे , कोपराना लागले होते. ड्रेस हि जरासा फाटला होता पण त्यापेक्षा जास्त मला त्या पर्स ची चिंता होती. धावत पहिल्या डब्या जवळ पोचले तिथे एका मुलाने माझी पर्स उचलून तिथल्या रेल्वे पोलिसांकडे दिली होती. आणि मला म्हणाला "दीदी आपला पर्स उधर है". पोलिसांकडून आधी ती पर्स घेतली.  मी तिथेच बाकड्यावर बसून राहिले , थोडा वेळ काहीच कळले नाही शुद्ध हरपल्यासारखे झाले होते , हात पाय गार पडले होते , आणि हृदयाची धडधड वाढली होती . जेव्हा जरा बरे वाटले तो पर्यंत गाडी निघून गेली होती. त्या मुलाचे आभार मानायचे हि राहून गेले.त्या मुलाच्या रूपाने बाप्पाचं भेटला होता. तो पर्यंत आजूबाजूला गर्दी जमली होती शंभर प्रश्न, शंभर सल्ले. जो तो शिव्या घालत होता. मग लक्षात आले खरंच जर चुकून पाय खाली गेला असता तर त्या थोड्या पैशासाठी जीवाला मुकावे लागले असते नाहीतर हात पाय काही तरी मोडून बसले असते. पण म्हणतात ना देव सगळे पाहत असतो. कदाचित मी केलेल्या चांगल्या कामाचे फळ म्हणून फक्त मुका मार लागण्यावरच निभावले होते आणि माझी पर्स हि त्यातली एकही वस्तू गहाळ ना होता मिळाली . त्या दिवशी पासून बाप्पावरचा विश्वास अजून वाढला. त्यानंतर मात्र जवळजवळ वर्षभर ट्रेन मध्ये कधीच दरवाजात उभी राहिले नाही. आणि अजूनही कधीतरी ट्रेन स्टेशन ला लागताना तो प्रसंग आठवला कि पाय आपोआप मागे जातात. 








Wednesday, 17 May 2017

विकी आणि शशी

सकाळचे ६. १५ -६. ३० झाले होते. डबे बनवायच्या गडबडीत. इतक्यात फोन वाजला. नाव पाहून डोक्याला सूक्ष्म आठी पडली. सकाळीच हिचा फोन मनात शंकेची पाल चुकचुकली. बातमी अपेक्षित होती पण इतक्या लवकर... . मी थरथरत्या हाताने फोन घेतला. एक वाक्य कानावर पडले " विकी गेला" मी विचारले " कधी ?"      " पहाटेच" समोरून तिचे उत्तर. मी म्हटलं " कळवते बाकीच्यांना" आणि फोन ठेवला. क्षणभर काहीच सुचत न्हवते. हात पाय थरथरत होते. घसा कोरडा पडला. दोन मिनिट अशीच बसले मग पटापट ३-४ फोन केले. पण कुणीच उचलला नाही. काय करावे सुचत न्हवते. मग समोरून एक फोन आला. बातमी सांगितली तर विश्वासच बसेना. त्याने अजून २-४ जणांना फोन केले आणि खात्री केली. हो आमच्या बरोबरच " विकी साळवी " आम्हाला सोडून गेला होता. कॅन्सर सारख्या आजाराला ३-४ वर्ष तोंड देत होता. शेवट माहित होता पण तो इतक्या लवकर येईल असे कुणालाही वाटले नव्हते. 

शाळेत असतानाच तो मला आठवत नाही. पण एक वर्ग मित्र म्हणून तो जेव्हा हि समोर आला तेव्हा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू होते. मला आठवतेय शाळे नांतर २००८ ,मध्ये आम्ही सगळे पहिल्यांदा भेटलो होतो. त्यावेळी खूप मोकळे पणाने बोलला होता तो. नंतर त्यानेच आम्हाला त्याच्या गाडीतून घरी सोडले होते.  नंतर २०१२ ,मध्ये हि आम्ही जेव्हा भेटणार होतो शाळेत तो कुठेतरी बाहेर जाणार होता म्हणून त्याचे काँट्रीब्युशन त्याने माझ्या ऑफिस ला येऊन दिले होते. मला त्रास नको म्हणून तो तिथपर्यंत आला होता. त्यावेळी बायको मुलाची ओळख करून दिली.  कसे असते ना धडधाकट दिसणारा मानूस आतून काय सहन करत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. 

त्यानंतर थोड्या महिन्यांनी कळले कि त्याला कॅन्सर आहे. ट्रीटमेंट सुरु होती. आम्ही मित्र मैत्रिणी त्याला अधे मध्ये फोन करून त्याची चौकशी करत होतो. त्याचे पहिले ऑपरेशन झाले ना तेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो होतो. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून अजिबात वाटले नाही का हा इतका आजारी आहे. त्याने त्याचे झालेल्या ऑपरेशन चे व्रण दाखवले. पाठीवरून छातीपर्यंत कट होता. बघून जीव हादरून गेला. डोळ्यात टचकन पाणी आले. जेमतेम स्वतःला सावरत बाहेर पडलो. कौतुक वाटले खूप त्याचे किती धीराने घेत होता सगळे. शारीरिक त्रासाचा लवलेश चेहऱ्यावर कुठेच नव्हता. 

त्याचा जाण्याच्या आधी त्याची इच्छा म्हणून आमच्या ग्रुप मधले ३-४ जण त्याला भेटून आले होते. त्याच्या सोबतचे फोटो हि शेअर केले होते. तेव्हा वाटले होईल हा बरा. कारण त्यावेळीही त्याच्या चेहऱ्यावरचे हसू काही कमी झाले नव्हते.  आणि अचानक अशी बातमी. आम्ही सगळे त्याच्या घराजवळ जमलो होतो. काय बोलायचे काही सुचत नव्हते. त्याचा तो निश्चल देह पाहिल्यावर मात्र रडू आवरले नाही. आपल्या बरोबरीचं , वयाचे कुणीतरी आपल्यातून कायमचे निघून जाणे बापरे खूप विचित्र भावना. सगळे सोबत असून कोणी काही करू शकत नाही किती असाहाय्य वाटते. आपल्याच बरोबरच्या मित्राला असा शेवटचा निरोप देणे खूप कठीण. 

आजही जेव्हा आम्ही सगळे भेटतो तेव्हा त्याची आठवण दर वेळी येते. आमच्या पहिल्या गेट तू गेदर च्या वेळेचा त्याचा लाल टी शर्ट मधला फोटो पहिला कि अजूनही डोळे पाणावतात. 

तसाच आमच्या आमची शाळेच्या ग्रुप मधला "शशी."  त्याची पहिली भेट झाली होती ती जोशी बाईंच्या ७५ च्या वेळी. असावारीने त्याची ओळख "BMC का आदमी" अशी करून दिली होती. किती हसलो होतो तेव्हा. त्या नंतर महिनाभर आसावरी ला खूप पिडले आणि शशीला  तर नावच पडले "BMC का आदमी". त्यानंतर आमच्याबरोबर तो एकदा पिकनिक ला आला होता किती मजा केली होती. नंतर २-३ वेळा काम आहे म्हणून त्याला आम्हाला भेटणे जमले नाही. आणि एक दिवस अचानक एका मित्राने ग्रुप वर टाकले शशी इस नो मोअर . बापरे काय हे त्याला जाऊन १५ दिवस झाले होते आणि आम्हाला कुणाला काही कळलेच नाही. कामाचे प्रेशर, आणि त्याची व्यसने याने घात केला त्याचा. सगळे अर्धवट टाकून निघून जावे लागले. शाळेनंतर इतक्यावर्षानी जेमतेम ८-१० महिन्याचा सहवास. सगळ्यांना हसण्याचे कारण देणारा "BMC का आदमी" आमच्यातून निघून गेला कायमचा. 

नियती पण काय खेळ खेळते. सगळ्यांसोबत खेळत खेळाता विकी आणि शशी सारख्या मित्रांना अचानक एक्सिट घ्यायला लावते. मात्र आपल्या सगळ्यांच्या हृदयातून मात्र ते कधीच एक्सिट घेत नाहीत , उलट आपल्या मनात त्यांच्या आठवणींचा एक वेगळा कप्पा तयार होतो. 

आयष्य किती अनपेक्षित असते ना म्हणूनच आलेला प्रत्येक क्षण माणसाने मनापासून जगावं. कुठलाही राग , द्वेष , मत्सर मनात ना ठेवता. काय माहित आपण कधी एक्सिट घेऊ ते? या वेळी आनंद मधला सवांद आठवतो " जिंदगी और मौत तो उपरवाले के हात में है जहाँपनाह , हम सब तो रंगमंच कि कठपुतलिया है ......... कौन कब कैसे उठेंगा ये कोई नाही बता सकता ."




विकी

शशी 


Tuesday, 16 May 2017

लेख महाराष्ट्र टाइम्स (मुंबई टाइम्स ) १५. ०५. २०१७

शाळेच्या त्या सोनेरी आठवणी 
० एप्रिल २०१७ आमच्या अ . व. स्मारक विद्यामंदिर , विरार च्या १९९१-१९९२ बॅचचा संस्मरणीय दिवस. शाळा सोडून २५ वर्षे झाली म्हणून आम्ही " टीम १९९२" ने एक छोटेसे स्नेहसंमेलन केले. या वेळी १५-२० नाही तर तब्बल ६० जणांचा यात सहभाग होता. पालघर, नाशिक, कोल्हापूर, कणकवली अशा ठिकाणाहून विद्यार्थीविद्यार्थिनी खास या कार्यक्रमासाठी आले होते. विरार कणेर फाट्याला एका  फार्म हाऊस वर हा कार्यक्रम करण्यात आला.  शाळेत लहान असताना खेळाला जाणारा चमचा लिंबू चा खेळ खेळण्यात आला त्यामुळे आपले आताचे वय विसरून सगळे शाळेच्या वेळेत शिरले. संगीत खुर्ची खेळताना सगळेच शाळेत खेळायचे तसे रडीचा डाव खेळत होते. शाळेत शिक्षक, प्रिंसिपल असणाऱ्या मुली किंवा मोठ्या  कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असणारे हे सगळे शाळेचे मित्र मैत्रिणी आपला हुद्दा , वय विसरून मजा करत होते. शाळेतल्या जुन्या आठवणींना छान उजाळा दिला जात होता. आणि गप्पांची महफिल सजली होती. काही जण शाळा सोडल्यावर प्रथमच भेटले होते त्यामुळे त्यांना किती आणि कुणाकुणाशी बोलू असे झाले होते. शाळेतल्या कटू आठवणी विसरून सगळेच एकमेकांची मस्करी करत होत .  सगळ्यांना या दिवसाची कायम आठवण राहावी म्हणून प्रत्येकाला शाळेचा फोटो आणि तारीख असलेली  एक भेटवस्तू  देण्यात आली . शाळेत आपल्याला बक्षीस मिळाल्यावर होतो तसाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते भेटवस्तू  घेताना दिसत होता. 

ह्या कार्यक्रमासाठी १०-११ जणांनी ३ महिने खूप मेहनत घेतली. हा आपला शाळेचा कार्यक्रम नसून घरचेच कार्य असल्यासारखे सगळे आपापली कामे नेमाने करत होते. सकाळी ९ वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० ला संपला. स्नेहभोजन , करमणुकीचे कार्यक्रम, मजा मस्ती आणि गप्पां यामुळे दिवस कधी सुरु झाला आणि संपला  कळलेच नाही. आणि ५० वर्षपूर्ती च्या वेळीही असेच एक स्नेहसंमेलन करू असा संकल्प आम्ही सगळ्यांनी केला. आणि खरेच तो पर्यंत सगळ्यांना निरोगी आणि सुधृढ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना म्हणजे त्याही वयात आम्ही अशीच मजा करू जशी आता केली. हा दिवस खरंच आठवणीत राहील असाच गेला. 



Saturday, 13 May 2017

टर्निंग पॉईंट

'टर्निंग पॉईंट' सगळ्यांच्या आयुष्यात येणारी हि महत्वाची वेळ. एक असा टप्पा ज्यात आपले सगळे आयुष्य बदलून जाते. काहीतरी खूप चांगले होते किंवा काहीतरी खूप वाईट. कधी कधी चांगल्यातुन वाईट घडते तर कधी वाईटातून चांगले. पण हा टप्पा मात्र कुणालाही चुकत नाही. टर्निंग पॉईंट ला वयाची मर्यादा नसते .  कधी कुठल्या  वेळी आपले आयुष्य बदलेल हे सांगता येत नाही.

काही लोकांचे शालेय जीवनात आयुष्य बदलते तर काहींचे कॉलेज मध्ये. काही लोकांना नोकरी लागल्यावर , तर काहींचे लग्न झाल्यावर  आयुष्य बदलून जाते. वयाच्या साठाव्या वर्षीही माणूस काहीतरी अदभूत करून जातो. शाळेत असताना लागलेली वाईट संगत किंवा  शाळेत एखाद्या  शिक्षकाचे मिळालेले उत्तम मार्गदर्शन हे हि आपल्या आयुष्याला दिशा देते.

कधी कधी आयुष्यात आलेली एखादी व्यक्ती ही आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन जाते. आपला हरवलेला आत्मविश्वास आपल्याला परत मिळवून देते. तर कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातुन कायमची किंवा तात्पुरती निघून जाते आणि त्या व्यक्ती च्या अचानक जाण्याने आपण खुप खचून जातो. कधी कधी इतके त्या व्यक्ती वर अवलंबून असतो कि त्या व्यक्तीशिवाय आपण काही करू शकत नाही असे वाटते. त्यावेळी त्यातून बाहेर येऊन काहीतरी जिद्दीने करून दाखवणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीच मागे वळून पाहत नाही.

एखादी अशी घटना घडते की आपले आयुष्यच बदलून टाकते. घेतलेला एक चुकीचा निर्णय आपली वाताहत करू शकतो तर एक बरोबर निर्णय आपले जीवन मार्गी लावू शकतो.  तर काही जण यशाच्या परमोच्च ठिकाणी असताना असे काही वागतात कि त्याना अपयशाची कटू चव चाखावी लागते.

खेळा मध्ये हि हा टर्निंग पॉईंट खूप महत्वाचा असतो. बऱ्याच वेळा आपण एखादा खेळ पाहताना म्हणतो " कसली मॅच फिरवली त्याने". एखाद्याच्या चांगला  खेळ हातातून जाणारा डाव जिंकून देतो तर  वाईट खेळ हातातोंडाशी आलेला डाव दुसऱ्याच्या पदरात पाडतो. 

आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यात वेगवेगळे बदल घडवत असते. कधीतरी कुणीतरी केलेला अपमान हि आपल्या आयुष्याला कलाटणी देतो. झालेल्या प्रकारामुळे आपण काहीतरी चांगले करायच्या जिद्दीला पेटतो. आणि त्याच जिद्दीने काहीतरी वेगळे करून दाखवतो. 

आपल्या जीवनात घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी काहीतरी चांगलेच घेऊन आली आहे असा विचार जर प्रत्येकाने केला तर नक्कीच आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ लाभेल. काय वाईट काय चांगले याची शहनिशा न करता, जर त्यातून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करून, वाईट गोष्टी मध्ये न अडकता चांगल्या गोष्टी घेऊन पुढे गेलो तर नक्कीच आपल्या आयुष्यात एक चांगला टर्निंग पॉईंट येईल. 

ज्या गोष्टी मुळे किंवा व्यक्ती मुळे आपल्या जीवनात बदल घडलेले असतात ते कधीच विसरू नये कारण जेव्हा जेव्हा आपल्याला हरल्यासारखे वाटते किंवा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा तीच गोष्ट आठवून आपण आधीप्रमाणे जिद्दीने पुढे जाऊ शकतो. 

जिथे आपण आपल्याला सापडतो , आणि आपलाच आपल्यावरचा आत्मविश्वास वाढवतो तोच आपल्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट. फक्त एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती हि आपल्याला तो शोधण्यासाठी भाग पाडते. 







Thursday, 4 May 2017

रियुनिअन

हल्ली आपण बऱ्याच वेळा ऐकतो " अरे! परवाच आमचे शाळेच्या मित्रमैत्रिणींचे रियूनिअन झाले." त्या दिवशी अमुक अमुक च्या कॉलेज ग्रुप चे रियूनिअन झाले. कुणी ५,१० वर्षांनी भेटते, कुणी २० एक वर्षांनी भेटते तर कुणी तब्बल  ४०-५० वर्षांनी भेटतात. खरच पण गम्मतच असते या रियूनिअनची दर वेळी नवीन विषय , नवीन आठवणी .
आम्ही हि भेटतो शाळेचे मित्र मैत्रिणी अगदी २-४ महिन्यातून एकदा नेमाने . कधी कधी तर अगदी ४-५ जणच असतो पण प्रत्येक वेळची मजा काही वेगळीच असते. मला एकदा कुणीतरी म्हटले होते " काय म्हणे सारखे सारखे भेटता?" , कुणाला सांगावे गेटटुगेदर आहे आणि कुठे फोटो टाकावेत तर सगळे म्हणतात काय तेच तेच चेहरे असतात आणि म्हणे गेटटुगेदर.  पण म्हणजे त्याच त्याच मित्रमैत्रिणींना भेटणे म्हणजे गेटटुगेदर नाही का ? कि दर वेळी २०-२५ जणच हवे भेटायला. रस्त्यात दोन मैत्रिणींनी तासनतास गप्पा मारणे ही ' रियूनिअन च ना? ' ज्या लोकांना परत परत भेटावेसे वाटते त्या साठीच करतो ना गेट टू गेदर.
काही लोकांना ही संकल्पनाच पटत नाही. कशाला भेटायचे सारखे? सतत त्याच गप्पा ,तीच लोक, वायफळ गप्पा. तर काही लोकांना हे ही रॉयल हवे असते, कॉर्पोरेट मीटिंग सारखे. गेट टू गेदर म्हणजे त्याना वेळ आणि पैसे याचा अपव्यय वाटतो.

तसे पहायला  गेलो  तर आपल्या कुटुंबाची हि बरीच रियूनिअन होतात. लग्न, मुंज, बारसे आणि असे इतर समारंभ  म्हणजे एक प्रकारचे फॅमिली गेट टू गेदरच   ना. मित्र मैत्रिणींना भेटायला असे समारंभ नसतात म्हणून आपण ते ठरवून करतो. काही लोकांना आपल्या ३-४ खास लोंकाना एकत्र येऊन भेटण्यात मजा येते. तर आमच्यासारख्या काही लोकांना सगळ्यांनाच एकत्र आणण्याची इच्छा   असते.

ह्या रियूनिअन चे सगळ्यात जास्त महत्व वाटतं ते अशा लोकांना जे आपल्या शाळेचे ठिकाण सोडून दूर कुठेतरी राहायला गेलेले असतात . शरीरानं ते अशा वेळी उपस्थित नसले तरी मनाने मात्र  ते कायम तिथं असतात. हल्ली या सोशल मीडिया मुळे  जग खूप जवळ आलेय पण नुसत्या वर्चुअल मैत्री पेक्षा प्रत्यक्ष भेट चांगलीच ना.

अशा गेट टू गेंदर च्या वेळी प्रत्येकाच्या  काही ना काही गमती सांगितल्या जातात. इतकी वर्षे लपून ठेवलेली सिक्रेट बाहेर येतात. दर वेळी नवीन कुणा ला तरी बळीचा बकरा बनवला जातो आणि मग त्याची मनसोक्त फिरकी घेतली जाते.  जुने रुसवे फुगवे विसरले जातात आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. 

 एक मात्र नक्की इथे फॅमिली गेट टू गेदर च्या वेळी होते तशी प्रॉब्लेम्स ची चर्चा नाही होत. आपण कसे सरस हे दाखवण्याची चढाओढ नसते. इथे केलेल्या गमतीची आणि घडलेल्या किश्श्यांची चर्चा होते. फक्त आणि फक्त धमाल केली जाते. मुळात इथे प्रत्येक जण आपला हुद्दा , ऐश्वर्य विसरून आपल्या वयाच्या सवंगड्यासोबत आपला जीव रमण्यात गुंग असतो. कधी कधी अशाच वेळी वर्षानुवर्षे अबोला धरलेल्या दोन व्यक्ती बोलायला लागतात. तर कधी ना तुटणारे ऋणानुबंध जुळून येतात. अजाणत्या वयात झालेले गैरसमज इथे दूर होतात. अशा वेळी कळते कि कोण काय करते, कुठे असते. प्रत्येकाचे नव नवीन , रोमांचिक अनुभव ऐकायला मिळतात. कितीतरी वेळा आपण एखाद्याला गृहीत धरलेले असते पण बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर भेटल्यावर कळते कि आपण किती चुकीचा विचार करत होतो. आपल्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींचे प्रगती पाहून आपल्याला हि त्यांचा अभिमान वाटतो. अशा वेळी कुणा एकाचे कौतुक होत नाही , तर प्रत्येक जण कुणाचे ना कुणाचे कौतुक करत असते. आपल्यापेक्षा माझी मैत्रीण किंवा माझा मित्र किती चांगला हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे फक्त मैत्रीतच होऊ शकते. 

कधीतरी या चांगल्या गोष्टीत एखादे गालबोट हि लागून जाते , पण इतक्या चांगल्या घडलेल्या गोष्टीमधे अशी गोष्ट दुर्लक्षित करावी. आणि त्या चांगल्या आठवणी घेऊन पुढे जावे. पण खरंच प्रत्येकाने बालमित्रमैत्रिणीसोबत जोडून राहावे. कारण त्यांच्यासोबत घालवलेले काही तास आपल्याला आपले त्रास, दुःख आणि मुख्य म्हणजे आपले वय विसरायला लावतात. वाढते वय विसरून शाळेच्या,बालपणीच्या आठवणीत रममाण होण्याची मजाच काही औरच .