Tuesday, 6 June 2023

चप्पल

 



चप्पल खरं तर हा विषय लिहिण्यासारखा नाही किंवा हा काय विषय आहे का लिखाणाचा?  असे लगेचच  मनात येतं.  पण मोच्याकडून शिवून आणलेल्या ठेवायला म्हणून चपलेचा खण उघडला आणि समोर एकदम दहा एक जोड. त्यातील एक घरी घालायला, एक लग्नाला किंवा एखाद्या समारंभाला जाताना,  चालायला एक, धावायला एक.  परत जरा जसा वेष त्याला तश्याच चपला असे म्हणत म्हणत  एकाचेच किमान चार पाच तरी चप्पल जोड घरात असतात.  एखादी चप्पल तुटली की ती  शिवून आणणे ही ही पद्धत आता फार जुनी झाली आहे. तुटली की ती टाकून द्यायची आणि नवीन घ्यायची. त्या इतक्या सगळ्या चपला  बघून आणि हा सगळा विचार करत मन भूतकाळात गेले.


आमच्या लहानपणी म्हणा किंवा अगदी कॉलेजमध्ये असतानाही,  आमच्याकडे जेमतेम दोन जोड असायचे चपलांचे. एक नेहमीच्या  वापराचे  आणि एक पावसाळ्यासाठी. पूर्वी सगळयाच शाळांतून बूटच घालायला हवे अशी सक्ती नव्हती. त्या काळात कितीतरी जण अनवणीही शाळेत येत असत. आणि जरी असलीच बूट घालायची सक्ती, तरी खूप जर कमी जण असे होते की ज्यांच्याकडे नवीन बूट असायचे.  घरातल्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला ते बूट घेतले जायचे आणि मग त्यापेक्षा धाकटी बहीण,  भाऊ यांना ते वापरायला दिले जायचे . त्यांनाही पायात बसेनासे झाले की नंतर कुणाला तरी दिले जायचे. एक तर कुठल्या तरी नातेवाईकांच्या मुलांना किंवा मग घरी काम करणाऱ्या बाईंच्या मुलांना.



मला आठवतंय आम्ही लहान असताना जवळपास सगळ्यांकडेच  असायची, टॉयलेट बाथरूमला जाण्यासाठी म्हणून ठेवलेली  किंवा सगळ्यांची मिळून कधी  पायात चढवता येईल आणि पटकन बाहेर घालून बाहेर पडता येईल अशी पांढऱ्या रंगाची निळ्या पट्ट्यांची स्लीपर.  ती स्लीपर थोडीशी महागातली घेतली की  हिरव्या पट्ट्याची आणि थोडीशी हिरवी झाक असलेली  ती स्लीपर असायची. साधारण सगळ्यांकडे सारख्या आणि वेगवेगळ्या मापाच्या त्या स्लीपर घातल्या जायच्या. मला आठवतंय आम्ही चेंबूर ला असताना जवळजवळ सगळेच तीच घालून खेळायला यायचो आणि मग बॉनीच्या दारात त्या काढून ठेवायचो. आणि निघताना माझी कुठली, तुझी कुठली यावरून भांडणे व्हायची. पण पायात घातली की प्रत्येकाला कळायचे आपली स्लीपर कुठली, कारण प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, त्यामुळे ती एका विशिष्ट बाजूने झिजली जायची , पायात चढवली की आपोआपच समजून यायचे. आणि त्यातूनही घोळ झालाच, तर घरी गेल्यावर घरच्यांना बरोबर ओळखू यायची ती आणि मग कुणाकडे गेली असेल म्हणून शोधाशोध. पण ती ही वेगळी गंमतच होती.

पावसाळ्यात या स्लीपरच्या पट्ट्याच्या मागची बाजू उघडून त्यात एक जाड रब्बर टाकला की झाली पावसाळ्यासाठी ती तयार. तो रब्बर मागच्या बाजूने पायावर चढवला की झाली स्लीपर ची सॅंडल आणि चिखल उडायची ही भीती नाही. अशी टू इन वन , स्वस्त आणि मस्त अशी आपल्या सगळ्यांची लाडकी स्लीपर.



जशी ही स्लीपर सगळ्यांकडे असायची.  तशीच पावसाळी चप्पल खास मुलींसाठी किंवा बायकांसाठी होती ती म्हणजे बाटाची पट्ट्या पट्ट्यांची सॅंडल. लाल किंवा काळा या दोनच रंगात ती यायची. पण बहुतांश वेळा लाल रंगाची सॅंडल सगळ्या जणी घ्यायच्या. त्यामुळे पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या चार मुली असतील तर, त्यापैकी तिघींच्या  पायात तरी नक्कीच या लाल रंगाच्या सॅंडल असायच्या. 


पावसाळ्यात अजून एक गंमत असायची ते म्हणजे गंबुट.

हेही लाल किंवा काळ्या रंगाचे असायचे. आणि मग मुलं मुद्दामून त्या गंबुटात पाणी साठवून पचाक पचाक असा आवाज करत चालायची. घराजवळ आले की ते गम्बुट काढून उलटे करून त्यातलं पाणी काढून टाकलं जायचं म्हणजे घरी ओरडा मिळणार नाही. त्या गंबुटातले पाणी एकमेकांवर उडवणे हे असले प्रकार ही काही मुले करायची.


त्यावेळी शक्यतो नवीन चपला या दिवाळीला घेतल्या जायच्या. मग कोणाची चप्पल कशी आहे याच्या याचाही एक वेगळा कार्यक्रम असायचा.  ज्या मुलीला जरा उंच टाचांचे वेगळे असे बूट जर मिळाले असतील,  तर तिचा रुबाब जरा जास्त असायचा. त्यावेळी फार कमी लोक उंच टाचांच्या आपला घालायचे.  त्या उंच टाचांच्या चपलांचं इतकं अप्रूप होते आम्हाला. की ती चप्पल घालून जाणाऱ्या मुली बद्दलही डिस्कशन व्हायचं. कसं जमत असेल हिला एवढे हिल्स चे चप्पल घालून चालायला? पडायला होत नसेल का? उंच टाचांच्या चप्पल घालणाऱ्या किंवा बायका या जरा श्रीमंत अशीच काहीशी धारणा होती. एखाद्या मैत्रिणीचे तसे असतीलच चप्पल आणि ती मैत्रीण तितकी चांगली असेल.  तर तिचे ते उंच टाचांचे चप्पल घालून चालायचा प्रयत्न करायचा.  चालणं कसलं धडधडणे असायचे ते.  पाय सारखा वाकडाच व्हायचा. आणि मग जाऊ दे, पायच मुरगळेल म्हणून तो नाद सोडून दिला जायचा.



अजून एक चप्पल जिचं सगळ्यांनाच आकर्षण असायचं आणि आजही आहे,  पण तेव्हा मात्र ती शक्यतो मोठ्यांनाच मिळायची.  ती म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती कोल्हापुरी चप्पल. हल्ली कोल्हापुरी चपला सगळेच घालतात एक फॅशन म्हणून, पण त्या काळी फार कमी लोक ती चप्पल घालायचे.   मला आठवतंय माने काका ती कोल्हापुरी चप्पल घालायचे,  तसे माझे आजोबाही कधीतरी  कोल्हापुरी चप्पल घालायचे पण  शक्यतो बुटातच असायचे ते. कोणी कोल्हापूरला जाणार असले की त्यांना कोल्हापुरी चप्पल आणा हा नक्की,  करर्कर वाजणाऱ्या असे अगदी आवर्जून सांगितलं जायचं. त्या चपलांचा रुबाब काही औरच.


आता सारख्या निरनिराळ्या प्रकारच्या चपलांचे फॅड ही त्याकाळी नव्हते . आणि त्यावेळी चपलांचे इतके सगळे ब्रँडही सर्वसामान्य माणसांना माहीत नव्हते. बूट म्हटले की चामड्याचे बूट, आणि शाळेच्या  मुलांसाठी कॅनव्हास चे बूट. पावसाळी किंवा इतर चपला म्हटलं की फक्त बाटा. त्यानंतर पॅरागॉन हे नाव क्वचित कुठेतरी यायचं. आणि त्यावेळी  एखाद्या ओळखीच्या लहानश्या चपलांच्या दुकानातूनच त्या घेतल्या जायच्या.


कुठल्यातरी एका हिंदी सिनेमात एक संवाद आहे की चपलांवरून त्या माणसाची लायकी कळते.  हे वाक्य ऐकलं पु ल देशपांडे यांचे चितळे मास्तर आठवतात. त्यांच्या चपला किती झिजल्या असतील, हे त्या नुसत्या वर्णनावरून आपल्या डोळ्यासमोर येतं. खऱ्या आयुष्यातही काहींच्या बाबतीत हे असेच  सत्य सस्ते. म्हणजे हा संवाद प्रत्येकालाच लागू होतो असं नाही कारण त्या चपलांच्या मागे एक वेगळी कहाणीही असू शकते. आणि ती कहाणी जास्त महत्त्वाची असते,  त्या चपलांच्या ब्रँड आणि किमतीपेक्षा.


 आत्ता आपल्याकडे पैसा आहे, म्हणून कदाचित आपल्याला त्या साध्या चप्पल ची किंमत नसते. तुटली कि  टाकून दिली.  पण पूर्वी अगदी  मोच्याने सांगेपर्यंत, की आत्ता ही शिवता येणार नाही, इतकी ती चप्पल वापरलेली असायची.  ती त्या काळच्या लोकांची काटकसर असायची,  आणि त्या साध्या वस्तू वरले प्रेम ही.  ती काटकसर, तो ओलावा बहुधा आत्ता थोडासा कमी झाला आहे. सगळ्याच गोष्टींपासून आपण डिट्याच होऊ लागलो आहोत. कदाचित म्हणूनच आपल्या घरात माणसांपेक्षा चपलांची संख्या वाढली आहे.....एक विचार करण्यासारखी गोष्ट.


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️


Saturday, 15 October 2022

दिवाळीचा अभ्यास

 हल्ली शाळा ही वेगवेगळ्या बोर्डाच्या असल्यामुळे सुट्ट्यांचे वेळापत्रक बदललं आहे. आमच्या वेळेला साधारण नवरात्रीच्या वेळेला सहामाही परीक्षा सुरू व्हायच्या, आणि साधारणपणे दिवाळीच्या तिच्या आठ दिवस आधी संपायच्या. मोजून २१ दिवस सुट्टी असायची त्यावेळी दिवाळीची.


वर्षाचा सगळ्यात मोठा सण म्हणून नेहमी अगदी आतुरतेने वाट बघितली जायची. तशी अजून बरीच कारणं होती, बाबांचा होणारा बोनस, नवीन कपडे, फटाके,  फराळाचे पदार्थ, सुट्टीत येणारे पाहुणे.  त्यामुळे लहानांपासून  मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिवाळीची आतुरता असायची.


या दिवाळीच्या निमित्ताने एक गोष्ट मला आठवली जी आता बरीच विस्मरणात गेली आहे, बऱ्याच  शाळांमध्ये बंद ही झाली आहे.  ती म्हणजे *दिवाळीचा अभ्यास*.   हा दिवाळीचा अभ्यास म्हणजे मोठी गंमत होती.


शेवटच्या पेपर च्या दिवशी किंवा जर परीक्षेनंतर एखाद दिवस शाळा असेल त्या दिवशी एक सायकलोस्टाइल पेपर वर्गातील  सगळ्या मुलांना वाटला जायचा. त्याच्या सुरुवातीला शुभ दीपावली असे लिहुन दोन बाजूला छोटे छोटे कंदील, किंवा पणत्या प्रिंट केलेल्या असायच्या. कधी कधी वेली सारखं नक्षीकाम केलेले असायचं.  तो पेपर आला की काही मुलांना आनंद व्हायचा,  तर काही मुलांची नाक मुरडायची, सुट्टीतही अभ्यास करावा लागणार म्हणून.


त्या कागदाला एक विशिष्ट प्रकारचा वास असायचा, त्या सायक्लोस्टाईल च्या शाई चा असावा. तो वासच आमच्या दिवाळीची सुरुवात असायची.


त्या पेपर वर तारखेनुसार त्या दिवशी काय अभ्यास करायचा ते लिहिलेलं असायचं.  म्हणजे उदाहरणार्थ दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ :  बे ते 10 चे पाढे लिहिणे. मराठीचे शुद्धलेखन पाच ओळी. 

दिवाळीचे चित्र काढणे.

दिनांक २३ ऑक्टोबर २०२२: बे ते १५ चे पाढे लिहिणे. मराठीचे शुद्धलेखन पाच ओळी. गोटीव कागदाचा कंदील बनवून चिकटवणे. त्या अभ्यासात फुले, पाने गोळा करून चिकटवणे. चित्रं काढणे, चित्र काढून त्यावर डाळी चिकटवणे , एखाद दुसरा निबंध. अशाप्रकारे प्रत्येक दिवसाचा अभ्यास हा लिहिलेला असायचा.  


तो अभ्यास करण्यासाठी नवीन वही ही घेतली जायची. कारण त्या कागदा वर लिहिलेलं असायचं की दिवाळीच्या अभ्यासासाठी नवीन वही करणे व ती सजवणे.  


ती वही आणायला जातानाही एक वेगळा उत्साह असायचा. कशी वही घ्यायची, कशी ती सजवायची याचे मनात चित्र रेखाटले जायचे. एकदा ती वही घरी आणली,  की अगदीं पहिल्या पानावर श्री लिहिला जायचा , मग नाव, इयता, शाळेचं नाव नेहमीप्रमाणे हे सगळे लिहीलं जायचे. आणि त्या नंतर मोठ्या दिमाखात *दिवाळीचा या अभ्यास*  असे  लिहिलं जायचे. मग वाटले तर एखादी पणती, कंदील ही रेखाटला जायचा. 


पाढे लिहिताना पट्टीने छान पैकी रेषा आखून घ्यायच्या. शुद्धलेखन लिहिताना आवडीच्या धड्यातले आवडते परिच्छेद लिहिले जायचे. सुरवातीचे दोन तीन दिवस अगदी उत्साह असायचा. रोज अगदी ना चुकता अभ्यास केला जायचा.


त्यानंतर साधारण सगळ्यांच्या परीक्षा संपून सगळी मित्र मंडळी मोकळी व्हायची. आणि मग खेळात बराच वेळ निघून जायचा. घरात  साफसफाई , फराळाचे पदार्थ याची तयारी सुरू व्हायची. नवीन कपड्यांची खरेदी, फटाके या सगळ्यांत त्या अभ्यासाच्या वहीच्या विसर पडलेला असायचा.  किंवा आज नाही करत पण उद्या नक्की दोन दिवसांचा अभ्यास करिन असे वचन देऊन , आजचे खेळाचे दान पदरी पडून घेतले जायचे. आणि नेहमीप्रमाणे उद्या कधी उजडायचा नाही.   हा अगदीच  कुणी अभ्यासू मुलांनी केला ही असेल पण त्याची शक्यता अगदीच कमी.


 दिवाळीचे चार दिवस कसे निघून जायचे कळायचे ही नाही. त्यानंतर भाऊबीजेच्या निमित्ताने आलेले पाहुणे घरी असायचे, मग तेव्हाही त्या वही चा विसर पडलेला असायचा.


हे सगळं झाल्यानंतर जशी सुट्टी संपायची वेळ जवळ यायची, तेव्हा अगदी प्रकर्षाने आठवण यायची या दिवाळीच्या अभ्यासाच्या वहीची. आणि मग व्हायची ती धावपळ.  आजचा अभ्यास उद्या करू म्हणणाऱ्या आम्हाला, आज उद्या काय तर परवा तेरवा आणि त्या आधीचा ही बऱ्याच दिवसांचा अभ्यास एकाच दिवशी करावा लागायचा. त्यात काही बनवायचं असेल तर त्या साठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठीची धावपळ. आणि नेहमीप्रमाणे घरातल्यां मोठ्या माणसांना लहान मुलांना ओरडायला अजून एक निमित्त मिळायचे.


मला आठवतं, आमची आशा मावशी मग दुपारी आमचं खेळणं बंद करून, आम्हाला तो अभ्यास पूर्ण करायला लावायची. त्याबरोबर पाठीत दोन धपाटे ही पडायचे. पण घाईगडबडीत ती वही पूर्ण करण्याची मजाही काही वेगळीच होती. ती वही पूर्ण झाल्यावर व्हायचीच असं नाही पण त्यातल्या त्यात  ९९ टक्के पूर्ण झाल्यावर त ती कोणी व कशी कशी सजवली आहे यावर मित्र-मैत्रिणींचा चर्चासत्र असायचं आणि कोणाला किती मार पडला याचंही.


ती वही पूर्ण करण्याची वेळ  आली की, जाणीव बाईची व्हायची ती दिवाळीची सुट्टी संपणार आहे याची आणि मग जास्त वाईट वाटायचे.... परंतु  ते वाईट वाटणे ही शाळेत जाई पर्यंतच असायचे. एकदा का शाळेत गेलं, मित्रमैत्रिणी भेटले , कुणी कुणी काय केलं, कुठं जाऊन आले हे बोलणं सुरू झाले की त्या वाईट वाटण्याचा विसर पडायचा.


पण काही म्हणा त्या दिवाळीच्या अभ्यासाची  वेगळीच गंमत असायची. आजही  त्या सायकलोस्टाइल पेपर चा वास नाकात जाणवतो.  त्या अभ्यासाची आठवण येते आणि वाटतं की पुन्हा एकदा तो अभ्यास अपूर्ण ठेवावा आणि त्यामुळे आपल्याला बोलणारी आपली  सगळी मंडळी आपल्या सोबत असावीत.... आणि पुन्हा एकदा ती जुनी दिवाळी साजरी व्हावी.



सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




Friday, 8 July 2022

वडापाव

 *वडापाव*


वडापाव म्हणजे आपला सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. वडापाव हे नाव घेतलं की आपल्या तोंडाला पाणी सुटते.  सुटलं की नाही तोंडाला पाणी? 

खूप दिवस झाले,  सारखे आपले मी वडापाव चे फोटो टाकते आहे. आणि बऱ्याच दिवसात लिहायला काही सुचतच नव्हतं पण काल फोटो बघताना म्हटलं अरे!!! हा विषय आहेच की लिहायला.


बनवायला अगदी तसा सोपा उकडलेल्या बटाट्याची भाजी करायची, मग ती बेसनच्या पिठात घोळवून तेलात छान पैकी तळून काढायची. आणि मग एक पाव घेऊन त्याला छान लाल तिखट चटणी थोडीशी गोड चटणी लावून वडा घालून खायचा, इतका साधा सोपा वडापाव. पण तरीही गाडीवरचा वडापाव खाण्याची मजा काही औरच. 

 आम्हा मुंबईकरांसाठी तर वडापाव म्हणजे आद्य खाद्य असं म्हणायला हवं. कारण मला वाटतं मुंबई ८० ते ९० टक्के माणसं ही दिवसातून एकदा तरी वडापाव खात असतीलच.   एखादी व्यक्ती दिवसभर  अगदी उपाशी राहिला, काहीच खायला नाही मिळालं तरी, ती व्यक्ती दिवसभर एका वडापाव वर राहूच शकते.  


आपण जर कोणाच्या स्ट्रगल स्टोरीज ऐकला म्हणजे एखाद्या उद्योगपतीची किंवा जास्त करून एखाद्या सिनेसृष्टीत काम करणाऱ्या व्यक्तीची.  सिनेसृष्टीत काम करताना जे बाहेरून आलेत, किंवा जे इथेच असून सुरवातीच्या दिवसात काम मिळविण्यासाठी धडपडत होते.  अशी प्रत्येक व्यक्ती म्हणतेच,  की माझ्या सुरुवातीच्या दिवसात मी एक कटिंग चहा आणि एक वडापाव खाऊन दिवस काढलेले आहेत.  


बसचा प्रवास, वडापाव, रेल्वेचा प्रवास, हे म्हणजे मुंबईचा सर्वस्व आहे.  इथे येणारी अशी एकही व्यक्ती नसेल की जिने ट्रेन मधला प्रवास नसेल केला. ट्रेन, बस मधून प्रवास केला नाहीये आणि ज्या व्यक्तीने वडापाव खाल्लेला नाही अशी व्यक्ती मुंबईकर असणे कठीण.  मुंबईत राहून मुंबईचा वडापाव न खाणं म्हणजे एक पापच जणू. 

 तर असा हा वडापाव,  सगळ्या शहरात हा वडापाव फेमस आहे.  आता तर वडापाव अगदी दिल्ली काय तर  सातासमुद्रापारा पलिकडेही पोहोचला आहे, परंतु मुंबईत येऊन जर वडापाव खाल्ला नाही तर ती मुंबई ट्रीप पूर्ण होत नाही एवढे मात्र नक्की.


आता वडापाव ची स्टोरी ही बऱ्याच वेळा आपण व्हाट्सअप वर वगैरे वाचलेली, ऐकलेली आहे. वडापाव या खाद्याची  सुरुवात कुठून झाली,  त्याचा उगम कसा झाला.  पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असतं ही आपल्या शहरात कुठला वडापाव जास्त फेमस आहे.  प्रत्येक ठिकाणी असं असतं की  हा वडापाव म्हणजे जगात भारी;  असा वडापाव दुसरीकडे मिळणार नाही.  हे वाक्य प्रत्येक शहरातला माणूस आपल्या शहरातल्या वडापावच्या टपरी बद्दल बोलत असतो. 


आमच्या चेंबूरचा ४२ चा वडापाव  म्हणजे ४२ नंबर बिल्डिंगच्या जवळ गाडी लागलेली असते म्हणून ४२चा वडापाव ( खरं नाव अनिलचा वडापाव).  विरारला बेस्ट प्रकाश वडापाव फेमस, बोरिवली चा मंगेश वडापाव फेमस आहे.  अरे, अमुक इकडचा वडापाव हा जगात भारी हे वाक्य  म्हणजे आपण जर एखाद्या  शहरात गेलो कि तिकडची लोक सांगतात की आलेच आहात  तिकडचा वडापाव एकदम भारी असतो, खाऊन जा.  म्हणजे तो वडापाव हा त्यांच्यासाठी अगदी म्हणजे हायक्लास असतो.  दुसरीकडचा वाईट असतो असं नाही . आणि गंमत म्हणजे  आपणही अगदी चवीने तो वडापाव खातो वगैरे, अगदी त्यांच्यासमोर सांगतो ही की अगदी मस्त वडापाव आहे.  पण तरीही  तिथून बाहेर पडल्यावर नक्कीच म्हणतो की आमच्याकडच्या वडापावची सर नाही या वडापावला.  असं  हे प्रत्येक जण करतो, म्हणजे आता मनातल्या मनात सगळे हसत असतील पण हे खरं आहे. 


वडापाव खाणे म्हणजे सुख आहे आणि   मुंबईच्या बाहेर जाऊनही चविष्ट वडापाव खायला मिळणं म्हणजे म्हणजे दुप्पट सुख. आम्ही गावी जातों तेव्हा खारेपाटण चा वडापाव आमच्या तराळ्यातला गगनगिरी वडापाव म्हणजर एकदम खासच.


मला आठवतो तेव्हा या वडापावची किंमत अगदी  काहीतरी सव्वा-दीड रुपया होती.  यावरून अगदी दोन ते चार रुपये वडापाव झाला होता. त्यावेळेस अगदी रुपया सव्वा रुपया इतके ही पैसे नसायचे. अगदीच कोणी पाहुणे आले आणि त्यांनी काही हातावर पैसे टेकवले तर त्याचा वडापाव खायचा. अगदीच वडापाव खायचा नसेल तर आमच्या बेचाळीसच्या वडापाववाल्याकडे (अर्थात त्याच्याकडे असं नाही सगळ्याच वडापाववाल्यांकडे) चुरापाव  मिळत असेल.  म्हणजे वडे तळल्यानंतर उरतो तो चुरा पावाला  गोड चटणी तिखट चटणी त्यात घालून दिला जातो तो चुरापाव. आम्ही खायचो त्या वेळेला तो चार आणे होता आणि नंतर तो आठ आणे झाला.  वडापाव खायला दिलेले पैसे चार वेळा चुरापाव खाऊन होईल म्हणून वडापाव खायचा ही टाळलं आहे. कधीतरी कोणी अगदीच  जर पार्टी दिली तर तो फुकटचा वडापाव खाण्याची मजा काही औरच आणि वाचवलेल्या पैशात चुरापाव.


वडापावच्या बाबतीतची एक गमतीदार आठवण आहे चेंबूरची. आमच्याकडे गणपती असायचे पाच दिवसाचे. गणपती  विसर्जनाला जाताना प्रत्येकाची धडपड असायची गणपतीच्या रिक्षातून जायची.   पण येताना मात्र आम्ही अनंतमामा ज्या रिक्षात असेल त्या रिक्षात बसायला धडपडायचो, कारण येताना अनंतमामा त्याच्या रिक्षात असणाऱ्या प्रत्येकाला वडापाव द्यायचा. अर्थात सुरुवातीला फक्त त्याच्या रिक्षात असणाऱ्या लोकांना मिळायचा.  पण काही लहान मुलांनी चुगली  केल्या नंतर मात्र मग तो सगळ्यांसाठी आणला जायचा. पण तरीही तिकडे गाडीवर उभं राहून गरम-गरम वडापाव खाण्याची जी मजा होती, ती घरी पार्सल करून आणलेल्या वडापावला येत नाही. यावरून बाकीच्यांना चिडवायला जरा मजा यायची त्यामुळे त्यावेळेला  त्या रिक्षात बसायला आमची धावपळ असायची.


खरंच असं कधी कधी वाटतं की आमची पिढी तशी खूप कमी खर्च करणारी आहे. आम्हाला वडापाव, पाणीपुरी याच्यावर भागायचं.  अगदी तुमचं स्टारबक्स मॅकडोनल्ड या गोष्टी आम्हाला नकोच असे नाही किंवा हव्या असे ही नाही.  चार मित्र मैत्रिणी असले आणि वडापाव किंवा शेव पुरी पाणीपुरी समोर असली खायला,  तरी तेवढी पार्टी ही  आमच्यासाठी पुरेशी असते 


मी जेव्हा चेंबूरला राहायचे, त्या वेळेला मी आणि माझी मैत्रीण आम्ही बऱ्याच वेळा वडापाव किंवा चुरापाव खायला जायचो.  म्हणजे जर  दोघींकडे पैसे असतील तरच खायला जायचो.  मग आम्ही दोघी जाणार तर काहीतरी कारण काढायचं की असंच फिरायला जातोय , जरा राऊंड मारून येतो. किंवा आमच्या बिल्डिंग मधली मोठी मुलं जायची वडापाव खायला, तेव्हा मग त्यांच्या बरोबर कोणालातरी दोन लहान मुलांना घेऊन जायचे त्यात कधीतरी नशिबानं नंबर लागला तर.   कोणी पाहुणे आले  की घरातली वडीलधारी माणसे सांगायची, जा तिकडचा वडापाव घेऊन ये.  मग वडापाव घेऊन येणार त्यालाही एक वडापाव मिळायचा,  त्यामुळे एवढ्या लांब वडापाव आणायला जाण्यासाठीही आमची चढाओढ असायची.  की तू जाणार की मी जाणार. 


बेचाळीसच्या  वडापावची चव अजूनही जिभेवर तशीच रेंगाळते  आहे. त्या वडापावच्या गाडीवर कितीतरी आठवणी आहेत.  तिकडे वडापाव खायला गेल्यावर  खूप गर्दी असली की थांबावं लागायचे मग कुणीतरी ओळखीचे भेटले की गप्पा,  किंवा काहीतरी गुपित सांगायचे म्हणून ही स्पेशल वडापाव पार्टी. तेव्हा असे कॉफी शॉप नव्हतें ना तास तास बसायला देणारे.  वडापावच्या गाडीवर गेल्यावर लपून-छपून वडापाव खायची मजा काही वेगळीच होती.  काहीतरी कारण खोटं सांगून आलेले असलो की मग कोणीतरी बघेल म्हणून अगदी त्या गाडीच्या मागे जाऊन पाठ करून वडापाव खाल्ला जायचा.  अर्थात असे हे सगळ्यांनीच केलं असेलच. आता या सगळ्याचा हसू येतंय पण या त्यावेळच्या गोष्टीची मजा काही वेगळीच होती.

होते असे एक खाऊन पोट भरतच नाही, कमीत कमी दोन हवे. तर कुठे जरा पोटातला वणवा  शांत होतो.  असतात काही असे लोक म्हणजे एक तर प्रकृतीची जरा जास्तच काळजी घेणारे किंवा डायबेटीस पेशंट किंवा अगदीच नाही तर ज्यांना ॲसिडीटी खूप होते  म्हणून एका वडापाव धन्यता मानणारे.  


पाऊस पडायला लागला की बटाटा भजी, कांदा भजी हा बेस्ट ऑप्शन असतो. वडापाव ला तोड नाही. बाहेरचे खायचं नाही म्हणून बऱ्याच दिवसांत वडापाव खाल्ला गेला नाही तर घरी तरी वडापाव कर आशु भुणभुण  मागे लागते. पण जरी घरी किती वडापाव खाल्ला तरी गाडीवरच्या वडापावचे समाधान घरच्या वडापावला येत नाही. वडापाव  तळलेली मिरची खाणारे ही आहेत.  म्हणजे जेवढा वडापाव आवडीने खातात तेवढ्याच आवडीने ते तळलेली मिरची ही खातात.  वडापाव,  मिरची आणि सोबत गरमागरम कटिंग चहा काय सुटलं ना तोंडाला पाणी???


वडापाव खाणे हा एक अध्यात्मिक आनंद आहे असं प्रत्येक मुंबईकराला वाटत असेल. अर्थात वडापाव न आवडणारी माणसे ही कदाचित असतील पण माझ्या लेखी अशा माणसांना गाढवाची गाढवाला गुळाची चव काय असं म्हणायला हरकत नाही. असा हा तुमचाआमचा सगळ्यांचा जिवाभावाचा वडापाव.


 अर्थात तुमच्या शहरात एखादा वडापाव फेमस असेलच ना तर त्याच्या बद्दल ची  एखादी गोष्ट मला कमेंट मध्ये लिहून पाठवा तेवढीच आठवणींची उजळणी.  किंवा तुमच्या इकडच्या वडापाववाल्याचं  नाव तरी लिहून पाठवा, म्हणजे  समजा कधी आलो तुमच्या शहरात तर निदान तिकडचा वडापाव तरी खाता येईल.


 *सौ. मिलन राणे - सप्रे*🖋️











Sunday, 11 October 2020

एक अविस्मरणीय भेट विस्मरणात गेलेली

 

खरेतर तसे आमच्याकडे तशी नाटक पाहायची  जास्त आवड नव्हती. आणि चेंबूर ला सहकार थिएटर अगदी जवळ असल्यामुळे तिथे सिनेमा पाहायला जाणे अगदीच सोयीचे पडायचे. काही मोजकी नाटके सोडली तर बाकीचा उल्लेखही घरात होत नसे. 

मी माझ्या अंकुश चौधरी च्या ब्लॉग मध्ये लिहिले आहे कि मी पाहिलेले पहिले नाटक " ऑल द बेस्ट ". हा ते अगदी नाट्यगृहात जाऊन पाहिलेले  ते  पहिले नाटक. त्याकाळी सोशल मीडिया चा इतका सुळसुळाट नव्हता , त्यामुळे कलाकारांना असे सहज भेटणे वगैरे शक्य नव्हते. आणि त्यावेळी ते इतके लक्षात हि यायचे नाही. 

 पण ते नाटक पाहायला गेलो होतो तेव्हा बाहेर एक व्यक्ती लिंबू रंगाचा टी शर्ट आणि जीन्सची पॅन्ट घालून अगदी बाजूला उभी होती. ती व्यक्ती मला बरीच ओळखीची वाटत होती पण कुठे पहिले आहे ते आठवत नव्हते. पण नाटक पाहताना जेव्हा श्रेयनामावली वाचली गेली त्यात ते नाव आल्यावर लक्षात आले ती व्यक्ती होती " महेश मांजरेकर". 

त्यादिवशी यूट्यूब वर एक नाटक बघताना मला आठवले कि मी पहिले पाहिलेले नाटक हे वेगळेच आहे. आणि तो प्रसंग आठवला आणि असे झाले कि मी कशी काय विसरू शकले इतका अविस्मरणीय    क्षण .आम्ही तेव्हा नुकतेच विरार ला राहायला आलो होतो. सगळेच नवीन होते. आई कधीतरी विक्रोळीला मोठ्या मावशीकडे जात असे. त्यावेळी ती तिथून आली होती. मोठ्या मावशीची मैत्रीण साधना ऑंटी त्यावेळी नाटकातून कामे करत असे. आई विक्रोळीला असताना साधना ऑंटी तिला भेटली होती, त्यावेळी ती करत असलेल्या नाटकाचा प्रयोग विरार ला कुठल्यातरी गावात होणार होता म्हणून तिने आईला त्याचे आमंत्रण दिले. 

प्रयोग होता रात्रीचा त्यात गावात विरार हुन लांब, त्यामुळे आधी जाऊया कि नको इथून सुरवात होती. मग एकदाचे जायचे ठरले. विरार हुन एस टी ने गेलो मग पुढे बरेच चालत त्या गावात पोहोचलो. तेव्हा  स्पेशल रिक्षा चे पीक आले नव्हते आणि थोड्या प्रमाणात होते ते खिशाला परवडणारे नव्हते. 

तिथे गेल्यावर आम्ही आधी साधना ऑंटी ला भेटलो , तिने सांगितले कितीही उशीर झाला तरी नाटक पूर्ण बघून जा. आणि संपल्यावर या भेटायला सांगा कसे वाटले नाटक आणि बाकीच्या कलाकारांशी भेट होईल. आम्ही ते नाटक पूर्ण पहिले. अर्थातच नुसते तिने सांगितले म्हणून नाही तर ते नाटक अर्धवट सोडून जाण्यासारखे अजिबातच नव्हते. कधी नाटक संपले कळलेच नाही. 

नाटक संपल्यावर आम्ही ऑंटीने सांगितल्याप्रमाणे तिला भेटायला गेलो. ते कुणाचे तरी घर होते. आपले आटपून बाकीचे कलाकारही तिथे चहापानासाठी बसले होते. त्या घरातली काही मंडळी, गावातली काही मान्यवर आणि आम्ही आई, मी आणि माझी दोन भावंडे असे तिथे होतो. साधना ऑंटी ने आमची जुजबी ओळख करून दिली. ऑंटीला सांगितले खूप छान आहे नाटक. त्या आजोबांना आणि काकांना नमस्कार केला. आणि तिथून निघालो. ते आजोबा खूप छान दिसत होते.प्रसंग इथेच संपला . 

 

पण खरी मेख तर पुढे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यात काय साधा तर प्रसंग आहे. हो प्रसंग अगदीच साधा आहे पण ते नाटक हि साधे नव्हते आणि ते काका आणि आजोबा हि.  ते नाटक होते "नटसम्राट" आणि ज्या काकांना मी नमस्कार केला ते होते "शरद पोंक्षे" आणि ज्या खूप छान आजोबांना मी नमस्कार केला ते आजोबा होते दस्तुरखुद्द "श्री. प्रभाकर पणशीकर". 

आज हा प्रसंग लिहिताना आपसुखच डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 



Friday, 9 October 2020

चित्रे काका आणि जो अंकल (काही आठवणी चेंबूरच्या)



रूम नंबर. ९९७ , बिल्डींग नो.२८, श्री गुरुदत्त को ऑप हौ सो , टिळकनगर, चेंबूर हा पत्ता अजून जसाच्या तास पाठ आहे, आता तिथे राहत नसलेल्या प्रत्येकाला पाठ असेल. आमचं बालपण जिथे गेले ती वास्तू. खूप आठवणी आहेत त्या बिल्डींगच्या. आमची बिल्डिंग नंबर २८ म्हणजे ३६ बिऱ्हाडांचे एक छोटे कुटुंब.

त्यातल्याच काही लोकांशी निगडित आठवणी मी एक एक करून उलगडणार आहे. 


आज भेटूया त्यातल्या दोन व्यक्तींना ज्या मला नेहमीच आदरस्थानी राहिल्या. एक थोड्या धाकामुळे तर दुसरी व्यक्ती त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे. खरे तर दोघांमध्ये तसे साम्य काहीच नाही. हा एकच साम्य दोघे ही बाहेर उभे राहून सिगारेट ओढत. 


त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे मधुसूदन चित्रे उर्फ चित्रे काका उर्फ आमचे दादा आणि दुसरे जोसेफ डिसिल्वा म्हणजे आमचे जो अंकल.


आधी आपण चित्रे काकांविषयी बोलू. अतिशय शांत (म्हणजे मला तसेच आठवतात). अगदी गोरेपान, उंच आणि दिसायला छान. त्यांना पाहिले की  बऱ्याचवेळा हिंदी सिनेमातल्या खलनायक ( ते त्याच्या अगदी उलट होते ) साकारणाऱ्या अजित यांची आठवण यायची . पांढरा शुभ्र लेंगा आणि बनियन असे घरात आणि बाहेर जाताना लाईट रंगाचे शर्ट असा त्यांचा पेहेराव असे. दादा म्हणजे कमी बोलणारे तरी दिलखुलास व्यक्तिमत्व. मला पुसटसे आठवतेय ते कधीतरी आम्हाला नकला ही करून दाखवायचे. एकावेळी तीन चेंडू हातात घेऊन ते उडवून पकडायचा जो खेळ असतो तो हि प्रत्यक्षात  दादांकडून पाहायला मिळाला होता.


बरेच वर्षे दादा आमच्या बिल्डिंग नं २८ चे सेक्रेटरी होते. मीटिंग च्या वेळीच काय ते मी दादांना रागावलेले पाहिले असेल ते ही तेवढ्याच वेळा पुरता. इतर वेळी कधी दादांना रागावलेले मी कधी पाहिलेले मला तरी आठवत नाही.  आणि त्यांच्या मुलींतर इतक्या गुणी की त्यांना रागावायचा प्रश्नच नाही😁. 


चित्रे काका स्वभावाने खूप प्रेमळ. मला आठवतंय त्यांच्या मेहुण्याचा मुलगा म्हणजे डोंबिवली च्या मामांचा मुलगा अजय (अजू) आणि माझा भाऊ अमोल या दोघांना नेहमी ती पिच्चर ला जायला पैसे द्यायचे. सोसायटीच्या प्रत्येक मीटिंग नंतर मिनिट्स लिहायला लागतात. चित्रे काका ते मिनिट्स माझ्याकडून किंवा कधीतरी उमा कडून लिहून घेत, ते मिनिट्स लिहायला पण छान वाटायचे, कारण दादा कधी सांगायला घाई घाई करत नसत, अगदी सावकाशपणे ते सांगत पुन्हा पुन्हा वाचून घेत. शक्यतों एकही चूक होत नसे त्यांच्या सांगण्यात त्यामुळे माझ्या लिहिण्यात. आणि मला प्रत्येक पानामागे काही पैसे देत . ते पैसे कमवून (आमची पाहिली कमाई) माझी सुट्टीतल्या वडापाव ची सोय व्हायची. आणि हे पैसे चित्रे काका नेहमी त्यांच्या खिशातून देत. तास दीड तासाचा हा कार्यक्रम चाले पण एरवी एका जागी बसायला कंटाळणारे आम्ही अगदी एकाग्रतेने हे काम करतं असू. दादांनी बोलावले म्हटले की मला तर फार आनंद होत असे कारण त्यांनी बोलावले म्हणजे काहीतरी मिळणारच याची शाश्वती असे, त्यामुळे ज्या कुणाला ते आवाज देत ते पटकन जात असत. 


चित्रे काका पनामा सिगारेट ओढायचे. कधीतरी आम्हाला ते आणायला पाठवायचे (तेव्हा आपले परके नव्हते) तेव्हा ही ५-१०पैसे आमची बक्षिसी असायची. दादांची एक लाकडी आराम खुर्ची होती. हो दादांचीच कारण त्यांच्याशिवाय कुणीच त्या खुर्चीवर बसायचे नाही. मला त्या खुर्चीवर बसायला खूप आवडायचे. त्या खुर्चीवर बसले की मस्त आराम वाटायचा एकदम झोप यायला लागायची. पण काकींच्या धाकामुळे फार कमी वेळा बसायचे. चित्रे काकींच्या घरात एक खायच्या सुपारीचा (मुखवासचा)एक डब्बा होता. ती सुपारीही मला खूप आवडायची. ती जास्त खायची नसते तरी ती थोडी थोडी करून गुपचूप खायचो. दादा काकी आत असल्या की सांगायचे खा म्हणून ....एक दोनदा काकीनी आमची ही चोरी पकडली होती. आणि माझ्या सोबत दादांना पण रागावल्या होत्या. पण तेव्हढ्यापुरता परत थोड्या दिवसांनी तेच पुन्हा.


दादांनी त्यांच्या दोन मुलींसारखे माझे ही लाड केले. ताईच्या लग्नानंतर तिच्या सासरी मुलुंडला कधी ही जायचे असले की ते मला घेऊन जायचे. काका काकी आणि मी आम्ही टॅक्सीतून जायचो. दादांकडे खायची ही मौज असायची. चित्रे काकींच्या भावाची दोन्ही मुले संजय आणि अजय म्हणजे संजू अजू सुट्टीत राहायला येत. त्यावेळी त्यांच्यासोबत आम्हालाही वडापाव ची पार्टी मिळायची.


दादांचा स्वभाव त्यांच्या दोन्ही मुलींमध्ये पुरेपूर उतरला आहे.
दुर्दैवाने दादांच्या अंत्यदर्शनासाठी नाही जाता आले. पण त्यांच्या आठवणी मात्र नेहमी आमच्या सोबत राहतील.

दुसरे आमचे जो अंकल. जो अंकल दिसायला एकदम कडक. त्यांच्या मिशा बघूनच भिती वाटायची. त्यांना पाहून ते सेनेत आहेत असेच वाटायचे. तसे ते शिस्तीचे कडकच होते. जो अंकल सोबतच्या तशा आठवणी फार नाहीत कारण एक तर ते नोकरी करायचे त्यामुळे फक्त रविवारी घरी, किंवा सणासुदीला आणि मुख्य कारण त्यांच्या बद्दलची आदरयुक्त भीती ज्याने त्यांच्याशी बोलायला जाणे कमीच व्हायचे.

जो अंकल बारीक, उंच आणि सावळे. घरात असताना ते नेहमी हाफ पॅन्ट मध्ये असत. बाहेर सिगारेट ओढत असताना त्यांची ती टिपिकल पॅन्ट आणि वर उघडे असे ते त्या कट्ट्याला रेलून उभे राहत. त्यांची उभे राहण्याची हि एक वेगळी स्टाईल होती. एक हात दुमडून कट्ट्यावर ठेवत ( आता सारखे कुणी आले म्हणून पुरुषाने पटकन शर्ट चढवावे , असा अलिखित रिवाज तेव्हा नव्हता). जो अंकल फोर स्केअर सिगारेट ओढत असत. 


जो अंकलच्या आवाजात ही एक वेगळी जरब होती. आम्ही जेव्हा संध्याकाळी मैदानात खेळत असायचो, बरोबर ७ वाजता जो अंकल आवाज द्यायचे ब्रायना की आहे तो खेळ तिथेच टाकून ब्रायन , बॉंनी काय तर आम्ही सगळेच घरी धूम ठोकायचो. अंकलला येताना पाहिले की आधीच बोंबाबोंब व्हायची कारण बॉंनी शांत होता पण ब्रायन आमचा खूप मस्तीखोर. कधी मारामारी, आरडाओरडा सुरू असायचा. मग डॅड आले ही धोक्याची सूचना द्यायचो. जेणेकरून सगळे शांत व्हायचे. बिलिंडा, बॉनी आणि ब्रायन तिघांनीही अंकलच्या हाताचा मार खाल्ला आहे. पण बिलिंडा ने जरा कमी. आणि ब्रायन ने जरा जास्त. बॉनी गुणी मुलगा होता. पण  परीक्षेच्या निकालाच्या दिवशी मात्र तिघांचीही घाबरगुंडी उडालेली असे. त्यादिवशी त्यांच्या घरून मारल्याचा आणि रडल्याचा दोन्ही आवाज येत. (अर्थात सगळ्यांच्या घरी सारखीच स्थिती).

 रविवारी चर्च  जाताना जो अंकल अगदी सुटाबुटात असायचे. तेव्हा ते अगदी वेगळे दिसायचे. त्यात त्यांचा रुबाब काही निराळाच असायचा. जो अंकलमुळे एक चांगली सवय लागली आहे. सकाळी गुडमॉर्निंग करयाची. सकाळी कधी दुकानात जाताना ते बाहेर असले आणि आपण असेच पुढे गेलो कि ते स्वतःहून गुडमॉर्निंग असे म्हणायचे, मग हळू हळू सवय झाली ते दिसले कि आपसूखच गुडमॉर्निंग अंकल असे निघून जायचे.

जो अंकलपेक्षा लीना ऑंटी जास्त कडक स्वभावाची होती. पण अंकल ची भीती जास्त वाटायची. एक गोष्ट मात्र खरी कि जो अंकल ला उगाच रागवताना मी कधीच पहिले नाही. जो अंकलची एक गोष्ट खूप चांगली होती ते सगळ्यांवर सारखेच प्रेम करत. मग ती त्यांची बहीण मेरी ऑंटी असो किंवा त्यांची मेहुणी बेटू ऑंटी असो. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांसारखं अजून एका मुलीवर आपल्या मुलांसारखे प्रेम केले ती म्हणजे रचना ची बहीण चिंकूली. जो अंकल तिच्यासोबत एखाद्या लहानमुलांसारखे रमून जायचे. जो अंकलचे एक वेगळे रूप त्या निमित्ताने आम्हाला बघायला मिळाले होते. 

अंकल जितके कडक दिसत तितके ते प्रेमळही होते. याचा प्रत्यय दिवाळीच्या वेळी येत असे. आम्ही जेव्हा फटाके फोडायला खाली येत असू. प्रत्येकाची एक पिशवी असे ज्यात आपापल्या वाटणीचे फटाके असत. कधी कधी आमचे फटाके लवकर संपत . ते नेहमी बाहेरच असत मग ते ब्रायन ला त्याच्या वाटणीचे फटाके आम्हाला द्यायला सांगत असत. त्यांच्या धाकामुळे नाही पण ब्रायन नेहमीच त्याचे फटाके आम्हाला देत असे.

 
माझी आजी १९९४ ला गेली. आजी पहाटेच गेली , आमच्या शेजारी विरार ला एकमेव फोन होता तो ही त्यादिवशी लागला नाही. म्हणून जो अंकल चेंबूरहुन विरार ला आले आजी गेल्याचा निरोप द्यायला. त्यावर्षी आजी गेली म्हणून ख्रिसमसच्या दिवशी त्यांनी फटाकेही फोडले नव्हते. कारण तेव्हा आजीला जाऊन फक्त १० दिवसच झाले होते. तेव्हापासून  जो अंकल बद्दलची आदरयुक्त भीती जाऊन फक्त आदर राहिला.

जो अंकल खूप लवकर आणि अचानक गेले त्यांच्या ही दर्शनाला जाता नाही आले हे दुर्दैव. अर्थात त्यांच्या ही आठवणी सोबत आहेतच आणि आमचा बॉनी आता बराचसा जो अंकल सारखा दिसतो. त्यामुळे त्याला पहिले कि सतत त्यांची आठवण येते.


Tuesday, 28 July 2020

संवाद मेकअप बॉक्स मधला

लॉकडाऊनच्या काळात सगळेच घरात बसून कंटाळलेत. अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे काळात सगळेच घरात बसून कंटाळलेत. अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे. ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे ते ही सुरवातीला जरा बरे वाटत होते पण आता ते ही नकोस झालेय. 


तसेच आपल्या वस्तू ही कंटाळल्या असतील ना. म्हणजे एखाद्या  स्त्रीच्या कपाटातील कपडे, तिची सौंदर्य प्रसाधने ते ही कंटाळले असतील ना साधारण काय संवाद असेल बरे त्यांचा....चला जरा गंमत करूया....


लिपस्टिक: किती दिवस झाले, साधे झाकण ही उघडले नाही. गुदमरायला झाले...तरी ह्या गुलाबीचे बरे...रंग फिका म्हणून निदान जरा तरी बाहेर काढली जाते. आम्ही मेले डार्क म्हणून ...आतच


पावडर: हो ना....कधीतरी काढते बाई मला बाहेर ...इतके हायसे वाटते, मोकळ्या हवेत.


काजळ: हं....हल्ली संगणकावर काम करते म्हणून मला मात्र जास्त भाव मिळायला लागला आहे. डोळ्यांना गारवा मिळावा म्हणून सारखी बाहेर काढते आणि तशीच बाहेर ठेवते. किती धूळ ती....मला त्रास होतो.


तेल: हो...ना तुझी जी गत तीच माझी, आधी आठवड्यातून एकदाच माझी आठवण व्हायची, आता मात्र वरचेवर येते हो...


मस्कारा, ब्लश, आईशाडो: (एकसुरात)... आम्हाला तर पूर्णच विसरून गेली आहे...


नवीन कपडे: आमची ही काही वेगळी व्यथा नाही. (पायजमा मध्येच) अरे!! निदान शर्ट, टॉप यांना त्या ऑनलाईन मीटिंगच्या निमित्ताने घातले जाते. आम्ही ...तर कधीतरीच...ह्या शॉर्टस चे बरे त्यांनाही वाव आहे. ( मध्येच साडी) हो की नाही. मलाही फक्त काही व्हिडिओ कॉल च्या वेळी काढलं तर काढलं नाहीतर हा पंजाबी ड्रेस आहेच माझी जागा घ्यायला. बघू आता सणांच्या निमित्ताने तरी बाहेर येतोय का?


नेलपेंट: अरे....ह्या कोरोना मुळे नखं वाढवायला भीती, आणि सारखे हाथ धुवायचे मग मी तर दूरच. किती सुकलोय मी...आता थोडया दिवसाने केराच्या टोपलीत जागा( मोठ्याने रडायला लागते)


आयलाईनर: अरे रडू नको. माझे ही तसेच आहे ना मला ही भीती वाटते कधी बाहेरचा रस्ता कधी दाखवेल सांगू शकत नाही.


बांगड्या, गळ्यातल्या माळा: तुमची तर आठवण तरी आहे ....आम्ही तर बॉक्स मधेच. आठवण पण नाही होत आमची. साडी आपण सम दुःखी आहोत.


टिकली: हो ना...ह्या लॉक डाऊन मुळे सगळे  घरी ....जास्त वेळ स्वयंपाकघरात ...सणवार ही घरात...त्यामुळे मला ही विसरत चालली ही.


कानातले झुमके: आधी माझ्याशिवाय पण हलायचे नाही बाईचे. मी जिथं दिसेन तिथून उचलून आणायची. फक्त कानातले घालायचे बाकी काही ओरनामेण्ट नको असा ट्रेंड आहे म्हणे.. किती भाव वधारला होता माझा . पण आता (रडत) गेले ते दिन गेले.  आता नुसती लंकेची पार्वती बनून राहते.


पर्स: एरवी माझ्यावर ओझे असायचे सगळे. आता आल्यावर सगळे सॅनिटाईज करायला नको म्हणून छोटं पाकीट सोबत. खरंतर खूप दिवसांनी हलके हलके वाटतंय पण हा एकटेपणा नको झालाय आता. पाण्याची बाटली, रुमाल, भाजी , तुम्ही सगळं ....खूप मिस करतेय मी. कधी तिच्या हातात मिरवेन असे झालेय.

लिपस्टिक: (वैतागून) ह्या मास्कमुळे आमची किंमत अजून डाऊन.... ह्या मास्क ला जास्त महत्व आले ना आता. 


मास्क: का असे रागावला आहेत सगळे.... मी रक्षणकर्ता आहे सध्या. मला तर वाटते की जितकं लवकर माझे महत्व कमी होईल तेवढे बरे.. मला ही तुम्हा सगळ्यांना आनंदाने हसता खेळताना बघायचे आहे  सगळयांना बाहेर फिरताना बघायचे आहे. मजा  करताना बघायचे आहे. तेव्हा सगळे मिळून देवाची प्रार्थना करू या.



सगळे मिळून: हे देवा, गणपतीबाप्पा तू आता येतो आहेस ना. प्लीज ह्या कोरोनाचा लवकरात लवकर संहार कर. आणि आमचे आयुष्य परत पूर्वीसारखे कर. स्वैर नाही , समाधानी कर...(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)

Wednesday, 25 March 2020

टोपण नाव

विषय वाचूनच उत्सुकता वाढली असेल प्रत्येकाची ... कारण हा विषय आपल्या सगळ्यांचा लाडका विषय आहे हो कि नाही ? काही दिवसांपूर्वी एक मालिका बघत असताना त्यात विषय होता " टोपण नाव" ... तो भाग बघता बघता सगळीच टोपण नावे आठवली आणि गम्मत वाटली.

टोपण नाव किंवा लाडाचे नाव ... हि एक सोय असते लांबलचक नाव घेण्यापेक्षा छोटेसे नाव दिले जाते, किंवा घरात लाडाने बोलले जाते. पण हेच नाव कधी कधी त्या व्यक्तीची ओळख बनते. आपल्या प्रत्येकालाच एक टोपणनाव असते. कधी घरच्यांनी दिलेले, तर कधी मित्रमैत्रिणींनी तर कधी कधी आपल्या शिक्षकांनी दिलेले.

अर्थात प्रत्येक जण कुणाला ना कुणाला नावं ठेवतच असतो पण टोपणनाव हि आपण प्रत्येकजण देतोच कुणा ना कुणाला.

खरी गम्मत असते ती कोकणात. इथे कुणाला सरळ नावाने हाक मारलीच जात नाही. अर्थात बरेसचे हे नावाचे अपभ्रंश हि असतात.प्रभाकर चे परब्या , बबन चे बबन्या , सुनील चे सुनग्या . कोकणात तुम्हाला एकही माणूस शोधून सापडणार नाही ज्याला टोपण नाव नाही. एखाद्याचे खरे नाव म्हणजे कागदोपत्री नाव शोधणे हा एक पी एच डी चा विषय होऊ शकतो . 

आता बंटी हे नाव ऐकले कि अगदी दोन अडीच वर्षाच्या मुलापासून अगदी पन्नाशीतला माणूस असे सगळेच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तसेच गुड्डी नावाचे हि आहे आमच्याकडची एक गुड्डी एका बाळाची आई आहे तर एक लग्नाला आलीय तरी अजून गुड्डीच. पूर्वी बंड्या, बाळा, बाबा,बाबू,  सोनू , गुड्डी,बेबी,  बाय हि नावं अगदी हमखास वापरली जायची. प्रत्येक घरात या नावाची किमान एक तरी व्यक्ती असतेच. बेबी मावशी किंवा बेबी आत्या हि हवीच ... आमच्या घरात हि एक आहेच कि. बंड्या हे नाव तर खूपच वापरले जायचे. पूर्वी चाळीत इतकी कुटुंब असायची त्यात अशा नावांची अगदी रेलचेल असायची. .... आमच्या कडे तीन बाळा मामा आहेत, तर एक बाळा दादा ....मग त्यातही उपभाग आहेत बरे का ...   म्हणजे  पनवेल ला राहतो तो पनवेल चा बाळा मामा, बॉम्बेसेन्ट्रल चा वेगळा आणि गोरेगावचा वेगळा. म्हंजे एकापेक्षा जास्त व्यक्तींची सारखी टोपण नावे असली कि त्या टोपणनावापुढे अजून एक उपनाम लागतेच.

मोठ्या भावाला दादा आणि मोठ्या बहिणीला ताई किंवा आक्का म्हटले जाते... आणि मग आयुष्यभर हीच त्याची ओळख होते. दादा काका किंवा मामा, ताई मावशी, आक्का मावशी  किंवा आत्या. हेच प्रचलित होऊन जाते. आपल्या वडिलांना बाबांऐवजी अण्णा, दादा म्हणतोच पण त्याही पलीकडे जाऊन बाबांच्या अपरोक्ष त्यांना डॉन, किंवा गब्बर म्हणणारी अनेक जण असतात. बघा सगळे कसे  मनातल्या मनात हसले. 

टोपण नावाची गम्मत पण बघा कशी म्हंजे इथे नवरा नवरी बोहल्यावर उभे आहेत आणि कुणीतरी अरे छोटू मान करून बघू नकोस, किंवा गुड्डी  आता नीट संसार करायचा हा...  असे म्हणतात .... त्यावेळी अख्ख्या  मंडपात हशा पिकतो. बऱ्याच वेळा मुलं मोठी झाली कि त्यांना अशा टोपणनावाने हाक मारलेली नाही आवडत . पण घरातल्यानंच काय, तर मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी सगळ्यांनाच त्या टोपण नावाची सवय झालेली असते. अगदी रस्त्यात भेटणारी माणसे हि गर्दीत जेव्हा त्या नावाने हाक मारतात तेव्हा कावरेबावरे व्हायला होते. लग्नानंतरहि घरच्या नावाने हाक मारली कि त्या नवरदेवाची बायको समोर अशी अवस्था होते आणि त्यात घरची मंडळी अजूनच चिडवायला मोकळी होतात. 

हे टोपणनाव अगदी कशावरूनही पडू शकते अगदी नावाच्या अपभ्रंशापासून, एखादाच्या सवयीवरून, कुणाच्या आडनावावरून, तर अगदी कुणाच्या वडिलांच्या नावावरूनही. आता आमची एक मैत्रीण आहे तिने नाव आणि बाबांचे नाव यांचे पहिले अक्षर घेऊन आम्ही तिला टोपण नाव दिले " मका" . 

हे टोपण नाव कुणालाही चुकलेले नाहीये अगदी श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत , तर जन्मलेल्या बाळापासून म्हाताऱ्यांपर्यंत ... कुठल्याही क्षेत्रात असो किंवा कुठल्याही पदावर असो ... प्रत्येकाला काही ना काही टोपण नाव हे असतेच.  आपल्या बॉलीवूड मध्ये तर टोपण नाव अगदी खास आहे. म्हणजे करिष्मा  कपूर लो लो , गोविंदा ची ची, करीना कपूर बेबो.  अशी काही खास नावे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सिनेमातूनच आलेली खलनायकाची नावे आपण एखाद्याला टोपण नाव म्हणून वापरतो उदा. शाकाल, मोगॅम्बो, गब्बर. सिनेमातली टोपण नावे म्हटली कि मला तेजाब मधला एक संवाद नक्की आठवतो " ये महेश से मुन्ना कैसे बन गया ?" 

खरे तर टोपण नावाची गम्मतच वेगळी आहे. या नावांमुळे समोरचा माणूस आपल्याला जवळचा वाटतो ( चिडवायला वापरतात ती गोष्ट वेगळी ) .  आता साधं उदाहरण द्यायचे म्हटलं तर आपले क्रिकेटर घ्या महेंद्रसिंग धोनी पेक्षा माही जास्त जवळचा वाटतो, युवराज पेक्षा युवी, आणि आपला सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर पेक्षा  ..... तेंडल्या जास्त जवळचा असतो ना आपल्याला , अशी बरीच उदाहरणे आहेत आपल्या आवडत्या खेळात . अर्थात या नावांमुळे त्यांच्याबद्दलचा आदर कमी होत नाही .... पण आपल्यातले जे अंतर आहे ते मात्र नक्कीच कमी होते. 

आता टोपण नावाचा विषय निघालाच आहे तर अजून एक गोष्ट सगळ्यांना आठवलीच असेल....अं ... अं ... आठवली का ? अरे असे कसे नाही आठवली... तुम्ही आम्ही सगळ्यांनीच केलीय हि गोष्ट. अर्थात खुलेपणाने कुणी कबूल नाही करणार पण ..... अहो असे काय करता .... शाळेतली गोष्ट ... आता आठवले असेल ना .... हं ... तेच आपण आपल्या शिक्षकांना ठेवलेली टोपण नावं ... नाही हा आम्हीं नाही ठेवली ... असे अजिबात म्हणू नका ... आता तुम्ही शिक्षक असलात तरी तुमच्या शालेय जीवनात तुम्ही हे केलेच असेल. अगदी स्वतःहून नसतील ठेवली नावे.. पण कुणाशी कधीतरी बोलताना त्या नावाचा उपयोग नक्कीच केला असणार. मोठे झाल्यावर वाटतं कि काय आपण आपल्या गुरूंना नावं ठेवायचो. पण ती तेवढ्यापुरताच होती .... त्यांच्याबद्दलचा आदर तेव्हा हि कमी नव्हता आणि कधी होणारही नाही.

काही टोपण नावे हि जरा विचित्र असतात कुणाच्या तरी केसावरुन, शरीरयष्टीवरून , व्यंगावरून ठेवलेली नावे. खरे तर हे चुकीचं आहे हे आपल्याला कळत असते पण तरीही आपण ती ठेवतो. पण हे आपण सगळ्यांनीच टाळले पाहिजे, कारण अशी वेळ कधी कुणावर येईल हे सांगता येत नाही.

काही नावं हि आपली सिक्रेट लपवायला ठेवलेली असतात. म्हणजे कुणाविषयी  बोलायचे असेल त्याला न कळता किंवा चार लोकांमध्ये काही बोलायचे असेल एखाद्या व्यक्ती विषयी तर आपण त्या व्यक्तीसाठी एक विशिष्ट टोपण नाव वापरतो. (लगेच बायका आल्या असतील सगळ्यांच्या डोळ्यासमोर ) पण या बाबतीत पुरुषही मागे नाहीत बरं का :) ....यात सगळ्यात अग्रस्थानी असतात ती प्रेमात आकंठ बुडालेली जोडपी.... त्यांचे बाबू , शोना, स्विटी , जानू हे पालुपद सुरूच असते ... 

  जाता जाता तुम्हाला माझे एक टोपण नाव सांगते ... माझे नाव मिलन आहे पण बरेच जण त्याचे मीनल करतात त्यामुळे मीनल चे मिनू झालेय... नूतन ताईची मी जपानी डॉल आहे. तशी अजून बरीच नावे आहेत (माझ्यामागून ठेवलेली नाही हा!!!! ) प्रेमाने ठेवलेली ...माझी आशा मावशी मला प्रेमाने एका प्राण्याच्या नावाने हाक मारायची,अहं ती नाही सांगायची बरे का .... कारण नंतर माझ्या काही मित्र मैत्रिणींना मला छळायला अजून एक निमित्त मिळेल.  पण तुमची जर काही छान टोपणनावं कंमेंट मध्ये लिहिलीत तर चालतील ...... 

चला या निमित्ताने बऱ्याच जणांना बऱ्याच जणांच्या जुन्या नावांची आठवण झाली असेल. तर मग फोन उचला आणि करा कॉल... एखाद्या पिंट्या, बंटी.  बबल्या, गुड्डी, बेबी ला या सक्तीच्या सुट्टीमध्ये तेवढाच विरंगुळा.... 

घरी राहा ... सुरक्षित राहा.... आणि एकमेकांच्या संपर्कात रहा ....

Friday, 6 December 2019

साडी ती शेवटी साडीच (स्त्री चे पहिले प्रेम )

"काय ग काय झाले असा का चेहरा?" "काय सांगू ग नणंदेचे लग्न आहे , चांगली येवल्याला जाऊन पैठणी आणली , पण सासूबाईंना पसंद नाही पडली, म्हणे जांभळ्या रंगाची आणायची  आता यांना  कोण सांगेल तो रंग नाही शोभायचा यांना. हौस तर भारी साड्या नेसायची १०० एक साड्या तरी असतीलच कपाटात तरी दर वेळी नवीनच हवी ते हि अगदी त्यांच्या पसंतीचीच.
 हा संवाद काही वर्षांपूर्वीचा. तर हल्लीचा संवाद काही असा  ....
"अगं ! गेट टू गेदर ला जायचे आहे ना,  काय ड्रेस कोड ठेवूया... साडी नेसूया का सगळ्या जणी?" "साडी नको ग बाई!!!  एक तर नेसायला वेळ लागतो. आणि ती सांभाळायला पण त्रास. त्यात आता पूर्वीचे ब्लॉऊज होत ही नाहीत म्हणजे तो हि नवीन घ्या , अजून खर्च" असे उद्गार आपण नेहमीच ऐकतो.
पण तरीही काही उत्साही बायका असतात ज्या सणावारालाच नाही तर इतरही प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून साडीच नेसतात. 

तसे पाहायला गेले तर हल्लीच्या काळात साडी खूप कमी नेसली जाते.रोजच्या आयुष्यात जीन्स , पंजाबी ड्रेस यांनी साडीची जागा घेतली आहे. आणि ते काही अंशी बरोबर हि आहे. रोजच्या धावपळीच्या रुटीन मध्ये जीन्स किंवा पायजमा चढवला  वर एखादा टॉप घातला कि झाले काम. इथे त्या गडबडीत साडी नेसणे आणि ती संभाळणे म्हणजे एक दिव्यच वाटते आपल्याला. ट्रेन च्या त्या गर्दीत पदर सांभाळायचा , निऱ्या  सांभाळायच्या , पर्स सांभाळायची कि स्वतःला हा मोठा यक्ष प्रश्न असतो. त्यामुळे हे असे शॉर्टकट बरे पडतात. पुन्हा पावसाळ्यातही प्रश्न असतोच ती भिजलेली साडी दिवसभर वागवणे म्हणजे एक दिव्यच. उन्हाळ्यात खूप उकाडा मग तो ब्लॉउज, साडी, परकर असे  सगळे घातले कि घामाने चिंब भिजलोच म्हणून समजा.

आपली आजी अगदी  रोज नऊवारी साडी नेसायची तर आपली आई सहावारी. घरातली सगळी काम करतानाही त्यांना कधी या साडीची अडचण झाली नाही. पण आता आपल्याला अगदी दोन तीन तास साडी नेसायची असेल तरी आपण दहा वेळा विचार करतो. पूर्वी घरात नेसायला दोन आणि सणावाराला दोन अशा मोजक्याच साड्या असायच्या बायकांकडे. आता साड्यांचा गठ्ठा वाढलाय आणि नेसायचे प्रमाण कमी झालेय.

पण काही म्हणा साडी मध्ये जी नजाकत आहे ती इतर कुठल्याही पेहरावात नाही. जरा आठवून बघा  कि ड्रेस किंवा जीन्स घातल्यावर कुणी तुम्हाला पटकन खूप चांगली कॉम्पलिमेन्ट दिलीय, कुणीतरी पटकन मागे वळून पाहिलेय. पण तेच साडी नेसल्यावर लोक तुम्हाला अगदी आवर्जून सांगतात कि "छान दिसतेस साडीमध्ये. अधून मधून जरा नेसत जा."

खरे हि आहे ते साडीत  जितके  स्त्री सौन्दर्य खुलून येते तितकं बाकी कशातच नाही. साडी नेसली की आपोआप एक स्त्रीत्व येते आपल्या वागण्यात. एक वेगळाच आत्मविश्वास येतो. इतर कशावरही करता येत नाही असे सोळा शृंगार ही करता येतात साडीवर. साडी नेसली कि त्यावर बांगड्या काय घालायच्या, गळ्यात काय, टिकली कुठली , कानातले कुठले एकापाठोपाठ एक अजून शंभर प्रश्न येतात. अर्थात हे सगळे प्रश्न आपल्या आवडीचे असतात. साडी नेसून साजशृंगार केल्यावर आपणच आपल्याला आरशात किती वेळा निरखून बघतो सांगा बरं . खरे आहे कि नाही आपणच जर आपल्या प्रेमात पडतो तर लोक का नाही पडणार?

बरे साड्यांचे प्रकारही भरपूर, रंगसंगती हि भरपूर. तसेच प्रत्येक सणा समारंभाला साडी नेसायचे प्रकारही भरपूर. जवळचे लग्न असेल तर शालू किंवा पैठणी, लग्न लागताना लागणारी पिवळी साडी, पूजेला बसताना हिरवी साडी, साधा सभारंभ असेल तर नारायण पेठ , ऑफिस ला जाताना कॉटन च्या वारली पेंटची साडी अशी भरपूर उदाहरणे देता येतील. साडी नेसल्यावर बहुतेक बायका आवर्जून एक गोष्ट करतात ती म्हणजे डोक्यात गजरा किंवा फुलं माळणे. त्याशिवाय साडी नेसणे अधुरे वाटते.

साडी नेसायची प्रत्येक प्रांताची आपली एक वेगळी कला आहे एक परंपरा आहे. गोल नेसली जाणारी बंगाली साडी, उजव्या बाजूला पदर येणारी गुजराती साडी. प्रत्येक प्रांताची आपापली पद्धत. वेगवेगळ्या नृत्यप्रकारात नेसले जाणारे साडीचे प्रकार हि वेगवेगळे भरतनाट्यम, मणिपुरी, कुचिपुडी, कथ्थक . आपल्या महाराष्ट्रातच साडी नेसायचे किती वेगवेगळे प्रकार आहेत ब्राह्मणी प्रकारची नऊवारी, साधी नऊवारी, कोळी लोकांची वेगळी पद्धत तर काही लोक गुढग्यापर्यंत नेसतात ती नऊवारी नेसायची वेगळीच पद्धत. . आपल्या कडे परंपरागत चालून आलेली नऊवारी साडी. याचा थाट काही औरच. नऊवारीसोबतच त्याचा शृंगार हि भारदस्त. नथ, बुगडी, तोडे, डूल , तन्मणी, आणि अजून कितीतरी असे दागिने जितके घालू तितकी त्या साडीची शोभा वाढविणारे.

असेच काही साड्यांचे प्रकार :
पैठणी म्हटली कि डोळ्यासमोर येते सुंदर रंगसंगती आणि पदरावरचे मोर.
नारायण पेठ म्हटली कि मऊ सिल्क आणि मोठे काठ , विरुद्ध रंगसंगती
जिजामाता म्हटले कि छान बारीक नक्षीचे मोठे काठ
कोसा सिल्क मध्ये एक वेगळाच शाही अंदाज जाणवतो
पुणेरी कॉटन च्या साड्या नेसायला हलक्या आणि दिसायला सुंदर
पेशवाई च्या नावातच श्रीमंती आहे. बारीक बुट्ट्यांची हि भरलेला पदर असलेली साडी
वारली प्रिंट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील चित्रांचा एक उत्तम नमुना तोच साडीवर उताराला कि त्या साडीची बात काही औरच होऊन जाते


साडी नेसणे हि देखील एक  कलाच आहे. काही बायका अगदी चापून चोपून छान साडी नेसतात, पदर तीन निऱ्यांचा लावायचा कि दोनच, का पदरावरचा जरतारीचा मोर नाचवायला तो असाच सुटा सोडायचा. एक साडी पण त्यातही नानाविध प्रकार. ड्रेस सारखा घातला ओढणी टाकली आणि निघाले असे होत नाही.

साडी नेसायची आहे म्हटल्यावरच मनात जे येत तेच आपले खरे स्त्रीत्व. ती नेसणे , सांभाळणे, तिच्यावर साजेसा शृंगार करणे यातून त्या स्त्रीच्या टापटीप पणाचा , आवडीनिवडीचा अंदाज येतो.

घरातही आपल्या मुलीने साडी नेसायची म्हटली की आयांचे धाबे दणाणतात. एक तर आपली आणि त्यांची आवड वेगळी ...म्हणजे हा ढीग काढला की त्यातून एक साडी निवडणार . नाही पसंद पडली तर नवीन घ्या.  साडी एखादी पसंद पडलीच तर त्यावरचा ब्लॉऊज आवडत नाही. त्यातुन सलामत बाहेर पडलो की ती नेसवण्याची कसोटी.  अग इथून सैल आहे ग, निऱ्या कमी घे, पदर बघ सारखा पडतोय, लहानच झालाय...अशा सगळ्या दिव्यातून पार पडल्यावर....ती सांभाळत चालायची कसरत.  साडी नेसवून ती सगळे आटपून सुखरूप राहेपर्यंत आई चे बीपी हायच असते. एकदा घरी येऊन सोडली की सुटकेचा निश्वास टाकला.
अशावेळी सगळ्यांनाच आपले बालपण आठवते अगदी साधी ओढणी मिळाली तरी ती साडी सारखी गुंडाळून घ्यायची, अगदी लहान असलो तर घरात जी स्त्री असेल तिच्या कडून आणि जरा  मोठे झालो कि स्वतःची स्वतः. ती साडी नेसून मग घरभर मिरवायचे. आणि सगळ्यांकडून कौतुक करून घ्यायचे हे प्रत्येक मुलीने हे एकदा तरी नक्कीच केले असेल. साडी नेसून मास्तरीण बाई होण्याची मजा हि काही औरच होती. शाळेत शिक्षक दिनानिमित्त साडी नेसायला मिळायची .  

जसे आई साठी मुलीने साडी नेसणे हे एक दिव्य असते. तसे जेव्हा मुलगी कॉलेज मध्ये "सारी डे " ला जेव्हा पहिल्यांदा साडी नसते तेव्हा तिच्या वडिलांचे मन आतून गलबलून जात असेल. छोटी छोटी म्हणताना अचानक आपली मुलगी किती मोठी झाली याची पहिल्यांदाच होणारी जाणीव. आणि मग पुढे दिसणारे तिचे लग्न आणि तिचा विरह. एका तिच्या साडी नेसण्याची त्या बाबाला लागणारी हुरहूर.

लहानपणी ज्या  साडी नेसण्याचं अप्रूप वाटायचे तेच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कंटाळवाणे काम झालेय. पण तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी साडी नेसायची इच्छा प्रत्येक स्त्रीला असतेच.

साडी नेसताना एक वाक्य नेहमी आपल्या तोंडी असते " या पुरुषांचे बरे , पॅन्ट शर्ट चढवले कि निघाले." पण अहो, स्त्रियांनाच का तर कधी कधी पुरुषांना हि नेसावी लागतेच कि साडी .... असे काय करता अहो नाटक सिनेमात नाही का नेसत पुरुष साडी ? तसे तर खूप जणांनी हे कृत्य केला आहे तरी साडी नेसलेला पुरुष म्हटले कि डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतात ते पुरुष म्हणजे कै. पं. बालगंधर्व (अर्थात त्यांचे काम नाही पहिले पण जे काही फोटो पहिले त्यात त्यांचे सौंदर्य अप्रतिमच ),   अशी हि बनवाबनवी मधले कै. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिनजी, अर्थातच पंडितांचे काम करणारा कलाकार सुबोध भावे. .... आणि सगळ्यात लाडकी मोरूची मावशी अर्थात कै.  विजय चव्हाण  त्यांनी खऱ्या अर्थाने साडीतल्या पुरुषाला अजरामर केले. (अर्थात पूर्वी पुरुषच स्त्री पात्र करायचे तेव्हा नेसतच होते) 

हवाहवाई म्हणणारी मि . इंडिया  मधली फ्रॉक घातलेले श्रीदेवी व्हायचे कि चांदनी मधली शिफॉन च्या साड्या नेसणारी मादक श्रीदेवी व्हायचे हे आपले आपण ठरवायचे (हे उदहारण फक्त गंमती दाखल आहे). 
अर्थानं साडी हे शालीनतेचे उत्तम उदाहरण आहे.

हा आता तिला पाहिल्यावर पडणाऱ्या शिट्या हव्या असतील तर साडी शिवाय पर्याय नाही.

तर मैत्रिणींनो साडी नेसा, सुंदर दिसा आणि आपली परंपरा जपा. आणि नवऱ्याच्या खिशाला मोठी कात्री लावा.



 

 

   






Sunday, 10 November 2019

आनंदवन-एक अभूतपूर्ण हृदयस्पर्शी अनुभव

आनंदवन-एक अभूतपूर्ण हृदयस्पर्शी अनुभव
कुष्ठरोग नाव ऐकले की मनात भीतीपेक्षा आधी किळस येते अशी आपली परिस्थिती आहे. खरेतर हा रोग संसर्गजन्य आहे  म्हणून यापेक्षा गेल्या जन्माच्या काहीतरी भीषण पापाची शिक्षा म्हणून झालेला हा रोग अशा लोकांना वाळीत टाकले जाते. "महारोग" हे भीती दायक नाव देऊन त्या भीतीचा पगडा आपल्या मनावर बसलाय. पण खरे  तर सगळ्यात कमी संसर्गजन्य असलेला  रोग आहे हा. ज्याला हा आजार झाला आहे तो औषध घेत नसेल आणि तुमची प्रतिकार शक्ती खूप कमी असेल तरच होतो हा.  आणि कदाचित हा एकमेव असा आजार आहे कि त्याला एक ठराविक वेळच औषध घ्यायची जरुरी आहे. हा आजार वंशपरंपरने येणाराही आजार नाही. पण तरीही या आजाराच्या रुग्णाला वाळीत टाकले जाते. पूर्वी तर अशा रुग्णांना जिवंतपणे गाडले जायचे. अजूनही काही ठिकाणी हे घडतेच आहे. आईवडिलांना जर झाला असेल तर त्यांना आनंदवनात आणून सोडले जायचे आणि मुलांना सांगितले जायचे कि त्यांचे आईवडील वारले. लग्न मोडली जायची. 

पण याच सगळ्यांचे वडीलांसारखे संगोपन केले त्या वडिलांना आपण ओळखतोच स्वर्गीय. मुरलीधर आमटे अर्थात आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे "बाबा आमटे". याच रुग्णांना घेऊन एका छोट्या गावात त्यांनी  नंदनवन फुलवले ते गाव म्हणजे "आनंदवन" . आपल्याकडे स्वयंभू देव असतात इथे देवासारखी  स्वयंभू माणसे आहेत. आज ७०  वर्षानंतर ही इथे रुग्ण कायमचे राहायला आहेत ही आपल्यातल्या माणुसकीची हार आहे तर आनंदवनातल्या प्रेमाची जीत.

बाबांनंतर ही धुरा म्हणण्यापेक्षा हा वारसा तसाच आपल्या खांद्यावर घेतला ते त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास आमटे यांनी तर हेमलकसा सारख्या दुर्गम भागातल्या आदिवासींना शिक्षण आणि आरोग्य देण्यासाठी उभारलेला प्रकल्प हाती घेतला तो त्यांचे धाकटे पुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी.

आज आपण माझ्या लेखातून फेरफटका मारणार आहोत याच आनंदवनात. 

आनंदवनात प्रवेश करतानाच त्याच्या प्रसन्न वातावरणाची झुळूक आपल्याला जाणवायला लागते. जिथे आपली राहायची सोय केलेली आहे तिथे प्रवेश करतानाच छान छान फुलझाडे आहेत. आणि समोरच एक फलक आहे ज्यावर लिहिले आहे "We do not have Wi-Fi., Talk to each other and Pretend it's 1995" आणि खरेच तिथे नाहीच आहे तेच बरे नाहीतर तिथल्या वातावरणाची खरी मजा न अनुभवता आपण त्या मोबाईलच्या कृत्रिम दुनियेतच रमून जाऊ. तिथे दोन्हीबाजूला छोटी छोटी फुलझाडे  आहेत. गुलाब, झेंडू, तगर, सदाफुली अशी काही परिचित झाडे हि आहेत. समोर  गवताची हिरवळ आहे. पहाटेच्या दवबिंदू पडलेल्या गवतावर चालताना पायाला जो मुलायम स्पर्श होतो तो अनुभवण्यात काही वेगळीच मजा आहे. 

 आनंदवनात एक विभाग आहे "काष्ठशिल्प विभाग " जिथे उन्मळून पडलेली झाडे, टाकाऊ लाकूड यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. तिथे एक लामणदिवा असतो तसे लाकडाचे शोपीस आहे ते एका अखंड लाकडापासून बनविले गेले आहे. हाताच्या पंजाच्या  आकाराची एक खुर्ची आहे. तर एक म्हशीचा पुतळा हि तिथे लाकडापासून बनविला गेला आहे. काचेच्या बाटलीत बनविल्या जाणाऱ्या वस्तू हि आहेत. 

 त्यानंतर येतो तो हस्तकला विभाग यात भेटकार्ड , भिंतीवर लावली जाणारी चित्रे बनवली जातात. पण याचे एक वैशिष्ट्य आहे. यात रंग नाही वापरले जात बरे का !! यात वापरल्या जातात त्या वस्तू म्हणजे केळीच्या झाडाची साले, मक्याच्या कणीसाची साले, भाताचे तूस. सालांचे वेगवेगळ्या  रंगछटांचे दोऱ्यासारखे गठ्ठे बनविले जातात.ते हवे त्या आकारात कापून मग ते गोंदामध्ये बुडवून जाडकापडावर असलेल्या नक्षीकामावर चिकटवले जातात. आणि त्यापासून बनविली जातात उत्तम चित्रे. त्यातच दुसरा भाग आहे , त्या भागात टाकाऊ झालेली कपड्यांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. आणि ते वरील प्रमाणेच रंगसंगतीनुसार चिकटवले जातात. त्या कापडाच्या कोलाज मधून तयार होणारी चित्रे फारच अप्रतिम असतात. 

एक विभाग आहे बैठका, सतरंजी बनविण्याचा विभाग. इथे प्रथम दोऱ्याला रंग करून आणला जातो. नंतर  ते आणलेले दोरे वेगवेगळे केले जातात. त्या दोऱ्यांचे छोटे छोटे रीळ बनविले जातात. मग ते दोरे ४-५ च्या प्रमाणात एकत्र करून त्याचे एकत्रीकरण केले जाते जेणेकरून सतरंजी विणताना दोरे गुंतायला नको. मग त्या मागावर सतरंजी विणली जाते.छोटी सतरंजी विणायला एक तर मोठी सतरंजी विणायला जास्त बायका एकत्र काम करतात.

अजून एक विभाग आहे तो हातमाग जिथे छोटे रुमाल, पंचे, धोतर बनविले जाते. इथे सगळे काम हे हातमागावर चालते. काही हातमाग मॅन्युअल आहेत तर मुंबईची एक मिल बंद झाल्यावर त्यांनी तिथे दिलेल्या काही ऑटोमॅटिक मशीन आहेत. इकडच्या कापडाची गुणवत्ता हि खूप चांगली आहे. हातालाच त्याचा मुलायमपणा जाणवतो. 

एके ठिकाणी आपण घरी वापरतो ती पत्र्याची कपाटे बनवली जातात. त्याचा पत्रा इतका जाड असतो कि ती गुणवत्ता  आता आपल्याला बाजारात मिळणे शक्य नाही. त्या कपाटाची अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे त्या कपाटाला आरश्यासमोर एक छोटासा जाळीचा खण असतो. म्हणजे आपल्याला आरशात बघताना पटकन लागणाऱ्या गोष्टी आपण तिथे ठेऊ शकतो. तिथेच आनंदवनात वापरले जाणारे हातमाग हि बनवले जातात. तसेच वापरल्या तेलाच्या डब्यांपासून चाळण्या बनविल्या जातात. अजून एक महत्वाची गोष्ट तिथे बनवली जाते ती म्हणजे तिथे लागणाऱ्या व्हील चेअर हि तिथेच बनविल्या जातात. त्यामुळे त्यांची खरी सोय जाणून त्या प्रमाणे त्याचे डिजाईन केले गेले आहे. 

आनंदवनात फक्त कुष्ठ रोगीच नाहीत तर दिव्यांग लोकांनाही आश्रय दिला जातो. त्यांच्यासाठी तिथे शाळा चालवली जाते. " संधी निकेतन " मध्ये अशा मुलांना काही प्रकारचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. आणि मग तिथूनच काही जणांना नोकरी साठी संधी उपल्बध करून दिल्या जातात. यात बऱ्याच वेळा अशी मुले असतात ज्यांना त्यांच्या घरच्यांनी हा किंवा हि काही कामाचे नाहीत, खायला एक तोंड जास्त म्हणून नाकारलेले असते. अशीच मुले मग स्वतः कमावून घर हि सांभाळतात. इथे अशा मुलांना फिजिओथेरपी मिळावी म्हणून एक हॉस्पिटल बांधले जात आहे. हे अशा प्रकारचे भारतातले पहिले हॉस्पिटल असेल जे अशा दिव्यांगांना नियमित फिजिओथेरपी देण्यासाठी उभारले जाणार आहे. इतका विचार तर काही लोक आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींसाठी हि करत नाहीत. 

 एकदा फार पूर्वी जेव्हा या रुग्णांना सिनेमा बघावयास नेले होते तेव्हा त्यांचा सिनेमा पाहून झाल्यावर त्या सिनेमाघरवाल्यानी अख्खे सिनेमाघर धुवून काढले होते. कुष्ठरोग्यांचे गाव म्हणून इथे जास्त कुणी यायला तयार होत नसत. हि सल आमटे कुटुंबियांच्या कायम मनात होती.  आणि मग याच दुःखावर उपाय म्हणून उभा राहिला तो "स्वरानंदनवन " ऑर्केस्ट्रा. इथल्या दिव्यांग लोकांमधले, रुग्णामधले  कलागुण ओळखून श्री. विकासभाऊ आमटे यांनी त्यांचा स्वतःचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला. इथे वादक, गायक, नृत्य सादर करणारे सगळेच त्यांचेच. या गावात येऊन प्रयोग करायला नकार मिळणाऱ्या याच गावातल्या ऑर्केस्ट्राचे मुंबई पुणे इथे १५ च्या वर प्रयोग झालेत. यातून मिळणार सर्व निधी हा आनंदवनासाठी वापरला जातो. "लोकशाही" लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य असे म्हणतात ..... हीच लोकशाही खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते. 

 या आनंदवनात एकंदरीत ११ तलाव आहेत. त्यात काही मानव निर्मित आहेत. एक तलाव चिवडा खाता खाता बांधले गेले म्हणून त्याचे नाव " चिवडा तलाव " असे ठेवले आहे. या तलावांमुळे इथे शेतीमध्ये दोन वेळची पिके घेतली जातात. भात शेती सोबत इथे भाज्या, फळे हि पिकवली जातात. इथला अजून एक व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय. इथे गाई म्हशींचे पालन करून येणारे दूध हे विकले जाते. सुरवातीला कुष्ठरोग्यांच्या वसाहतीतले दूध घ्यायचे नाही म्हणून नाकारणारी लोक आता तिथले दूध घ्यायला रांग लावतात. कधी कधी दूध संपून जाते पण रांग नाही. या वरूनच तिथल्या दुधाच्या दर्जाची आपण कल्पना करू शकतो. 

इथे पाणीसाठ्याची जशी मानव निर्मित तलावं  आहेत. तशी इथे अजून एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. ती म्हणजे इथली डोम च्या आकाराची घरे. हि घरे बांधली जातात ती फक्त विटांनी. विटांची तिरपी चालत ठेऊन हि घरे बांधली जातात. याचे छत हे अर्धवर्तुळाकार असते. त्या वर रंगीत टाईल्स चे तुकडे बसविले जातात. जेणेकरून ऊन त्यावरून परावर्तित होऊन घरातील तापमान बाहेर पेक्षा कमी राहील. या घरामध्ये बाहेरपेक्षा साधारण ५ डिग्री तापमान कमी असते. इथे जराही लाकडाचा  वापर केला जात नाही त्यामुळे या घरांमध्ये उंदीर होत नाही. हि संकप्लना आहे आदरणीय श्री. विकासभाऊ आमटे यांची. रुग्णांना उंदीर चावून त्यांना जखम होऊ नये. बाहेरच्या उकाड्याचा त्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून हि खास रचना. 

या विभागात पाणी आणि वीज टंचाई आहे हे आपणा  सर्वाना माहीतच आहे. त्यामुळे इथे मोठे सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. जेणेकरून फक्त सरकारी विजेवर अवलंबून राहून कामे खोळंबायला नको. 

आजपर्यंत आनंदवनातून लाखो कुष्ठरोगी बरे होऊन गेले आहेत. काही जे इथे आले ज्यांना घरच्यांनी नाकारले म्हणून ते अजूनही इथेच आहेत. त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हि आनंदवनाची जबाबदारी आहे. अजूनही इथे रुग्ण येतात. काही निघून जातात काही इथेच राहतात. त्यांच्या साठी इथे एक हॉस्पिटल आहे. सकाळ दुपार इथे रुग्ण तपासले जातात. आजूबाजूच्या गावातूनही रुग्ण इथे तपासणी साठी येतात. आपल्या मुंबई पुण्याकडे सापडणार नाही इतकी स्वच्छता आहे त्या हॉस्पिटल मध्ये. इथे एक हेल्थ ए टी एम  मशीन आहे ज्यात आपल्या ३३ चाचण्या करता येतात. डिजिटल एक्सरे  ची हि इथे सोय आहे. इथे बरेसचे मेडिकल कॅम्प होतात. ज्यात हजारो रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातात अगदी मोफत.

इथे अजून एक खूप वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे इथले स्वयंपाकघर. इथे एकच सार्वजनिक स्वयंपाक घर आहे. सगळ्यांचा स्वयंपाक हा एकाच ठिकाणी बनतो. इथे कामावर येणाऱ्या बाईला घरच्या स्वयंपाकाची चिंता नसते. तिन्ही वेळचे जेवण हे इथे एकत्रित केले जाते. जे या प्रकल्पात थोडे लांब काम करतात त्यांना डबे पोहचविले जातात. साधारण दीड ते दोन हजार माणसांचा एकत्र स्वयंपाक किती मोठी गोष्ट. याच स्वयंपाकघरात साधारण ८०-९० सिलेंडर लागायचे. पण इथे आता बायोगॅस प्लांट हि उभारण्यात आला आहे. दररोज साधारण ५ टन शेण आणि ३ टन टाकाऊ अन्न यापासून ४०० घन मी. गॅस ची निर्मिती होते. त्यामुळे आता तिथे लागण्याच्या सिलेंडर ची संख्या आता ५ वर आली आहे. 

आणि ह्या सगळ्या विभागात काम करणारी माणसे आहेत ती या आजारातून बरे झालेले रुग्ण. आता आजारी असणाऱ्या रुग्णाची सेवा करायला माणसे मिळत नाही म्हणून इथेच बरे झालेल्या रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते मग तेच या रुग्णाचे ड्रेसिंग करणे, त्यांची काळजी घेणे हि कामे करतात.  इथे बरे झालेले रुग्णाचं काम करतात म्हणून त्यांच्याकडून जास्त वेळ काम करून घेतले जात नाही. त्यांच्या तब्बेतीचा पुरेपूर विचार करून त्यांचे कामाचे तास आहेत. 

आनंदवनात एक जागा आहे जिथे "श्रद्धेय बाबा आमटे  आणि साधना ताई " यांची समाधी आहे. आपल्या शरीराचा निसर्गाला उपयोग व्हावा म्हणून बाबांची  त्यांना अग्नी देऊ नये अशी इच्छा होती . म्हणून ते गेल्यावर त्यांना एके ठिकाणी पुरले गेले. आणि मेल्यानंतर हि बाबांच्या कुशीतच राहावे म्हणून त्यांच्या शेजारी साधनाताईंनाही त्यांच्या निधनानंतर तिथेच पुरले गेले. यावर कुठलीही समाधी बांधली जाऊ नये अशी बाबांची इच्छा होती म्हणून तिथे एक चौथरा बांधून तिथे निरनिराळ्या प्रकारची फुलझाडे लावली जातात.

त्यासमोरच आहे ते अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरण शिला. सुरवातीला यांना  लग्नाचा अधिकार हि नव्हता. साधनाताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो मिळवून दिला. पण त्यांना प्रजननाचा अधिकार नव्हता,  का तर मुलाला हि होईल आजार. म्हणून त्यांचे कुटुंबनियोजनाचे ऑपेरेशन करून त्यांचे लग्न लावून दिले जायचे. आणि मग तिथे आलेल्या एखाद्या मुलाला हे  जोडपे वाढवत असे. मुलाला पालक मिळत व त्यांची मुलाची इच्छा पूर्ण होत असे आणि एक कुटुंब पूर्णत्वास येत असे . पण पुढे जाऊन सौ. भारती ताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो अधिकार हि मिळवून दिला. यात त्यांना किती जणांशी लढा द्यावा लागला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. त्या वेळी त्या न जन्मलेल्या बाळांची म्हणजेच अनाम मूक कळ्यांची स्मरणशिला. आणि आनंदवन उभारताना नाईलाजाने थोडी वृक्षतोड करावी लागली म्हणून त्यांची आहे अनाम वृक्षांची स्मरणशीला. आपण इथे दुसऱ्याला किती दुखावले तरी माफी मागत नाही, आपला अहंकार जपून ठेवतो. आणि इथे दोष न देणाऱ्या गोष्टींचीही माफी मागितली गेली. किती मोठी गोष्ट शिकवून जातात हि माणसे.

त्या शेजारी बाबांच्या "भारत जोडो" अभियानाची (sea to snow)  काही क्षण चित्रे आहेत. बाबांना पाठीचा त्रास होता, त्यामुळे ते एक तर चालत किंवा झोपून राहत. तर या अभियानात त्यांनी ज्या बस ने प्रवास केला ती बस कम अँबुलन्स तिथे उभी आहे. 
 
आनंदवनात एक खूप चांगला नियम आहे इथे माणूस गेल्यावर त्यांच्या नावाने एक वृक्ष लावला जातो आणि त्याचे पालनपोषण केले जाते. लंडन मधल्या एका ख्रिस्ती व्यक्तीने आपल्याला मरणोत्तर आनंदवनात विसावा मिळावा म्हणून स्वतःला अग्नी द्यायची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे त्यांना अग्नी देऊन नंतर त्यांच्या अस्थी आनंदवनात आणून पुरल्या गेल्या. आज त्यांचे हि स्मरण स्थान तेथे आहे.

इथे अजून एक उपक्रम राबवला जातो ज्याचे नाव आहे आनंदवन घन वन प्रकल्प. आपण साधारण ३ फुटावर एक झाड लावतो. पण इथे एक एक फुटावर झाडे लावली जातात. जेणेकरून कमीतकमी जागेत घनदाट जंगल तयार होईल, आणि त्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळेल. जपान मधून आलेल्या मियावाकी यांनी हि कल्पना सुचवली होती. आज आनंदवनातील या प्रकल्पाचे अनुकरण बऱ्याच ठिकाणी केले जाते. 
 
 "टाकाऊ पासून टिकाऊ" हि संकल्पना पुरेपूर अनुभवली ती आनंदवनात. कुठलीही गोष्ट वाया न घालवता त्याचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे इथे येऊन बघण्यासारखे आहे. डॉ. विकास भाऊ आमटे यांना डॉक्टर म्हणावे कि इंजिनिअर हा मोठा यक्ष प्रश्न आहे. हुद्द्याने डॉक्टर असलेल्या या वल्ली ने आनंदवनात आणि सोमनाथ इथे केलेल्या वास्तू हे इंजिनीअरिंग चे उत्तम उदाहरण आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय हे अनुभवायला मिळते ते इथेच. 

आनंदवनाला " स्मार्ट व्हिलेज " म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आपल्याला फार कौतुक आहे चीन चे कि त्यांचे उत्पादन जास्त कारण त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची सोय आहे, शाळा आहे सर्व काही आहे. मीठ आणि तेल सोडले तर इथे सगळ्याचे उत्पादन करते. पण आपल्याला आपल्याच देशात असलेल्या आनंदवनात हे असेच आहे याची पुसटशी कल्पना हि नाही (खूप जणांना नसेल). कदाचित आनंदवन हे एकमेव असे गाव असेल जिथे एका पूर्ण गावाचे एकच रेशन कार्ड आहे. ज्या नागरिकांना त्यांची बोटे वाकडी झाल्यामुळे, किंवा नसल्यामुळे सरकार आधार कार्ड देऊ शकत नाही, त्यांना त्यांची सरकारी ओळख देऊ शकत नाहीत . त्याच लोकांना आंदनवानाने त्यांच्यातले गुण जाणून त्यांना स्वतःची ओळख दिली. 

आपल्याकडे आंतरजातीय विवाह  असतो. पण आनंदवनात एक आगळी वेगळी कल्पना राबवली जाते इथे असतो अंतरदिव्यांग विवाह. मूक , बधिर, अंध मुलांचा. पण असे असले तरी त्यांना होणारी बाळे हि सुधृढ आणि कुठलेही व्यंग नसणारी असतात. 

ज्या लोकांना आपल्याला हात लावावासा वाटत नाही अशा लोकांना घेऊन वसवलेले हे गाव.  इथली स्वच्छता, शिस्त आणि मॅनॅजमेन्ट आपल्याला लाजवेल अशी आहे. रिकाम्या झोळीत आपण बरेच काही भरून घेऊन येतो. आजही ज्या लोकांना कुष्ठरोगा बद्दल गैरसमज आहेत ना त्यांनी नक्कीच भेट द्यावी इथे. जरा जराश्या गोष्टीचा आपण बाऊ करून बसतो. इथे बोटं नसलेली , किंवा वाकडी असलेली लोकं किती अप्रतिम कलाकृती तयार करतात. इथे कुणाच्या हि चेहऱ्यावर मरगळलेले भाव नाहीत. सगळेच प्रसन्न आणि टवटवीत. आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वच्छताप्रिय. इकडे काम हि एक श्रद्धा आहे. फक्त उदरभरणाची सोय नाही. इथे वृध्दाश्रमातल्या आजी हि आम्ही भेटायला गेल्यावर अगदी आनंदी झाल्या होत्या. आम्ही नुसता नमस्कार म्हटले तरी आम्हाला भरभरून आशीर्वाद देत होत्या. 

आज श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई नंतर त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास भाऊ आणि त्यांच्या पत्नी (डॉ) सौ . भारतीताई   आमटे यांनी त्याच श्रद्धेने आणि भक्तीने तो वारसा पुढे चालवला आहे. आपण सेलिब्रिटीज ना , किंवा पडद्यावरच्या नायक नायिकांना भेटायला खूप उत्सुक असतो . त्यांच्या जीवनात काय सुरु आहे याची हि आपल्याला फार उत्सुकता असते. पण खरे उत्सवमूर्ती तर आम्ही याची देही याची डोळा आनंदवनात पहिले. हात गगनात पोहचले असताना पाय जमिनीवर रोवलेले. आपल्याकडे विठ्ठल रखुमाई आहेत आनंदवनात " बाबा आणि साधना ताई नंतर " " डॉ. विकास भाऊ आणि सौ.(डॉ) भारती ताई " याच आनंदवनाच्या लोकांच्या विठ्ठल रखुमाई आहेत. म्हणूनच कदाचित आनंदवनात एकही देऊळ नाही. इथे जात पात नाही. धर्मभेद नाही. आरक्षण नाही. इथे आहे ती फक्त आणि फक्त माणुसकी, श्रद्धा माणसाची माणसावरची, आणि विश्वास. हल्ली शहरांमध्ये जन्मदात्यांना हि सांभाळायला मुलांना जीवावर येते. इथे तर इतके मोठे कुटुंब सांभाळायची जबाबदारी किती सहज उचलली जातेय.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कि काही थोर कर्तृत्व नसताना डॉ. विकास भाऊ आमटे आणि सौ. (डॉ)भारती ताई आमटे यांच्याशी आम्हाला संवाद साधता आला. अर्थात आम्ही सगळे निःशब्द होतो. पण त्या वेळात जे काही श्री. विकास भाऊंच्या मुखातून ऐकले ते काळीज पिळवटून टाकणारे होते. किती वेळ तरी डोळे भरून आले होते आणि मन दुःखी झाले होते. 

पु.ल . देशपांडे यांनी आनंदवनाविषयी एक वाक्य म्हटलं होते " पर्यटक म्हणून जा आणि परीवर्तित होऊन या."  हे वाक्य किती खरे आहे याची प्रचिती नक्कीच येते. अगदी खूप नाही पण ५% बदल तर नक्कीच होतो. आपण किती मी पणात जगतो याची लाज वाटायला लागते. 

हा लेख ज्यांना आवडला त्यांनी कृपया हा आपल्या मित्रपरिवरात शेअर करा. जेणे करून थोडेसे का होईना आपल्याकडून जनजागृती होईल. आणि शक्य असल्यास आनंदवन ला भेट ही जरूर  द्या. दगडी देव तर आपण नेहमीच बघतो...जिवंत देव बघितल्याची प्रचिती एकदा घ्यायलाच हवी.

हा लेख म्हणजे फक्त अडीच दिवसात मी अनुभवलेलं आनंदवन आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व. पण हा लेख अंतरंगीच्या अगदी खोलातून आलेला लेख आहे.  खरंतर अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे कारण हा विषय असा ठराविक शब्दात मांडण्याचा विषय नाही. मी फक्त १% प्रयत्न केला आहे. 
 दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती 


छोटी सतरंजी बनवताना

मोठी सतरंजी बनवताना

आनंदवनातील हॉस्पिटल

भाताचे तूस, कणीसाचे साल, केळीच्या झाडाचे साल वापरून केलेली भेटकार्ड

श्रध्येय बाबा आमटे आणि साधनाताईंचे समाधी स्थळ

काष्ठशिल्प विभाग

कापडाच्या तुकड्यांपासून बनविलेले भेट कार्ड

सोलर पॅनल आणि डोम आकाराचे घर


ख्रिस्ती व्यक्तीचे स्मरण स्थान

हेल्थ ए टी एम मशीन

संधी निकेतन

आनंदवनातील स्वयंपाकघर


बायोगॅस प्लांट




अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरणशीला

आनंदवनातील हातमाग