Wednesday, 25 March 2020

टोपण नाव

विषय वाचूनच उत्सुकता वाढली असेल प्रत्येकाची ... कारण हा विषय आपल्या सगळ्यांचा लाडका विषय आहे हो कि नाही ? काही दिवसांपूर्वी एक मालिका बघत असताना त्यात विषय होता " टोपण नाव" ... तो भाग बघता बघता सगळीच टोपण नावे आठवली आणि गम्मत वाटली.

टोपण नाव किंवा लाडाचे नाव ... हि एक सोय असते लांबलचक नाव घेण्यापेक्षा छोटेसे नाव दिले जाते, किंवा घरात लाडाने बोलले जाते. पण हेच नाव कधी कधी त्या व्यक्तीची ओळख बनते. आपल्या प्रत्येकालाच एक टोपणनाव असते. कधी घरच्यांनी दिलेले, तर कधी मित्रमैत्रिणींनी तर कधी कधी आपल्या शिक्षकांनी दिलेले.

अर्थात प्रत्येक जण कुणाला ना कुणाला नावं ठेवतच असतो पण टोपणनाव हि आपण प्रत्येकजण देतोच कुणा ना कुणाला.

खरी गम्मत असते ती कोकणात. इथे कुणाला सरळ नावाने हाक मारलीच जात नाही. अर्थात बरेसचे हे नावाचे अपभ्रंश हि असतात.प्रभाकर चे परब्या , बबन चे बबन्या , सुनील चे सुनग्या . कोकणात तुम्हाला एकही माणूस शोधून सापडणार नाही ज्याला टोपण नाव नाही. एखाद्याचे खरे नाव म्हणजे कागदोपत्री नाव शोधणे हा एक पी एच डी चा विषय होऊ शकतो . 

आता बंटी हे नाव ऐकले कि अगदी दोन अडीच वर्षाच्या मुलापासून अगदी पन्नाशीतला माणूस असे सगळेच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तसेच गुड्डी नावाचे हि आहे आमच्याकडची एक गुड्डी एका बाळाची आई आहे तर एक लग्नाला आलीय तरी अजून गुड्डीच. पूर्वी बंड्या, बाळा, बाबा,बाबू,  सोनू , गुड्डी,बेबी,  बाय हि नावं अगदी हमखास वापरली जायची. प्रत्येक घरात या नावाची किमान एक तरी व्यक्ती असतेच. बेबी मावशी किंवा बेबी आत्या हि हवीच ... आमच्या घरात हि एक आहेच कि. बंड्या हे नाव तर खूपच वापरले जायचे. पूर्वी चाळीत इतकी कुटुंब असायची त्यात अशा नावांची अगदी रेलचेल असायची. .... आमच्या कडे तीन बाळा मामा आहेत, तर एक बाळा दादा ....मग त्यातही उपभाग आहेत बरे का ...   म्हणजे  पनवेल ला राहतो तो पनवेल चा बाळा मामा, बॉम्बेसेन्ट्रल चा वेगळा आणि गोरेगावचा वेगळा. म्हंजे एकापेक्षा जास्त व्यक्तींची सारखी टोपण नावे असली कि त्या टोपणनावापुढे अजून एक उपनाम लागतेच.

मोठ्या भावाला दादा आणि मोठ्या बहिणीला ताई किंवा आक्का म्हटले जाते... आणि मग आयुष्यभर हीच त्याची ओळख होते. दादा काका किंवा मामा, ताई मावशी, आक्का मावशी  किंवा आत्या. हेच प्रचलित होऊन जाते. आपल्या वडिलांना बाबांऐवजी अण्णा, दादा म्हणतोच पण त्याही पलीकडे जाऊन बाबांच्या अपरोक्ष त्यांना डॉन, किंवा गब्बर म्हणणारी अनेक जण असतात. बघा सगळे कसे  मनातल्या मनात हसले. 

टोपण नावाची गम्मत पण बघा कशी म्हंजे इथे नवरा नवरी बोहल्यावर उभे आहेत आणि कुणीतरी अरे छोटू मान करून बघू नकोस, किंवा गुड्डी  आता नीट संसार करायचा हा...  असे म्हणतात .... त्यावेळी अख्ख्या  मंडपात हशा पिकतो. बऱ्याच वेळा मुलं मोठी झाली कि त्यांना अशा टोपणनावाने हाक मारलेली नाही आवडत . पण घरातल्यानंच काय, तर मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी सगळ्यांनाच त्या टोपण नावाची सवय झालेली असते. अगदी रस्त्यात भेटणारी माणसे हि गर्दीत जेव्हा त्या नावाने हाक मारतात तेव्हा कावरेबावरे व्हायला होते. लग्नानंतरहि घरच्या नावाने हाक मारली कि त्या नवरदेवाची बायको समोर अशी अवस्था होते आणि त्यात घरची मंडळी अजूनच चिडवायला मोकळी होतात. 

हे टोपणनाव अगदी कशावरूनही पडू शकते अगदी नावाच्या अपभ्रंशापासून, एखादाच्या सवयीवरून, कुणाच्या आडनावावरून, तर अगदी कुणाच्या वडिलांच्या नावावरूनही. आता आमची एक मैत्रीण आहे तिने नाव आणि बाबांचे नाव यांचे पहिले अक्षर घेऊन आम्ही तिला टोपण नाव दिले " मका" . 

हे टोपण नाव कुणालाही चुकलेले नाहीये अगदी श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत , तर जन्मलेल्या बाळापासून म्हाताऱ्यांपर्यंत ... कुठल्याही क्षेत्रात असो किंवा कुठल्याही पदावर असो ... प्रत्येकाला काही ना काही टोपण नाव हे असतेच.  आपल्या बॉलीवूड मध्ये तर टोपण नाव अगदी खास आहे. म्हणजे करिष्मा  कपूर लो लो , गोविंदा ची ची, करीना कपूर बेबो.  अशी काही खास नावे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सिनेमातूनच आलेली खलनायकाची नावे आपण एखाद्याला टोपण नाव म्हणून वापरतो उदा. शाकाल, मोगॅम्बो, गब्बर. सिनेमातली टोपण नावे म्हटली कि मला तेजाब मधला एक संवाद नक्की आठवतो " ये महेश से मुन्ना कैसे बन गया ?" 

खरे तर टोपण नावाची गम्मतच वेगळी आहे. या नावांमुळे समोरचा माणूस आपल्याला जवळचा वाटतो ( चिडवायला वापरतात ती गोष्ट वेगळी ) .  आता साधं उदाहरण द्यायचे म्हटलं तर आपले क्रिकेटर घ्या महेंद्रसिंग धोनी पेक्षा माही जास्त जवळचा वाटतो, युवराज पेक्षा युवी, आणि आपला सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर पेक्षा  ..... तेंडल्या जास्त जवळचा असतो ना आपल्याला , अशी बरीच उदाहरणे आहेत आपल्या आवडत्या खेळात . अर्थात या नावांमुळे त्यांच्याबद्दलचा आदर कमी होत नाही .... पण आपल्यातले जे अंतर आहे ते मात्र नक्कीच कमी होते. 

आता टोपण नावाचा विषय निघालाच आहे तर अजून एक गोष्ट सगळ्यांना आठवलीच असेल....अं ... अं ... आठवली का ? अरे असे कसे नाही आठवली... तुम्ही आम्ही सगळ्यांनीच केलीय हि गोष्ट. अर्थात खुलेपणाने कुणी कबूल नाही करणार पण ..... अहो असे काय करता .... शाळेतली गोष्ट ... आता आठवले असेल ना .... हं ... तेच आपण आपल्या शिक्षकांना ठेवलेली टोपण नावं ... नाही हा आम्हीं नाही ठेवली ... असे अजिबात म्हणू नका ... आता तुम्ही शिक्षक असलात तरी तुमच्या शालेय जीवनात तुम्ही हे केलेच असेल. अगदी स्वतःहून नसतील ठेवली नावे.. पण कुणाशी कधीतरी बोलताना त्या नावाचा उपयोग नक्कीच केला असणार. मोठे झाल्यावर वाटतं कि काय आपण आपल्या गुरूंना नावं ठेवायचो. पण ती तेवढ्यापुरताच होती .... त्यांच्याबद्दलचा आदर तेव्हा हि कमी नव्हता आणि कधी होणारही नाही.

काही टोपण नावे हि जरा विचित्र असतात कुणाच्या तरी केसावरुन, शरीरयष्टीवरून , व्यंगावरून ठेवलेली नावे. खरे तर हे चुकीचं आहे हे आपल्याला कळत असते पण तरीही आपण ती ठेवतो. पण हे आपण सगळ्यांनीच टाळले पाहिजे, कारण अशी वेळ कधी कुणावर येईल हे सांगता येत नाही.

काही नावं हि आपली सिक्रेट लपवायला ठेवलेली असतात. म्हणजे कुणाविषयी  बोलायचे असेल त्याला न कळता किंवा चार लोकांमध्ये काही बोलायचे असेल एखाद्या व्यक्ती विषयी तर आपण त्या व्यक्तीसाठी एक विशिष्ट टोपण नाव वापरतो. (लगेच बायका आल्या असतील सगळ्यांच्या डोळ्यासमोर ) पण या बाबतीत पुरुषही मागे नाहीत बरं का :) ....यात सगळ्यात अग्रस्थानी असतात ती प्रेमात आकंठ बुडालेली जोडपी.... त्यांचे बाबू , शोना, स्विटी , जानू हे पालुपद सुरूच असते ... 

  जाता जाता तुम्हाला माझे एक टोपण नाव सांगते ... माझे नाव मिलन आहे पण बरेच जण त्याचे मीनल करतात त्यामुळे मीनल चे मिनू झालेय... नूतन ताईची मी जपानी डॉल आहे. तशी अजून बरीच नावे आहेत (माझ्यामागून ठेवलेली नाही हा!!!! ) प्रेमाने ठेवलेली ...माझी आशा मावशी मला प्रेमाने एका प्राण्याच्या नावाने हाक मारायची,अहं ती नाही सांगायची बरे का .... कारण नंतर माझ्या काही मित्र मैत्रिणींना मला छळायला अजून एक निमित्त मिळेल.  पण तुमची जर काही छान टोपणनावं कंमेंट मध्ये लिहिलीत तर चालतील ...... 

चला या निमित्ताने बऱ्याच जणांना बऱ्याच जणांच्या जुन्या नावांची आठवण झाली असेल. तर मग फोन उचला आणि करा कॉल... एखाद्या पिंट्या, बंटी.  बबल्या, गुड्डी, बेबी ला या सक्तीच्या सुट्टीमध्ये तेवढाच विरंगुळा.... 

घरी राहा ... सुरक्षित राहा.... आणि एकमेकांच्या संपर्कात रहा ....

5 comments:

  1. जिथे शेक्सपियर नावात काय आहे म्हणत राहिला तिथे आपण टोपण नाव सुद्धा एखाद्या पदवी प्रमाणे स्विकारले.. खरच ज्यांची लहानपणापासून टोपण नावे आहेत त्यांनीच ही गम्मत अनुभवली आहे... टोपण नावाची इतकी सवय होते की कधी कधी आपल्याला खर्या नावाने हाक मारली तरी तिथे लक्ष जात नाही.. जो आपलेपणा टोपण नावात आहे तो खर्या नावात नाही (माझे आहे टोपण नाव लहानपणापासून.. म्हणुन अनुभवाचे बोल आहेत हे )... आज हि विरार ला आलो की सगळी जुनी मंडळी.. बालमित्र मला त्याच नावाने हाक मारतात...मस्त लिहिलयस मिलन.. तुझ्या या लेखाने एक गोष्ट प्रभावीपणे जाणवली की आजच्या सिरियल.. सिनेमा मधील नावे ठेवण्याच्या काळात.. टोपण नाव ठेवायची आणि त्यानी हाक मारायची संस्कृतीच लोप पावत चालली आहे.. Nice writeup.. 😊

    ReplyDelete
  2. टोपणनावाची गमंत आवडली, तशी माझी लहानपणी दोन नावे गोपाल व बाबू आता कोणाला माहिती नाही मागून ठेवलेली अनेक पण मजा वाटते, मावशीने ठेवलेले अंदाज करू शकतो पण आता नको

    ReplyDelete
  3. खूप सुंदर लेख माझे राजी.. पुन्हा माझे काका मला राजा असेही bolayche.. झब्बू... Kuku..hi माझ्या नवर्‍याने दिलेली आहेत टोपण नावे.... छान वाटते पण ऐकायला... त्याने लाडाने बोलावे. अणि मी. ते लाडात येवून ऐकावे... मस्त 😘 चा वाटले लेख वाचून...

    ReplyDelete
  4. डिअर मिलन,
    टोपण नाव लेख वाचला..
    मस्तच. खूपच छान लिखाण आहे तुझे.
    अभिनंदन.
    सौ. अंजली देशपांडे.

    ReplyDelete