Thursday, 5 December 2024

एका वेगळ्या वाटेवर

एका वेगळ्या वाटेवर


एअरपोर्ट ची वेटिंग रूम, फ्लाईट ला अजून वेळ होता. सगळेच प्रवासी इथे तिथे रेंगाळत होते. ती हि एका खुर्ची वर आपला लॅपटॉप उघडून बसली होती. कुठल्यातरी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करणारी असावी. छोटे केस, डोळ्याला महागडा चष्मा, फॉर्मल शर्ट पॅन्ट  आणि काळ्या रंगांचे बूट. काम करता करता तिला कंटाळा आला बहुतेक तिने जरा आळस दिल्यासारखे केले. चष्मा काढून पुसला,आणि आजू बाजूला पाहायला लागली. तिथे बसलेल्या एका आई आणि मुलीकडे ती बराच वेळ निरखून बघत होती.

मग हळूच डोळे मिटून नकारार्थी मान हलवली. थोडीशी मागे टेकली आणि हाताची घडी घालून विचार करायला लागली. तिची मुलगी अन्विता आता दहावीत गेली होती. गेल्या १०-१२ वर्षात एकटीने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून ती थकली होती. तिने डोळे मिटले आणि सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळला . अगदी तिच्या शिक्षणापासून. त्या दोघी बहिणी अर्चना आणि अश्विनी.अर्चना मोठी आणि हि अश्विनी धाकटी .  स्वभावाला तितक्याच उलट. अर्चना अबोल, हुशार, अति अभ्यासू आणि  अश्विनी बोलकी , हुशार, अभ्यास जेवढ्यास तेवढा पण तरीही पहिल्या पाचात येणे तिने कधी सोडले नाही. वडील सरकारी कर्मचारी त्यामुळे घराची परिस्थिती हि चांगली. अर्चना ला सी. ए व्हायचे होते म्हणून ती कॉमर्स ला गेली.  हिला इंजिनीअर व्हायचे होते. 

बारावीनंतर स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर स्कॉलरशिप मिळवून ती हट्टाने इंजिनीअरिंग ला गेली. आणि त्याच हट्टाने आणि जिद्दीने इंजिनीयर ही झाली.  तिच्या हुशारीच्या बळावर तिला एका चांगल्या कंपनीत नोकरीहीमिळाली. ऑफिसच काम ती अगदी इमानेइतबारे करत होती. तिचे ते वयच होते मजा मस्ती करण्याचे त्यामुळे  ऑफिसच्या पार्ट्या, पिकनिक सगळे ती एन्जॉय करत होती. काही गोष्टी तिच्या आईला खटकत होत्या पण अश्विनी तशी कुणाचे ऐकणारी नव्हती. तिला जे बरोबर वाटेल पटेल तेच ती करत असे. याच दरम्यान तिची ओळख झाली माधवशी. माधव तिच्या प्रेमात पडला होता , त्याने तिला रीतसर लग्नासाठी हि विचारले होते. पण तिची मनाची तयारी नव्हती.   घरी अर्चनाच्या  लग्नाची गडबड सुरू झालीच होती .  अर्चनाला तिच्या मनासारखा नवरा मिळत नव्हता त्यात २ वर्ष गेली आणि मग अर्चनाचे लग्न ठरले. तिच्या अनुभावरून शहाणे होऊन अश्विनी ने माधव शी लग्न करायचे ठरवले. खरे तर आंतरजातीय विवाह म्हणून आधी कुणाला मान्य नव्हते पण अश्विनीच्या आणि माधवच्या निर्णयापुढे कुणाचे काही चालले नाही . आतापर्यंत अश्विनी चे आयुष्य अगदी सरळ रेषेत सुरु होते पण या लग्नानंतर तिच्या आयुष्यात खूप वेगवेगळी वळणे आली ज्याचा कुणीच कधीच विचार केला नव्हता. 

लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस खूपच छान होते. निदान वर वर तरी सगळे छान वाटत होते. तिला जमेल तशी ती घरात मदत करत होती. लग्नानंतरची सुट्टी संपली आणि दोघांनी ऑफिस ला जायला सुरवात केली आता मात्र तिची तारांबळ उडत असे. माधव आणि ती एकाच ऑफिस मध्ये असल्याने दोघे एकत्र निघत. पण घरातले सगळं आटपून निघायला उशीर होत असे. सुरवातीला तिच्यासाठी थांबणारा माधव आता आधी निघायला लागला.   लोकल चा प्रवास , घराची कामे अश्विनी थकून जात असे. पहिला महिनाभर तिला काही नको करणारी सासू आता काही करत नसे. 

लग्नानंतर तीनच महिन्यात अश्विनी ला येणाऱ्या बाळाची चाहूल लागली . बापरे!!! हे काय होऊन बसले होते. दोघांचीही मनाची तयारी नव्हती. माधव तर जबाबदारी साठी तयारच नव्हता. पण आशिवनी ला बाळाचा असा जीव घेणे तिला पटत नव्हते. तिने ते बाळ वाढवण्याचा निर्णय घेतला. रोजचा प्रवास , घराची कामे, गर्भारपण सगळे सांभाळताना अश्विनी ची खूप वाईट अवस्था झाली. खूप अशक्त झाली होती. माधव तिला डॉक्टर काय नेणे आणणे करत होता पण त्याच्या मनात अजूनही होते कि हे बाळ अश्विनीने ठेऊ नये. त्याच्या मनाची तयारी नव्हती मुलाची जबाबदारी . पण घरात तिला आराम नव्हता. आता सहा महिने उलटले अश्विनी खूप अशक्त झाली होती डॉक्टरांनी तिला धावपळ कमी करायला सांगितली. म्हणून तिने आईकडे राहण्याचा निर्णय घेतला. 

माधव अधून मधून तिला येऊन भेटून जात असे. अश्विनी ने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी म्हटल्यावर आधीच नाराज असलेला माधव अजून नाराज झाला. तिथे सासरीही जास्त काही कुणाला आनंद झालेला दिसला नाही. तिच्या आईला दोन्ही मुलीच म्हणून हिला मुलगी असा टोमणा हि मारून झाला. महिनाभर आई कडे राहून पुन्हा सासरी जाणे तिला जड झाले होते. पण पर्याय नव्हतया. त्याच दरम्यान माधव ची बदली बँगलोर  झाली. अश्विनी ला कळेना काय सुरु आहे हे ? एका मागून एक समस्या तिच्या समोर येत होत्या. अजून तिची १ महिना सुट्टी शिल्लक होती. त्या दरम्यान तिने ऑफिस मध्ये प्रयत्न करून स्वतःचींहि बदली बँगलोर  करून घेतली. आता त्या तिघांचा त्रिकोणी संसार सुरु झाला. मुलीची पाळणाघरात सोय करून तिने ऑफिसला जाणे सुरु केले. मन तुटत होते पण पर्याय नव्हता. पण या सहा महिन्याच्या दुराव्यात तिला माधव चे बदलेले वागणे खटकत होते.  

अन्विता मोठी होऊ लागली. अश्विनी ऑफिस च्या कामासाठी बाहेर गेली कि अश्विनीची आई अन्विता साठी येऊन राहत असे. माधव हि जास्त वेळ ऑफिस मधेच असे. माधव चे असे जास्त वेळ बाहेर राहणे, सतत मोबाईल वर असणे आई ला हि खटकत असे. अश्विनीला तिने बोलूनही दाखवले होते पण अश्विनीने दुर्लक्ष केले होते. आता अन्विता शाळेत जाऊ लागली होती. अश्विनी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी नीट पार पाडत  होती. कधीतरी माधव शनिवार रविवार अन्विताला स्वतःहून बाहेर  फिरायला नेत  असे. एक दिवस अन्विता येताना रडत घरी आली , ती कुठेतरी  पडली होती आणि तिला बऱ्यापैकी लागले होते. माधव च्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. खूप खोदून खोदून विचारल्यावर अन्विता ने सांगितले पप्पा मीरा मावशीबरोबर बोलत होते, ती नेहमी भेटते आम्हाला. अश्विनी ने रागाने माधव कडे पहिले तो मान घालून उभा होता. अश्विनीचे विचार चक्र सुरु झाले. माधवची बदललेली वागणूक , मीरा ची जवळची मैत्रीण म्हणून करून दिलेली ओळख, तिचे सतत घरी येणे जाणे, माधव चे सतत फोनवर असणे. तिचा पारा चढला पण त्यावेळी शांत राहिली. अन्विता ला घेऊन बेडरूम मध्ये गेली. त्यादिवशी कोणीच कुणाशी काही बोलले नाही. दोन तीन दिवस असेच शांततेत गेले. आणि एक दिवस अश्विनीने अन्विता शाळेत गेल्यावर जाब विचारला आणि आश्चर्य म्हणजे माधव ने काही आढेवेढे ना घेता कबूल  केले कि त्याचे मीरा वर प्रेम आहे. पुढचे वाक्य जास्त धक्कदायक होते त्याला अश्विनीपासून घटस्फोट हवा होता. अश्विनी हतबल होऊन तिथेच बसली. काय करावे सुचेना पण अशी हार मानणारी ती नव्हती. त्यानंतर बऱ्याच वेळा सगळ्यांनी समजावून बघितले पण माधव ऐकायला तयार नव्हता. शेवटी घटस्फोटाची केस उभी राहिली त्यात ३-४ वर्ष गेली , अश्विनी आई कडे येऊन राहिली होती. शेवटच्या दिवशी जेव्हा कोर्टात विचारले गेली मुलीच्या कस्टडी विषयी माधवने चक्क अन्विताचे पालकत्व हि नाकारले. सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता. अश्विनीची आपला संसार टिकवायची शेवटची आशा हि मालवली होती. 

खूप विचित्र अवस्थेतून अश्विनी जात होती . मुलीची जबाबदारी, नोकरी, प्रेमविवाह करून झालेला घटस्फोट, लोकांमध्ये होणारी चर्चा सगळेच. लग्नापर्यंत सरळ धोपट असणारे तिचे आयुष्य अचानक अगदी गुंतागुंतीचे झाले होते. पण कशानेही हार मानेल ती अश्विनी कुठली. आईबाबांसोबत राहायचे म्हणून तिने मोठे घर घेतले. माधवसोबत झालेल्या भांडणानंतर तिने परत मुंबई ला बदली घेतली होती. तेव्हा पासूनच तिच्या डोक्यात होते कि स्वतःचे काहीतरी सुरु करायचे, सतत स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवायचे .  आणि हळू हळू त्या दिशेने तिने तयारी करायाला हि सुरवात केली होती.  तिने स्वतःचा ज्ञानाचा उपयोग व्हावा या दृष्टीने स्वतःचे छोटे क्लासेस सुरु केले. २-४ बाहेरचे शिक्षकही ठेवले. त्यातच एक शिक्षिका होती पल्लवी. पल्लवी अत्यंत हुशार मुलगी. आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होती ३ वर्षात तिने ४ नोकऱ्या केल्या होत्या. घरातून लग्नासाठी मागे लागले असले तरी तिला स्वतःला एम बी ए करायचे होते. म्हणून ती पार्ट टाइम नोकरी करत होती. तिची मुलाखत घेतानाच अश्विनीला तिच्यातले वेगळेपण जाणवले होते. ती स्वतःला तिच्यात पाहत होती. अश्विनी नसली कि पल्लवी सगळं व्यवहार बघत असे. दोघींचे विचार बरेच सारखे असल्यामुळे दोघी सतत एकत्र असत. त्यांच्यामध्ये वेगळेच नातं तयार झाले होते. 

अश्विनीच्या घटस्पोटाच्या धक्क्याने आई खचली होती आणि एक दिवस अचानक ती झोपेतच गेली. सगळे नीट होत असताना परत एकदा अश्विनीला मोठा धक्का. त्यावेळी वयाने बरीच लहान असून पल्लवीने अश्विनी ला आधार दिला. अन्विता, बाबा , क्लास तिन्ही गोष्टी ती सांभाळत होती. त्यामुळे त्याही परिस्थितीत अश्विनीला ऑफिसमध्ये लक्ष देता येत होते. या घटनेने त्या दोघी अजून जवळ आल्या. न बोलता सांगता दोघीना लक्षात आले होते कि त्यांच्यात मैत्रीपेक्षा एक वेगळे नाते तयार झाले आहे. लोकांच्या दृष्टिने हे कदाचित चुकीचे होते पण दोघीनाही त्याची पर्वा नव्हती. पल्लवीच्या घरी हि या विषयावरून वाद होत असत पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. प्रश्न होता तो बाबांना आणि मुख्य अन्विताला समजावण्याचा. दोघी जेव्हा कधी या विषयवार बोलत तेव्हा त्यांना सतत अन्विताच्या प्रतिक्रियेचा विचार येत असे. अश्विनी आडून आडून अन्विताला तिच्या आणि पल्लवीच्या नात्याची कल्पना देत असे. अन्विताही आजच्या काळातली मुलगी असल्यामुळे तिला काही गोष्टी काळात होत्या पण त्या आपल्या घरात घडाव्या हे तिला पचायला जड जात होते. पण कधी कधी ती आईच्या सगळ्या मनस्थितीचाही विचार करत असे. पल्लवी तिला आवडत होती. पण तरीही... . अश्विनीला जे काही करायचे होते ते अन्विताच्या परवानगीने. यावेळी ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर पडताना तिने खूप विचार केला. अन्विताच्या दहावी पर्यंत थांबून मग तिला , आणि पल्लवीला कुठेतरी बाहेर फिरायला नेऊन अन्विताला सगळ्यागोष्टींची कल्पना द्यायची आणि कायमचे पल्लवी सोबत राहायचे अर्थात अन्विताला घेऊन.  

तिचे मन भूतकाळात फिरत असतानाच विमानाच्या  घोषणेने ती भानावर आली. डोळ्यात आलेले पाणी हलकेच टिपले. लॅपटॉप बंद करून बॅग मध्ये ठेवला. कुणालातरी फोन लावला ..... पल्लवी मी तयार आहे कायमची तुझ्यासोबत राहायला पण अजून एका वर्षानंतर ... अन्विताला मी सांगेन समजावून इतके म्हणून फोन ठेवला आणि गालातल्या गालात हसत काउंटर च्या दिशेने चालायला लागली.

सौ. मिलन राणे - सप्रे🖋️





Thursday, 27 June 2024

मै ऐसी क्यूँ हूँ ?.........

 मै ऐसी क्यूँ हूँ ?.........


खरंतर लिखाण म्हटलं की माझा आवडतं काम, पण कुणी  विषय देऊन लिही म्हटलं की जरा कठीणच जाते, पटकन सुचतच नाही.  अय्या बघाना !!!! पहिला पॉईंट इथेच झाला . तर राधिका मॅमनी विषय दिल्यानंतर वाटत होतं लिहावं लिहावं पण वेळ जुळून आली नाही.  आणि ज्या वेळेला एक एक लेख  वाचले तेव्हा   काही लेख वाचताना असं झालं  की " अरेच्चा!!मी पण अशीच वागते".  तर एखाद लिखाणात असं वाटलं हेच लिहायचे मला. 


पण तरीही आता राधिका मॅमनी अजून एक संधी दिलीच आहे तर म्हटलं मौके पे चौका मार देते है।  हा एक दुसरा गुण झाला नाही का ? की संधी मिळाली की त्याचा सोनं करायचं. 


खरंतर  कुठल्याही स्त्रीला आपले  दुर्गुण कबूल करणं हे जरा कठीणच जाते. 


तर पॉईंट नंबर तीन,  तुम्ही  वरती वाचलेच की दोन पॉईंट.  तर तिसरा पॉईंट असा, मी  अतिशय हळवी आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते.  म्हणजे कोणी मस्करीत काही बोललं तरी मी लगेच कंठ दाटून येणं, डोळे भरून येणं या सगळ्या गोष्टी घडतात. थोडक्यात काय तर मला मस्करी कळतच नाही पटकन.😀


दुसरी गोष्ट सॉरी चौथी गोष्ट.  मी थोडीशी, किंवा थोडी जास्त किंवा जास्तच हट्टी होते. म्हणजे एखादी गोष्ट मला जशी हवी आहे  तशीच घडली पाहिजे असा हट्ट असायचा.  आणि ती  तशी नाही घडली आकाड  तांडव करायचा.  खूप चिडचिड करायची, रुसून बसायचे, आदळआपट करायची . हो हो अगदी हे सगळं करायचे.  पण आता वयामनाने म्हणा, किंवा अनुभवाने म्हणा स्वभावात  बराच म्हणजे खूप जास्तच फरक झालाय. आणि तो हल्ली माझ्या लिखाणातून जास्त दिसायला लागलाय.


आता आपण पॉइंटला बाजूलाच ठेऊ या. असं बघायला गेलं तर मी थोडी अंधश्रद्धाळू आहे . म्हणजे एखादा रंग घातला की तो अनलकी, मांजर आडवं गेलं किंवा बाहेर पडताना कोणी शिंकलं की जरा मागे फिरणं. अशा  छोट्या छोट्या गोष्टी मी अजूनही करते कधी कधी. हा पण  मी पाळते म्हणून घरच्यांनी ही पाळाव्यात असा अट्टाहास  कधीच केला नाही. आता प्रयत्न करते मी बाहेर पडायचा जमेल हळूहळू. 


हट्टीपणाच्या बाबतीत मात्र माझी एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे जर मी एखादी गोष्ट करायची ठरवली,  तर ती करण्यासाठी लागेल ती मेहनत, कष्ट, जिद्द आणि एकाग्रता या सगळ्या गोष्टी करायची माझी तयारी असते . एखादी गोष्ट मिळवण्यासाठी दोन गोष्टीचा त्याग करायची  ही तयारी असते. त्यासाठी मग कसलीही कुरबूर नसते. एक उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या कष्टाने माझ्या छोट्याश्या लाडूच्या व्यवसायाच्या कमाईतून  घेतलेला माझा पुण्याचा फ्लॅट.


अजून एक गोष्ट जी साधारण आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये कॉमन आहे, आपण समोरच्या व्यक्तीवर खूप पटकन विश्वास ठेवतो.  म्हणजे ती व्यक्ती जरा गोड वागली की आपण आपल्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी त्या व्यक्तीकडे व्यक्त करतो.  पुरुष किंवा स्त्री असा भेदभाव त्यात नसतो . आणि नंतर त्याच व्यक्तीने जर  आपल्याला दगा दिला , किंवा दूर निघून गेली तर आपण त्या गोष्टीचा खूप विचार करत राहतो. आणि स्वतःला त्रास करून घेतो. मी ही अगदी अशीच आहे.


आणि हो थोडीशी आळशी आहे.  आळशी म्हणण्यापेक्षा म्हणजे मला कधी कधी त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेवर करायला कंटाळा येतो.  म्हणजे कपडे घडी करायचे असले तर  एखादा सिरीयलचा एपिसोड बघू मग करू किंवा थोड्या वेळाने करू,  असं मी करते.  अगदीच दरवेळी नाही पण अधून मधून येतो  कंटाळा. आणि म्हणूनच कदाचित हा लिहायला आज उजडवा लागला.


एक गोष्ट खूप चांगली आहे की मी समोरच्या व्यक्तीला पटकन  बोलते करते.  त्यामुळे माझी बरीचशी काम ही थोड्याशा गोड बोलण्याने होतात.  माझ्याकडे लाडूला असणारी मदतनीस म्हणते की , "ताई , दगडालाही बोलायला लावाल तुम्ही."   या गोष्टीचा फायदा असा माझी कामे जास्त अडून राहत नाही . आणि अगदीच अडलं  तर कुठलंही काम करायला मी मागे राहत नाही म्हणजे  प्लंबर,  कार्पेंटर,  इलेक्ट्रिशियन यांची छोटी छोटी  काम मी स्वतःची स्वतः करून घेते.


इतरांना मदत करायला मला खूप आवडते. माझ्या ताकती आणि कुवतीनुसार हा पण.....आणि एक गोष्ट फारच गंमतीची मला ना अगदी कशाचीही भीती वाटते. वेळ पडली तर मी रणरागिणी ही होते . पण बऱ्याच वेळा माझा भित्रा ससा असतो. 😂😂😂


एक अत्यंत वाईट गुण आहे . हा गुण म्हणावा की वयानुसार आलेली ही गोष्ट.  तो म्हणजे विसरभोळेपणा.  रोज शंभर वेळा मी मोबाईल कुठे ठेवला? चष्मा कुठे ठेवला? याचा शोध घेत असते.  मोबाईलला मिस कॉल देऊन शोधता येतो , पण चष्म्याचा काय?  तो शोधाण्यासाठी घरातल्या सगळ्यांना कामाला लावते.  तसंच कधी एखादी गोष्ट कुठेतरी ठेवते आणि विसरून जाते. आणि मग ती मिळाली नाही,  कि  चिडचिड करते.  आणि सापडली की स्वतःवरच कधी रागावते तर कधी हसते.


एक गोष्ट मी सगळ्यात शेवटची पण खूप महत्त्वाची मला लिपस्टिक लावायला प्रचंड आवडतं. म्हणजे मी अगदी घरीच असले तरी लिपस्टिक लावते.  आंघोळ झाल्यावर देवाला नमस्कार करायच्या आधी ओठांवर लिपस्टिक फिरवणं चुकत नाही.  बऱ्याच वेळा लोकांनी टीका ही केलीय यावर   पण who केअर्स😏. ते  मला प्रचंड आवडतंआणि ते मी करणारव.


आणि खूप महत्वाचे मी माझ्या मनाचा कुणालाही थांगपत्ता लागू देत नाही. मनातली वादळं मनात ठेवून छान हसत राहणे  मला उत्तम जमते.


अजून असं काही आठवत नाहीये. (विसारभोळेपणा😂)


पण राधिका ताई खरंच छान!!!  तुमच्या या मै ऐसी क्यूँ हूँ ?...  टॉपिक मुळे  कधी नव्हे ते आम्हांला आत्मपरीक्षण करायची संधी ही मिळाली आणि वेळही मिळाला.  


धन्यवाद राधिकाताई🙏🏻


आणि सर्व सखींचे लेख खूप खूप छान आहेत.   त्यांचे लेख वाचून, इन्स्पायर होऊन , मलाही वाटलं  यार !!!थोडा लिखना तो बनता है😜.


तर थोडी खट्टी बहुत मीठी ऐसी ही हूं मैं♥️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️


Sunday, 16 June 2024

वडील

 आज जागतिक पितृ दिन या दिवसाच्या निमित्ताने थोडसं वडिलांविषयी......


खरं तर वडील म्हटलं अगदी कडक स्वभावाचे, शिस्तीचे अशी व्यक्ती असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे  राहते.  कारण  वर्षानुवर्षे आपण तेच बघत आलो 

आहोत किंवा आमच्या पिढीपर्यंत वडील म्हटलं की साधारण अशीच व्यक्ती असायची म्हणूनही.


पण जसा जसा काळ बदलतोय , आणि  त्याबरोबर इतर गोष्टी बदलत आहेत तसं हल्लीच्या काळात वडिलांची प्रतिमाही थोडीशी बदलत जात चाललीये असं मला वाटतं. म्हणजे काळानुरूप प्रत्येक व्यक्ती आपल्यात बदल घडवत आली आहे त्यामुळे ही हा बदल होत असावा.


आईची माया, आईचं प्रेम,  आईचे कष्ट या विषयावर भरपूर लिहिलं जातं, बोललं जातं, सादर केले जाते.  वडील या विषयावर तितके भाष्य होत नव्हतं , पण हल्ली हल्ली थोडं फार लिहिलं जातेय, बोललं जातंय, सादर ही केले जातेय.


पूर्वीच्या काळी बहुतांश वेळा वडील नोकरी करायचे, किंवा कामानिमित्त बाहेर असायचे. त्यामुळे आपसूकच घर सांभाळायची जबाबदारी ही घरातल्या स्त्रियांवर असायची.  त्यामुळे घरातले प्रत्येक मूल हे आईच्या खूप जवळ असायचं, आणि आईला त्याची प्रत्येक गोष्ट माहीत असायचीच. हट्ट करायचा तर आईकडे, हवं नको असेल तर आईकडे,  राग  काढायचा तर आईवर असंच दिसतं बहुतेक ठिकाणी.


बाबांपासून थोडा दुरावा असायचा आणि तो अजूनही असतो. बाबा या शब्दाविषयी मनात आदरयुक्त भीती असते म्हणूनच कदाचित बाबांच्या इतके जवळ नाही जाऊ शकत. आईला आपण एकेरी संबोधतो आणि बाबांना बहुवचनी त्यामुळे इथेच दुराव्याची सुरुवात होत असावी.  कुठेतरी आपल्या घरातूनही ते शिकवलं जातं की  आईला अगं आई म्हटलं तर चालतं पण बाबांना अरे बाबा नाही म्हणायचं अहो बाबाच म्हणायचं. आता हल्ली बऱ्याच ठिकाणी बाबांनाही अरे बाबा म्हणायची पद्धत सुरू झाली ही चांगली का वाईट याबद्दल चर्चा नको.  पण त्या पाल्यातला आणि वडील यांच्यातला जो दुरावा आहे तो  थोड्या अंशी कमी व्हायला नक्कीच मदत होत असेल.


बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की , बाबा तर नुसते कडक शिस्तीचेच आहेत,  त्यांना कुठे कळतंय मुलांना काय वाटतं, काय हवंय. ते फक्त नाहीच म्हणतात. पण हे असं नसावं. कारण मुख्य गोष्ट इथूनच सुरू होते की पुरुषाला रडता येत नाही,  मोकळेपणाने व्यक्त होत येत नाही. जसं स्त्री करू शकते.  तसे पाहायला गेले तर तो ही दोनदा मोकळेपणाने रडतो एकदा त्याची आई गेल्यावर आणि दुसऱ्यांना मुलीची पाठवणी  करताना. कुठल्याही दुःखद प्रसंगात त्यांना वाईट वाटत नसेल असं नसावं बहुतेक , मी एक स्त्री आहे मी फक्त माझा  पॉईंट ऑफ यू मांडत आहे. आपल्या भावना मोकळेपणानं पुरुषाला मांडताच येत नाही बहुतेक.  म्हणजे पुरुष म्हणून जी प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनात असते त्याचा एक भार कुठेतरी ते सतत वाहत असतात.  आपल्या या धीरगंभीर प्रतिमेला कुठेतरी धक्का बसेल  या भीतीने ते कमी व्यक्त होत असतील.


एखादी गोष्ट करायला देताना कधीकधी आईचा होकार असतो पण  बाबांचा नकार असतो.  त्यामागे वेगळं कारणही असू शकते फक्त शिस्त किंवा  पैसे नाहीत म्हणून तो नकार असं नसतं.  एकंदरीतच पूर्ण संसाराच्या  खर्चाचा विचारही, पुढे जाऊन त्याचे परिणाम याचाही विचार ते करत असतील. कधी कधी आपली राहिलेली स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत , किंवा जे आपण सहन केले ते मुलांनी करू नये म्हणून वेळप्रसंगी त्यांना मनाविरुद्ध ही कठोर निर्णय घ्यावे लागतात.


वर  म्हटलं त्याप्रमाणे हल्ली वडिलांचे एक मृदू रूप ही आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळात बहुतांश वडील कधी आपल्या पाल्याचे मित्र होऊ शकले नाहीत. आता हे चित्र थोडं  बदलायला लागले आहे.  हल्ली  वडिलांना   बऱ्याच ठिकाणी  सर्रास एकेरी नावाने  नावाने संबोधले जाते.  त्यामुळे बाबा हा नुसता आपला बाबा नसून आपला मित्रही आहे असं मुलांना वाटतं.  अर्थात तिथं ही एक पुसटशी रेषा असते जिथे वडिलांचा धाक हा कायम असतोच. 


हल्लीचे बाबा मुलांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये लक्ष घालतात त्यांना मार्गदर्शन करतात. वेळीच त्यांच्या सोबत ते ही एखादी गोष्ट करायला संकोच बाळगत नाहीत.


पण तरीही मुलांपेक्षा मुली वडिलांच्या जास्त जवळच्या असतात , हे ९९% टक्के खरं आहे.  वडिलांचे जेवढे प्रेम मुलीवर असतं तितकं प्रेम मुलावर नसतं असेच नाही अगदी  पण त्या नेहमीच वडिलांच्या हृदयाच्या खूप जवळच्या असतात.  मुलीसाठी वडिलांचा जीव जास्त तुटतो.  मुली बद्दल एखादा निर्णय घेताना  ते जास्त सजग असतात.  मुलींच्या वडिलांना तारेवरची कसरत असते आधी आई आणि बायको मध्ये कुणाची बाजू घ्यायची याची आणि नंतर बायको आणि मुलगी यांच्या मध्ये कुणाची बाजू घ्यायची याची.


बऱ्याच वेळा मुलांचे आजारपणा आले की  त्यांची काळजी घेणं ही आईची जबाबदारी असायची,  पण हल्ली हल्ली वडील ही आपली कामे बाजूला ठेवून , किंवा आपली कामे सांभाळून मुलांसाठी वेळ काढतात.  आई इतकी जबाबदारी घेण्याचा ते ही प्रयत्न करतात. 


पूर्वीच्या काळी मुलींची मासिक पाळी वगैरे आली की वडिलांना तिला कावळा शिवला असे सांगितले जायचे किंवा त्या गोष्टी लपवल्या जायच्या.  पण हल्ली या गोष्टी जितक्या आईला माहिती असतात तितक्याच वडिलांनाही माहिती असतात.  म्हणूनच हल्लीचे बाबा त्या काळात होणाऱ्या मुलीच्या बदलाला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.  त्या काळात तिची होणारी चिडचिड कमी करण्यासाठी  आपल्या परीने प्रयत्न ही करतात. 


पूर्वी प्रगती पुस्तकांवर फक्त वडिलांची सही लागायची , त्यावेळी कमी मार्क मिळाले की ते काम आईवर सोपवलं जायचे. वडिलांशी बोलणे , त्यांना काही सांगणे हे मोठे दिव्य काम असायचे. आता मात्र वडिलांशी चर्चा होतात, आपले मुद्दे मांडले जातात, समजावले जातात. दोन पिढ्यांमधील वैचारिक फरक हा असतोच पण तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे.


 हल्लीची मुले मुली एखाद्या मित्राच्या हक्काने हात ठेवावा तेवढ्या हक्काने आपल्या वडिलांच्या खांद्यावर ही हात ठेवतात.  इतकंच नाही तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून घरातली जबाबदारी घेतात. हे होणारे बदल चांगलेच ना. 


पण एक गोष्ट नक्की वडील कितीही मित्रासारखे वागले तरी  मुलीच्या लग्नाचा विषय येतो , त्या वेळेला मात्र त्यांच्यातला *बाबा*  जागा होतो.  आपली जागा आता दुसरा कोणीतरी घेणार ही कल्पना त्याला सहन होत नाही. जसा आपण आपल्या मुलीला जपलं वाढवलं तसं समोरच्या पुरुषांनीही करावं त्यांची अपेक्षा असते. आणि म्हणूनच त्याचे निर्णय कधी कधी कठोर असतात.


जसं आपण म्हणतो मुलीला आई झाल्या शिवाय तुला कळणार नाही.  मुलांच्या बाबतीतही असतं ज्या मुलांचं त्यांच्या तारुण्यात वडिलांशी अजिबात पटलेलं नसतं किंवा वैचारिक मतभेद असतात.  ती मुले ज्यावेळी बाबा होतात त्यावेळी त्यांना वडिलांची तळमळ  कळून येते. आणि कधीही त्यांच्या वडिलांच्या जवळपास बसलेली मुलंही त्यांच्या म्हातारपणात त्यांना हात धरून सगळीकडे नेतात, आजारपणात त्यांची सेवा करतात.


याच कडक शिस्तीच्या बाबांचा जेव्हा आजोबा होतो. तेव्हा यांच्यातला तो मृदू माणूस  आपल्याला दिसू लागतो. आणि त्यावेळेला प्रत्येक मूल हाच विचार करतो ही नातवंडांशी इतके प्रेमाने वागणारे बाबा माझ्याशी का इतक्या कडक शिस्तीत का बरे वागले?  तेव्हा कुठं होते हे रूप?  आपल्याला कारण कळत नाही कारण तेव्हा आपण  त्यांच्या वयात असतो आणि त्यांच्या भूमिकेत ही.


एक नक्की की वडिलांचे प्रेम आईसारखे दिसत नसले तरी ते आपल्या मुलांवर तितकेच असते. फक्त कधी कधी ते  समजून घ्यायची गरज असते. 


सगळ्याला अपवाद असतातच त्यामुळे कुणाला वडिलांच्या बाबतीत वाईट अनुभव ही आले असतील.


माझा हा लेख माझ्या आजूबाजूला असणाऱ्या ते कुल बाबा तसेच  कडक शिस्तीच्या वडिलांना जागतिक पितृदिनानिमित्त भेट. 💐



सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




   या

Saturday, 15 June 2024

एक जुनी आठवण

आज दहावीचा निकाल लागला. दरवर्षी दहावीच्या निकलाच्या दिवशी माझा दहावीचा निकाल लागल्यानंतर ची एक घटना मला आठवते. अर्थात त्या घटनेशी निगडित दोन्ही व्यक्ती आज हयात नाहीत.  पण त्या घटनेनिमित्त त्या दोन्ही व्यक्तींची आठवण नव्याने ताजी होते.


मी दहावी झाले मार्च १९९२ला. आमच्या वेळी ७०-७५ टक्के म्हणजे खूप असायचे. हल्ली सगळ्यांचे मार्क बघून नवल वाटते. ८५ ते ९८ मध्ये  मार्क असतात. आमच्या काळात मंगेश म्हसकर नावाचा मुलगा ९६% नी पहिला आला होता, कोण कौतुक झालं होतं त्याच. आजही ते पेपर मधले रकाने आठवतात. 


 माझा दहावीचा निकाल लागायच्या आधीच आईला सांगितलं होतं ७५ ते ७८% च्या मध्ये मिळतील त्यापेक्षा जास्त नाही त्यापेक्षा कमी नाही.  एक ताई बोर्डाच्या ऑफिस मध्ये असल्यामुळे एक दिवस आधीच निकाल कळला होता.  पण शाळेत जाऊन पाहिल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब  झाले.  मला ७५.४२टक्के होते.मिळालेल्या मार्कांचे कौतुक सगळ्यांनाच होतं, कारण ज्या परिस्थितीत आम्ही शिकत होतो त्या परिस्थितीत ते मार्क जरा जास्तच होते.


माझा निकाल लागला, त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. त्यावेळी  काही असे मोबाईल वगैरे नव्हते, की स्टेटसला टाकलं किंवा फोन करून सांगितलं.  फोनही फार कमी होते.  त्यामुळे नातेवाईकांना मार्क कळायला एक दोन दिवस लागायचे. 


 तर दुसऱ्या दिवशीची गोष्ट ते तीन साडेतीन वाजले होते. आणि आमच्या घराची कडी वाजली ,तेव्हा  बेल हा प्रकार चाळींमध्ये जास्त अस्तित्वात नव्हता.  मी दार उघडलं समोर आमचा बॉम्बे सेंट्रल चा बाळा मामा होता. जो बीएसटीत कामाला होता.


 मला आणि आईला दोघींनाही आश्चर्य वाटलं.  की हा आता यावेळी इथे कसा? तो येऊन बसला. आईने त्याला पाणी वगैरे दिलं. मला मामानं जवळ बोलावलं आणि त्याने पार्ले जी चा पुडा माझ्या हातात दिला. माझे अभिनंदन केलं. तो आईला म्हणाला मला माहितीच नव्हतं मिलन इतकी हुशार आहे.  आत्तापर्यंत घरातल्या इतर मुलांचं कौतुक ऐकून होतो.  मला वाटलं होतं की हिला ५०-५५% मिळतील.  पण खरंच खूप चांगले टक्के मिळाले. खूप छान वाटलं हिला ७५ टक्के मिळाले हे ऐकून.    मला अगदीच रहावलं नाही म्हणून हाफ डे टाकून मी भेटायला आलो.  मला आणि आईला दोघींनाही अगदी भरून आलं होतं.   त्याचं येणं अगदीच अनपेक्षित होतं.  आमचा बाळा मामा म्हणजे अगदी साधाभोळा  माणूस.  आपल्या भाचीचे कौतुक करायसाठी खास हाफ डे घेऊन बॉम्बे सेंट्रल होऊन विरारला येणं  हे खरंच कौतुकास्पद होतं. त्यानंतर आईने त्याला तिची स्पेशलिटी खिचडी करून घातली. खिचडी लोणचं तो जेवला आणि नेहमी तो म्हणायचा गोविंद गोविंद म्हणत तृप्त मनानं पानावरुन उठला.


त्याने आणलेल्या त्या पार्ले जी च्या पुड्याची किंमत काही लाखाहून कमी नव्हती. मला त्या वेळेला मिळालेलं सगळ्यात मोठ बक्षीस आहे कारण ते आजही माझ्या लक्षात राहिले आहे. आणि खूप निर्भेळ कौतुकानं दिलेलं होते ते.


दुर्दैवाने मामा खूप लवकर गेला.  त्याची जाण्याची तारीख आणि माझ्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख ही एकच आहे. काही योगायोग मनाला चटका लावून जातात.


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

सहजच.....५

 काल सुशांत सिंग च्या बातमीनंतर इतक्या पोस्ट आल्या, एकटे राहू नका, कुणाशी तरी बोला, मोकळे व्हा....अगदी १००% खरे आहे. पण काही गोष्टी अशा घडतात की आपण त्या कुणाला पटकन नाही सांगू शकत.कुठेतरी ही भीतीही असते याच गोष्टींचा आधार घेऊन समोरच्या व्यक्तीने कधी पुढे आपल्याला दुखावलं तर....त्यामुळं नाही मोकळं होता येत. 

जेव्हा आपल्याला कुणी विश्वासाने काही सांगितलं तर ते आपल्यापर्यंत ठेवण्याची आपलीही तयारी हवी.  समोरच्या व्यक्तीला हा विश्वास हवा की मी सांगितलेल्या गोष्टींचा दुरूपयोग होणार नाही.  

तर काही वेळा असेही होते की आपण चांगले काहीतरी करायला जातो आणि समोरच्या व्यक्तीला ते त्याच्या बाजूने नसल्यामुळं चूक वाटते. हा अनुभव ही प्रत्येकाने घेतला असेल. 

काल हे सगळे वाचताना एक मराठी सिनेमा आठवला लॉस्ट अँड फाउंड. त्यात एकटे वाटणाऱ्या व्यक्ती सोबत २४ तास घालावायचे अशी संकल्पना एक ग्रुप राबवत असतो. खूप वेगळी कल्पना असे असायला हवे कुठेतरी. आज प्रत्येकाला गरज आहे अशा आधाराची. 

माझ्या डॉक्टर बीना वागळे ने टाकले आहे की कधी वाटले तर माझ्याशी बोला निःसंकोचपणे असे टाकणारी मी पाहिलेली पहिलीच व्यक्ती .....तेच मला ही सांगावेसे वाटते....

(उगाच टाईमपास म्हणून नाही... जर खरंच कुणी नसेल व्यक्त व्हायला तेव्हा)

बोलून मन हलकं होते आणि साठवून फक्त ओझे होते😊

Friday, 7 June 2024

सहजच .....४

 दिलसे.....❤️


आज आपल्या लाडक्या वरूणराजाचा  वाढदिवस...७ जूनला पाऊस पडणार आणि १३ जून ला शाळा उघडणार हे समीकरण आमच्या पिढीच्या मनात अगदी पक्के बसलेलं आहे....🌧️🌧️🌧️


या निमित्ताने आठवण झाली जुन्या दिवसांची. जून महिना सुरू झाला की शाळेचे आणि पावसाचे वेध लागायला सुरवात व्हायची. पहिला पाऊस कधी येतो आणि त्यात कधी भिजतो असे होऊन जायचे. आणि दोन महिन्यांनंतर शाळा सुरू होणार आणि लवकर उठावे लागणार म्हणून मन थोडेसे खट्टू ही व्हायचे.


आभाळ जरा भरून आले की हातातली कामे टाकून आकाशाकडे पाहत राहायचे की कधी पाऊस पडतोय. पाऊस पण इतका खोडकर की जेव्हा फावला वेळ असायचा तेव्हा पडायचा  नाही आणि सगळे कामात गर्क असले किंवा जेवायला बसणार इतक्यात हा बरसायचा. मग सगळे पटापटा आवरायचं , घास कोंबायचे आणि पावसात भिजायला पळायचे. त्यावेळी सर्दी होईल, खोकला होईल अशी कारणे नसायची. उलट उन्हाळ्यात आलेलं घामोळे पहिल्या पावसात भिजून जाते म्हणून सर्रास भिजायला जायचो. 

बऱ्याच बिल्डिंगमध्ये पावसात फुटबॉल खेळला जायचा. साचलेल्या त्या पाण्यात उड्या मारायच्या. सगळेच चिंब भिजलेले असताना एकमेकांवर ओंजळीत येईल तेवढं पाणी एकमेकांवर उडवायचे. दहा वेळा तोंड धुवायचे. आणि गच्चीवरून पाईप मधून खाली येणाऱ्या पाण्याखाली उभे राहायचे. कोण काय म्हणेल, कोण बघतेय, कोण ओरडेल याची अजिबातच चिंता आणि तमा दोन्ही नसायची. ते क्षण त्या छोट्या ओंजळीत सामावून घ्यायची धडपड असायची.


पाऊस हजेरी लावून गेला की शाळेच्या तयारीला सुरवात व्हायची. जुन्या पावसाळी चपला प्रथम बाहेर निघायच्या. जुने रेनकोट , छत्र्या सगळं काढलं जायचे. नवीन गणवेश शक्यतो घरातल्या मोठ्या मुलीला किंवा मुलाला मिळायचा. बाकीच्यांना शक्यतो जुनाच. दप्तराची ही तीच गत. तेव्हा खाकी दप्तर असायची बहुतेक. अगदी श्रीमंतांची जराशी वेगळी. पुस्तकं ही आधीच्या वर्गातल्या कुणाची तरी , किंवा मोठ्या भावाबहिणीची. नवीन पुस्तकं मिळाली की त्याचा रुबाब काही वेगळाच असायचा. त्या पुस्तकांच्या पानांचा वास घेण्यात आणि पानावरुन हात फिरविण्यातच बराच वेळ जायचा. फक्त वह्याच काय त्या नवीन असायच्या. त्याला पेपर, कॅलेंडर किंवा खाकी कव्हर घातलं जायचे. लेबल लावून नावं घातली जायची. कव्हर घालणे हा एक वेगळा कार्यक्रम असायचा. शक्यतो तो एखाद्या रविवारी असायचा किंवा दुपारी फावल्या वेळेत. आवडत्या विषयाच्या वहीला अगदी सांभाळून आणि व्यवस्थित कव्हर घातले जायचं. घरात ज्याचे अक्षर चांगलं असेल त्याला सगळ्यांच्या वह्यांवर नावे घालावी लागायची. नवीन वर्ग, नवीन वर्गशिक्षिका , यावर्षी वर्गात नवीन कोण मुलं मुली येणार याची उत्सुकता असायची. पहिला बेंच मिळवायचा म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी लवकर जाण्याचे प्लॅन ही केले जायचे. 


जून महिना नवीन ऋतू आणि नवीन शालेय वर्ष याची चाहूल घेऊन यायचा.


काही म्हणा पण ते मंतरलेले दिवस पुन्हा  येणे नाही. पण त्या सुखद आठवणींवर आयुष्य जाते...आणि मित्रमंडळी सोबत गप्पांच्या फडात हे प्रसंग अगदी जिवंत उभे राहतात डोळ्यासमोर❤️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️