Sunday, 25 November 2018

मैत्री कि आकर्षण


कुणीतरी हवे आपल्याला मनापासून समजून घेणारे. आता तुम्ही म्हणाल तसे तर खूप जण असतात कि आपल्याला समजून आपले आई बाबा आजी आजोबा नवरा बायको, मुलेहो ते हि आहेच कि. पण खरेच हे सगळे आपल्याला मनापासून समजून घेतातकितीतरी अशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्या जोडीदारासोबत हि नाही वाटून घेऊ शकत. कितीतरी गुपिते जी कुणालाही नाही सांगता येत
अशा वेळी हवे असते कुणीतरी आपले. आता त्यावर आहेच उत्तर कि आपले मित्र मैत्रिणी असतातच ना ज्यांच्या सोबत आपण सगळे काही वाटून घेऊ शकतो. हे हि खरेच आहे कि.... मग आता घोडं अडले कुठे?

आता प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा कि कोण आहे आपल्यावर अगदी मनापासून समजून घेणारे? ज्यांना ठामपणे एक नाव घेता येईल ते खरेच नशीबवान. तरीही प्रत्येकाची समजून घेण्याची व्याख्या काही वेगळीच असते

अर्थात ते मिळतेच असे नाही. पण प्रत्येकाला कुणीतरी असे हवे असते ज्या व्यतींशी आपण अगदी मोकळेपणाने काही हि बोलू शकतो. जेव्हा कधी एकटे वाटते त्या व्यक्तीशी दोन शब्द बोलल्यावर एकटेपणा कुठल्या कुठे निघून जातो. असे कुणीतरी हवे जे आपल्यातल्या लहान मुलाला सहन करणारेकितीही बालिशपणा केला तरी आपल्याला समजून घेणारकाय हा पोरकटपणा? किंवा आता काय लहान आहे का तू असे वागायला ? असा कधीही प्रश्न ना करता तुम्ही जे वागलं ते खपवून घेणारे. अर्थात आपणही समोरच्या व्यक्तीचा बालिशपणा खपवून घेतला पाहिजे. तुम्हाला कधीही गरज लागली तरी हातातली कामे सोडून तुमच्यासाठी वेळ देणारे. आता बिझी आहे मग बोलू .... म्हणजे माणूस मारतोय आणि तुम्ही पाणी पाजायला तुमच्या सवडीने जाणार असेच झाले ना ते

आता असा प्रश्न मनात आला असेलच ना कि असे फक्त प्रियकर प्रेयसी असू शकतातअसू दे ना मग ... पण दोन मैत्रिणी, दोन मित्र किंवा मित्र मैत्रीण कुणीही असू शकतो ना. पण दोन मैत्रिणी किंवा मित्र ,अगदी प्रियकर प्रेयसी हि आपण समजूच शकतो

पण कधीतरी असे होते जेव्हा एक मित्र आणि मैत्रिणी असे असतात तेव्हा? त्यांच्या भावना कितीही शुद्ध असल्या तरी लोक नवे ठेवतातच. माझा दादा म्हणाला होता मला कि मैत्रीला नात्याचे नाव दिले कि त्याला बंधने येतात. खरेच आहे

पण आपल्याकडे दुर्देव असे कि हे कुणी मानतच  नाही. इतकेच कशाला त्या मैत्रीतही बऱ्याच वेळा असे होते कि समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप मोकळेपणाने बोलते म्हणजे तिच्या मनात काहीतरी वेगळेच आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. एखाद्या व्यक्तीशी आपण अगदी नियमित बोललो कि ती व्यक्ती आपल्याला खूप जवळची वाटू लागते. जरी भेटलो नाही तरी एक आपुलकीचे नातं तयार होतेपण कधी कधी काय होते ना कि त्यातल्या एखाद्याच्या मनात काहीतरी वेगळेच विचार येतात. समोरची व्यक्ती अगदी मोकळेपाणाने बोलते म्हणजे तिला सगळेच चालू शकते असा विचार करू लागतात. एका अर्थाने गृहीत धरू शकतात

मग बोलण्यातले विषय भलतीकडे जायला लागतात. समोरच्या व्यक्तीच्या मनातही नसतात असे विषय बोलले जातात. काही वेळा वेगळे विषय म्हणून त्यावर चर्चा हि होते पण तेच विषय जेव्हा खऱ्या विषयाकडे वळतात तेव्हा त्यातली एक व्यक्ती नेहमीच दुखावली जाते कारण तिच्या भावना तशा नसतात.  

आपल्याला एखादी व्यक्ती मोकळेपणाने भेटते किंवा बोलते तेव्हा ते फक्त शारीरिक आकर्षणच असेल असे नाही ना. दोन विरुद्ध लिंगी व्यक्ती जर जवळ आल्या तर त्याची वाट एकाच ठिकाणी का धरण्याचा आग्रह केला जातो हे आता पर्यंत उलगडणारे कोडे आहेएखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याची , कामाची स्तुती करणे  हे फार स्वाभाविक असते पण कधी कधी हे काही विशिष्ट कारण समोर ठेवूनच केले जाते. तर कधी कधी एखादी व्यक्ती हि निर्मळ  मनाने कुठलीही अपेक्षा ना ठेवता फक्त आपुलकी खातर करत असेल हा विचारच केला जात नाही
एखादी व्यक्ती आपल्याशी मोकळेपणाने बोलली कि आपण त्या व्यक्तीला काही अंशी गृहीत धरायला लागतो. कदाचित ती व्यक्ती आपल्यात एक चांगला मित्र किंवा मैत्रीण शोधात असेल हा साधा विचारही मनाला शिवत नाही. आपल्या मनात असणाऱ्या भावना अतिशय उथळपणे मांडल्या जातात आणि असलेल्या मैत्रीचा हि बळी दिला जातो
फार कधीतरी हे आकर्षण दोन्ही कडून असते. पण अगदी फारच कमी वेळा. आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन मित्र किंवा मैत्रिणींमध्ये आपण तो कंफर्ट  झोन शोधत असतो जो काही वेळा आपल्याला कुणातही मिळत नाही. किंवा आपल्या अगदी जवळची दोस्त मंडळी इतकी लांब गेलेली असतात कि आपल्याला वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांना नाही सांगू शकत. आता काही व्यक्ती होतच नाहीत व्यक्त पण ९९% व्यक्तींना कुणीतरी लागतेच जवळचे
एक साधी सरळ गोष्ट कि मैत्रीचा हात पुढे करून त्याआडून काहीतरी वेगळे अपेक्षित ठेवण्यापेक्षा आणि समोरच्या व्यतीच्या भावनांना दुखावण्यापेक्षा, स्पष्ट राहून मैत्री करा म्हणजे एकतर मैत्री होणारच नाही किंवा तुमचे मत बदलेल
एख्याद्याकडे एक शरीर म्हणून बघण्याची मानसिकता बदलली ना तर बऱ्याच मैत्री या सुलभ होतील. आणि आपला हि दृष्टिकोन बदलेल







 






-

Tuesday, 6 November 2018

भूषण कदम

आमची मैत्री जेमतेम दोन वर्षांची आहे. शाळेतला भूषणच काय तर त्याचे नावही मला आठवत नाही. अर्थात त्यालाही मी आठवत नाहीये ही गोष्ट वेगळी. जेव्हा ग्रुप वर माझ्या विषयी बोलले जायचे तेव्हा तो विचार करायचा कि आपल्या वर्गांत मिलन नावाचा कोण मुलगा होता? पण ज्या दिवशी माझ्या दहिसर च्या घरच्या गेट टू गेदर चे फोटो टाकले तेव्हा त्याला कळले कि मिलन मुलगा नाही मुलगी आहे. 
त्यानंतर हि आम्ही जास्त काही बोलत नव्हतो पण एकदा माझा महाराष्ट्र टाइम्स ला एक लेख आला होता त्यावर त्याने कंमेंट्स केले होते. तेव्हा खरी बोलायला सुरवात झाली आमची. त्यानंतर कळले कि त्याला वाचनाची खूप आवड आहे म्हणून मी ग्रुप वर पाठवलेले बाजींद कथेचे भाग त्याला हि पाठवले. त्या वेळेला आम्ही मेल मधून एकमेकांशी बोलायला लागलो. त्यावेळी त्याने मला म्हटले होते कि धरती वर माणूस उपराच हे पुस्तक आहे माझ्याकडे मी देईन तुला. आज दोन वर्ष पूर्ण होतील आमच्या मैत्रीला पण अजून पुस्तक काही मिळालेलं नाही मला. 

त्यानंतर खूप दिवस मेलवरच बोलल्यावर आमच्या लक्षात आले कि आम्ही व्हाट्सअँप वरही बोलू शकतो मग तिथे संवाद सुरु झाले. आमचे बोलणे हे साधारण पुस्तकं, लेख एखादा चांगला चित्रपट यावरच असायचे. अगदी ऑफिशिअली गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट आम्ही एकमेकांना केले असे मला आठवत नाही. 
एक दिवस त्याचा मेसेज आला मी विरार ला येणार आहे तुला वेळ असेल तर भेट. अनायसे  मी हि विरार लाच होते म्हणून आम्ही भेटायचे ठरवले. विरार स्टेशन ला उतरल्यावर मी त्याला फोन केला " कुठे आहेस तू?" ते आमचे पहिले फोनवरचे संभाषण होते. मग आम्ही स्टेशन जवळच भेटलो जेमतेम १० ते १५ मिनिट. बापरे किती गप्पा मारल्या आम्ही. सगळ्या गमती जमती ज्या त्याने आतापर्यंत मिस केल्या होत्या त्या सांगितल्या. त्यावेळी मला आठवतेय तो म्हणाला होता कि तुझे आणि मंदार चे कौतुक कि तुम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले आहे.  परत लवकरच भेटू म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. 

आणि अगदी एकाच महिन्यात आम्हाला परत भेटण्याची संधी मिळाली. जानेवारी मध्ये आमची पिकनिक होती त्यावेळी आमची दुसरी भेट. त्या पिकनिक मध्ये भूषण च्या बऱ्याच चांगल्या गोष्टी लक्षात आल्या. तो उत्तम कानसेन आहे. जुन्या गाण्यांबद्दल आणि चित्रपटांबद्दल त्याचे ज्ञान भन्नाट आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अशा फार कमी गोष्टी असतील ज्या त्याला माहित नाही. आणि गाणी तर त्याला अशी पाठ आहेत मग ती जुनी असोत कि नवीन हिंदी असोत कि मराठी. तो ज्या टीम मध्ये असेल ती टीम अतांक्षरी मध्ये कधीच हरणार नाही.त्याला इंटरनेट चे हि भयानक वेड आहे. मी तर त्याला " इंटरनेट चा कीडा " म्हणते.  त्याला काही काम सांगा नेट शी रेलटेड तो पूर्ण करतोच.  अगदीच नाही जमण्यासारखे असेल तर सांगतो कि मी प्रयत्न करतो पण झाले तर ठीक. त्याच पिकनिक मध्ये भूषण ची विनोदबुद्धी हि दिसून आली आणि त्याचा हजरजबाबीपणा हि. एखाद्या गोष्टीवर त्याची उस्फुर्त प्रतिक्रिया अगदी अफलातून असते. हि गोष्ट तर आमच्या शाळेच्या ग्रुप वर असणाऱ्या प्रत्येकालाच लक्षात आली असेल. भूषण चे कौतुक असे हि कारण तो आमच्या गेट टू गेदर ला येताना ३ ट्रेन बदलून येतो. कोपरखैरणे ते विरार असा प्रवास म्हणजे धन्यच. यावर्षी माझ्याघरी गणपतीला हि त्याने प्रॉमिस केल्याप्रमाणे येऊन गेला. 

माझे ज्यावेळी दोन तीन लेख छापून आले तेव्हा त्याने मला विचारले तू ब्लॉग लिहितोस का ? बापरे !!! हे काय ? अशी काहीतरी माझी प्रतिक्रिया होती. मग त्याने फोन करून मला नीट समजावले , त्यानंरत २-३ दिवसांनी फोन करून त्याने मला फोनवरूनच ब्लॉग कसा ओपन करायचा ते शिकवले. जवळ जवळ एक तासभर मी त्याला हैराण केले असेल. मला प्रश्न खूप पडतात ना ...  त्यानंतर मी माझा पहिला  ब्लॉग लिहिला आणि त्याला मेल केला. त्यात असणाऱ्या चुका त्याने सुधारून दिल्या. त्यानंतर मी माझा प्रत्येक ब्लॉग आधी त्याला मेल करते त्याचे अप्रूव्हल आले कि मगच तो पब्लिश करते. त्याची एक गोष्ट मला खूप भारी वाटते कि मी त्याला कितीही वाजता जरी मेल किंवा मेसेज केला तरी तो त्याला वेळ मिळेल तास तो रिप्लाय करतो. कधीही कंटाळा करत नाही. आणि चुकून जर कधी त्याला उशीर झाला तर तो चक्क सॉरी म्हणतो. माझा एकमेव मित्र असा आहे जो मला सॉरी म्हणतो.  लिखाणात झालेल्या चुका खूप सोप्या पद्धतीने तो मला समजावतो. माझ्या प्रत्येक ब्लॉग वर सर्वात आधी त्याची कंमेंट असते. त्याने नाही केली तर नेहमीप्रमाणे मी त्याच्यावर रागावते. 
मला वाटते माझ्या लिखाणाचे सगळ्यात जास्त कौतुक त्यानेच केले असेल. मध्यंतरी जेव्हा मला काही लिहायला सुचत नव्हते. म्हणजे अक्षरशः असे वाटत होते कि बहुधा माझे लिखाण इथेच थांबले आता अजून काही लिहूच शकणार नाही. हे त्याला सांगितल्यावर माझ्यापेक्षा जास्त टेन्शन त्याला आले होते. ८ दिवस सतत तो माझ्या संपर्कात होता. मी काही मेसेज केला तरी रिप्लाय देत होता. मला धीर देत होता. एक वाक्य सुचले तरी लिही. होते असे कधी कधी. नको अशी खचून जाऊ. खूप समजावले त्याने मला. आणि त्या नंतर मी पहिला ब्लॉग लिहिला तो विंदा वरचा.  तो वाचून तो खूप खुश झाला. त्याची बिनपगारी ब्लॉग एडिटर ची नोकरी टिकल्याचा  आनंद झाला होता त्याला. हो आणि मी हि त्याची ओळख आता ' माझा ब्लॉग एडिटर ' अशीच करून देते. 

मी जेव्हा हॅम्लेट वरचा ब्लॉग  लिहिला ना तेव्हा तो आणि मुक्ता म्हणाले होते कि यावर सुमित राघवन ची प्रतिक्रिया येईल बघ. आणि काय आश्चर्य एका अज्ञात व्यक्ती मुळे  माझा तो ब्लॉग सुमित पर्यंत पोचला आणि सुमित ने त्यावर खूप छान प्रतिक्रिया हि दिली. त्यात लिहिले होते कि पुन्हा याल तेव्हा नक्की भेटा. आधी मी आणि मुक्त जाणार होतो पण मग ५ मित्रमैत्रिणी गेलो नाटकाला. मला खूप आनंद होत होता कि ज्याच्या मुळे  मला सुमित ची प्रतिक्रिया मिळू शकली त्याच व्यक्तीबरोबर अगदी बी रांगेत बसून मी ते नाटक पहिले. आणि फोटो मध्ये हि माझ्यासोबत तो हि आहे. जेव्हा सुमित शी बोलताना माझे ततपप होत होते तेव्हा भूषणनेच माझी बाजू सावरून घेतली. माझे कौतुक होताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हि मला स्पष्ट दिसत होता. 

भूषण चा एका गोष्टीचा मला राग येतो तो जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तो कधीच समोरून सांगत नाही आपण विचारले कि अरे कुठे होतास इतके दिवस तेव्हा सांगतो. पाठीच्या मणक्याचा असलेला त्रास त्याने सांगितला त्याला कारण हि तसेच झाले आमचे २५ वर्षाचे स्नेहसंमेलन होते आणि त्याच्या आदल्या दिवशी पासून त्याचा फोन बंद येत होता. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो कि काय झाले. पण त्या दिवशी सकाळी त्याचा फोन आला कि मी येतो आहे. मी तर खूप चिडले होते पण नंतर त्याने कारण सांगितले. आताही मध्ये जेव्हा तो हॉस्पिटल ला ऍडमिट होता मी सहज म्हणून मेसेज केला तेव्हा म्हणाला कि अग मी हॉस्पिटल ला आहे. त्याच्यासाठी मी जेव्हा अगदी साधे गेट वेल सून चे ग्रीटिंग बनवले तेव्हा हि तो खूप खुश झाला  कि मी वेळ काढून स्वतः काहीतरी बनवले त्याच्यासाठी. 

मला वाटते माझी  आणि भूषणची इतक्या पटकन मैत्री  होण्याचे कारण आमच्या बऱ्याच आवडी निवडी सारख्या आहेत (गाणी, सिनेमा, वाचन ) . तो हि खूप हळवा आहे. सगळ्यांना मदत करायला तो हि एका पायावर तयार असतो. आणि त्याला तुम्ही त्याला कधी हि , किती वाजता हि मेसेज करा तो रिप्लाय देतोच. 

भूषण परत एकदा मनापासून सॉरी मी तुझा वाढदिवस विसरले. 
 खरेतर हा ब्लॉग मी खूप  आधी लिहायला पाहिजे होता कारण ज्याच्यामुळे मी ब्लॉग लिहायला सुरु केले त्याच्यावर इतक्या उशिरा लिहिणे मलाच मन खात होते. मला माहित आहे भूषण तुला मी थँक यू  म्हटलेले आवडत नाही पण हा ब्लॉग खरेच फक्त तुझे आभार मानण्यासाठी. कदाचित तू ब्लॉग सुरु करून दिला नसतास तर मी फक्त महाराष्ट्र टाइम्स च्या लेखावरच समाधान मानले असते. खऱ्या अर्थाने तू माझ्या लेखनाला दिशा  दिलीस. मी खूप मोठे काही करू शकणार नाही कदाचित पण माझ्या लेखांचे होणारे कौतुक यात सतत तुझा वाटा  असेल.





Tuesday, 9 October 2018

आशिष कुलकर्णी - एक गुणी अभिनेता

टीव्ही वरच्या सगळ्याच मालिका म्हणजे आपल्या जिव्हाळयाचा विषय. त्यात असलेली व्यक्तिरेखा हि आपल्याच घरची कुणीतरी व्यक्ती आहे असेच आपल्याला वाटते. आणि त्यातलीच एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता आपल्याला आवडायला लागतो. मग त्यांची कुठलीही मालिका, सिनेमा  अगदी जाहिरात सुद्धा आपण अगदी आवडीने बघतो.  असेच आज माझ्या एका आवडत्या अभिनेत्या बद्दल मला लिहावेसे वाटतेय. 
अरे हो  हो !!! माहित आहे मला अंकुश चौधरी वर लिहून झालेय. पण असे नाही ना कि दुसऱ्या कुणाचा अभिनय आवडणारच नाही. एक नायक म्हणून अंकुश नेहमीच आवडता आहे पण एक अभिनेता म्हणून जे नाव मला घ्यावेसे वाटतेय ते आहे "आशिष कुलकर्णी".

त्याने आतापर्यंत बरेच काम केले आहे सिनेमा, मालिका आणि नाटकांमध्ये . खरेतर आशिष च्या काही जास्त भूमिका पहिल्या नाहीयेत मी पण ज्या काही पहिल्या आहेत त्या अफलातून आहेत. हॅम्लेट नाटक पाहिल्यानंतर, जास्त उत्सुकतेने मी  त्याच्या मालिका बघायला लागले. त्यामुळे खूप जास्त काही नाही लिहिता येणार पण जे लिहेन ते कमी हि नसेल.

मला वाटत ७-८ वर्षांपूर्वी त्याला " मला सासू हवी" मालिकेमध्ये "विघ्नेश" च्या भूमिकेत पहिले होते पहिल्यांदा, त्या आधी त्याने काम केले हि असेल पण एका घटनेमुळे ती भूमिका प्रकर्षाने लक्षात राहिली. ती भूमिका आधी जो अभिनेता करत होता त्याच ताकदीने आशिष ने हि ती पार पडली. 
मी जेव्हा त्याच्या सोबतच फोटो सोशल मीडिया वर टाकला होता तेव्हा बऱ्याच जणांनी "अगं  , हा क्राइम पॅट्रॉल  मध्ये असतो तोच ना ? असे विचारले. म्हटले हो तोच तो ,जो रुद्रम मालिकेत होता, जो आपला माणूस चित्रपटात आहे, तोच जो कट्टी बट्टी मध्ये आहे आणि आता "आम्ही दोघी मध्ये हि आहे.

जेव्हा रुद्रम मालिका पाहायला सुरवात केली तेव्हा ज्या दिवशी आशिष ची एन्ट्री झाली "हा बघ विघ्नेश" अशी आमची सगळ्यांची रीऍक्शन होती. त्या मालिकेत एका छान , समजूतदार मित्राची भूमिका त्याने पार पडली होती. ती मालिका तर अप्रतिम होतीच पण  त्या मालिकेत सगळ्याच भागांमध्ये तो नव्हता, मग तो कधी दिसतो असे होऊन जायचे.   त्यानंतर त्याला पहिले ते आपला माणूस मध्ये छोटीशी भूमिका  "नितीन" नावाची नायकाचा मित्र , संशयाची सुई काही वेळा याच्याकडे हि वळली आहे त्या चित्रपटात. एक आहे नाना पाटेकरांसारख्या दिग्गज कलाकारापुढे त्याने आपले अस्तिव कुठे झाकोळू दिले नाही.

नंतर कट्टी बट्टी मध्ये प्रतीक महाबळ म्हणून त्याची एन्ट्री झाली. आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली म्हणून काहीसा चिडलेला आणि थोडासा आक्रमक झालेला प्रियकर उत्तम रंगवला. सुरवातीला वाटायचे का असा नेगेटिव्ह रोल ? पण बघायला मजा येत होती. मला त्यातले दोन प्रसंग जास्त प्रकर्षाने लक्षात राहिले कारण माहित नाही पण राहिले. एक त्यांच्या मारामारीचा ज्यात आशिष त्या नायकाला (पराग) दारूच्या नशेत म्हणतो कि "अरे तू का दाढी वाढवली आहेस?  मी वाढवायला हवी माझी प्रेयसी सोडून गेलीय मला ". आताही हसू येते मला त्या प्रसंगातील त्याचा तो टोन आठवून . असे वाटत होते कि खरेच दारू पिऊन केलाय कि काय सीन . त्यांनतर पोलीस स्टेशन मध्ये असताना जेव्हा पराग त्याला समजावत असतो त्यावेळी आधी राग, मग हतबलता, डोळ्यात येणारे पाणी सगळेच एकदम,  आपल्याला  कीव यावी इतका इनोसन्ट चेहरा. आधी आपल्याला त्या प्रतीक चा राग येतो आणि मग त्याचा चेहरा बघून आपल्यालाच वाटते किती वाईट झालेय याच्या बाबतीत . मस्तच...

आम्ही दोघी मालिके मध्ये हि तसाच नेगेटिव्ह रोल . भोळेपणाचा आव आणून दुसर्यांना फसवणे. काही वेळा तर त्याने कपटीपणाचा इतका छान भाव आणला होता कि किती जणींनी मनातून म्हटले असेल का असा फसवतो लोकांना. मला तर वाटायचे कि भेटून सांगावे त्याला कि , अरे बाबा तुला इतका सुंदर चेहरा दिलाय ,एखादा रोमँटिक रोल कर. पण खरे तर त्याने वठलेल्या त्या कपटी भूमिकेचा आपल्याला राग येणे हीच खरी पावती ना त्यांच्या साठी.

क्राइम पॅट्रोल चे  मध्ये हि मी त्याला ४-५ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहिले. एक जुना भाग पहिला त्याचा त्यात अगदी मळके कपडे , केस बारीक , अगदी गावकरी शोभून दिसत होता. पहिल्याच शॉट मध्ये तो अगदी कुत्सितपणे थुंकताना दाखवला होता. तेव्हा हि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके जिवंत होते, कि  कळत होते  त्याच्या मनात किती राग भरला आहे त्या विशिष्ट व्यक्ती विषयी. प्रत्येक भागात त्याची व्यक्तिरेखा निरनिराळ्या स्वभावाची, ठिकाणाची  होती पण प्रत्येक भूमिका खूपच छान आणि प्रभावी.

आणि आता अगदी आपल्या सगळ्यांचा पाहावेसे वाटणारे अप्रतिम  नाटक "हॅम्लेट". यात सगळेच अप्रतिम आहे. मी पहिल्यांदा पहिले तेव्हाच मला "होरेशीओ" अर्थात "आशिष" चा अभिनय आवडला होता. पण दुसऱ्यांदा जेव्हा ते नाटक खूप जवळून पाहायची संधी मिळाली. अहाहा !!! काय मस्त !!!. त्या नाटकात सगळ्यांचाच अभिनय बेस्ट. पण त्या दिवशी मी काही वेळा फक्त आशिष लाच बघत होते. त्याच्या छोट्या छोट्या हालचाली बघत होते. अर्थात पहिल्या वेळी हि हॅम्लेट ने दिलेली जबाबदारी नीट पार पडतोय का? म्हणून त्या वेळी हि मी त्याला बघितलेच होते. पण या वेळी जास्त जवळून नाटक अनुभवायची संधी मिळाली. त्याचे हावभाव, हॅम्लेट बद्दल असलेली तळमळ , त्याच्या मृत्यूने होणारे दुःख, आणि सगळ्या प्रसंगात आपल्या मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक संवेदनशील मित्र.  हॅट्स ऑफ ...  खरे तर बरेच लिहावेसे वाटतेय पण शब्दच सापडत नाहीये असेच काहीतरी झालेय.

नाटक संपल्यावर आम्ही जेव्हा कलाकारांना भेटायला गेलो सगळेच मस्त बोलले. आम्ही आशिष ला गराडा घातला होता. माझ्या मैत्रिणीच्या मुलीने केलेली विनंती त्याने शांतपणे ऐकून घेतली. आमच्या सगळ्यांचा फोटो काढावा म्हणून त्याने स्वतःहून त्यांच्या युनिट च्या माणसाला सांगितले. आम्ही निघताना त्याने आवर्जून म्हटलेले " थँक्स फॉर कमिंग " माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहे. कलाकार म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनही खूप चांगला वाटला. बोलताना कुठेही असे वाटत नव्हते कि आम्ही पहिल्यांदाच भेटलो त्याला. 

मी आतापर्यंत पाहिलेल्या त्याच्या भूमिकांवरून या कलाकाराबद्दल एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे  ती म्हणजे प्रत्येक वेळी ( मी ज्या पाहिल्या त्या) त्याचा लुक वेगवेगळा होता. आणि त्या प्रत्येक भूमिकेत अभिनय ही इतका भारी केला की म्हणतात ना ती व्यक्तीरेखा तो जगला तसेच काहीतरी. मला एकदम हिंदी मधील एक असे नाव आठवले  कि त्यांनी हि आपल्या अभिनयाने त्यांची प्रत्येक भूमिका जिवंत केली.आशिष चा अभिनय हि मला बराच तसाच वाटतो. हि तुलना नाही म्हणता येणार पण ती ताकद नक्कीच त्याच्यात आहे असे माझे प्रामाणिक मत आहे . आता जर कधी त्याला नामांकन  मिळाले ना त्याच्या भूमिकेसाठी तर सगळ्यात जास्त वोट माझेच असतील 🙂

या अभिनेत्याची एक गोष्ट कौतुक करण्यासारखी आहे कि त्याची भूमिका लहान असो किंवा मोठी तो त्याची छाप पडतो त्या भूमिकेत. भूमिका छोटी असली तरी लक्षात राहण्यासारखी असते. त्याची भूमिकांची निवड जास्त योग्य कि त्याने त्या भूमिकेला दिलेला न्याय हे जास्त चांगले हे  ठरवणे त्याने त्याच्याच अभिनय कौशल्यामुळे कठीण करून ठेवले आहे. त्याच्या आताच्या काही भूमिका पाहिल्यावर असे वाटते कि एखादा रोमँटिक अँटी हिरो करायला काहीच हरकत नाही याला .  आता जसा अंकुशच्या आजूबाजूला मुलींचा गराडा पडतो ना फोटो साठी तसाच त्याच्या भोवती हि पडावा असे मनोमन वाटतेय. लवकरच त्याला एका मुख्य भूमिकेत  (नायकाच्या ) बघायची फार इच्छा आहे. याच्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून  खूप खूप खूप शुभेच्छा. अशाच मस्त मस्त भूमिका करत राहा आणि आम्हाला सतत पडद्यावर दिसत राहा.

एका उत्कृष्ट अभिनेत्याला त्याच्या एका चाहतीने दिलेली दाद.






Saturday, 6 October 2018

दीपाली कर्णिक


दीपाली म्हणजे मला पडलेले एक कोडे आहे कधी ती मला खूप जवळची वाटते तर कधी परकी . का माहीत नाही पण असे वाटते कधीतरी.. सॉरी दीपा. कदाचित तिचा कमी बोलण्याच्या स्वभावामुळे असेल.
दीपाली ची आणि माझी ओळख पहिल्यांदा झाली ती शाळेत दहावीत. माझ्या मागच्या  बेंचवर बसायची संदिती सोबत. खूप बडबड करायचो आम्ही. म्हणजे अभ्यास ही करायचो😊. शाळेत मला कळलं होते की तिच्या बाबांनी चोरांना पकडून दिलेय तेव्हापासून खूप उत्सुकता होती त्यांना पहायची.  त्यांना जेव्हा नुसते पाहिले तेव्हा भीती वाटली  होती. उंच ,झुबकेदार मिशा. एकदम पोलीस वाटत होते पण जेव्हा बोलले तेव्हा मात्र भीती एकदम गेली. 
दीपालीला लक्षात ठेवण्याचे अजून एक कारण म्हणजे तिचे चालणे. तिच्या चालण्याची विशिष्ट अशी लकब आहे.तिच्या बोलण्याची हसण्याची ,  इतकंच काय तर तिची केस बांधायची पण एक वेगळी स्टाइल आहे.दीपाली कर्णिक म्हटले कि आपल्याला पटकन तिचा चेहरा समोर यायलाच हवा इतके तिने तिचे ते वेगळेपण जपले आहे. 
मी दहिसर ला राहिला आल्यानंतर एक दोन महिन्यांत दीपाली ही बोरिवली ला राहायला अली. तिच्या वास्तुशांती चे फोटो तिने फेसबुक वर टाकले तेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली होती. त्यावेळी मला खूप वाईट वाटले होते. संध्याकाळी बऱ्याच वेळा आम्ही एकाच ट्रेन ला असायचो तेव्हा तिने घर बघतोय असे म्हटले  होते पण हे एकदम घेऊन राहायला गेली मला शॉक होता.  माझा असा गैरसमज झाला होता की मी ही गोष्ट कुणाला तरी सांगेन म्हणून तिने मला सांगितले नाही. त्यानंतर जवळजवळ सहा महिने  मी तिच्याशी बोलत नव्हते. मी रागाच्या भरात काहीतरी बोलेन म्हणून तिने माझ्याकडे गणपती ला येणे ही टाळले. २४ सप्टेंबर ला जेव्हा आमचे गेट टू गेडर होते  त्यावेळी ती आल्या आल्या मला येऊन भेटली पण मी तिला म्हटलं आपण नानंतर बोलू मला थोडा वेळ हवाय. खरेच होते कारण मला रडायला येत होते. शेवटी जाताना जेव्हा ती बाय म्हणत जवळ आली तेव्हा मात्र मी खूप रडले. तिला ही वाईट वाटलं होते ती सॉरी म्हणत होती . पण अजूनही मला त्या गोष्टीची कुठेतरी खंत आहे मनात.
२००८ ते २०१० मी आणि दीपा सकाळी एकाच ट्रेन ला असायचो ८.११ आणि आमच्या सोबत कधीतरी सचिन राऊत( हा हा तो बाजूच्या डब्यात असायचा). खूप गप्पा मारायचो. दोघींची स्टेशन  वेगवेगळ्या बाजूला यायची तरी आम्ही एका बाजूला उभ्या राहून गप्पा मारायचो. संध्याकाळी हि आम्ही बऱ्याच वेळा मागच्या पुढच्या ट्रेन ला असायचो. मी आणि मुक्ता त्या विवा मार्केट जवळ गप्पा मारायचो तेव्हा ती हि कधी कधी यायची. त्याच दरम्यान मला संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या " आयुष्यावर  बोलू काही " ची तिकीट मिळाली होती आम्ही दोघी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. पण रात्री उशीर झाला आणि व्दिता राहत नव्हती म्हणून मनीष चा दोनदा फोन हि येऊन गेला म्हणून आम्ही कार्यक्रम संपायच्या आधी निघालो.
तसे शाळेत आम्ही खूप बोललो नाही आणि अशा हि आम्ही खूप जवळच्या अशा मैत्रिणी आहोत असे कुणी म्हणणार नाही. पण मी आणि दीपाली बऱ्याच वेळा , बऱ्याच ठिकाणी एकत्र असायचो. आमची लोणावळा ट्रिप खूप धमाल झाली , त्यावेळी निघायच्या दिवशी खूप  जोरदार पाऊस  पडत होता , त्यावेळी मी आणि दिपाली सतत एकमेकींच्या संपर्कात होतो. जायचे नाही जायचे हे ठरवत होतो. पिकनिक ला तर आम्ही गेलोच इतक्या पावसात. दीपाली आणि मी येताना एकाच गाडीतून आलो होतो. ती जास्त बोलत नाही पण मधेच एखादी गुगली मात्र मस्त टाकते. 
मंदार च्या घरी पहिल्यांदा जाताना हि मी दीपाली आणि रत्ना मितेश च्या गाडीत होतो. तेव्हा मितेश पहिल्यांदा गाडी मुंबईत नेतो आहे हे ऐकल्यावर त्यांच्या रीऍक्शन बघण्यासारखी होती. तेव्हा हि जात येता  खूप धमाल केली होती. 
अशा बऱ्याच गेट टू गेदर ला आम्ही एकत्र असायचो. कारण दोघी विरार पूर्वेला राहायचो. दीपाली ची एक गोष्ट आहे कि तिला जमते तेव्हा आणि तसे ती गेट टू गेदर ला यायचा प्रयत्न करते. उगाच कारण देत बसत नाही.  इतकेच कशाला माझ्या ऑपरेशन च्या वेळी ती मला बघायला हि आली होती. एरवी ती आठवणीने फोन करेलच असे नाही पण कुणी आजारी असेल, काही घटना घडली असेल तर मात्र ती ना चुकता चौकशी करते. 
दीपा माझ्या खूप समजूतदार मैत्रिणीनं पैकी एक आहे. तिचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. खूप समजूतदार पण घेते ती सगळ्या गोष्टी . तिला खूप चिडलेले , रागावलेले मी कधी पहिले नाहीये. (बाकी मनीष ला विचारावे लागेल 😃). पण मी तरी पहिले नाहीये.अजून एक गोष्ट दीपाली ऑफिस मध्ये खूप चांगल्या पदावर आहे. पण त्या गोष्टीचा तिने कधी गर्व केला नाही. कि कधी कुणाला कमी लेखले नाही.   
तिच्या लग्नानंतर दीपाली बद्दल मला जास्त जवळीक वाटू लागली कारण तिचा नवरा मनीष राणे आणि मी एकाच गावचे आमची वाडी ही बाजू बाजूची. त्यामुळं आपुलकी जास्त. तसेच दीपाचे कौतुक ही वाटते तिने सासर माहेर यात व्यवस्थित समन्वय साधला आहे. मी हि ओझरम ची असल्यामुळे मी समजू शकते कसा स्वभाव असतो "राण्यांचा". घर ,ऑफिस , शेजारी , मित्रमैत्रिणी सगळ्याच बाजू तिने खूप छान सांभाळल्या आहेत.  एक चांगली मैत्रीण, बायको ,आई, सून, जाऊ आणि मुलगी सगळ्याच भूमिका ती यशस्वीपणे  निभावतेय. 
अजून एक गोष्ट मला या ब्लॉग च्या निमित्ताने कबूल करावीशी वाटते ती म्हणजे हल्ली हल्ली मला एक गोष्ट जाणवली आहे , दीपा जरी बोलून दाखवत नसली तरी तिचा माझ्यावर खूप जीव आहे. आमच्या शाळेच्या ग्रुप संदर्भात काही गोष्ट असेल तर ती सगळ्यात आधी मला सांगते.
दीपाली तुला एक सांगायचे आहे "  जसा आतापर्यंत आमच्या राण्यांका सांभाळेस तसेच पुढे पण संभाळ गो बाय". 





Friday, 5 October 2018

एक आभासी मैत्री


आपल्या सगळ्यांच्या काही सुप्त इच्छा असतात ज्या आपण बोलून दाखवत नाही. अशाच एका सुप्त इच्छेवर सुचलेली गोष्ट.....


आटपाट नगर होते. त्या नगरात सर्वसामान्य स्त्री होती. नवरा , बायको आणि एक गोंडस मुलगा असे ते तिघांचे छोटेखानी कुटुंब. नवरा कामावर आणि मुलगा शाळेत गेल्यावर सगळी घरची कामे आटपून टीव्ही पाहणे हा तिचा आवडता छंद. मराठी मालिका म्हणजे तिच्या अगदी आवडीच्या. जर वेळेत नाही भाग पाहता आला तर दुसऱ्या दिवशी रिपीट पाहायचे , पण मालिका चुकवायची नाही. एक दिवस अशीच मालिका पाहताना तिला तो दिसला ...अरे हा तर तोच जुन्या मालिकेत काम करणारा. इतकी वर्षे कुठं गायबच झाला होता. मध्ये एक नाटक केले होते वाटते याने. तिला तो त्या भूमिकेत हि आवडला होता .  ही चंदेरी दुनिया जशी सगळ्यांना भूल घालते तशी तिला ही आकर्षण होते. कोणीतरी आपल्या ही जवळचे असावे या दुनियेत , किंवा आपणही कधीतरी याचा छोटासा भाग व्हायला हवे असे नेहमीच वाटायचे तिला.

एक दिवस अचानक एका सोशल साईट वर तिला तो दिसला , त्याला तिने फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली. दोन दिवसांनी त्याने ती स्वीकारली. या आभासी जगतात तो तिचा मित्र झाला होता. त्याच्यासाठी ती त्याच्या १००० मैत्रीणींपैकी एक होती. त्याच्या गावी ही नसेल कुणीतरी अशी मैत्रीण आहे. तिला खूप भारी वाटतं होते.

त्याला कधी कुठे मालिकेत, नाटकात  पहिले कि ती त्याला मेसेज करत असे, कधीतरी कुठल्या तरी सणाला हि ती त्याला शुभेच्छा देत असे. नवल म्हणजे तो हि कधीतरी त्या मेसेज ला उत्तर देत असे. मग एक दिवस त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला तिला जायचे होते म्हणून तिने त्याच्या कडे प्रयोगानंतर भेटायची परवानगी मागितली. खूप आढेवेढे घेऊन त्याने हा ये म्हणून परवानगी दिली. ती खूप खुश झाली. एका ऑनलाईन सेलेब्रिटी मित्राला ती ऑफलाईन भेटणार होती. तिच्यासाठी तर तो तिच्या स्वप्नातला राजकुमार होता. नाटकात त्याच्या प्रवेशाला तिच्या काळजाचा ठोका चुकला. काहीतरी वेगळेच वाटत होते तिला. नाटक संपल्यावर लगेच ती त्याला भेटायला पळाली.त्याला भेटायचे म्हणून घाईघाईत तिने त्याच्यासाठी पत्र लिहिले होते. त्याने जेव्हा तिला नावाने ओळखले खूप खुश झाली ती तिच्या अपेक्षेच्या पलीकडचे होते हे सगळे. तो प्रत्यक्षात खूपच छान दिसत होता. तिला त्याच्याकडे नुसते पाहत राहावेसे वाटत होते. तिने निघता निघता त्याला ते पत्र दिले. अरे कशाला हे ? म्हणत त्याने ते घेतले. त्याच्या सोबत दोन फोटो काढून ती निघाली. त्याला समोर बोलू शकली नाही पण तिथून निघाल्यावर तिने त्याला मेसेज केला खूप सुंदर दिसतोस तू.

दुसऱ्या दिवशी त्याचा रिप्लाय आला थँक्स चा . त्या दिवसानंतर हळू हळू त्यांचे बोलणे वाढले. ती रोज त्याला गुड मॉर्निंग , गुड नाईट चा मेसेज करत होती. त्याला जमेल तसा तो हि बोलत होता तिच्याशी. तिला नवल वाटायचे का बरे बोलतो हा आपल्याशी? तिने विचारले पण त्याने कधी सांगितले नाही. तिला खूप उत्सुकता होतीच त्याच्या क्षेत्राविषयी त्यामुळे ती सतत त्याला काही ना काही प्रश्न विचारात असे. कधी तो उत्तर देत असे तर कधी टाळत असे. एक दिवस तिने काहीतरी विचारले आणि तो इतका चिडला कि बोलणे बंद केले. तिला खूप वाईट वाटले या गोष्टीचे. पण तिने त्याला रोज मेसेज करणे काही सोडले नाही. ८-१० दिवसांनी परत त्याने बोलायला सुरवात केली. या दिवसात ती हजारवेळा तरी त्याला सॉरी म्हणाली असेल. पण तरीही उत्तर नाही.

ती त्याच्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक करत होती. तो कधी टीव्ही वर दिसला की त्याला फोटो काढून पाठवायची. तो ही तिने केलेल्या कौतुकाचा स्वीकार करत होता. अधून मधून विचारायचा बरे होतेय ना काम माझे?  ती आपली मनापासून उत्तर देई. त्याने कसेही काम केले तरी तिला आवडणारच होते.  पण तरीही तिला जर नाही आवडले तर स्पष्ट सांगत होती. कधीतरी तो तिला अशी एखादी गोष्ट सांगायचा की तिला प्रश्न पडत असे आपल्याला का बरे सांगितलं असेल हे?

 एक गोष्ट घडली होती त्याच्याशी बोलायला लागल्यापासून तिचा आत्मविश्वास वाढला होता.ती स्वतःवर प्रेम करायला शिकली होती. नीटनेटकं राहणे, छान दिसणे , स्वतःकडे लक्ष देणे तिला हवेहवेसे वाटू लागले होते. त्याने केलेल्या तिच्या स्तुती ने ती भारावून जायची. तिच्यासाठी तो खूप जवळचा होता. इतका जवळचा कि देवासमोर प्रार्थनेसाठी हात जोडले कि त्याच्यासाठी हि प्रार्थना करत असे. तिच्या जवळच्या लोकांसाठी वाटणारी तगमग तिला त्याचसाठी हि वाटत होती. त्यांच्या या वाढत्या संभाषणामुळे तिला त्याला भेटावेसे वाटत होते . त्याही बाबतीत तो फक्त तिला आश्वासने देऊन टाळत होता. त्याची कारणे खरी खोटी तिला कळत नव्हते. पण तिची इच्छा काही कमी होत नव्हती. शेवटी कंटाळून तिने ती इच्छा मनात दाबून टाकली.  त्याच्या सोईप्रमाणे तो तिच्याशी बोलत होता आणि ती हि आपल्या सगळ्या इच्छा मनात ठेवून स्वतःच्या आनंदासाठी बोलत राहिली. एका सर्वसामान्य गृहिणीला एक सेलेब्रिटी मित्र लाभला होता हेच एक मोठे समाधान होते तिच्यासाठी.

पण एक गोष्ट  तिच्या लक्षात आली होती कि मैत्री किती मनापासून असली तरी दोन्ही बाजू समान असायला हव्यात, नाहीतर ती मैत्री फक्त आभासी मैत्री असते. अशीच असते का हि मैत्री फक्त जवळ असताना जाणवणारी? मनाने तुम्ही कितीही आपले म्हटले तरी जोपर्यंत दोन्ही बाजूने स्वीकारली जात नाही तो पर्यंत एक पुसट रेषा कायम जाणीव करून देते परकेपणाची ( दोघांमध्ये असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेच्या अंतराची). या सामान्य मैत्रिणीच्या मैत्रीची जाणीव होईल का त्याला ? तिच्यासाठी तो या चंदेरी दुनियेतील   पहिला आणि शेवटचा मित्र होता. त्यांची ऑनलाईन  मैत्री तशीच कायम राहिली पण त्याबरोबरच तिचा एक प्रश्न मात्र कायम अनुत्तरीत राहिला "कधी भेटायचे आपण?" 




Saturday, 22 September 2018

आपली माणसे

काल एका मित्राचा फेसबुक प्रोफाइल बघताना त्याची एक जुनी  पोस्ट वाचली " आपली माणसे खरेच आपली असतात का ?' त्यावरचे कंमेंट काही वाचले नाहीत. पण मनात विचार आला कि हा प्रश्न तर कधी ना कधी प्रत्येक माणसाला पडत असेल ना. खूप साधा सरळ प्रश्न पण  अंतर्मुख करणारा ,त्याचे उत्तर तितकेच कठीण ना !!!
मुळात या प्रश्नाच्या उत्तराची सुरवातच एका प्रति प्रश्नाने होते असे मला वाटते तो म्हणजे नक्की हि आपली माणसे कोण?  आपली जी रक्ताच्या नात्याने जोडलेली आहेत ती? कि जी वैचारिक पातळीवर आपल्याला हवी असतात ती? कि काही कारण नसताना ज्यांच्याशी आपल्याला बोलावेसे वाटते भेटावेसे वाटते ती ?
 आपली माणसे म्हटले कि रक्ताच्या नात्यातील, नातेवाईक, नवरा बायको, हीच लोक आपल्या डोळ्यासमोर येतात. आपला विचारांचा प्रवाहच इथून सुरु होतो. हि आपल्या माणसांची व्याख्या वेळ आणि काळ आणि गरज यानुसार बदलते बहुतेक. आपला मनुष्य स्वभावच कदाचित तसा आहे. जसे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला वेळ देत असते, आपल्यासाठी काही करत असते तेव्हा ती आपल्याला आपल्या जवळची वाटते. पण तीच व्यक्ती जर कधी आपल्याला वेळ देऊ शकली नाही कि आपण लगेच त्या व्यक्तीला परके करून टाकतो. कधी कधी हा हि विचार करत नाही कदाचित त्या हि व्यक्तीला काही अडचण असेल. कुठेतरी त्याही व्यक्तीचे हात बांधलेले असतील.
काही वेळा असेही होते कि आपण कुणाच्या तरी खूप जवळचे असतो , आपल्या नातेवाईकांपेक्षा , घरच्यांपेक्षा , मित्रमैत्रिणीपेक्षा पण हि गोष्ट आपण उघडपणे नाही बोलू शकत. कारण कधी कधी समाजाची, किंवा कोण काय म्हणेल या भीतीने , आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, आपल्याला काही माणसे जवळची असूनही त्यांच्याशी चारचौघात परकेपणाने वागावे लागते. हि गोष्ट कदाचित जास्त त्रासदायक असते प्रत्येकासाठीच.
असे म्हणतात कि हल्लीच्या जगात कुणीच कुणाचे नाही. काही अंशी हे खरे हि वाटते. हल्ली नवरा बायको सारखे पवित्र बंधनात बांधलेले नाते हि तुटते. आपण नेहमीच ज्यांना आपले म्हणतो अशी आपली मुले ती हि कधी कधी आईवडिलांना सोडून निघून जातात, मग कुणीतरी शेजारी पाजारी , वृद्धाश्रमातील त्यांच्यासारखीच एकटी पडलेली काही मंडळी त्यांना सोबत करतात त्यांना संभाळतात  मग अशा वेळेला प्रश्न पडतो कि नक्की कोण आपले आणि कोण परके?
कधी वाटते कि जिथे आपण समोरच्या माणसांकडून अपेक्षा ठेवायला लागतो ना तिथेच आपल्या परक्याचा भेद सुरु होतो. एखाद वेळी जर आपण खूप आपली मानणारी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा एक तर त्या व्यक्तीची आपल्याकडची गरज संपलेली असते किंवा ती व्यक्ती खरेच कधीच आपली नसते. फक्त आपणच त्या व्यक्तीला आपले समजून गमवायला घाबरत असतो. समोरच्या व्यक्ती साठी आपण कधी त्यांच्या जवळचे नसतोच. 
कधीतरी आपण एखाद्याला आपलेसे समजून त्या व्यक्ती साठी खूप काही करतो. त्याची काळजी घेतो, त्याला सर्व प्रकारे मदत करायचा प्रयत्न करतो. पण त्या व्यक्तीला फक्त आपल्या कामाशी काम असते. अशा वेळेला मग वाटते कि आपल्यासाठी जवळची असणाऱ्या व्यक्तीसाठी आपण कुणीच नाही. एकतर्फी प्रेमासारखे हा हि एकतर्फी आपलेपणाचा झाला नाही का ? 
तर कधीतरी एकदा किंवा दोनदाच भेट झालेल्या व्यक्ती बद्दल आपल्याला आपले पणा वाटू लागतो आणि हीच भावना समोरच्या व्यक्तीची ही असते.
आपली माणसे हि नेहमी आपलीच असतात पण आधी आपली माणसे कोण हे ओळखता यायला हवे. जी माणसे आपला विचार न करता आपल्याला सोडून कधीही परत न येण्यासाठी निघून जातात ती कधीच आपली नसतात. जी माणसे कसलीही अपेक्षा ना करता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात, आपल्या गुणदोषांसकट आपल्याला स्वीकारतात, आपल्या दुःखात ज्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि आपल्या आनंदात ज्यांच्या ओठांवर हसू फुलते, आपल्या प्रगतीसाठी जी मनोमन प्रार्थना करतात, आपल्याला कधीही मागे ओढायचा प्रयत्न करत नाहीत, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचे ज्यांना कौतुक असते, लांब राहूनही ज्यांना आपली आठवण असते,   तीच खरी आपली माणसे. आणि जर समोरची व्यक्ती जर तुम्हाला १००% आपले मानत असेल तर आपण निदान ५०% तरी त्या व्यक्तीचा विचार करावा. कारण जेव्हा आपल्याला कुणाबद्दल तरी प्रश्न पडतो कि आपली माणसे आपलीच असतात का तेव्हा हा हि विचार करावा कि आपल्याबद्दल हि कुणीतरी कुठेतरी हा विचार करत असेलच ना.

मला एक नक्की सांगावेसे वाटते मला हि अजून या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे सापडले नाहीये कि आपली माणसे खरेच आपली असतात का? पण मी मनापासून जोडलेली माणसे खरंच माझी आहेत आणि जी मला आपली वाटतात त्यांनी मला आणि मी त्यांना त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारले आहे. 

आणि हो मित्रा  तुझे खूप खूप आभार तुझ्या एका वाक्यावर मला इतके लिहिता आले. माझ्या आपल्या माणसांमध्ये तू हि आहेस बरं का 🙂🙂🙂


Wednesday, 19 September 2018

मिलन- एक अजब रसायन

हा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या मैत्रिणीने (मुक्ता कदम) माझ्यासाठी लिहिलेले ४ शब्द. खऱ्या अर्थाने मैत्रीचे चीज झाले. मुक्ता खूप खूप धन्यवाद. तसेच भूषण तुलाहि.

 
गेले दोन वर्ष मिलन चे बरेच लेख वाचले. तिने लिहिलेले व्यक्ती विशेष तर उत्तमच. जणू काही आपण त्या व्यक्ती ला भेटतोय असे लिखाणातून जाणवते. म्हणून विचार आला कि अशा हरहुन्नरी, सतत सर्वांसाठी २४ * ७ मदत करायला तयार असणाऱ्या मिलन वर  आपण हि दोन चार वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करावा. सध्या माझ्या आयुष्यातली  मैत्रीण, फिलॉसॉफर, गाईड, आणि हो फिनान्शिअल कन्सल्टन्ट म्हटले तरी चालेल अशी एकमेव व्यक्ती ती आहे. तसेच मला अजिबात कंटाळा न करता मेहंदी काढणारी ही फक्त तीच  आहे.
मिलन आमच्या शाळेत दहावीत आली आणि सर्वांमध्ये लगेच मिसळून गेली. लोकांना आपलेसे करायचे कसब आधी पासूनच आहे तिच्याकडे. मला आठवते ती आणि मी  बऱ्याच वेळा मधल्या सुट्टीत शाळेजवळच्या दुकानात पान पसंद च्या गोळ्या खायचो. नंतर कॉलेज , लग्न या काळात भेटी थोड्या कमी झाल्या. २००८ मध्ये आमचे पहिले गेट टू गेदर झाले त्या नंतर आम्ही परत कॉन्टॅक्ट मध्ये आलो.या नवीन भेटीत आधी आम्ही फक्त चॅट फ्रेंड्स होतो. पण लकीली आमच्या ट्रेन हि कधी सारख्या तर कधी मागे पुढे असायच्या. मग ओघाने एकमेकांसाठी थांबणे आले. ट्रेन मध्ये हि आमच्या पैकी एक कोण नसेल तर बाकीच्या बायका विचारायच्या आज दुसरी कुठे?  मिलन ला सगळे माझी वसई वाली मैत्रीण म्हणून ओळखायच्या.  स्टेशन वर उतरलो कि मग विवा जवळ परत गप्पा. त्या कधी संपायच्याच नाहीत. भाजी च्या पिशव्या घेऊन हात दुखले तरी तिथेच उभे असायचो. 
माझी एक्सेल गुरु, ऑनलाईन बँकर हि तीच. माझे गणित एकदम भारी आहे आणि माझ्या आई नंतर ते बहुतेक तिलाच समजले आहे. तिच्या मुळे खरेच बरेच पैसे वाचलेत माझे. मी हिशोबात नेहमी घोळ घालते मी आणि मग मिलन तो निस्तारून देते.  माझे नेट सेट क्लिअर करायला हि तिने खूप मदत केली. माझे परीक्षेचे % नेहमी तीच काढून देते. मला आठवतेय  मी जेव्हा अमेरिकेला गेले होते फिरायला तेव्हा मला सामानाची लिस्ट करून द्यायलाच नाही तर माझी खरेदी , ऑनलाइन रिचार्ज करणे हे सगळे  ती स्वतःहून करत होती. तिच्याशी तिथून स्काईप वर बोलताना मी खूप खुश असायचे. माझ्या घरच्यांना हि आश्चर्य वाटायचे काय इतके बोलते हि मिलन शी.

मिलन च्या मैत्री मध्ये लहान, मोठे, गरीब, श्रीमंत असे भेदभाव कधीच नसतात. अगदी ट्रेन मधले कुणी असो किंवा दुकानातली कुणी सेल्स गर्ल ,किंवा तिच्या  आजूबाजूचे, कुणा  मित्रमैत्रिणीचे पालक असोत, किंवा शाळेतल्या बाई ती सर्वांशी मोकळे पणा ने बोलते. तिच्या या स्वभावामुळे तिने खूप माणसाने जोडली आहेत. पण मला हे खटकते कारण मला वाटते तिने फक्त माझ्याशीच बोलावे ( काय करू स्वभाव आहे माझा तसा ). सगळ्यांना मदत करणे हा तिचा प्लस पॉईंट आहे. कुणी न सांगताच हि नेहमी मदत करायला तयार असते. अर्थात फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत जे तिच्या मदतीची, ती घेते त्या काळजीची जाणीव ठेवतात. आणि असे हि लोक आहेत ज्यांना तिचा हा स्वभाव आवडत नाही. असो पण या सगळ्याचा विचार करेल तर ती मिलन कसली. 
अजून एक तिचा प्लस पॉईंट जाणवला तो म्हणजे तिला जर का एखादे सीक्रेट सांगितले तर ते तिच्याकडे कुलूपबंद होऊन जाते. अशी कित्येकांची कितीतरी सिक्रेट्स तिच्या कडे असतील पण ती त्याचा कधी गैरफायदा घेणार नाही कि कुणाकडे बोलून दाखवणार नाही.

वरून जितकी खंबीर वाटते ना तितकीच ती आतून हळवी आहे. कोणी तिच्याशी बोलले नाही , रागावले तर तिला लगेच वाईट वाटते. विचार करत राहील कि आपले काही चुकले का? तिला किती वेळा सांगितले कि दुसऱ्यांची काळजी करून स्वतःला त्रास करून घेणे   सोडून दे  पण नाही स्वतःला त्रास झाला तरी समोरच्या व्यक्तीला ती दुखावणार नाही. 
 मिलन आणि मंदार नेहमी आमच्या बॅच च्या  गेट टू गेदर साठी प्रयत्न करतात. मला नेहमी वाटायचे मिलन आपल्याला सगळे सागंते म्हणजे तारखा, अरेंजमेंट ,पण तसे नसायचे काही गोष्टी ती मला सगळे ठरल्यावरच सांगते. त्यातूनच मग काही गैरसमज निर्माण झाले होते. पण अशा समज गैरसमजातून च आमची मैत्री वाढत गेली. कित्येकदा तर तिच्यावर रागावून मी तिला ब्लॉक हि केले होते. पण असा एकही दिवस गेला नसेल कि तिचा विचार आला नाही मनात. माझ्या कुटुंबानंतर मला जर कोणी जवळचे असेल तर ती मिलन. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही एकमेकींशी शेअर करतो. 
अर्थात तिला जवळची अशी बरीच माणसे आहेत. 
आता नोकरी सोडल्यापासून मिलन स्वतः साठी जगायला शिकली आहे. स्वतःसाठी वेळ द्यायला लागली आणि त्यातूनच एक लेखिका जन्माला आली. मिलन तुझा हा छंद असाच वाढू दे. सतत काही ना काही काम करत राहणे हे हि आवडते काम आहे तिचे. कधीही  विचारले काय करते आहेस तर ती कधी बोलणार नाही काहीच नाही असे. सतत काहीतरी उद्योग सुरूच. 
जरा दुसऱ्यांचा विचार कमी केलास आणि समोरच्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले (मग ते घरचे असोत कि मित्रमैत्रिणी  )  तर तुझे आयुष्य अजून सुंदर होईल. 
मिलन  नावाप्रमाणे " Bringing Together " या गोष्टीला आपले ब्रीदवाक्य बनवले आहे. 

आम्हा सगळ्यांना जोडून ठेवणारा दुवा आहे ती. 





 

Wednesday, 15 August 2018

( मैत्री बंध ...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स ०७.०८. २०१८ )

 (गवसली नात्यातील मैत्री)

मैत्री म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मित्रमैत्रिणीच येतात. शाळेतले, कॉलेज मधले, ट्रेन मधले आजूबाजूचे सगळेच. पण आपली भावंडे ही आपले पाहिले मित्रमैत्रिण असतात. माझ्यासाठी माझी भावंडे, भाचे भाच्या हे अगदी मित्रा मैत्रिणींसारखेच आहेत. त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाची असूनही त्यांना प्रत्येक पिकनिक ला मी हवीच असते. रक्षाबंधन , भाऊबीज अशा सणांना तर आम्ही भेटतोच पण वर्षातून एकदा आम्ही कुठेतरी पिकनिक ला ही जातो. ज्यावेळी आम्ही एकत्र असतो त्यावेळी अगदी मित्रमैत्रिणी मध्ये चालते तशी थट्टामस्करी चालते. लहान मोठे, आत्यभाचा, भाऊ बहीण ही नाती विसरून फक्त धमाल असते. कुणाचे वाढदिवस असोत, कुणाकडे पूजा, किंवा कुणाचे वाढदिवस असो आम्ही सगळे मिळूनच जातो. सगळे हेवेदावे विसरून आम्ही तो तो दिवस एन्जॉय करतो.

मी मोठी आहे म्हणून माझ्यावर सगळ्यांची जबाबदारी असते. पण मोठी आहे म्हणून माझी मस्करी करायला कुणी मागे नसतं. अशावेळी कोण कुणाचा दादा आणि कोण कुणाची ताई याचे भान नसते. समोरची व्यक्ती ही फक्त आपली दोस्त असल्यासारखे वागतात. आम्ही आमचा व्हाट्सएप ग्रुप ही बनवला आहे "नात्यांची जपणूक". इथे फक्त सगळी यंग ब्रिगेड आहे मी सोडून.
कधी कधी वाद ही होतात, रुसवे फुगवे ही होतात, पण रुसणारि व्यक्ती १० मिनिटांच्या वर रुसून राहू शकत नाही कारण कुणीतरी असे काही बोलून जाते की त्या व्यक्तीला बोलावेच लागते. आणि मग त्या विषयावर अशी काही टिप्पणी होते की हसून हसून डोळ्यात पाणी येते.
जयेश, विकी, निखिल, मिथिल, मिताली, मंथन, ओंकार , आकांक्षा, हर्षु, विद्या, आणि आमचं शेंडेफळ  मयूर अशी आमची ही गँग. आता त्यात अजून एक दोन जण समाविष्ट झाले आहेत. आमची ही नात्याची जपणूक कायम अशीच राहू दे.
कुठल्याही नात्यामध्ये जेव्हा मैत्री होते ना तेव्हा ते नातं जास्त जवळचे होते. सगळे रुसवे फुगवे विसरून वर्षातून एकदा तरी आपण आपल्या नातेवाईकांना घेऊन पिकनिकला जायलाच हवे. कारण याच वेळी आपल्याला प्रत्येक नाते नव्याने गवसते.



Tuesday, 7 August 2018

विंदा


विंदा म्हंटले की एकच वाक्य डोळ्यासमोर येते ते म्हणजे माझी "ती फुलराणी". मी तिला पहिल्यांदा पाहिले  ते शाळेत कुठल्यातरी कार्यक्रमाला ती फुलराणी करताना . तेव्हाच मला ती आवडली होती. गोरा रंग, कुरळे केस दोन वेण्या खूप गोड दिसत होती.  खरंच त्या वेळी तिला पाहिल्यावर "ती पाहताच बाला कलीजा खलास झाला" अशी अवस्था आमच्या शाळेतील बऱ्याच मुलांची झाली असेल  तिला ते सांगण्याची हिंमत मात्र कुणाची झाली होती की नाही माहीत नाही. संगीतामध्ये जशी जोडगोळी असते तशी आमच्या वर्गात होती माधवी आणि विंदा. एकीचे नाव घेतले की आपोआपच दुसरीचे नाव यायचे त्यावेळी.
शाळेत नाही पण कॉलेजमध्ये असताना आमच्या दोघींमध्ये बरेच छोटे छोटे वाद व्हायचे, पण कधी  आम्हाला तिसऱ्या व्यक्ती ची गरज नाही लागली अमच्यात सलोखा घडवायला. आमचे हे लुटुपुटू चे वाद जास्तीत जास्त एक दिवस चालायचे. बहुतेक वेळा हे वाद विंदांच्या उशिरा येण्यावरून व्हायचे.
आमचे कॉलेज वेगवेगळे होते पण क्लास एकच वैद्यांसरांचा. खूप धमाल केली ५ वर्षे. क्लास च्या गॅदरिंग ला आम्ही रुक्मिणी रुक्मिणी गाण्यावर नृत्य केले होते.  विंदांच्या दुसऱ्या घरी आम्ही तालीम करायचो तिथे ही तालीम कमी आणि टाइमपास च जास्त व्हायचा. क्लास मध्ये आमचा एक मित्र होता कविश शाह. पण विंदा ने त्याच्याशी आजपर्यंत मैत्री जपली आहे मस्त, त्यानिमित्ताने आम्हालाही आमच्या जुना मित्र परत सापडला. विंदांच्या घरचे , कॉलेज मधले मित्रमैत्रिणी सगळेच मला ओळखतात. तसेच माझ्या घरचे नातेवाईक ती तुझी गोरी मैत्रीण म्हणून तिला ओळखतात.
कॉलेज ला असताना माझ्या हातात एक अंगठी होती ती विंदा ला खूप आवडायची. एकदा सहज तिने ती घालून पहिली आणि ती तिच्याकडेच राहिली. आमच्या दोघींच्या ही ती गोष्ट लक्षात आली नाही. दुसऱ्या दिवशी क्लास ला आल्या आल्या तिने ती अंगठी माझ्या हातात दिली. घरी तिची आजी तिला खूप ओरडली होती. आणि  विंदांच्या आजीचे रागावणे आम्हाला सगळ्यांना माहीत होते. तिचे आपण ऐकत नाही तोपर्यंत ती आपल्याला बजावत राहणार. आजीचा सगळ्यात जास्त ओरडा कुणी खाल्ला असेल तर ती मी. तरीही तिची आजी जितकी रागावायची तितकी प्रेमळ ही होती. तिच्या तिन्ही नातवंडांवर तिचा खूप जीव होता.
विंदा चा तिच्या अण्णांवर आणि दादावर जास्त प्रेम. तिच्यासाठी तिचा दादा एक चांगला मित्र. पण मला आठवतंय एका व्यक्तीवरून तिच्या दादाने तिच्याशी अबोला धरला होता त्यावेळी झालेली विंदाची तगमग मी खूप जवळून पहिली आहे. त्यावेळी तिने दादा साठी (नक्की आठवत नाहीये) पण एक पत्र किंवा डायरी लिहिली होती. आणि तो अबोला सुटल्यावर तिचा आनंद ही आम्ही अनुभवला आहे.
विंदाने बहुतेक माझ्या घरी पहिल्यांदा नॉन व्हेज खाल्ले होते. ती घरी आली आणि मासे केले असले की ती आवडीने खायची. म्हणजे तिला माझ्या घरी आल्यावर व्हेज नकोच असायचे. माझ्या घरी केलेली मुशी तिच्या खूप आवडीची. कधी ही पोहे न खाणारी मी विंदांच्या हातचे दडपे पोहे आवडीने खायचे. तिच्या हाताच्या त्या पोह्याची चव अजून रेंगाळते आहे जिभेवर. तिच्या हातची फणसाची भाजी ही मस्तच.
आम्ही तेरावीत असताना एका नाटकाच्या ग्रुप मध्ये काम केले होते, तेव्हा आमच्या ग्रुप मध्ये फक्त विंदांच्या एकटीचे नाव पेपरमध्ये आले होते. आम्ही सगळ्यांना तो पेपर दाखवत सुटलो होतो.
अजून एक गोष्ट एखादी चुकीची गोष्ट केलेली पटत नाही ती लगेच समोरच्याची शाळा घेते. आमच्या पिकनिक च्या वेळी त्या रिसॉर्ट ला आलेला  एक अभिनेता आमच्या मुलांवर ओरडला होता तेव्हा तिने त्याचीही शाळा घेतलीं होती.
विंदाची अजून एक सवय होती जी आता आठवली की हसू येते. काही झाले आणि आपण चुकून म्हटले की नाच आता तर ही वेळ काळ स्थळ न पाहता हात हवेत फिरवून नाचायला लागायची. आणि  अय्या!!! किती गोड !! हे बोलायची तिची सवय. त्यावर मी तिला नेहमी म्हणायचे चाटून पाहिलेस का? आणि मग ती जीभ बाहेर काढून दाखवायची.
विंदा दिसायला छान,  हुशार, बोलणे ही लकबी  सगळ्या बाबतीत उजवी पण तरीही आमच्यात कधी द्वेष, मत्सर, चढाओढ नव्हती.उलट एकाचे कौतुक झाले की आम्हाला आनंदच होतो. आजही आम्ही मस्करीत कधीतरी म्हणतो की विंदा असली की मुलांना आम्ही इतर मुली दिसत नाही. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मला कधी कधी एक प्रश्न पडतो कीशाळा कॉलेज मध्ये जिच्याशी इतके वाद घातलेत तीच ही का? आता जेव्हा कधी आम्ही फोनवर बोलतो ( शकतो काही वाईट बातमी असेल किंवा मी चिडून ग्रुप लेफ्ट केला असेल) ती अगदी मोठ्या बहिणी सारखी माझी समजूत घालते. आजही फोन केल्यावर भेटल्यावर आम्ही  आमची बरीच गुपितं एकमेकींना सांगतो. आणि जुन्या आठवणी काढून खूप हसतो.
जास्त कुणाला माहीत नाहीये पण विंदा ने पु ल रंजन नावाच्या नाटकाचे २५ एक प्रयोग केलेत. आणि माझी मनापासून इच्छा आहे की तिने आतापर्यंत गृहिणीची भूमिका अत्यंत छान पार पाडली आहे तर आता तिने एकदा तरी परत रंगभूमीवर यावे. नाटकाच्या बोर्ड वर परत एकदा तिचे नाव पाहायला आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल.
आणि त्यांचे हे व्ही नावाचे चौकोनी कुटुंब असेच खुश राहू दे.

आतापर्यंत तुला ती फुलराणी करून दाखव असे सारखे सांगून मी खूप त्रास दिला त्याबद्दल सॉरी. पण या ब्लॉग चे बक्षीस म्हणून आपण भेटल्यावर तू एकदा नक्कीच करून दाखवशील ना😉😘








Friday, 3 August 2018

मुक्ता

मुक्ता  सध्या माझी थेट  कमी आणि  नेट मैत्रीण जास्त झाली आहे. खरेतर  आमची मैत्री आम्ही दहावीत असताना झाली. दिवसातले कमीत कमी ४ तास आम्ही एकमेकींशी बोलतो , सुट्टीचे आणि काही ठराविक दिवस सोडले तर. आज हि तिला माझे आणि मला तिचे बहुतेक सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग असते. सुरवातीला जरा अंतर ठेवणारी मुक्ता हळू हळू माझ्याशी बोलू लागली. शाळेच्या मधल्या सुट्टीत आम्ही चणे शेंगदाणे खायला बाहेर जायचो आणि पान पसंद नावाच्या गोड पानासारख्या लागणाऱ्या  गोळ्या ही खूप खाल्ल्या. पुढे कॉलेज ला गेल्यावर तिचे आणि आमचे कॉलेज वेगळे होते पण आम्ही एकाच क्लास ला होतो वैद्यसरांच्या . पण वैद्य सरांच्या क्लास च्या जास्त आठवणी नाहीत माझ्याकडे. फक्त एक गोष्ट आठवतेय कि एक राकेश नावाचा मुलगा तिला खूप चिडवायचा उगाचच. आणि हि जास्तच चिडायची मग तो अजून चिडवायचा तिला. मला वाटते एखाद फटका हि खाल्ला असेल त्याने मुक्ताचा . 
हा शाळेत असताना मात्र मला मुक्ताचे घर खूप आवडायचे. कारण आमच्या सगळ्यांची घरे बिल्डिंग मध्ये होती त्यांचा मात्र बंगला होता . त्यामुळे एक वेगळे अप्रूप होते. त्यांच्याकडे एक कुत्रा हि होता मला अजूनही आठवतेय आम्ही कसे लपून छपून जायचो तिच्याकडे. तो भुंकायला लागला कि त्यांना लगेच कळायचे कुणीतरी आले आहे. मुक्ताच्या घरी केलेली आमची "मोरूची मावशी" नाटकाची तालीम मला अजूनही आठवतेय. तालीम कमी आणि खादाड पणा जास्त झाला होता. मस्त भजी करून खाल्ली होती. त्यानंतर हि बऱ्याच वेळा मुक्ताच्या घरी जाणे झाले होते. आईवडिलांशिवाय आपल्या खोलीत बसणे हे मुक्ता कडे शक्य व्हायचे. 
कॉलेज नंतर आमचे भेटणे फार कमी झाले होते. माझ्या लग्नाच्या वेळी, तिच्या लग्नाच्या वेळी असे एक दोनदा भेटलो असू. माझ्या बाळंतपणात भेटायला येणाऱ्या २-३ मैत्रीणमधली मुक्ता एक. त्यानंतर २०१० मध्ये जेव्हा मृणाल च्या निमित्ताने आम्ही भेटलो ते काही बंद झाले नाही .३-४ महिन्यातून एकदा आम्ही भेटतोच.  मध्ये मात्र तिच्या जॉब साठी महत्वाच्या असणाऱ्या नेट सेट च्या परीक्षेत पास होण्यासाठी तिला खूप अभ्यास करावा लागत होता त्यामुळे ती आम्हाला वेळ देऊ शकत नव्हती.  मला खरेच कौतुक आहे तिच्या या मेहनतीचे. तिने सगळे त्याग केले या परीक्षेसाठी. कधी कधी तिला यशाने अगदी १-२ मार्क ने हुलकावणी दिली. पण तिने हार मानली नाही. सतत ७ वर्षे तिने या साठी मेहनत घेतली. त्या सतत च्या येणाऱ्या अपयशामुळे हि कदाचित मध्ये ती खूप चिडचिडी झाली होती. छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायची. घर, नोकरी , अभ्यास या सगळ्यामुळे ती पुरती दमून जायची. अपुरी झोप, प्रवासाचा क्षीण सगळेच. पण यावर्षी मात्र यश तिच्या पदरात पडलेच. तिच्या मेहनतीचं चीज झाले. 
 दोन गोष्टी मुक्ताच्या आवडत्या आहेत एक म्हणजे पावभाजी आणि दुसरे म्हणजे मेहंदी. मेहंदी काढायला ती नेहमी मला गिऱ्हाईक  बनवते. अगदी नाईट आऊट साठी भेटायचे असले तरी हि मेहंदीचे कोण घेऊन येणार. त्यासाठी ती वेस्ट हुन ईस्ट लाही येते. एक आहे आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवायची जिद्द आहे तिच्यात आणि त्यासाठीची मेहनत हि ती करते.  मुक्ताचा नावडता विषय म्हणजे गणित. तिचे गणित पहिले तर समोरचा चक्कर येऊन पडेल. ती कॉमर्स मधून कशी पास झाली हे तिचे गणित पाहिल्यावर सगळ्यांनाच प्रश्न पडेल.
मुक्ताचा जसा राग भारी तसेच भारी तिचे हसणे. अगदी सातमजली गडगडाटी हास्य. तिला नॉर्मल हसता येतच नाही बहुतेक.
जसे आमचे नेट वर रोज बोलणे असते तसे मी विरार ला असताना आम्ही लागोपाठच्या ट्रेन ला असायचो. मग विवा सुपर मार्केट मधले एक दुकान हा आमचा भेटण्याचा अड्डा होता. आमची तासनतास तिथे गप्पा मारायचो. कधी कधी दीपाली, शीतल, रत्ना याही भेटायच्या आम्हाला तिथे. कधी कधी आमच्या शाळेच्या बाई हि भेटायच्या. गमतीने आम्हाला म्हणायच्या हि कि बरे आहे तुमचे इथे हि छोटेसे गेट टू गेदर होते. मजा यायची. कितीही बोललो तरी गप्पा संपायच्या नाहीत. अजूनही संपत नाहीत.
ती चिडली रागावली की खूप वाटायचे की बोलणे बंद करावे की काय तुझ्याशी पण नाही, जर गैरसमज करून मैत्री तोडणे किंवा बोलणे बंद करणे याला मैत्री म्हणत नाहीत. आज ह्या ब्लॉग च्या निमित्ताने तुला सॉरी म्हणते आपले जे काही फोटो पेपर मध्ये आले ते छापणाऱ्याने असे छापले कि तू त्यात नव्हतीस त्या वरून आपण बरेच वाद हि घातले , अगदी अबोला हि धरला. पण तो २-४ दिवसांसाठीच होता. त्यानंतर हि आपण तसेच बोलत राहिलो जसे आधी बोलत होतो.  एक गोष्ट मात्र लक्षात आली कि मी तुझ्याशी आणि तू माझ्याशी बोलल्या शिवाय राहू शकत नाही. आणि एक विनंती आहे जे काही तुझ्या मनात आमच्याविषयी (मी आणि मंदार) विषयी जे काही गैरसमज आहेत ते काढून टाक. आमच्या कडून काही गोष्टी अनावधानाने घडल्या असतील हि पण आम्ही कुठलीच गोष्ट तुला त्रास व्हावा, किंवा तुला टाळावे म्हणून मुद्दाम केली नाही.
खरें तर मी आणि मुक्ता अगदी रोजच बोलतो. ती सगळ्या गोष्टी मला सांगते  आणि मी ही बऱ्याच गोष्टी तिला सांगते  पण आज एक गोष्ट कबूल करते की अजूनही काही अश्या गोष्टी आहेत ज्या मी तिला सांगितल्या नाहीत.
मुक्ताचा  जितका मला राग आला आहे ना तितका माझा तिच्यावर विश्वास हि आहे. तिला सांगितलेली कुठलीही गोष्ट ती दुसऱ्या कुणाला कधीच सांगत नाही. किंवा तिला एखादी आपली गोष्ट माहित आहे म्हणून त्याचा गैरफायदा हि घेत नाही.  तिच्या विषयी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ते म्हणजे तिला माझ्याविषयी असणारी काळजी. मी कुठेही गेले, अगदी ते आमचे गेट टू गेदर असो किंवा मी माझ्या कामासाठी कुठे जाऊ दे. मी सुखरूप पोचल्याचा तिला मेसेज किंवा फोन नाही केला तर ताबडतोब दिलेल्या वेळेत तिचा फोन येतो. मला कधी बरे नसले तरी दिवसातून ३-४ वेळा माझ्या तब्बेतीची चौकशी करायला ती मेसेज नाही तर कॉल करतेच. 
तिच्यामुळे माझ्यात काही चांगले बदल हि घडलेत, मी दारासमोर रोज रांगोळी. काढायला लागले, जमेल तशी चालायला जायला लागले. तिच्यामुळे मी दालखिचडी बनवायला आणि खायला शिकले. त्याआधी मला हा काय प्रकार असतो माहित नव्हते.  आणि एक गोष्ट ती नेहमी मला सांगते की इतरांचा विचार करणे सोडून दे, पण ते काही माझ्याच्याने होत नाही.
खरंतर मुक्ता विषयी कधीपासून लिहायचे होते पण काही कारणे अशी होती की थांबले होते पण आता एक कारण असे घडली की मला खूप इच्छा झाली लिहायची.
मुक्ता तुझ्यामध्ये जो काही आमूलाग्र बदल झालाय ना तो कायम तसाच ठेव. आणि मला खूप छान वाटतं आहे की उशिरा का होईना तूझ्या लक्षात आल्या काही गोष्टी. खरतर हा तुझा १८०  अशांतला बदल आहे तो हळू हळू ३६० होऊ दे. मुक्ता तुझ्यात एक लहान मूलं दडलेले आहे त्याला तसेच ठेव , फक्त त्यामुळे  कुणी दुखावले जाणार नाही याची हि काळजी घे.
आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते कि माझ्या प्रत्येक ब्लॉग ला कंमेंट देणारा जसा भूषण आहे तशीच एक मुक्ता हि. आणि मला खात्री आहे कि तिच्या जवळच्या लोकांमध्ये मैत्रीणमध्ये माझा पहिला नंबर लागतो. हो कि नाही ग ?