Friday, 5 December 2025

शुभेच्छा

 शुभेच्छा


आजकाल या सोशल मीडियामुळे अगदी पेव फुटलं आहे या शुभेच्छांचे. म्हणजे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीला लोक शुभेच्छा  देत असतात.

पूर्वी कसं होतं लोकं दिवाळी, दसरा, नववर्ष, वाढदिवस  लग्नाचा वाढदिवस, तसेच काही ठराविक सणांना आणि ठराविक दिवसांनाच आपण एकमेकांना शुभेच्छा  देत असू. पण हल्ली  या सोशल मीडियामुळे अगदी आठवड्याच्या प्रत्येक दिवसाच्या शुभेच्छा असतात. अगदी रविवार ते शनिवार सगळ्याच दिवसांच्या. एकही दिवस सुट्टी नसते बरं का. 😄😄

मला आतापर्यंत कधीच आठवत नाही कि महिन्याला येणाऱ्या संकष्टी, एकादशी, विनायकी चतुर्थी  सकट अगदी सगळ्या दिवसांच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. पण या दिवसांनाही शुभेच्छा  देण्याचे नवीन काहीतरी लोण आलंय. म्हणजे  त्या दिवसाची संबंधित त्या देवाचा फोटो आणि खाली संकष्टी, एकादशीच्या शुभेच्छा.

मला कळतच नाही की हे कशाला. नुसता फोटो पाठवला तरी भावना पोचतात की.

त्यात अजून धन्य ती माणसे जी लिहितात हॅप्पी अमुक दिवस, हॅप्पी तमुक दिवस. अरे! लिहा की मराठीत... सण आपला ना मग इंग्रजीच्या कुबड्या कशाला? त्याही अर्ध्या.

गंमत अशी असते वाढदिवसाला शुभेच्छा, किंवा इतरही शुभेच्छा देताना लोकं आधीचा मेसेज कॉपी करतात (अगदी भावपूर्ण श्रद्धांजली पण ). म्हणजे हल्ली तर ग्रुप मुळे असं झालं आहे की एकाने मेसेज टाकला, की मनात नसताना ही काहीजण शुभेच्छा देतात, नाईलाज असल्यासारख्या. का तर बाकीचे काय म्हणतील? अशा दिवशी ग्रुप वर कधीही एक शब्द न बोलणारी माणसे ही हजेरी लावतात.

त्यात काही जण त्याबाबतीत ही भेदभाव करतात. म्हणजे एखाद्याला शुभेच्छांचे लांबलचक मेसेज, किंवा भरपूर ईमोजी. आणि एखाद्याला कुणीतरी जबरदस्ती केल्यासारख्या अगदीच आटोपत्या.

हल्ली आपण वाढदिवसाच्या किंवा त्यांच्या स्पेशल दिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या, तर राग धरून राहणारी माणसेही आहे. मला कळत नाही एखाद्या व्यक्तीने शुभेच्छा नाही दिल्या तर आपला तो दिवस जायचा राहतो का? कधी कधी एखाद्या व्यक्तीला आठवण असते,  पण त्या व्यक्तीची त्यावेळची परिस्थिती अशी असते की ती तुम्हांला शुभेच्छा देऊ शकत नाही. असा एक प्रसंग मला आठवतोय, माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून तिने ग्रुप सोडला. कारण काय तर म्हणे ठराविक लोकांच्या मुलांनाच शुभेच्छा देतात. आता जर एखाद्याचा लक्षात राहिला तर देतो, नाही राहिला तर नाही देत. आपल्या मित्र मैत्रिणींनी आपल्या मुलांना शुभेच्छा दिल्या नाहीत तर वाढदिवस आपण करायचा थांबतो का?  मला तर असं वाटतं की, आपल्या जी जवळची माणसं असतात त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असतात. आणि ज्यांना मनापासून शुभेच्छा द्याव्याशा वाटत नाही जे फक्त तोंड देखील शुभेच्छा देतात त्यांनी त्या न दिलेल्या चांगल्या नाहीत का?

कधी कधी असं होतं आपण फोटो बघून त्या व्यक्तीला आपण त्या गोष्टीसाठी मग वाढदिवस असो लग्न असो शुभेच्छा देतो. बऱ्याचदा त्या मनापासून असतात पण काही वेळा नाईलाजास्तव. आता पहिलेच आहे तर न बोलणे चांगले दिसत नाही म्हणून. तर काही इतके चांगले असतात की कुणाचेही चांगले झालेले असले की. तोंडभरून कौतुक करतात. तर काही अगदी माहित असूनही टाळतात.

खरंतर आपण जितक्या लोकांना शुभेच्छा देतो त्यापैकी किती जणांशी आपण मनापासून जोडलेले असतो?  हा खरंच संशोधनाचा विषय आहे. प्रत्येकासाठी वाढदिवसाला मोठे मोठे मेसेज पाठवणारे काहीजण असतात, पण त्यातले किती जण आपल्याला फोन करतात आठवणीने?


मला अशा लोकांचा खूप राग येतो जे वाढदिवसाला फोन केल्यावर म्हणतात सॉरी हा मला तुझा वाढदिवस लक्षात नाही राहिला. बरोबरच आहे आपल्याला काही सगळ्यांचे खास दिवस पाठ नसतात. पण जी माणसे तुमच्या साठी कष्ट घेत आहेत त्यांचे खास दिवस लक्षात ठेवायला काय हरकत आहे? आज सगळे हाताशी तर आहे , मोबाईल मध्ये ही टाकून ठेवता येते की. तुमच्या महत्वाच्या मीटिंग, तुमच्या साहेबांच्या किंवा तुम्हांला उपयोगी (कामासाठी ) पडणाऱ्या लोकांचे ठेवताच ना वाढदिवस किंवा इतर खास दिवस लक्षात? जेव्हा ४ वेळा आपण पुढाकार घेतल्यानंतर ही समोरून काडीचेही प्रयत्न होत नसतील तर आपणही थांबलेलं बरं नाही का?


अगदी रोज गुड मॉर्निंग, गुड नाईट, दररोजचा शुभ दिवसाचा मेसेज पाठविणाऱ्यांपैकी किती जण आपल्याशी वर्षातून एकदा तरी फोनवर बोलतात?
आपली चौकशी करतात? आपल्या सुखदुःखात सहभागी होतात? बहुतेक वेळा असे मेसेज आपण उघडून ही बघत नाही. या फक्त कोरड्या शुभेच्छा कशासाठी?

वाटलंच बोलावेसे तर उचला फोन आणि करा कॉल. समोरच्याशी केलेला पाच मिनिटांचा संवाद त्या व्यक्तीला तुमच्या रोजच्या मेसेज पेक्षा जास्त लक्षात राहील.

एकेमकांच्या संपर्कात राहण्यासाठी या फॉर्वर्डेड मेसेजपेक्षा विचारपूस करण्यासाठी पाठवलेले एक वाक्य जास्त महत्वाचे, आणि जवळचे वाटतं. या कृत्रिम जगातून बाहेर येऊन प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा देण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे..... कारण बोलून दाखवत नसले तरी मायेच्या स्पर्शाची सगळयांनाच उणीव जाणवतेय.

सौ. मिलन राणे - सप्रे 🖋️


Wednesday, 12 November 2025

फुकटच्या सोशल मीडिया पोस्ट

 महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात एक प्रहसन होते श्रद्धांजली ची घाई म्हणून. अतिशय उत्तम प्रहसन.


हल्ली सोशल मीडियाचा सुळसुळाट इतका वाढलाय की लोकं कुठलाही विचार न करता धडाधड पोस्ट टाकत सुटतात.  ती पोस्ट खरी आहे की खोटी आहे याची शहानिशा ही करत नाहीत.

फेसबुकवर, व्हाट्सअपवर काही व्हिडिओ व्हायरल होतात, म्हणजे कुठेतरी जरा पाऊस पडला असेल,  तर त्या पावसाचं रौद्ररूप दाखवणारा एक तरी  व्हिडिओ लगेच सगळीकडे वायरल होतात. तो व्हिडिओ एकतर त्या ठिकाणचा नसतोच किंवा असलाच तरी तो खूप जुना कधीचा तरी असतो. आणि तोच व्हिडिओ आत्ताच असं झालंय म्हणून सगळीकडे पसरवला जातो.

अगदी शिकलेल्या  माणसांनाही पोस्ट टाकायची इतकी घाई असते ना की जराही विचार न करता एखादी पोस्ट टाकतात.  आपण त्यांना दाखवून दिलं की ही पोस्ट आत्ताची नाहीये,  किंवा सांगितले की पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पोस्ट टाकू नको  तरीही ही  माणसं ती पोस्ट डिलीट तर करत नाहीत. वर निर्लज्जपणे अशीच काहीतरी पोस्ट पुन्हा पोस्ट करतात.

तसंच एखाद्या अपघाताची पोस्ट किंवा कुठे मोबाईल फुटून  माणसं जखमी झाल्याची, किंवा मुले चोरीला नेतात  अशा पोस्ट सर्रास आपल्या ग्रुप वर पोस्ट करतात.  अर्थात एखाद्याचा मन असतं  कमकुवत,  सगळेच काही स्ट्रॉंग असतात असं नाही.  त्यामुळे अशा पोस्ट टाकताना आपण थोडासा विचार करायला हवा.

मला आठवतंय आमचा एक सोशल ग्रुप आहे, त्या ग्रुप वर अशीच एका बाईने पोस्ट टाकली होती.  म्हणजे एका आजाराबद्दल अत्यंत चुकीची माहिती होती.  त्या महिलेला सांगितले की ही पोस्ट चुकीची आहे डिलीट करा. तर त्या बाईने ती डिलीट केलीच नाही वर इतका वाद घातला.  ती मान्यच करायला तयार नाही की हे चुकीचं आहे. अशाच बऱ्याच पोस्ट असतात घरगुती उपायांच्या , सगळ्याच चुकीच्या असतात असे नाही पण आपण स्वतः ते केले नाही किंवा कुणी प्रत्यक्षात अनुभव सांगितला नाही तर ती पोस्ट करू नये इतकी साधी विचार शक्ती ही नसते.

तसंच अशा ही पोस्ट असतात,व ज्या पोस्ट असतात कोणाच्यातरी दुसऱ्यांच्या आणि त्या स्वतःच्या नावे खपवल्या जातात.  काही जुन्या लेखकांच्या नावाने ही त्या पोस्ट शेअर केल्या जातात.  म्हणजे काही पोस्ट तर इतक्या खालच्या दर्जाच्या असतात एखाद्या दिग्गज लेखकांनी ते लिहिलं असेल विश्वासच बसत नाही. किंवा लेखक एवढं सुमार दर्जाचा लिहू शकत नाही यावर आपला पूर्ण विश्वास असतो, तरीही काही महाभाग माणसं अशा पोस्ट अगदी राजरोसपणे  सगळीकडे पसरवत सुटतात.

अजून एक प्रकार असतो फ्री गिफ्ट पोस्ट चा. १० जणांना पाठवा मग तुम्हाला हे फ्री मिळेल... काही लोकं बिनदिक्कत सगळ्यांना पाठवतात. अगदी ज्यांच्याशी कधी इतर संवाद नसतो त्यांना ही. हे लक्षातच घेत नाहीत की हल्लीच्या जगात कुणीच काही फुकट देत नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत मोजावीच लागते.

कधी कधी वाटतं की पूर्वीच्या काळात पेपर हे एक माध्यम होते ना तेच बरे होते, म्हणजे पेपरमध्ये बातमी आली की लोकांना कळायचे काय झालंय,कसं झालंय,  कुठे  झालं. हल्ली जरा कुठं खुट्ट झाले तरी ती बातमी अख्ख्या दुनियाभर पसरते. विचारही केला जात नाही की या बातमीने कोणावर काय परिणाम होतील. 

या सोशल मीडियाचे जेवढे चांगले उपयोग आहेत, तेवढेच वाईट.  त्याचा उपयोग कोणी कसा करायचा,  हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. पण तरीही आपल्या पोस्टने कोणाला त्रास होणार नाही किंवा कोणाचं काही नुकसान होणार नाही याची छोटीशी खबरदारी तरी ते पुरेसं आहे.

सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

Saturday, 8 November 2025

दिल से..... ♥️

 


दिलसे...... ♥️

अमोल  मुजुमदार या एका नावाने राजकारणामुळे उपेक्षित राहिलेल्या अनेक  मुलांबद्दल विचार करायला भाग पाडले. नुसतेच खेळात, किंवा मैदानातल्या नाही तर सगळ्याच क्षेत्रातल्या.

याच माणसाने महिला क्रिकेट बद्दल लोकांचं मत बदलायला लावले.  स्त्रिया जग जिंकू शकतात, एकत्र राहू शकतात, एकमेकींना कमीपणा न दाखवता एकजुटीने इतिहास घडवू शकतात हे उदाहरणासकट दाखवून दिले.


काय मिळाले नाही याबद्दल रडत राहण्यापेक्षा, मेहनत करत रहा. आपली  आवड जपत रहा. देव, दैव, आणि तुमची मेहनत कधी ना कधी त्याचे फळ तुम्हांला देतेच, यावर विश्वास ठेवायला आपल्या सगळ्यांनाच भाग पाडले. 

*गुरु*  कसे असावेत यांचे एक उत्तम उदाहरणं म्हणजे अमोल. शिष्यांसोबत त्यांचे स्वप्न जगणारा. आणि मुख्य कसलेही श्रेय स्वतः न लाटणारा. इतक्या सगळ्या कौतुकानंतरही पाय घट्ट जमिनीला रोवून उभा राहणारा माणूस.

*अमोल* नावाप्रमाणे अनमोल कामगिरी करून सगळ्यांची मनं जिंकली. मला *अमोल मुजुमदार* सारखं व्हायचे आहे असे आपण ऐकले तर नवल नाही. आणि नुसतं त्याच्यासारखे होणार त्यापेक्षा त्याने राखलेला संयम आणि सातत्य राखण्याचा प्रयत्न केला तरी भरून पावलं.


आज जितका आभिमान आणि गर्व आपल्याला आपल्या भारतीय महिला संघाचा वाटतोय. त्यापेक्षा कदाचित काकणभर जास्त  आपल्याला *अमोल मुजुमदार* या नावाचा वाटतोय.

आणि बऱ्याच गोष्टीत आपल्या विचारांची दिशा बदलणारा हा विजय अनेक पिढ्याना कायम लक्षात राहील.

सौ. मिलन राणे - सप्रे 🖋️



Sunday, 5 October 2025

माझी हक्काची गॅलरी

 आजच्या पुणे टाइम्स (महाराष्ट्र टाईम्स) मध्ये आलेला माझा लेख. इतके भारी वाटतेय♥️ (८ डिसेंबर २०२४)


लहानपणापासूनचं  स्वप्न स्वतःचं  एक छोटसं घर असावं, स्वकष्टाच्या कामाईने घेतलेलं. आणि  घराला एखादी छोटीशी बाल्कनी असावी.    पिरंगुट पुणे येथे घेतलेल्या फ्लॅटमुळे  माझी दोन्ही  स्वप्न पूर्ण झाली, मुख्य म्हणजे छोटयाशा बाल्कनीचे.


पिरंगुट च्या घरी गेल्यावर, दिवसातला माझा बराचसा वेळ बाल्कनीतच घालवते मी.  अगदी सकाळी उठल्यापासून , रात्रीचा मिट्ट काळोख होईपर्यंत. या पूर्ण दिनचक्रात निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा तिकडे अनुभवता येतात.


समोर छानसा , छोटासा डोंगर , वर मोकळं  आकाश, आणि खाली नागमोडी , वळणावळणाचा घाट रस्ता असे विहंगम दृश्य. 


त्या डोंगरा आडून हळूहळू होणारा सूर्योदय. सूर्य उगवायचा आधी आकाशात दिसणाऱ्या त्या गुलाबी, तांबड्या, सोनेरी छटा.  एकदा का सूर्यदेव डोक्यावर आले  की अंग भाजणरं ऊन.  अंधारात चंद्रोदय व्हायच्या आधी डोंगराच्या कडेवर दिसणारी ती सुंदर रुपेरी छटा. मग एकामागून एक डोकावणाऱ्या  एक एक तारका. आणि त्यामागून येणारा तो चांदोमामा. काळ्यामिट्ट आभाळात चंदेरी प्रकाश.


पावसाळ्यात तर निसर्गाच्या रूपाने डोळ्याचं पारणे फिटते. समोर हिरव्यागार झाडांची शाल पांघरलेला डोंगर, भरून आलेलं आभाळ , भुरुभुरु पडणार पाऊस आणि त्या डोंगरातून वाहणारे छोटे छोटे झरे. घाटरस्त्यावर दूरपर्यंत दिसणारा तो पाऊस. थंडीत, पावसाळ्यात धुक्याची चादर पांघरलेला तो रस्ता आणि डोगर. त्या चदारीतून डोकावणारी हिरवीगार झाडे.


गॅलरीत खुर्ची टाकून बसले की रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नुसत्या गाड्या बघत बसले तरी वेळ निघून जातो. लहानपणी रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या मोजायची एक गंमत होती ती ही अनुभवता येते इथे. रात्रीच्या वेळी रहदारी कमी झाली की शांत निवांत रस्ता आणि पाहायचा.  घाटातून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचे लाईट बघताना ही मजा येते. रांगेत दिसणारे ते एकीकडे लाल आणि दुसरीकडे पांढऱ्या रंगाचे प्रकाश. नागमोडी जाणाऱ्या गाड्या. 


दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी अगदी ओळीने दिवे लावून., आवडती ठिपक्यांची रांगोळी काढून मनाप्रमाणे गॅलरी सजवता आली.


आमच्यासाठी एक हक्काचा सेल्फी पॉईंट झाला आहे तो. निरभ्र आकाश असो की भरून आलेलं आभाळ दरवेळी फोटोसाठी एक नवीन बॅकग्राऊंड मिळते.


काहीच न करता अगदी पायावर पाय टाकून नुसते सुस्त, निवांत पडून राहायचे. धकाधकीच्या जीवनातून तेवढाच आराम.  लिखाणासाठी  अगदी उत्तम जागा.


अगदी समोरसमोर घरे असणाऱ्या मुंबईत अर्धे आयुष्य घालवताना कधी  वाटलं नव्हतं की स्वतःच्या घराच्या बाल्कनीतून असा सूर्योदय, निसर्ग  पाहायला मिळेल.   पण कधी कधी स्वप्न सत्यात उतरतात. फक्त जिद्द, चिकाटी, मेहनत आणि स्वतःवर विश्वास हवा.


मी  जर चित्रकार असते कितीतरी चित्रांना जन्म देता आला असता. पण चित्रकार नसले लिखाण करते एखादी कविता मात्र तिथे सुचून गेलीये


माझी सगळ्यात आवडती जागा, आवडता कप आणि आपल्या सर्वांचे आवडते पेय....चहा आणि काळ्या मेघांनी भरून आलेलं आभाळ. असे असताना काही सुचलं नाही तर नवलच . त्या वेळी सुचलेल्या दोन ओळी.


माझ्या मनासारखे 

भरून आलेलं आभाळ

आपल्या प्रेमसारखा 

बहरलेला हिरवागार डोंगर

रिमझिम बरसणाऱ्या

पावसाचे गार गार तुषार

हातात  तुझ्या आठवणींनीनी 

रंगवलेला सुंदरसा प्याला

त्यात तुझ्या स्वभावासारखा

कडक तरीही गोड चहा

कमी आहे ती

फक्त प्रत्यक्ष सोबतीची.........♥️


झुंजूमंजू पहाट,

शांत निवांत वाट,

वाफाळत्या चहा सोबत,

गोड मैत्रीची सुरवात❤️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️





नवरात्रीच्या नऊ माळा

 या नवरात्री च्या निमित्ताने दहा दिवसांच्या दहा माळा, प्रत्येक दिवसाची माळ स्त्री मधल्या नात्यांना वाहिलेली.


एक प्रयत्न🙏🏻


आज माळ ती पहिली, केली अर्पण चरणी,

आपले आयुष्य आहे, कायमच  जिचे ऋणी, 

जन्मदात्री ती आपुली, जिने कळ ती सोसली,

आई संबोधती जिला, प्रत्येकाला ती लाभली.


आज माळ ती दुसरी, त्या माउलीला वाहिली,

जिचे प्रेम, लाड, माया, कधी नाही हो आटली.

माय बापा दिला जन्म, केले जीवन सार्थक,

आजी हाक मारू तिला, तिचे थांबेना कौतुक.


 आज माळ ती तिसरी, त्या मातेला वाहिली,

जिच्या मायेची ऊब, सदा सासरी लाभली,

जिच्यामुळे हे  सौभाग्य, पदरी  आपुल्या आले ,

लेक सुनेमध्ये  पाही,  तिज  *सासू* संबोधले.


आज माळ ती चौथी, त्या बाळाला वाहिली,

जिच्या पावलांनी दारीं, जणू लक्ष्मी अवतरली,

जिच्या येण्याने लागे,  स्त्रीस मातृत्वाची चाहूल,

रूप कन्येचे  देखणे, केले  आपणांसी बहाल.


 आज माळ ती पाचवी , करू अर्पण दोघीना, 

माता पित्यांच्या लाडक्या, दोन बहिणींना, 

एक आईची सावली, माय मावशी  लाडाची,

दुजी बापाची लाडकी, आत्या ती शिस्तीची. 


आज माळ ती सहावी, दोन संख्याना वाहिली, 

एक जन्माने लाभली,  दुजी मनाने जोडली,

एक माहेरची ओढ, बहिणी जिवाभावाच्या

दुजे सासरचे देणे, नणंदा त्या कौतुकाच्या


आज माळ ती सातवी , अर्पण दोघीना, 

मायच्या सासर माहेरच्या , दोन सुनांना, 

आजोळचे सुख , मामी म्हणू तिजला ,

हक्काने  आपण, लाड सांगू काकूला.


आज माळ ती आठवी , वाहिली दोघीना, 

आपुल्या सासर माहेरच्या , दोन वाहिन्यांना ,

एक भावाची भार्या, भावजय म्हणू तिला,

दुजी दिरांची पत्नी, मान देऊ जावेला.


आज माळ ती नववी, करू  अर्पण सख्यांना,

आयुष्यात महत्त्वाच्या, अशा साऱ्या मैत्रिणींना,

बालपण ते वृद्धापकाळ, लाभे यांचा सदा संग,

यांच्यामुळे जणू आले, आयुष्यात निरनिराळे रंग.


आज माळ ती दहावी, करू अर्पण स्वतःला,

रूप सगळ्यांचे घेऊन, सदा  तत्पर कार्याला, 

रूप कन्येचे घेऊन, करी सांभाळ माहेराचा,

रूप घेता पत्नीचे, तोल संभाळी सासरचा,

होऊनी कर्तव्यदक्ष, दिला न्याय हर रुपाला, 

करू वंदन आज, आपुल्याच नारी शक्तीला.


सौ. मिलन राणे सप्रे🖋️

Tuesday, 1 July 2025

हरवलेल्या मी चे सापडलेल्या स्वतःला पत्र


प्रति,

माझी प्रिय 

हरवलेली मी ,


खरंतर तुला हे पत्र लिहायची गरजच नाही असे तुला ही एक क्षण वाटून जाईल.....पण बरंच काही आहे जे सांगायचे राहून गेलेय.  स्वतःच स्वतःला काय ते पत्र लिहायचं? पण मोकळं होण्यासाठी पत्र यापेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही.


कुठून सुरवात करू कळतच नाहीये, कारण सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जसं सुचेल, आठवेल तसं लिहिते.


जेव्हा पासून कळायला लागलं , तेव्हा पहिली जाण झाली ती परिस्थिती ची. परिस्थिती नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या इच्छा मारून जगत राहिलीस. कधी कसली मागणी नाही की कसला हट्ट नाही. दिवाळीच्या वेळी एक नवीन ड्रेस असायचा, बाकी वर्षभर कुणाचे ना कुणाचे कपडे घालून समाधान मानलेस. सगळंच कुणाचे न कुणाचं जुने वापरले. कधीतरी एखादं वर्षी नविन पुस्तकं, नवीन दप्तर मिळायचे. त्यावेळीचा आनंद चेहऱ्यावर दिसायचा.


मुलगी असून नट्टापट्टा केला नाही. चापून चोपून बांधलेले केस. कपाळावर टिकली ती ही लालच , त्याखाली देवाचे कुंकू अशीच राहिलीस कायम. कधीतरी न्हाऊन आल्यावर हळूच आरश्यात डोकवायचीस पण ते ही चोरून. मोकळ्या केसांत स्वतःला न्याहाळायचे  सुख ही मनसोक्तपणे घेतलं नाहीस.


घरातील वातावरण पहिल्यापासून  कडक शिस्तीचे असल्यामुळे मुलांशी बोलायची चोरी. शाळेत काय किंवा कॉलेज मध्ये काय  कधी मुलांशी मैत्री नाही. आजूबाजूच्या मुली  जेव्हा बिनदिक्कत मुलांसोबत बोलायच्या,  हसायच्या तेव्हा कधी कधी त्यांचा हेवा वाटायचा.  कॉलेजमध्ये गेल्यावर प्रत्येकाचा छोटासा तरी ग्रुप होता.  त्या ग्रुपमध्ये तरी मुलगा असायचा,  पण आपल्या ग्रुपमध्ये मात्र चार मुलीच.  कधी हिम्मत झाली नाही कुठल्याही मुलाशी स्वतःहून बोलायला जायची.  खूप वाटायचं, पण त्या वाटण्यापेक्षा मनात असलेली भीती जास्त होती त्यामुळे तसं पाऊल त्या दिशेने कधी गेलेच नाही.


त्यादिवशी आपल्याच जवळच्या नातेवाईकाने केलेला तो किळसवाणा स्पर्श, जोरात ओरडून त्या काकांच्या श्रीमुखात लगावायची होती , पण गप्प राहून ते सहन केले चूकच झाली. त्यानंतर तसे घडणार नाही म्हणून स्वतःला सांभाळत राहिलीस. घरची गोष्ट म्हणून अगदी जवळच्या मैत्रिणीला ही कळू दिलं नाही.


बोहल्यावर चढताना मनातल्या राजकुमाराची  प्रतिमा बाजूला ठेवून आईबाबांनी ठरवून दिलेल्या मुलाशी लग्न केलेस.   मनात बरीच सुखी संसाराची स्वप्न घेऊन. सुरुवातीचे काही दिवस नव्याची नवलाई म्हणून अगदी आनंदात गेले पण हळूहळू एक एक करून सगळी स्वप्नं खोटी ठरू लागली. इथेही परिस्थिती सारखीच हे कळायला लागलं. सगळीच स्वप्नं खरी व्हावीत असा अट्टाहास नव्हताच पण संसाराच्या सगळ्याच संकल्पना खोट्या ठरत गेल्या.


पहिल्या गरोदरपणात कौतुक झाले, पण पहिली मुलगी झाली आणि ते कौतुक टोमण्यात बदललं. पण तरीही आपल्याला लागलेली झळ मुलीला लागू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. दुसरा मुलगा झाला आणि सगळ्यांचा रोष कमी झाला. पण तुझ्या मनावरची जखम कायम राहिली.


तू सतत मुलांच्या सुखामध्ये स्वतःचे सुख शोधत राहिलीस. मुलीला बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिले. वेळेला तिच्या मागे उभी राहिलीस. मुलांना काही कमी पडू दिले नाहीस. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून , स्वतःचा व्यवसाय केलास. पैसे साठवून ते मुलांसाठी खर्च केलेस. नंतर कधीतरी उपयोगी पडतील म्हणून स्वतःसाठी कधीच खर्च केले नाहीस.


मुलं शिकली, बाहेर गेली आणि  नोकरीला लागली. मुलांची लग्न ही झाली. मुलाने वेगळं घर घेतलं पण नवऱ्याच्या हट्टापायी तू जुन्या घरात त्याच्यासोबत राहिलीस. त्याने ही पहिल्यापासून तुझा विचार केला नाही. कधी बसून चार शब्द गोड बोलला नाही. तुला काय कळतेय? याच नजरेनं सतत पाहिले गेले तुझ्याकडे. पण तरीही तू तुझी एकनिष्ठाता सोडली नाहीस. अगदी मन लावून प्रामाणिक पत्नीची भूमिका पार पाडलीस.


स्वतः सगळीकडे जायचा पण तुला मात्र बंधनं घातली. नातेवाईक, घरातले सण समारंभ, कार्यक्रम यात सहभागी होणे हे तुझ्या वाट्याला होते. कधी कधी ईच्छा नसताना त्या गोष्टी इमानेइतबारे केल्यास. कधी मित्रमैत्रिणींची भेट घ्यायची झाली की मात्र तुला वेळ काढता आला नाही. स्वतःच्या मौजमजेसाठी तू वेळ काढला नाहीस. आणि तुला ही मित्रमैत्रिणींची गरज आहे, याची जाणीव कधी कुणाला झाली नाही. अगदी तुझ्या मुलांना सुद्धा. ते ही दर वेळी तुला गृहीत धरत आले.


आतपर्यंत सगळं आयुष्य दुसऱ्यांची सेवा करण्यात, बाकीच्यांचे नखरे सांभाळण्यात गेलं. कधी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा यांना महत्व दिलंस नाही.  अगदी खाण्यापिण्याच्या बाबतीतही समोरच्या व्यक्तीचा विचार केलास.  अगदीच कधी काही पदार्थ खावासा वाटला तरी तो दुसऱ्या कुणाला तरी हवा असेपर्यंत वाट पाहिली. मनातली ही साधी इच्छा ही कधी बोलून दाखवली नाहीस.


आता आयुष्याच्या या टप्प्यावर खरंच तुला सांगावेसे वाटतंय की आता तरी वेळ घालवू नको, सगळ्या जबाबदाऱ्या झाल्या निभावून,  आता तरी स्वतः कडे लक्ष दे. जिथं मनापासून वाटतं तिथे व्यक्त हो. दिवसांतून एकदा तरी वेळ काढून आरशात बघ. कधीतरी स्वतःसाठी तयार होऊन बघ. कुणाची परवानगी न घेता जरा बाहेर फिरून येत जा.  कुणाचीही तमा , लाज न बाळगता मस्त रस्त्याच्या कडेला असणाऱ्या त्या भेळपुरी वाल्याकडे पाणीपुरी खा. खूप वर्षांपासून होतं ना मनात! बाजारात जाता येता किती तरी वेळा तिथे वळणारे पाय मुश्किलीने थांबवलेस. 


साठवलेले पैसे आता तरी स्वतःवर खर्च कर. छान छान कपडे घाल. पंजाबी ड्रेस आवडतो ना घालायला, पण घरात परवानगी नाही म्हणून साडीच नेसत आलीस. एखादा ड्रेस घालून तरी बघ. जगाला दाखवायला नाही पण आरशात  पाहताना स्वतःला पंजाबी ड्रेस मध्ये  पहायची नुसती कल्पना करत राहिलीस, ते प्रत्यक्षात पाहून घे.


मित्रमैत्रिणींना भेट. त्यांच्या सोबत वेळ घालव. एकदा मनसोक्त, मनमुराद , खळखळून हसून घे. गालातल्या गालात दाबून ठेवलेलं ते हसू बाहेर पडू दे. वाटलंच तर मोठ्यांदा रडूनही घे. पदराने गुपचूप पुसल्या अश्रूंना मोकळी वाट करून दे.


आतापर्यंत दुरून पाहिलेल्या त्या लोभसवाण्या पावसात भिजून घे. चिंब चिंब भिजून , त्या पाण्यात उडी मारून घे. कित्येक वर्षे मनातल्या मनात भिजत राहिलीस दुःखाने, आतातरी या आनंदात भिजण्याचा प्रयत्न तरी कर. जमेल न जमेल  ते पुढचं पुढे. धावता नाही आलें तरी चालेल पण निदान चालायचा प्रयत्न कर. कुणाचाही हात न धरता.


आज या पत्राच्या निमित्ताने हरवलेली मी , मलाच सापडले. खूप हलकं हलकं वाटतेय. अगदी हवेत उडणाऱ्या त्या पांढऱ्याशुभ्र पिसासारखे. नेहमीच त्याच्यासारखे होण्याची इच्छा होती ना तुझी. 


खरंच आधी का नाही सुचलं हे?  मग हे असे सांगायचं राहून नसते गेलं ना! पण यानंतर नक्कीच जेव्हा जेव्हा काही सांगावेसे वाटेल तेव्हा असेच पत्र लिहीन. तोपर्यंत सांगितलेलं लक्षात ठेव, आणि अंमलात ही आण.

आणि हो काळजी घे. आणि मस्त हसत रहा.


प्रेषक,

तुझीच लाडकी

सापडलेली स्वतः♥️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

Wednesday, 19 February 2025

पत्र - एक गोड आठवण


पत्र खरंच आता हा शब्दच खरं तर आता आऊट डेट झाला आहे, कारण आता आपण सगळीकडे एक तर मेल करतो किंवा लेटर देतो पत्र देतच  नाही . आणि हल्ली माणसांना तसा खास पत्र लिहिण्याचा  प्रसंग येतच नाही.  अगदी आपल्या जवळच्या माणसांना ही  आपण पत्र लिहित नाही. हल्ली या सोशल मीडियाच्या जगात लिहायची सवय ही मोडली. आणि कुणाला आता  एवढा वेळ ही नाही की  कुणी कुणासाठी पत्र लिहिण्याचे कष्ट घेईल.  या सोशल मीडियामुळे जग किती जवळ आलं असलं तरी मनाने मनाने मात्र आपण सगळेजण एकमेकांपासून दुरावत आहोत. 

थोडा ट्रॅक बदलला पण मूळ मुद्दा की हल्लीं पत्र कुठंही लिहिलं जात नाही पूर्वीसारखे.

आपल्या हृदयाला एखाद्याने अगदी चार ओळींचं  पत्र लिहिलं तरी त्या व्यक्तीच्या मनातील भावना आपल्या पर्यंत जशाच्या तशा पोहोचतात.  एखादे पत्र ते  वाचताना त्या व्यक्तीचा आवाज हळूहळू आपल्या कानात घुमायला  लागतो,  ते अक्षर पाहताना त्या व्यक्तीचा चेहरा त्या पत्रात आपल्याला दिसायला  लागतो, त्या व्यक्तीचे हावभाव आपल्याला  जाणवायला लागतात, जणू काही ती व्यक्तीच आपल्यासमोर येऊन व्यक्त होतेय. आपसूकच त्या व्यक्तीच्या भावभावना आपल्या हृदयाला भिडतात.

हल्ली आपला  कोणाशी वाद झाला, कुणाशी भांडण झालं की हे भले भले भले मेसेजेस व्हाट्सअप वर आपण   लिहून पाठवतो.  पण त्यातनं त्या भावना तितक्या प्रभावीपणे व्यक्त होत नाहीत.  त्यातून हल्ली  भरीस भर काय तर त्या शब्दांची जागा ही  आता इमोजींनी घेतली आहे त्यामुळे तर आपल्या भावना व्यक्त करणे हे अगदीच सोपे झाले आहे.  पण त्या समोरच्याला कितपत पोचतात हे सांगणं मात्र कठीण. 

पण काही म्हणा हे असे  मेसेजेस चे उतारेच्या उतारे लिहून पाठवले तरी ते भावनाहीन वाटतात.  ते वाचलेलं काही तसे प्रभावीपणे लक्षातच राहत नाही. पण तेच आपल्याला लिहिलेलं एक छोटसं पत्र सुद्धा आपल्याला कायम लक्षात राहतं.

अजून एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तार. एका ओळीत खुशाली किंवा दुःखद बातमी दोन्ही कळायचे. तार आली म्हणजे वाईटच बातमी असे काहीसे समीकरण होते. त्यामुळे तार आली की आधी पोटात गोळाच यायचा.  तार वाचणाऱ्याच्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणारी मंडळी त्या तार वाचणाऱ्या माणसांकडे आशेने पहायची. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून प्रयत्न करायचे समजण्याचा की बातमी वाईट आहे की चांगली.

नोकरीचे अर्ज असोत, की  कुठले सरकारी कामें असो तेव्हा पत्रांशिवाय पर्याय नव्हता.  पूर्वी कुणी बाळंत झालं,  कुणी एखादी परीक्षा पास झालं, कुणाला नोकरी लागली असे काही  पत्र  आले की घरात अगदी आनंदी आनंद असायचा. ते पत्र सगळ्यांना दाखविलं जायचे अगदी पेढे वाटले जायचे.  घरात ज्याला लिहिता वाचता यायचं त्यांच्यावर पत्र सगळ्यांना वाचून दाखवायची  जबाबदारी असायची. गावाकडची माणसं शहरात खुशालीचे पत्र पाठवायचे किंवा शहरातून गावाकडे तेव्हा तो आनंद  आणि दुराव्याचे  दुःख असे मिश्र अश्रू ते पत्र   व्यक्तीच्या डोळ्यातून वाहायचे.

 आमच्या वेळी  पेन फ्रेंड म्हणून एक संकल्पना होती. ते  नक्की काय होतं ते मला माहित नाही कारण मी ते कधी अनुभवलं नाही.  पण आपल्या परदेशात राहणाऱ्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला पत्र लिहायचे. आपण कुणाला तरी अंतर्देशीय पत्र लिहितोय  किंवा आपल्याला कुणीतरी अंतर्देशीय पत्र पाठवतेय हेच खूप भारी होते.

पूर्वी तारेप्रमाणे अजून एक गोष्ट होती , ती म्हणजे ज मनी ऑर्डर.   शहरात कमावत असलेला मुलगा / मुलगी , आई-वडिलांना गावी पैसे पाठवायचे किंवा दुसऱ्या गावात शिकत असलेल्या मुलामुलींना त्यांच्या घरून पैसे पाठवले जायचे.  मनी ऑर्डर सोबत दोन ओळींमध्ये खुशालीही कळवली जायची.  त्या मनीऑर्डर चे पैसे घेताना त्या पैशाला झालेला आपल्या माणसांचा स्पर्श तोही जाणवायचा.  आता नेट बँकिंग सारख्या सुविधांमुळे मनी ऑर्डर ही विस्मृतीत जात आहे.

दोन मित्रमैत्रिणीं मधील संवाद असो,  माहेरवाशीणीचे  माहेराला पत्र असो किंवा तिच्या माहेरहून आलेलं पत्र असो, किंवा दूरदेशी राहणाऱ्या कुणाचे किंवा आपल्या एखाद्या सीमेवरच्या जवानांचे  पत्र असो ,  ते पत्र पाठवण्यात आणि त्या पत्राचे  उत्तर येण्याची वाट बघण्यात एक वेगळीच मजा होती, एक प्रकारची हुरहूर होती. जणू आपलं घरच त्यांच्यापाशी त्या पत्राच्या रुपात पोहोचत होते. 

आता मेसेज सेंड केला की तो डिलिव्हर होतो, वाचला जातो. किती पटापट सगळं.   तो वाचला की नाही हे कळू नये म्हणून हल्ली ब्लू टिक ही ऑफ ठेवतात , त्यामुळे  त्या सगळ्या वाट बघण्याची आणि एकंदरीतच त्या देवाणघेवाणीची गंमतच निघून गेली आहे.

या सगळ्या पत्रांमध्ये एका पत्राची फार गंमत होती ते पत्र प्रियकराने प्रेयसीला लिहिलेलं किंवा प्रेयसीने प्रियकरायला सगळ्यांपासून लपवून लिहिलेलं प्रेम पत्र. अर्थात त्या त्या पिढीचं  ते लव लेटर. प्रत्येकाने हा प्रयत्न एकदा तर नक्कीच केला असेल. तर कितीतरी प्रेमपत्र अजूनही तशीच कुठेतरी लपवलेली ही असतील. 

या पत्रांनी आपल्या मराठी,  हिंदी  सिनेसृष्टीत कितीतरी  प्रसंग आणि कितीतरी अजरामर गाणी दिली आहेत.  हल्ली परदेशी असलेल्या मुलांशी आपण व्हिडिओ कॉल वर कधीही बोलू शकतो (फक्त वेळेचे बंधन पाळून).  पण आजही चिट्ठी आई हैं हे गाणं ऐकताना सगळ्यांचे डोळे भरून येतात.  तसंच बॉर्डर सिनेमातलं संदेसे आते हैं गाणं ऐकताना आपल्या सैनिकांचे दुःख हृदयाला भिडून जाते. डोळ्यासमोर साहजिकच ती सगळी माणसे तरळून जातात.

पूर्वी शाळेत परीक्षेला पत्र लेखन असा खास प्रश्न असायचा. त्याचे विषय ही किती छान असायचे सुट्टीत मामाच्या गावी जाऊन केलेली धमाल मित्र किंवा मैत्रिणीला पत्राने कळवा. मुख्यध्यपकांना पत्र लिहा. हॉस्टेल मध्ये असलेल्या आपल्या भावंडाना पत्र लिहा. मार्क तर मिळायचेच पण ते लिहायला वेगळी मज्जा ही यायची. 

प्रत्येकाला पत्र लिहिताना करायची सुरवात आणि शेवट याचे काही नियम असतात. तीर्थरूप, स.न. वि. वि, माननीय, आदरणीय असे.....तर शेवटी आपला लाडका/ लाडकी, आपले कृपाभिलाशी असे कितीतरी शब्द. आता dear आणि yours लिहिलं की झाले.

मला अजूनही आठवतंय मी जेव्हा माझ्या आई-बाबांकडे राहायला गेले,   त्यावेळेला मी माझ्या आजोबांना  एका पोस्ट कार्डवर पत्र लिहून पाठवलं होतं. तेव्हा त्यांना इतका आनंद झाला होता की माळ्यावरच्या सगळ्यांना त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं होतं.  अर्थात त्या काळात लँडलाईन होते , शेजारी कोणाकडे तरी असं... पण त्या पत्राची गंमत काही वेगळीच.

आपल्याला कुणी पत्र पाठवणार नाही माहीत असताना, त्या पोस्टमन काकांच्या घंटीचा आवाज आला की लगेच त्यांच्या मागे धावायचे. कुणा कुणाचं पत्र आलेय ते पहायचे. आणि ज्याचे असेल त्याला जोरात ओरडून सांगायचे. आणि आपल्याच घरात पत्र आलेलं असलं की हर्षवायूच व्हायचा 

आमच्या लहानपणी आम्ही एक खेळ ही खेळायचो "आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आता मुळात आईची मम्मी किंवा मॉम झाली आणि पत्र तर गायबच झालं आहे त्यामुळे आता तो खेळही गेला काळाच्या पडद्याआड.

आता अंतर्देशीय पत्र, पोस्ट कार्ड, पोस्ट पाकीट हे फक्त ऐकायला मिळतं,  तेही फार कमीच.  हा पण तुम्ही गुगल केलं की त्याच्या इमेजेस मात्र आपल्याल दिसतात. 

या पत्राबरोबर खरं तर खाकी  गणवेशातले  ते पोस्टमन काका,   लाल काळ्या रंगांच्या त्या पोस्टाच्या पेट्या, ती सायकल ची घंटी , गुडूप अंधारातले  पोट ऑफिस हे सुद्धा काळाच्या पडद्याआड गेले.

आज अशा कितीतरी गोष्टी आहेत की या पत्रलेखनाच्या मागे पडण्याने आपण अनुभवू शकत नाही.

चला तर मग जर तुम्ही हा ब्लॉग वाचला असेल, आणि तुम्हांला तो आवडला असेल  तर तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहून द्या आणि  बघा त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि जमल्यास ती आम्हालाही कळवा आमच्या ब्लॉगवर कंमेंट करून.

सौ. मिलन राणे - सप्रे🖋️