Friday, 9 October 2020

चित्रे काका आणि जो अंकल (काही आठवणी चेंबूरच्या)



रूम नंबर. ९९७ , बिल्डींग नो.२८, श्री गुरुदत्त को ऑप हौ सो , टिळकनगर, चेंबूर हा पत्ता अजून जसाच्या तास पाठ आहे, आता तिथे राहत नसलेल्या प्रत्येकाला पाठ असेल. आमचं बालपण जिथे गेले ती वास्तू. खूप आठवणी आहेत त्या बिल्डींगच्या. आमची बिल्डिंग नंबर २८ म्हणजे ३६ बिऱ्हाडांचे एक छोटे कुटुंब.

त्यातल्याच काही लोकांशी निगडित आठवणी मी एक एक करून उलगडणार आहे. 


आज भेटूया त्यातल्या दोन व्यक्तींना ज्या मला नेहमीच आदरस्थानी राहिल्या. एक थोड्या धाकामुळे तर दुसरी व्यक्ती त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे. खरे तर दोघांमध्ये तसे साम्य काहीच नाही. हा एकच साम्य दोघे ही बाहेर उभे राहून सिगारेट ओढत. 


त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे मधुसूदन चित्रे उर्फ चित्रे काका उर्फ आमचे दादा आणि दुसरे जोसेफ डिसिल्वा म्हणजे आमचे जो अंकल.


आधी आपण चित्रे काकांविषयी बोलू. अतिशय शांत (म्हणजे मला तसेच आठवतात). अगदी गोरेपान, उंच आणि दिसायला छान. त्यांना पाहिले की  बऱ्याचवेळा हिंदी सिनेमातल्या खलनायक ( ते त्याच्या अगदी उलट होते ) साकारणाऱ्या अजित यांची आठवण यायची . पांढरा शुभ्र लेंगा आणि बनियन असे घरात आणि बाहेर जाताना लाईट रंगाचे शर्ट असा त्यांचा पेहेराव असे. दादा म्हणजे कमी बोलणारे तरी दिलखुलास व्यक्तिमत्व. मला पुसटसे आठवतेय ते कधीतरी आम्हाला नकला ही करून दाखवायचे. एकावेळी तीन चेंडू हातात घेऊन ते उडवून पकडायचा जो खेळ असतो तो हि प्रत्यक्षात  दादांकडून पाहायला मिळाला होता.


बरेच वर्षे दादा आमच्या बिल्डिंग नं २८ चे सेक्रेटरी होते. मीटिंग च्या वेळीच काय ते मी दादांना रागावलेले पाहिले असेल ते ही तेवढ्याच वेळा पुरता. इतर वेळी कधी दादांना रागावलेले मी कधी पाहिलेले मला तरी आठवत नाही.  आणि त्यांच्या मुलींतर इतक्या गुणी की त्यांना रागावायचा प्रश्नच नाही😁. 


चित्रे काका स्वभावाने खूप प्रेमळ. मला आठवतंय त्यांच्या मेहुण्याचा मुलगा म्हणजे डोंबिवली च्या मामांचा मुलगा अजय (अजू) आणि माझा भाऊ अमोल या दोघांना नेहमी ती पिच्चर ला जायला पैसे द्यायचे. सोसायटीच्या प्रत्येक मीटिंग नंतर मिनिट्स लिहायला लागतात. चित्रे काका ते मिनिट्स माझ्याकडून किंवा कधीतरी उमा कडून लिहून घेत, ते मिनिट्स लिहायला पण छान वाटायचे, कारण दादा कधी सांगायला घाई घाई करत नसत, अगदी सावकाशपणे ते सांगत पुन्हा पुन्हा वाचून घेत. शक्यतों एकही चूक होत नसे त्यांच्या सांगण्यात त्यामुळे माझ्या लिहिण्यात. आणि मला प्रत्येक पानामागे काही पैसे देत . ते पैसे कमवून (आमची पाहिली कमाई) माझी सुट्टीतल्या वडापाव ची सोय व्हायची. आणि हे पैसे चित्रे काका नेहमी त्यांच्या खिशातून देत. तास दीड तासाचा हा कार्यक्रम चाले पण एरवी एका जागी बसायला कंटाळणारे आम्ही अगदी एकाग्रतेने हे काम करतं असू. दादांनी बोलावले म्हटले की मला तर फार आनंद होत असे कारण त्यांनी बोलावले म्हणजे काहीतरी मिळणारच याची शाश्वती असे, त्यामुळे ज्या कुणाला ते आवाज देत ते पटकन जात असत. 


चित्रे काका पनामा सिगारेट ओढायचे. कधीतरी आम्हाला ते आणायला पाठवायचे (तेव्हा आपले परके नव्हते) तेव्हा ही ५-१०पैसे आमची बक्षिसी असायची. दादांची एक लाकडी आराम खुर्ची होती. हो दादांचीच कारण त्यांच्याशिवाय कुणीच त्या खुर्चीवर बसायचे नाही. मला त्या खुर्चीवर बसायला खूप आवडायचे. त्या खुर्चीवर बसले की मस्त आराम वाटायचा एकदम झोप यायला लागायची. पण काकींच्या धाकामुळे फार कमी वेळा बसायचे. चित्रे काकींच्या घरात एक खायच्या सुपारीचा (मुखवासचा)एक डब्बा होता. ती सुपारीही मला खूप आवडायची. ती जास्त खायची नसते तरी ती थोडी थोडी करून गुपचूप खायचो. दादा काकी आत असल्या की सांगायचे खा म्हणून ....एक दोनदा काकीनी आमची ही चोरी पकडली होती. आणि माझ्या सोबत दादांना पण रागावल्या होत्या. पण तेव्हढ्यापुरता परत थोड्या दिवसांनी तेच पुन्हा.


दादांनी त्यांच्या दोन मुलींसारखे माझे ही लाड केले. ताईच्या लग्नानंतर तिच्या सासरी मुलुंडला कधी ही जायचे असले की ते मला घेऊन जायचे. काका काकी आणि मी आम्ही टॅक्सीतून जायचो. दादांकडे खायची ही मौज असायची. चित्रे काकींच्या भावाची दोन्ही मुले संजय आणि अजय म्हणजे संजू अजू सुट्टीत राहायला येत. त्यावेळी त्यांच्यासोबत आम्हालाही वडापाव ची पार्टी मिळायची.


दादांचा स्वभाव त्यांच्या दोन्ही मुलींमध्ये पुरेपूर उतरला आहे.
दुर्दैवाने दादांच्या अंत्यदर्शनासाठी नाही जाता आले. पण त्यांच्या आठवणी मात्र नेहमी आमच्या सोबत राहतील.

दुसरे आमचे जो अंकल. जो अंकल दिसायला एकदम कडक. त्यांच्या मिशा बघूनच भिती वाटायची. त्यांना पाहून ते सेनेत आहेत असेच वाटायचे. तसे ते शिस्तीचे कडकच होते. जो अंकल सोबतच्या तशा आठवणी फार नाहीत कारण एक तर ते नोकरी करायचे त्यामुळे फक्त रविवारी घरी, किंवा सणासुदीला आणि मुख्य कारण त्यांच्या बद्दलची आदरयुक्त भीती ज्याने त्यांच्याशी बोलायला जाणे कमीच व्हायचे.

जो अंकल बारीक, उंच आणि सावळे. घरात असताना ते नेहमी हाफ पॅन्ट मध्ये असत. बाहेर सिगारेट ओढत असताना त्यांची ती टिपिकल पॅन्ट आणि वर उघडे असे ते त्या कट्ट्याला रेलून उभे राहत. त्यांची उभे राहण्याची हि एक वेगळी स्टाईल होती. एक हात दुमडून कट्ट्यावर ठेवत ( आता सारखे कुणी आले म्हणून पुरुषाने पटकन शर्ट चढवावे , असा अलिखित रिवाज तेव्हा नव्हता). जो अंकल फोर स्केअर सिगारेट ओढत असत. 


जो अंकलच्या आवाजात ही एक वेगळी जरब होती. आम्ही जेव्हा संध्याकाळी मैदानात खेळत असायचो, बरोबर ७ वाजता जो अंकल आवाज द्यायचे ब्रायना की आहे तो खेळ तिथेच टाकून ब्रायन , बॉंनी काय तर आम्ही सगळेच घरी धूम ठोकायचो. अंकलला येताना पाहिले की आधीच बोंबाबोंब व्हायची कारण बॉंनी शांत होता पण ब्रायन आमचा खूप मस्तीखोर. कधी मारामारी, आरडाओरडा सुरू असायचा. मग डॅड आले ही धोक्याची सूचना द्यायचो. जेणेकरून सगळे शांत व्हायचे. बिलिंडा, बॉनी आणि ब्रायन तिघांनीही अंकलच्या हाताचा मार खाल्ला आहे. पण बिलिंडा ने जरा कमी. आणि ब्रायन ने जरा जास्त. बॉनी गुणी मुलगा होता. पण  परीक्षेच्या निकालाच्या दिवशी मात्र तिघांचीही घाबरगुंडी उडालेली असे. त्यादिवशी त्यांच्या घरून मारल्याचा आणि रडल्याचा दोन्ही आवाज येत. (अर्थात सगळ्यांच्या घरी सारखीच स्थिती).

 रविवारी चर्च  जाताना जो अंकल अगदी सुटाबुटात असायचे. तेव्हा ते अगदी वेगळे दिसायचे. त्यात त्यांचा रुबाब काही निराळाच असायचा. जो अंकलमुळे एक चांगली सवय लागली आहे. सकाळी गुडमॉर्निंग करयाची. सकाळी कधी दुकानात जाताना ते बाहेर असले आणि आपण असेच पुढे गेलो कि ते स्वतःहून गुडमॉर्निंग असे म्हणायचे, मग हळू हळू सवय झाली ते दिसले कि आपसूखच गुडमॉर्निंग अंकल असे निघून जायचे.

जो अंकलपेक्षा लीना ऑंटी जास्त कडक स्वभावाची होती. पण अंकल ची भीती जास्त वाटायची. एक गोष्ट मात्र खरी कि जो अंकल ला उगाच रागवताना मी कधीच पहिले नाही. जो अंकलची एक गोष्ट खूप चांगली होती ते सगळ्यांवर सारखेच प्रेम करत. मग ती त्यांची बहीण मेरी ऑंटी असो किंवा त्यांची मेहुणी बेटू ऑंटी असो. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांसारखं अजून एका मुलीवर आपल्या मुलांसारखे प्रेम केले ती म्हणजे रचना ची बहीण चिंकूली. जो अंकल तिच्यासोबत एखाद्या लहानमुलांसारखे रमून जायचे. जो अंकलचे एक वेगळे रूप त्या निमित्ताने आम्हाला बघायला मिळाले होते. 

अंकल जितके कडक दिसत तितके ते प्रेमळही होते. याचा प्रत्यय दिवाळीच्या वेळी येत असे. आम्ही जेव्हा फटाके फोडायला खाली येत असू. प्रत्येकाची एक पिशवी असे ज्यात आपापल्या वाटणीचे फटाके असत. कधी कधी आमचे फटाके लवकर संपत . ते नेहमी बाहेरच असत मग ते ब्रायन ला त्याच्या वाटणीचे फटाके आम्हाला द्यायला सांगत असत. त्यांच्या धाकामुळे नाही पण ब्रायन नेहमीच त्याचे फटाके आम्हाला देत असे.

 
माझी आजी १९९४ ला गेली. आजी पहाटेच गेली , आमच्या शेजारी विरार ला एकमेव फोन होता तो ही त्यादिवशी लागला नाही. म्हणून जो अंकल चेंबूरहुन विरार ला आले आजी गेल्याचा निरोप द्यायला. त्यावर्षी आजी गेली म्हणून ख्रिसमसच्या दिवशी त्यांनी फटाकेही फोडले नव्हते. कारण तेव्हा आजीला जाऊन फक्त १० दिवसच झाले होते. तेव्हापासून  जो अंकल बद्दलची आदरयुक्त भीती जाऊन फक्त आदर राहिला.

जो अंकल खूप लवकर आणि अचानक गेले त्यांच्या ही दर्शनाला जाता नाही आले हे दुर्दैव. अर्थात त्यांच्या ही आठवणी सोबत आहेतच आणि आमचा बॉनी आता बराचसा जो अंकल सारखा दिसतो. त्यामुळे त्याला पहिले कि सतत त्यांची आठवण येते.


Tuesday, 28 July 2020

संवाद मेकअप बॉक्स मधला

लॉकडाऊनच्या काळात सगळेच घरात बसून कंटाळलेत. अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे काळात सगळेच घरात बसून कंटाळलेत. अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे. ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे ते ही सुरवातीला जरा बरे वाटत होते पण आता ते ही नकोस झालेय. 


तसेच आपल्या वस्तू ही कंटाळल्या असतील ना. म्हणजे एखाद्या  स्त्रीच्या कपाटातील कपडे, तिची सौंदर्य प्रसाधने ते ही कंटाळले असतील ना साधारण काय संवाद असेल बरे त्यांचा....चला जरा गंमत करूया....


लिपस्टिक: किती दिवस झाले, साधे झाकण ही उघडले नाही. गुदमरायला झाले...तरी ह्या गुलाबीचे बरे...रंग फिका म्हणून निदान जरा तरी बाहेर काढली जाते. आम्ही मेले डार्क म्हणून ...आतच


पावडर: हो ना....कधीतरी काढते बाई मला बाहेर ...इतके हायसे वाटते, मोकळ्या हवेत.


काजळ: हं....हल्ली संगणकावर काम करते म्हणून मला मात्र जास्त भाव मिळायला लागला आहे. डोळ्यांना गारवा मिळावा म्हणून सारखी बाहेर काढते आणि तशीच बाहेर ठेवते. किती धूळ ती....मला त्रास होतो.


तेल: हो...ना तुझी जी गत तीच माझी, आधी आठवड्यातून एकदाच माझी आठवण व्हायची, आता मात्र वरचेवर येते हो...


मस्कारा, ब्लश, आईशाडो: (एकसुरात)... आम्हाला तर पूर्णच विसरून गेली आहे...


नवीन कपडे: आमची ही काही वेगळी व्यथा नाही. (पायजमा मध्येच) अरे!! निदान शर्ट, टॉप यांना त्या ऑनलाईन मीटिंगच्या निमित्ताने घातले जाते. आम्ही ...तर कधीतरीच...ह्या शॉर्टस चे बरे त्यांनाही वाव आहे. ( मध्येच साडी) हो की नाही. मलाही फक्त काही व्हिडिओ कॉल च्या वेळी काढलं तर काढलं नाहीतर हा पंजाबी ड्रेस आहेच माझी जागा घ्यायला. बघू आता सणांच्या निमित्ताने तरी बाहेर येतोय का?


नेलपेंट: अरे....ह्या कोरोना मुळे नखं वाढवायला भीती, आणि सारखे हाथ धुवायचे मग मी तर दूरच. किती सुकलोय मी...आता थोडया दिवसाने केराच्या टोपलीत जागा( मोठ्याने रडायला लागते)


आयलाईनर: अरे रडू नको. माझे ही तसेच आहे ना मला ही भीती वाटते कधी बाहेरचा रस्ता कधी दाखवेल सांगू शकत नाही.


बांगड्या, गळ्यातल्या माळा: तुमची तर आठवण तरी आहे ....आम्ही तर बॉक्स मधेच. आठवण पण नाही होत आमची. साडी आपण सम दुःखी आहोत.


टिकली: हो ना...ह्या लॉक डाऊन मुळे सगळे  घरी ....जास्त वेळ स्वयंपाकघरात ...सणवार ही घरात...त्यामुळे मला ही विसरत चालली ही.


कानातले झुमके: आधी माझ्याशिवाय पण हलायचे नाही बाईचे. मी जिथं दिसेन तिथून उचलून आणायची. फक्त कानातले घालायचे बाकी काही ओरनामेण्ट नको असा ट्रेंड आहे म्हणे.. किती भाव वधारला होता माझा . पण आता (रडत) गेले ते दिन गेले.  आता नुसती लंकेची पार्वती बनून राहते.


पर्स: एरवी माझ्यावर ओझे असायचे सगळे. आता आल्यावर सगळे सॅनिटाईज करायला नको म्हणून छोटं पाकीट सोबत. खरंतर खूप दिवसांनी हलके हलके वाटतंय पण हा एकटेपणा नको झालाय आता. पाण्याची बाटली, रुमाल, भाजी , तुम्ही सगळं ....खूप मिस करतेय मी. कधी तिच्या हातात मिरवेन असे झालेय.

लिपस्टिक: (वैतागून) ह्या मास्कमुळे आमची किंमत अजून डाऊन.... ह्या मास्क ला जास्त महत्व आले ना आता. 


मास्क: का असे रागावला आहेत सगळे.... मी रक्षणकर्ता आहे सध्या. मला तर वाटते की जितकं लवकर माझे महत्व कमी होईल तेवढे बरे.. मला ही तुम्हा सगळ्यांना आनंदाने हसता खेळताना बघायचे आहे  सगळयांना बाहेर फिरताना बघायचे आहे. मजा  करताना बघायचे आहे. तेव्हा सगळे मिळून देवाची प्रार्थना करू या.



सगळे मिळून: हे देवा, गणपतीबाप्पा तू आता येतो आहेस ना. प्लीज ह्या कोरोनाचा लवकरात लवकर संहार कर. आणि आमचे आयुष्य परत पूर्वीसारखे कर. स्वैर नाही , समाधानी कर...(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)

Wednesday, 25 March 2020

टोपण नाव

विषय वाचूनच उत्सुकता वाढली असेल प्रत्येकाची ... कारण हा विषय आपल्या सगळ्यांचा लाडका विषय आहे हो कि नाही ? काही दिवसांपूर्वी एक मालिका बघत असताना त्यात विषय होता " टोपण नाव" ... तो भाग बघता बघता सगळीच टोपण नावे आठवली आणि गम्मत वाटली.

टोपण नाव किंवा लाडाचे नाव ... हि एक सोय असते लांबलचक नाव घेण्यापेक्षा छोटेसे नाव दिले जाते, किंवा घरात लाडाने बोलले जाते. पण हेच नाव कधी कधी त्या व्यक्तीची ओळख बनते. आपल्या प्रत्येकालाच एक टोपणनाव असते. कधी घरच्यांनी दिलेले, तर कधी मित्रमैत्रिणींनी तर कधी कधी आपल्या शिक्षकांनी दिलेले.

अर्थात प्रत्येक जण कुणाला ना कुणाला नावं ठेवतच असतो पण टोपणनाव हि आपण प्रत्येकजण देतोच कुणा ना कुणाला.

खरी गम्मत असते ती कोकणात. इथे कुणाला सरळ नावाने हाक मारलीच जात नाही. अर्थात बरेसचे हे नावाचे अपभ्रंश हि असतात.प्रभाकर चे परब्या , बबन चे बबन्या , सुनील चे सुनग्या . कोकणात तुम्हाला एकही माणूस शोधून सापडणार नाही ज्याला टोपण नाव नाही. एखाद्याचे खरे नाव म्हणजे कागदोपत्री नाव शोधणे हा एक पी एच डी चा विषय होऊ शकतो . 

आता बंटी हे नाव ऐकले कि अगदी दोन अडीच वर्षाच्या मुलापासून अगदी पन्नाशीतला माणूस असे सगळेच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तसेच गुड्डी नावाचे हि आहे आमच्याकडची एक गुड्डी एका बाळाची आई आहे तर एक लग्नाला आलीय तरी अजून गुड्डीच. पूर्वी बंड्या, बाळा, बाबा,बाबू,  सोनू , गुड्डी,बेबी,  बाय हि नावं अगदी हमखास वापरली जायची. प्रत्येक घरात या नावाची किमान एक तरी व्यक्ती असतेच. बेबी मावशी किंवा बेबी आत्या हि हवीच ... आमच्या घरात हि एक आहेच कि. बंड्या हे नाव तर खूपच वापरले जायचे. पूर्वी चाळीत इतकी कुटुंब असायची त्यात अशा नावांची अगदी रेलचेल असायची. .... आमच्या कडे तीन बाळा मामा आहेत, तर एक बाळा दादा ....मग त्यातही उपभाग आहेत बरे का ...   म्हणजे  पनवेल ला राहतो तो पनवेल चा बाळा मामा, बॉम्बेसेन्ट्रल चा वेगळा आणि गोरेगावचा वेगळा. म्हंजे एकापेक्षा जास्त व्यक्तींची सारखी टोपण नावे असली कि त्या टोपणनावापुढे अजून एक उपनाम लागतेच.

मोठ्या भावाला दादा आणि मोठ्या बहिणीला ताई किंवा आक्का म्हटले जाते... आणि मग आयुष्यभर हीच त्याची ओळख होते. दादा काका किंवा मामा, ताई मावशी, आक्का मावशी  किंवा आत्या. हेच प्रचलित होऊन जाते. आपल्या वडिलांना बाबांऐवजी अण्णा, दादा म्हणतोच पण त्याही पलीकडे जाऊन बाबांच्या अपरोक्ष त्यांना डॉन, किंवा गब्बर म्हणणारी अनेक जण असतात. बघा सगळे कसे  मनातल्या मनात हसले. 

टोपण नावाची गम्मत पण बघा कशी म्हंजे इथे नवरा नवरी बोहल्यावर उभे आहेत आणि कुणीतरी अरे छोटू मान करून बघू नकोस, किंवा गुड्डी  आता नीट संसार करायचा हा...  असे म्हणतात .... त्यावेळी अख्ख्या  मंडपात हशा पिकतो. बऱ्याच वेळा मुलं मोठी झाली कि त्यांना अशा टोपणनावाने हाक मारलेली नाही आवडत . पण घरातल्यानंच काय, तर मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी सगळ्यांनाच त्या टोपण नावाची सवय झालेली असते. अगदी रस्त्यात भेटणारी माणसे हि गर्दीत जेव्हा त्या नावाने हाक मारतात तेव्हा कावरेबावरे व्हायला होते. लग्नानंतरहि घरच्या नावाने हाक मारली कि त्या नवरदेवाची बायको समोर अशी अवस्था होते आणि त्यात घरची मंडळी अजूनच चिडवायला मोकळी होतात. 

हे टोपणनाव अगदी कशावरूनही पडू शकते अगदी नावाच्या अपभ्रंशापासून, एखादाच्या सवयीवरून, कुणाच्या आडनावावरून, तर अगदी कुणाच्या वडिलांच्या नावावरूनही. आता आमची एक मैत्रीण आहे तिने नाव आणि बाबांचे नाव यांचे पहिले अक्षर घेऊन आम्ही तिला टोपण नाव दिले " मका" . 

हे टोपण नाव कुणालाही चुकलेले नाहीये अगदी श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत , तर जन्मलेल्या बाळापासून म्हाताऱ्यांपर्यंत ... कुठल्याही क्षेत्रात असो किंवा कुठल्याही पदावर असो ... प्रत्येकाला काही ना काही टोपण नाव हे असतेच.  आपल्या बॉलीवूड मध्ये तर टोपण नाव अगदी खास आहे. म्हणजे करिष्मा  कपूर लो लो , गोविंदा ची ची, करीना कपूर बेबो.  अशी काही खास नावे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सिनेमातूनच आलेली खलनायकाची नावे आपण एखाद्याला टोपण नाव म्हणून वापरतो उदा. शाकाल, मोगॅम्बो, गब्बर. सिनेमातली टोपण नावे म्हटली कि मला तेजाब मधला एक संवाद नक्की आठवतो " ये महेश से मुन्ना कैसे बन गया ?" 

खरे तर टोपण नावाची गम्मतच वेगळी आहे. या नावांमुळे समोरचा माणूस आपल्याला जवळचा वाटतो ( चिडवायला वापरतात ती गोष्ट वेगळी ) .  आता साधं उदाहरण द्यायचे म्हटलं तर आपले क्रिकेटर घ्या महेंद्रसिंग धोनी पेक्षा माही जास्त जवळचा वाटतो, युवराज पेक्षा युवी, आणि आपला सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर पेक्षा  ..... तेंडल्या जास्त जवळचा असतो ना आपल्याला , अशी बरीच उदाहरणे आहेत आपल्या आवडत्या खेळात . अर्थात या नावांमुळे त्यांच्याबद्दलचा आदर कमी होत नाही .... पण आपल्यातले जे अंतर आहे ते मात्र नक्कीच कमी होते. 

आता टोपण नावाचा विषय निघालाच आहे तर अजून एक गोष्ट सगळ्यांना आठवलीच असेल....अं ... अं ... आठवली का ? अरे असे कसे नाही आठवली... तुम्ही आम्ही सगळ्यांनीच केलीय हि गोष्ट. अर्थात खुलेपणाने कुणी कबूल नाही करणार पण ..... अहो असे काय करता .... शाळेतली गोष्ट ... आता आठवले असेल ना .... हं ... तेच आपण आपल्या शिक्षकांना ठेवलेली टोपण नावं ... नाही हा आम्हीं नाही ठेवली ... असे अजिबात म्हणू नका ... आता तुम्ही शिक्षक असलात तरी तुमच्या शालेय जीवनात तुम्ही हे केलेच असेल. अगदी स्वतःहून नसतील ठेवली नावे.. पण कुणाशी कधीतरी बोलताना त्या नावाचा उपयोग नक्कीच केला असणार. मोठे झाल्यावर वाटतं कि काय आपण आपल्या गुरूंना नावं ठेवायचो. पण ती तेवढ्यापुरताच होती .... त्यांच्याबद्दलचा आदर तेव्हा हि कमी नव्हता आणि कधी होणारही नाही.

काही टोपण नावे हि जरा विचित्र असतात कुणाच्या तरी केसावरुन, शरीरयष्टीवरून , व्यंगावरून ठेवलेली नावे. खरे तर हे चुकीचं आहे हे आपल्याला कळत असते पण तरीही आपण ती ठेवतो. पण हे आपण सगळ्यांनीच टाळले पाहिजे, कारण अशी वेळ कधी कुणावर येईल हे सांगता येत नाही.

काही नावं हि आपली सिक्रेट लपवायला ठेवलेली असतात. म्हणजे कुणाविषयी  बोलायचे असेल त्याला न कळता किंवा चार लोकांमध्ये काही बोलायचे असेल एखाद्या व्यक्ती विषयी तर आपण त्या व्यक्तीसाठी एक विशिष्ट टोपण नाव वापरतो. (लगेच बायका आल्या असतील सगळ्यांच्या डोळ्यासमोर ) पण या बाबतीत पुरुषही मागे नाहीत बरं का :) ....यात सगळ्यात अग्रस्थानी असतात ती प्रेमात आकंठ बुडालेली जोडपी.... त्यांचे बाबू , शोना, स्विटी , जानू हे पालुपद सुरूच असते ... 

  जाता जाता तुम्हाला माझे एक टोपण नाव सांगते ... माझे नाव मिलन आहे पण बरेच जण त्याचे मीनल करतात त्यामुळे मीनल चे मिनू झालेय... नूतन ताईची मी जपानी डॉल आहे. तशी अजून बरीच नावे आहेत (माझ्यामागून ठेवलेली नाही हा!!!! ) प्रेमाने ठेवलेली ...माझी आशा मावशी मला प्रेमाने एका प्राण्याच्या नावाने हाक मारायची,अहं ती नाही सांगायची बरे का .... कारण नंतर माझ्या काही मित्र मैत्रिणींना मला छळायला अजून एक निमित्त मिळेल.  पण तुमची जर काही छान टोपणनावं कंमेंट मध्ये लिहिलीत तर चालतील ...... 

चला या निमित्ताने बऱ्याच जणांना बऱ्याच जणांच्या जुन्या नावांची आठवण झाली असेल. तर मग फोन उचला आणि करा कॉल... एखाद्या पिंट्या, बंटी.  बबल्या, गुड्डी, बेबी ला या सक्तीच्या सुट्टीमध्ये तेवढाच विरंगुळा.... 

घरी राहा ... सुरक्षित राहा.... आणि एकमेकांच्या संपर्कात रहा ....

Friday, 6 December 2019

साडी ती शेवटी साडीच (स्त्री चे पहिले प्रेम )

"काय ग काय झाले असा का चेहरा?" "काय सांगू ग नणंदेचे लग्न आहे , चांगली येवल्याला जाऊन पैठणी आणली , पण सासूबाईंना पसंद नाही पडली, म्हणे जांभळ्या रंगाची आणायची  आता यांना  कोण सांगेल तो रंग नाही शोभायचा यांना. हौस तर भारी साड्या नेसायची १०० एक साड्या तरी असतीलच कपाटात तरी दर वेळी नवीनच हवी ते हि अगदी त्यांच्या पसंतीचीच.
 हा संवाद काही वर्षांपूर्वीचा. तर हल्लीचा संवाद काही असा  ....
"अगं ! गेट टू गेदर ला जायचे आहे ना,  काय ड्रेस कोड ठेवूया... साडी नेसूया का सगळ्या जणी?" "साडी नको ग बाई!!!  एक तर नेसायला वेळ लागतो. आणि ती सांभाळायला पण त्रास. त्यात आता पूर्वीचे ब्लॉऊज होत ही नाहीत म्हणजे तो हि नवीन घ्या , अजून खर्च" असे उद्गार आपण नेहमीच ऐकतो.
पण तरीही काही उत्साही बायका असतात ज्या सणावारालाच नाही तर इतरही प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून साडीच नेसतात. 

तसे पाहायला गेले तर हल्लीच्या काळात साडी खूप कमी नेसली जाते.रोजच्या आयुष्यात जीन्स , पंजाबी ड्रेस यांनी साडीची जागा घेतली आहे. आणि ते काही अंशी बरोबर हि आहे. रोजच्या धावपळीच्या रुटीन मध्ये जीन्स किंवा पायजमा चढवला  वर एखादा टॉप घातला कि झाले काम. इथे त्या गडबडीत साडी नेसणे आणि ती संभाळणे म्हणजे एक दिव्यच वाटते आपल्याला. ट्रेन च्या त्या गर्दीत पदर सांभाळायचा , निऱ्या  सांभाळायच्या , पर्स सांभाळायची कि स्वतःला हा मोठा यक्ष प्रश्न असतो. त्यामुळे हे असे शॉर्टकट बरे पडतात. पुन्हा पावसाळ्यातही प्रश्न असतोच ती भिजलेली साडी दिवसभर वागवणे म्हणजे एक दिव्यच. उन्हाळ्यात खूप उकाडा मग तो ब्लॉउज, साडी, परकर असे  सगळे घातले कि घामाने चिंब भिजलोच म्हणून समजा.

आपली आजी अगदी  रोज नऊवारी साडी नेसायची तर आपली आई सहावारी. घरातली सगळी काम करतानाही त्यांना कधी या साडीची अडचण झाली नाही. पण आता आपल्याला अगदी दोन तीन तास साडी नेसायची असेल तरी आपण दहा वेळा विचार करतो. पूर्वी घरात नेसायला दोन आणि सणावाराला दोन अशा मोजक्याच साड्या असायच्या बायकांकडे. आता साड्यांचा गठ्ठा वाढलाय आणि नेसायचे प्रमाण कमी झालेय.

पण काही म्हणा साडी मध्ये जी नजाकत आहे ती इतर कुठल्याही पेहरावात नाही. जरा आठवून बघा  कि ड्रेस किंवा जीन्स घातल्यावर कुणी तुम्हाला पटकन खूप चांगली कॉम्पलिमेन्ट दिलीय, कुणीतरी पटकन मागे वळून पाहिलेय. पण तेच साडी नेसल्यावर लोक तुम्हाला अगदी आवर्जून सांगतात कि "छान दिसतेस साडीमध्ये. अधून मधून जरा नेसत जा."

खरे हि आहे ते साडीत  जितके  स्त्री सौन्दर्य खुलून येते तितकं बाकी कशातच नाही. साडी नेसली की आपोआप एक स्त्रीत्व येते आपल्या वागण्यात. एक वेगळाच आत्मविश्वास येतो. इतर कशावरही करता येत नाही असे सोळा शृंगार ही करता येतात साडीवर. साडी नेसली कि त्यावर बांगड्या काय घालायच्या, गळ्यात काय, टिकली कुठली , कानातले कुठले एकापाठोपाठ एक अजून शंभर प्रश्न येतात. अर्थात हे सगळे प्रश्न आपल्या आवडीचे असतात. साडी नेसून साजशृंगार केल्यावर आपणच आपल्याला आरशात किती वेळा निरखून बघतो सांगा बरं . खरे आहे कि नाही आपणच जर आपल्या प्रेमात पडतो तर लोक का नाही पडणार?

बरे साड्यांचे प्रकारही भरपूर, रंगसंगती हि भरपूर. तसेच प्रत्येक सणा समारंभाला साडी नेसायचे प्रकारही भरपूर. जवळचे लग्न असेल तर शालू किंवा पैठणी, लग्न लागताना लागणारी पिवळी साडी, पूजेला बसताना हिरवी साडी, साधा सभारंभ असेल तर नारायण पेठ , ऑफिस ला जाताना कॉटन च्या वारली पेंटची साडी अशी भरपूर उदाहरणे देता येतील. साडी नेसल्यावर बहुतेक बायका आवर्जून एक गोष्ट करतात ती म्हणजे डोक्यात गजरा किंवा फुलं माळणे. त्याशिवाय साडी नेसणे अधुरे वाटते.

साडी नेसायची प्रत्येक प्रांताची आपली एक वेगळी कला आहे एक परंपरा आहे. गोल नेसली जाणारी बंगाली साडी, उजव्या बाजूला पदर येणारी गुजराती साडी. प्रत्येक प्रांताची आपापली पद्धत. वेगवेगळ्या नृत्यप्रकारात नेसले जाणारे साडीचे प्रकार हि वेगवेगळे भरतनाट्यम, मणिपुरी, कुचिपुडी, कथ्थक . आपल्या महाराष्ट्रातच साडी नेसायचे किती वेगवेगळे प्रकार आहेत ब्राह्मणी प्रकारची नऊवारी, साधी नऊवारी, कोळी लोकांची वेगळी पद्धत तर काही लोक गुढग्यापर्यंत नेसतात ती नऊवारी नेसायची वेगळीच पद्धत. . आपल्या कडे परंपरागत चालून आलेली नऊवारी साडी. याचा थाट काही औरच. नऊवारीसोबतच त्याचा शृंगार हि भारदस्त. नथ, बुगडी, तोडे, डूल , तन्मणी, आणि अजून कितीतरी असे दागिने जितके घालू तितकी त्या साडीची शोभा वाढविणारे.

असेच काही साड्यांचे प्रकार :
पैठणी म्हटली कि डोळ्यासमोर येते सुंदर रंगसंगती आणि पदरावरचे मोर.
नारायण पेठ म्हटली कि मऊ सिल्क आणि मोठे काठ , विरुद्ध रंगसंगती
जिजामाता म्हटले कि छान बारीक नक्षीचे मोठे काठ
कोसा सिल्क मध्ये एक वेगळाच शाही अंदाज जाणवतो
पुणेरी कॉटन च्या साड्या नेसायला हलक्या आणि दिसायला सुंदर
पेशवाई च्या नावातच श्रीमंती आहे. बारीक बुट्ट्यांची हि भरलेला पदर असलेली साडी
वारली प्रिंट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील चित्रांचा एक उत्तम नमुना तोच साडीवर उताराला कि त्या साडीची बात काही औरच होऊन जाते


साडी नेसणे हि देखील एक  कलाच आहे. काही बायका अगदी चापून चोपून छान साडी नेसतात, पदर तीन निऱ्यांचा लावायचा कि दोनच, का पदरावरचा जरतारीचा मोर नाचवायला तो असाच सुटा सोडायचा. एक साडी पण त्यातही नानाविध प्रकार. ड्रेस सारखा घातला ओढणी टाकली आणि निघाले असे होत नाही.

साडी नेसायची आहे म्हटल्यावरच मनात जे येत तेच आपले खरे स्त्रीत्व. ती नेसणे , सांभाळणे, तिच्यावर साजेसा शृंगार करणे यातून त्या स्त्रीच्या टापटीप पणाचा , आवडीनिवडीचा अंदाज येतो.

घरातही आपल्या मुलीने साडी नेसायची म्हटली की आयांचे धाबे दणाणतात. एक तर आपली आणि त्यांची आवड वेगळी ...म्हणजे हा ढीग काढला की त्यातून एक साडी निवडणार . नाही पसंद पडली तर नवीन घ्या.  साडी एखादी पसंद पडलीच तर त्यावरचा ब्लॉऊज आवडत नाही. त्यातुन सलामत बाहेर पडलो की ती नेसवण्याची कसोटी.  अग इथून सैल आहे ग, निऱ्या कमी घे, पदर बघ सारखा पडतोय, लहानच झालाय...अशा सगळ्या दिव्यातून पार पडल्यावर....ती सांभाळत चालायची कसरत.  साडी नेसवून ती सगळे आटपून सुखरूप राहेपर्यंत आई चे बीपी हायच असते. एकदा घरी येऊन सोडली की सुटकेचा निश्वास टाकला.
अशावेळी सगळ्यांनाच आपले बालपण आठवते अगदी साधी ओढणी मिळाली तरी ती साडी सारखी गुंडाळून घ्यायची, अगदी लहान असलो तर घरात जी स्त्री असेल तिच्या कडून आणि जरा  मोठे झालो कि स्वतःची स्वतः. ती साडी नेसून मग घरभर मिरवायचे. आणि सगळ्यांकडून कौतुक करून घ्यायचे हे प्रत्येक मुलीने हे एकदा तरी नक्कीच केले असेल. साडी नेसून मास्तरीण बाई होण्याची मजा हि काही औरच होती. शाळेत शिक्षक दिनानिमित्त साडी नेसायला मिळायची .  

जसे आई साठी मुलीने साडी नेसणे हे एक दिव्य असते. तसे जेव्हा मुलगी कॉलेज मध्ये "सारी डे " ला जेव्हा पहिल्यांदा साडी नसते तेव्हा तिच्या वडिलांचे मन आतून गलबलून जात असेल. छोटी छोटी म्हणताना अचानक आपली मुलगी किती मोठी झाली याची पहिल्यांदाच होणारी जाणीव. आणि मग पुढे दिसणारे तिचे लग्न आणि तिचा विरह. एका तिच्या साडी नेसण्याची त्या बाबाला लागणारी हुरहूर.

लहानपणी ज्या  साडी नेसण्याचं अप्रूप वाटायचे तेच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कंटाळवाणे काम झालेय. पण तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी साडी नेसायची इच्छा प्रत्येक स्त्रीला असतेच.

साडी नेसताना एक वाक्य नेहमी आपल्या तोंडी असते " या पुरुषांचे बरे , पॅन्ट शर्ट चढवले कि निघाले." पण अहो, स्त्रियांनाच का तर कधी कधी पुरुषांना हि नेसावी लागतेच कि साडी .... असे काय करता अहो नाटक सिनेमात नाही का नेसत पुरुष साडी ? तसे तर खूप जणांनी हे कृत्य केला आहे तरी साडी नेसलेला पुरुष म्हटले कि डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतात ते पुरुष म्हणजे कै. पं. बालगंधर्व (अर्थात त्यांचे काम नाही पहिले पण जे काही फोटो पहिले त्यात त्यांचे सौंदर्य अप्रतिमच ),   अशी हि बनवाबनवी मधले कै. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिनजी, अर्थातच पंडितांचे काम करणारा कलाकार सुबोध भावे. .... आणि सगळ्यात लाडकी मोरूची मावशी अर्थात कै.  विजय चव्हाण  त्यांनी खऱ्या अर्थाने साडीतल्या पुरुषाला अजरामर केले. (अर्थात पूर्वी पुरुषच स्त्री पात्र करायचे तेव्हा नेसतच होते) 

हवाहवाई म्हणणारी मि . इंडिया  मधली फ्रॉक घातलेले श्रीदेवी व्हायचे कि चांदनी मधली शिफॉन च्या साड्या नेसणारी मादक श्रीदेवी व्हायचे हे आपले आपण ठरवायचे (हे उदहारण फक्त गंमती दाखल आहे). 
अर्थानं साडी हे शालीनतेचे उत्तम उदाहरण आहे.

हा आता तिला पाहिल्यावर पडणाऱ्या शिट्या हव्या असतील तर साडी शिवाय पर्याय नाही.

तर मैत्रिणींनो साडी नेसा, सुंदर दिसा आणि आपली परंपरा जपा. आणि नवऱ्याच्या खिशाला मोठी कात्री लावा.



 

 

   






Sunday, 10 November 2019

आनंदवन-एक अभूतपूर्ण हृदयस्पर्शी अनुभव

आनंदवन-एक अभूतपूर्ण हृदयस्पर्शी अनुभव
कुष्ठरोग नाव ऐकले की मनात भीतीपेक्षा आधी किळस येते अशी आपली परिस्थिती आहे. खरेतर हा रोग संसर्गजन्य आहे  म्हणून यापेक्षा गेल्या जन्माच्या काहीतरी भीषण पापाची शिक्षा म्हणून झालेला हा रोग अशा लोकांना वाळीत टाकले जाते. "महारोग" हे भीती दायक नाव देऊन त्या भीतीचा पगडा आपल्या मनावर बसलाय. पण खरे  तर सगळ्यात कमी संसर्गजन्य असलेला  रोग आहे हा. ज्याला हा आजार झाला आहे तो औषध घेत नसेल आणि तुमची प्रतिकार शक्ती खूप कमी असेल तरच होतो हा.  आणि कदाचित हा एकमेव असा आजार आहे कि त्याला एक ठराविक वेळच औषध घ्यायची जरुरी आहे. हा आजार वंशपरंपरने येणाराही आजार नाही. पण तरीही या आजाराच्या रुग्णाला वाळीत टाकले जाते. पूर्वी तर अशा रुग्णांना जिवंतपणे गाडले जायचे. अजूनही काही ठिकाणी हे घडतेच आहे. आईवडिलांना जर झाला असेल तर त्यांना आनंदवनात आणून सोडले जायचे आणि मुलांना सांगितले जायचे कि त्यांचे आईवडील वारले. लग्न मोडली जायची. 

पण याच सगळ्यांचे वडीलांसारखे संगोपन केले त्या वडिलांना आपण ओळखतोच स्वर्गीय. मुरलीधर आमटे अर्थात आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे "बाबा आमटे". याच रुग्णांना घेऊन एका छोट्या गावात त्यांनी  नंदनवन फुलवले ते गाव म्हणजे "आनंदवन" . आपल्याकडे स्वयंभू देव असतात इथे देवासारखी  स्वयंभू माणसे आहेत. आज ७०  वर्षानंतर ही इथे रुग्ण कायमचे राहायला आहेत ही आपल्यातल्या माणुसकीची हार आहे तर आनंदवनातल्या प्रेमाची जीत.

बाबांनंतर ही धुरा म्हणण्यापेक्षा हा वारसा तसाच आपल्या खांद्यावर घेतला ते त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास आमटे यांनी तर हेमलकसा सारख्या दुर्गम भागातल्या आदिवासींना शिक्षण आणि आरोग्य देण्यासाठी उभारलेला प्रकल्प हाती घेतला तो त्यांचे धाकटे पुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी.

आज आपण माझ्या लेखातून फेरफटका मारणार आहोत याच आनंदवनात. 

आनंदवनात प्रवेश करतानाच त्याच्या प्रसन्न वातावरणाची झुळूक आपल्याला जाणवायला लागते. जिथे आपली राहायची सोय केलेली आहे तिथे प्रवेश करतानाच छान छान फुलझाडे आहेत. आणि समोरच एक फलक आहे ज्यावर लिहिले आहे "We do not have Wi-Fi., Talk to each other and Pretend it's 1995" आणि खरेच तिथे नाहीच आहे तेच बरे नाहीतर तिथल्या वातावरणाची खरी मजा न अनुभवता आपण त्या मोबाईलच्या कृत्रिम दुनियेतच रमून जाऊ. तिथे दोन्हीबाजूला छोटी छोटी फुलझाडे  आहेत. गुलाब, झेंडू, तगर, सदाफुली अशी काही परिचित झाडे हि आहेत. समोर  गवताची हिरवळ आहे. पहाटेच्या दवबिंदू पडलेल्या गवतावर चालताना पायाला जो मुलायम स्पर्श होतो तो अनुभवण्यात काही वेगळीच मजा आहे. 

 आनंदवनात एक विभाग आहे "काष्ठशिल्प विभाग " जिथे उन्मळून पडलेली झाडे, टाकाऊ लाकूड यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. तिथे एक लामणदिवा असतो तसे लाकडाचे शोपीस आहे ते एका अखंड लाकडापासून बनविले गेले आहे. हाताच्या पंजाच्या  आकाराची एक खुर्ची आहे. तर एक म्हशीचा पुतळा हि तिथे लाकडापासून बनविला गेला आहे. काचेच्या बाटलीत बनविल्या जाणाऱ्या वस्तू हि आहेत. 

 त्यानंतर येतो तो हस्तकला विभाग यात भेटकार्ड , भिंतीवर लावली जाणारी चित्रे बनवली जातात. पण याचे एक वैशिष्ट्य आहे. यात रंग नाही वापरले जात बरे का !! यात वापरल्या जातात त्या वस्तू म्हणजे केळीच्या झाडाची साले, मक्याच्या कणीसाची साले, भाताचे तूस. सालांचे वेगवेगळ्या  रंगछटांचे दोऱ्यासारखे गठ्ठे बनविले जातात.ते हवे त्या आकारात कापून मग ते गोंदामध्ये बुडवून जाडकापडावर असलेल्या नक्षीकामावर चिकटवले जातात. आणि त्यापासून बनविली जातात उत्तम चित्रे. त्यातच दुसरा भाग आहे , त्या भागात टाकाऊ झालेली कपड्यांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. आणि ते वरील प्रमाणेच रंगसंगतीनुसार चिकटवले जातात. त्या कापडाच्या कोलाज मधून तयार होणारी चित्रे फारच अप्रतिम असतात. 

एक विभाग आहे बैठका, सतरंजी बनविण्याचा विभाग. इथे प्रथम दोऱ्याला रंग करून आणला जातो. नंतर  ते आणलेले दोरे वेगवेगळे केले जातात. त्या दोऱ्यांचे छोटे छोटे रीळ बनविले जातात. मग ते दोरे ४-५ च्या प्रमाणात एकत्र करून त्याचे एकत्रीकरण केले जाते जेणेकरून सतरंजी विणताना दोरे गुंतायला नको. मग त्या मागावर सतरंजी विणली जाते.छोटी सतरंजी विणायला एक तर मोठी सतरंजी विणायला जास्त बायका एकत्र काम करतात.

अजून एक विभाग आहे तो हातमाग जिथे छोटे रुमाल, पंचे, धोतर बनविले जाते. इथे सगळे काम हे हातमागावर चालते. काही हातमाग मॅन्युअल आहेत तर मुंबईची एक मिल बंद झाल्यावर त्यांनी तिथे दिलेल्या काही ऑटोमॅटिक मशीन आहेत. इकडच्या कापडाची गुणवत्ता हि खूप चांगली आहे. हातालाच त्याचा मुलायमपणा जाणवतो. 

एके ठिकाणी आपण घरी वापरतो ती पत्र्याची कपाटे बनवली जातात. त्याचा पत्रा इतका जाड असतो कि ती गुणवत्ता  आता आपल्याला बाजारात मिळणे शक्य नाही. त्या कपाटाची अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे त्या कपाटाला आरश्यासमोर एक छोटासा जाळीचा खण असतो. म्हणजे आपल्याला आरशात बघताना पटकन लागणाऱ्या गोष्टी आपण तिथे ठेऊ शकतो. तिथेच आनंदवनात वापरले जाणारे हातमाग हि बनवले जातात. तसेच वापरल्या तेलाच्या डब्यांपासून चाळण्या बनविल्या जातात. अजून एक महत्वाची गोष्ट तिथे बनवली जाते ती म्हणजे तिथे लागणाऱ्या व्हील चेअर हि तिथेच बनविल्या जातात. त्यामुळे त्यांची खरी सोय जाणून त्या प्रमाणे त्याचे डिजाईन केले गेले आहे. 

आनंदवनात फक्त कुष्ठ रोगीच नाहीत तर दिव्यांग लोकांनाही आश्रय दिला जातो. त्यांच्यासाठी तिथे शाळा चालवली जाते. " संधी निकेतन " मध्ये अशा मुलांना काही प्रकारचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. आणि मग तिथूनच काही जणांना नोकरी साठी संधी उपल्बध करून दिल्या जातात. यात बऱ्याच वेळा अशी मुले असतात ज्यांना त्यांच्या घरच्यांनी हा किंवा हि काही कामाचे नाहीत, खायला एक तोंड जास्त म्हणून नाकारलेले असते. अशीच मुले मग स्वतः कमावून घर हि सांभाळतात. इथे अशा मुलांना फिजिओथेरपी मिळावी म्हणून एक हॉस्पिटल बांधले जात आहे. हे अशा प्रकारचे भारतातले पहिले हॉस्पिटल असेल जे अशा दिव्यांगांना नियमित फिजिओथेरपी देण्यासाठी उभारले जाणार आहे. इतका विचार तर काही लोक आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींसाठी हि करत नाहीत. 

 एकदा फार पूर्वी जेव्हा या रुग्णांना सिनेमा बघावयास नेले होते तेव्हा त्यांचा सिनेमा पाहून झाल्यावर त्या सिनेमाघरवाल्यानी अख्खे सिनेमाघर धुवून काढले होते. कुष्ठरोग्यांचे गाव म्हणून इथे जास्त कुणी यायला तयार होत नसत. हि सल आमटे कुटुंबियांच्या कायम मनात होती.  आणि मग याच दुःखावर उपाय म्हणून उभा राहिला तो "स्वरानंदनवन " ऑर्केस्ट्रा. इथल्या दिव्यांग लोकांमधले, रुग्णामधले  कलागुण ओळखून श्री. विकासभाऊ आमटे यांनी त्यांचा स्वतःचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला. इथे वादक, गायक, नृत्य सादर करणारे सगळेच त्यांचेच. या गावात येऊन प्रयोग करायला नकार मिळणाऱ्या याच गावातल्या ऑर्केस्ट्राचे मुंबई पुणे इथे १५ च्या वर प्रयोग झालेत. यातून मिळणार सर्व निधी हा आनंदवनासाठी वापरला जातो. "लोकशाही" लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य असे म्हणतात ..... हीच लोकशाही खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते. 

 या आनंदवनात एकंदरीत ११ तलाव आहेत. त्यात काही मानव निर्मित आहेत. एक तलाव चिवडा खाता खाता बांधले गेले म्हणून त्याचे नाव " चिवडा तलाव " असे ठेवले आहे. या तलावांमुळे इथे शेतीमध्ये दोन वेळची पिके घेतली जातात. भात शेती सोबत इथे भाज्या, फळे हि पिकवली जातात. इथला अजून एक व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय. इथे गाई म्हशींचे पालन करून येणारे दूध हे विकले जाते. सुरवातीला कुष्ठरोग्यांच्या वसाहतीतले दूध घ्यायचे नाही म्हणून नाकारणारी लोक आता तिथले दूध घ्यायला रांग लावतात. कधी कधी दूध संपून जाते पण रांग नाही. या वरूनच तिथल्या दुधाच्या दर्जाची आपण कल्पना करू शकतो. 

इथे पाणीसाठ्याची जशी मानव निर्मित तलावं  आहेत. तशी इथे अजून एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. ती म्हणजे इथली डोम च्या आकाराची घरे. हि घरे बांधली जातात ती फक्त विटांनी. विटांची तिरपी चालत ठेऊन हि घरे बांधली जातात. याचे छत हे अर्धवर्तुळाकार असते. त्या वर रंगीत टाईल्स चे तुकडे बसविले जातात. जेणेकरून ऊन त्यावरून परावर्तित होऊन घरातील तापमान बाहेर पेक्षा कमी राहील. या घरामध्ये बाहेरपेक्षा साधारण ५ डिग्री तापमान कमी असते. इथे जराही लाकडाचा  वापर केला जात नाही त्यामुळे या घरांमध्ये उंदीर होत नाही. हि संकप्लना आहे आदरणीय श्री. विकासभाऊ आमटे यांची. रुग्णांना उंदीर चावून त्यांना जखम होऊ नये. बाहेरच्या उकाड्याचा त्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून हि खास रचना. 

या विभागात पाणी आणि वीज टंचाई आहे हे आपणा  सर्वाना माहीतच आहे. त्यामुळे इथे मोठे सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. जेणेकरून फक्त सरकारी विजेवर अवलंबून राहून कामे खोळंबायला नको. 

आजपर्यंत आनंदवनातून लाखो कुष्ठरोगी बरे होऊन गेले आहेत. काही जे इथे आले ज्यांना घरच्यांनी नाकारले म्हणून ते अजूनही इथेच आहेत. त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हि आनंदवनाची जबाबदारी आहे. अजूनही इथे रुग्ण येतात. काही निघून जातात काही इथेच राहतात. त्यांच्या साठी इथे एक हॉस्पिटल आहे. सकाळ दुपार इथे रुग्ण तपासले जातात. आजूबाजूच्या गावातूनही रुग्ण इथे तपासणी साठी येतात. आपल्या मुंबई पुण्याकडे सापडणार नाही इतकी स्वच्छता आहे त्या हॉस्पिटल मध्ये. इथे एक हेल्थ ए टी एम  मशीन आहे ज्यात आपल्या ३३ चाचण्या करता येतात. डिजिटल एक्सरे  ची हि इथे सोय आहे. इथे बरेसचे मेडिकल कॅम्प होतात. ज्यात हजारो रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातात अगदी मोफत.

इथे अजून एक खूप वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे इथले स्वयंपाकघर. इथे एकच सार्वजनिक स्वयंपाक घर आहे. सगळ्यांचा स्वयंपाक हा एकाच ठिकाणी बनतो. इथे कामावर येणाऱ्या बाईला घरच्या स्वयंपाकाची चिंता नसते. तिन्ही वेळचे जेवण हे इथे एकत्रित केले जाते. जे या प्रकल्पात थोडे लांब काम करतात त्यांना डबे पोहचविले जातात. साधारण दीड ते दोन हजार माणसांचा एकत्र स्वयंपाक किती मोठी गोष्ट. याच स्वयंपाकघरात साधारण ८०-९० सिलेंडर लागायचे. पण इथे आता बायोगॅस प्लांट हि उभारण्यात आला आहे. दररोज साधारण ५ टन शेण आणि ३ टन टाकाऊ अन्न यापासून ४०० घन मी. गॅस ची निर्मिती होते. त्यामुळे आता तिथे लागण्याच्या सिलेंडर ची संख्या आता ५ वर आली आहे. 

आणि ह्या सगळ्या विभागात काम करणारी माणसे आहेत ती या आजारातून बरे झालेले रुग्ण. आता आजारी असणाऱ्या रुग्णाची सेवा करायला माणसे मिळत नाही म्हणून इथेच बरे झालेल्या रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते मग तेच या रुग्णाचे ड्रेसिंग करणे, त्यांची काळजी घेणे हि कामे करतात.  इथे बरे झालेले रुग्णाचं काम करतात म्हणून त्यांच्याकडून जास्त वेळ काम करून घेतले जात नाही. त्यांच्या तब्बेतीचा पुरेपूर विचार करून त्यांचे कामाचे तास आहेत. 

आनंदवनात एक जागा आहे जिथे "श्रद्धेय बाबा आमटे  आणि साधना ताई " यांची समाधी आहे. आपल्या शरीराचा निसर्गाला उपयोग व्हावा म्हणून बाबांची  त्यांना अग्नी देऊ नये अशी इच्छा होती . म्हणून ते गेल्यावर त्यांना एके ठिकाणी पुरले गेले. आणि मेल्यानंतर हि बाबांच्या कुशीतच राहावे म्हणून त्यांच्या शेजारी साधनाताईंनाही त्यांच्या निधनानंतर तिथेच पुरले गेले. यावर कुठलीही समाधी बांधली जाऊ नये अशी बाबांची इच्छा होती म्हणून तिथे एक चौथरा बांधून तिथे निरनिराळ्या प्रकारची फुलझाडे लावली जातात.

त्यासमोरच आहे ते अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरण शिला. सुरवातीला यांना  लग्नाचा अधिकार हि नव्हता. साधनाताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो मिळवून दिला. पण त्यांना प्रजननाचा अधिकार नव्हता,  का तर मुलाला हि होईल आजार. म्हणून त्यांचे कुटुंबनियोजनाचे ऑपेरेशन करून त्यांचे लग्न लावून दिले जायचे. आणि मग तिथे आलेल्या एखाद्या मुलाला हे  जोडपे वाढवत असे. मुलाला पालक मिळत व त्यांची मुलाची इच्छा पूर्ण होत असे आणि एक कुटुंब पूर्णत्वास येत असे . पण पुढे जाऊन सौ. भारती ताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो अधिकार हि मिळवून दिला. यात त्यांना किती जणांशी लढा द्यावा लागला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. त्या वेळी त्या न जन्मलेल्या बाळांची म्हणजेच अनाम मूक कळ्यांची स्मरणशिला. आणि आनंदवन उभारताना नाईलाजाने थोडी वृक्षतोड करावी लागली म्हणून त्यांची आहे अनाम वृक्षांची स्मरणशीला. आपण इथे दुसऱ्याला किती दुखावले तरी माफी मागत नाही, आपला अहंकार जपून ठेवतो. आणि इथे दोष न देणाऱ्या गोष्टींचीही माफी मागितली गेली. किती मोठी गोष्ट शिकवून जातात हि माणसे.

त्या शेजारी बाबांच्या "भारत जोडो" अभियानाची (sea to snow)  काही क्षण चित्रे आहेत. बाबांना पाठीचा त्रास होता, त्यामुळे ते एक तर चालत किंवा झोपून राहत. तर या अभियानात त्यांनी ज्या बस ने प्रवास केला ती बस कम अँबुलन्स तिथे उभी आहे. 
 
आनंदवनात एक खूप चांगला नियम आहे इथे माणूस गेल्यावर त्यांच्या नावाने एक वृक्ष लावला जातो आणि त्याचे पालनपोषण केले जाते. लंडन मधल्या एका ख्रिस्ती व्यक्तीने आपल्याला मरणोत्तर आनंदवनात विसावा मिळावा म्हणून स्वतःला अग्नी द्यायची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे त्यांना अग्नी देऊन नंतर त्यांच्या अस्थी आनंदवनात आणून पुरल्या गेल्या. आज त्यांचे हि स्मरण स्थान तेथे आहे.

इथे अजून एक उपक्रम राबवला जातो ज्याचे नाव आहे आनंदवन घन वन प्रकल्प. आपण साधारण ३ फुटावर एक झाड लावतो. पण इथे एक एक फुटावर झाडे लावली जातात. जेणेकरून कमीतकमी जागेत घनदाट जंगल तयार होईल, आणि त्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळेल. जपान मधून आलेल्या मियावाकी यांनी हि कल्पना सुचवली होती. आज आनंदवनातील या प्रकल्पाचे अनुकरण बऱ्याच ठिकाणी केले जाते. 
 
 "टाकाऊ पासून टिकाऊ" हि संकल्पना पुरेपूर अनुभवली ती आनंदवनात. कुठलीही गोष्ट वाया न घालवता त्याचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे इथे येऊन बघण्यासारखे आहे. डॉ. विकास भाऊ आमटे यांना डॉक्टर म्हणावे कि इंजिनिअर हा मोठा यक्ष प्रश्न आहे. हुद्द्याने डॉक्टर असलेल्या या वल्ली ने आनंदवनात आणि सोमनाथ इथे केलेल्या वास्तू हे इंजिनीअरिंग चे उत्तम उदाहरण आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय हे अनुभवायला मिळते ते इथेच. 

आनंदवनाला " स्मार्ट व्हिलेज " म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आपल्याला फार कौतुक आहे चीन चे कि त्यांचे उत्पादन जास्त कारण त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची सोय आहे, शाळा आहे सर्व काही आहे. मीठ आणि तेल सोडले तर इथे सगळ्याचे उत्पादन करते. पण आपल्याला आपल्याच देशात असलेल्या आनंदवनात हे असेच आहे याची पुसटशी कल्पना हि नाही (खूप जणांना नसेल). कदाचित आनंदवन हे एकमेव असे गाव असेल जिथे एका पूर्ण गावाचे एकच रेशन कार्ड आहे. ज्या नागरिकांना त्यांची बोटे वाकडी झाल्यामुळे, किंवा नसल्यामुळे सरकार आधार कार्ड देऊ शकत नाही, त्यांना त्यांची सरकारी ओळख देऊ शकत नाहीत . त्याच लोकांना आंदनवानाने त्यांच्यातले गुण जाणून त्यांना स्वतःची ओळख दिली. 

आपल्याकडे आंतरजातीय विवाह  असतो. पण आनंदवनात एक आगळी वेगळी कल्पना राबवली जाते इथे असतो अंतरदिव्यांग विवाह. मूक , बधिर, अंध मुलांचा. पण असे असले तरी त्यांना होणारी बाळे हि सुधृढ आणि कुठलेही व्यंग नसणारी असतात. 

ज्या लोकांना आपल्याला हात लावावासा वाटत नाही अशा लोकांना घेऊन वसवलेले हे गाव.  इथली स्वच्छता, शिस्त आणि मॅनॅजमेन्ट आपल्याला लाजवेल अशी आहे. रिकाम्या झोळीत आपण बरेच काही भरून घेऊन येतो. आजही ज्या लोकांना कुष्ठरोगा बद्दल गैरसमज आहेत ना त्यांनी नक्कीच भेट द्यावी इथे. जरा जराश्या गोष्टीचा आपण बाऊ करून बसतो. इथे बोटं नसलेली , किंवा वाकडी असलेली लोकं किती अप्रतिम कलाकृती तयार करतात. इथे कुणाच्या हि चेहऱ्यावर मरगळलेले भाव नाहीत. सगळेच प्रसन्न आणि टवटवीत. आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वच्छताप्रिय. इकडे काम हि एक श्रद्धा आहे. फक्त उदरभरणाची सोय नाही. इथे वृध्दाश्रमातल्या आजी हि आम्ही भेटायला गेल्यावर अगदी आनंदी झाल्या होत्या. आम्ही नुसता नमस्कार म्हटले तरी आम्हाला भरभरून आशीर्वाद देत होत्या. 

आज श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई नंतर त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास भाऊ आणि त्यांच्या पत्नी (डॉ) सौ . भारतीताई   आमटे यांनी त्याच श्रद्धेने आणि भक्तीने तो वारसा पुढे चालवला आहे. आपण सेलिब्रिटीज ना , किंवा पडद्यावरच्या नायक नायिकांना भेटायला खूप उत्सुक असतो . त्यांच्या जीवनात काय सुरु आहे याची हि आपल्याला फार उत्सुकता असते. पण खरे उत्सवमूर्ती तर आम्ही याची देही याची डोळा आनंदवनात पहिले. हात गगनात पोहचले असताना पाय जमिनीवर रोवलेले. आपल्याकडे विठ्ठल रखुमाई आहेत आनंदवनात " बाबा आणि साधना ताई नंतर " " डॉ. विकास भाऊ आणि सौ.(डॉ) भारती ताई " याच आनंदवनाच्या लोकांच्या विठ्ठल रखुमाई आहेत. म्हणूनच कदाचित आनंदवनात एकही देऊळ नाही. इथे जात पात नाही. धर्मभेद नाही. आरक्षण नाही. इथे आहे ती फक्त आणि फक्त माणुसकी, श्रद्धा माणसाची माणसावरची, आणि विश्वास. हल्ली शहरांमध्ये जन्मदात्यांना हि सांभाळायला मुलांना जीवावर येते. इथे तर इतके मोठे कुटुंब सांभाळायची जबाबदारी किती सहज उचलली जातेय.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कि काही थोर कर्तृत्व नसताना डॉ. विकास भाऊ आमटे आणि सौ. (डॉ)भारती ताई आमटे यांच्याशी आम्हाला संवाद साधता आला. अर्थात आम्ही सगळे निःशब्द होतो. पण त्या वेळात जे काही श्री. विकास भाऊंच्या मुखातून ऐकले ते काळीज पिळवटून टाकणारे होते. किती वेळ तरी डोळे भरून आले होते आणि मन दुःखी झाले होते. 

पु.ल . देशपांडे यांनी आनंदवनाविषयी एक वाक्य म्हटलं होते " पर्यटक म्हणून जा आणि परीवर्तित होऊन या."  हे वाक्य किती खरे आहे याची प्रचिती नक्कीच येते. अगदी खूप नाही पण ५% बदल तर नक्कीच होतो. आपण किती मी पणात जगतो याची लाज वाटायला लागते. 

हा लेख ज्यांना आवडला त्यांनी कृपया हा आपल्या मित्रपरिवरात शेअर करा. जेणे करून थोडेसे का होईना आपल्याकडून जनजागृती होईल. आणि शक्य असल्यास आनंदवन ला भेट ही जरूर  द्या. दगडी देव तर आपण नेहमीच बघतो...जिवंत देव बघितल्याची प्रचिती एकदा घ्यायलाच हवी.

हा लेख म्हणजे फक्त अडीच दिवसात मी अनुभवलेलं आनंदवन आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व. पण हा लेख अंतरंगीच्या अगदी खोलातून आलेला लेख आहे.  खरंतर अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे कारण हा विषय असा ठराविक शब्दात मांडण्याचा विषय नाही. मी फक्त १% प्रयत्न केला आहे. 
 दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती 


छोटी सतरंजी बनवताना

मोठी सतरंजी बनवताना

आनंदवनातील हॉस्पिटल

भाताचे तूस, कणीसाचे साल, केळीच्या झाडाचे साल वापरून केलेली भेटकार्ड

श्रध्येय बाबा आमटे आणि साधनाताईंचे समाधी स्थळ

काष्ठशिल्प विभाग

कापडाच्या तुकड्यांपासून बनविलेले भेट कार्ड

सोलर पॅनल आणि डोम आकाराचे घर


ख्रिस्ती व्यक्तीचे स्मरण स्थान

हेल्थ ए टी एम मशीन

संधी निकेतन

आनंदवनातील स्वयंपाकघर


बायोगॅस प्लांट




अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरणशीला

आनंदवनातील हातमाग










Saturday, 12 October 2019

आई

हा ब्लॉग कदाचित माझ्या भावनांचा निचरा करण्याचा प्रयत्न आहे. 

आपल्याला शाळेत नेहमी निबंध लिहायला देत असत. विषय अगदी ठरलेले असत. माझा आवडता नेता, प्राणी, मला पडलेलं स्वप्न किंवा मी अमुक अमुक झालो तर. या सगळ्याच विषयाबरोबर एक विषय असायचा माझी आई, माझे बाबा हा विषय जास्त कधी कुणी लिहिलेला मला तरी आठवत नाही. कदाचित तेव्हा नोकरी करणाऱ्या आई नसतील जास्त. 

पण तरीही आई हा विषय दिला कि सुरवात ठरलेली असायची. माझ्या आईचे नाव हे आहे. ती घरात अमुक अमुक कामे करते. मला डबा करून देते, माझा अभ्यास घेते, माझ्या आई ला हे आवडते, ते आवडत नाही. . असे बरेच काही .... आणि मग शेवटचे वाक्य म्हणून माझी आई मला खूप आवडते. अगदी साधा सरळ आणि मनस्वी निबंध. बाई हि त्याला १० पैकी ८ गुण तरी द्यायच्या. त्याही आईच होत्या ना मुलांना नाराज कसे करणार. 

मग जसे जसे मोठे होत गेलो तसे आईचे महत्व वाढत गेले आयुष्यातले, पण दुर्दैवाने कधी कधी ते त्या वेळी लक्षात नाही येत. आई नोकरी करणारी असो किंवा घरी राहणारी तिचे विश्व म्हणजे तिचा संसार आणि तिची मुले. मुलांच्या शाळा , कॉलेज, अभ्यास खाणे पिणे .... तिला काय माहित नाही असे होत नाही. पण आपल्या मुलांना किती ठाऊक असतात आपल्या आईच्या आवडी निवडी. आपण जसे मोठे होत जातो तसे आपण आपल्या विश्वात रमत जातो. शाळा , कॉलेज, मग नोकरी, आणि मग लग्न. या सगळ्यात आपले आई कडे लक्ष देणे राहूनच जाते. हल्ली तरी मदर्स दे, फादर्स डे च्या निमित्ताने आणि या सोशल मीडियामुळे का होईना थोडा मुलांना आईबद्दल थोडी फार माहिती असते. 

कसे असते ना जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा  कितीतरी गोष्टींमध्ये आई आपल्याला ओरडत असते , हे करू नको , ते करू नको. तेव्हा आपण किती वैतागतो ना आई वर. खास करून मुली ... कि किती बंधन घालते हि आपल्यावर. पण हीच गोष्ट जेव्हा आपण आई होतो तेव्हा कळते. कधीतरी किती वेळा तरी आपले अगदी वाद हि होतात तिच्याशी. आईचे प्रेमच नाही माझ्यावर असे हि मनात बोलून जातो कधी कधी आपण. त्यावेळी फक्त राग असतो ना डोक्यात. ती बिचारी आपल्याला ओरडून विसरून हि गेलेली असते तिच्या बाकीच्या कामांच्या गडबडीत. आपण अगदी अबोला हि धरून मोकळे होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात तेव्हा एक तर तिचे वय झालेले असते किंवा ती आपल्यात नसते. किंवा आपण आपल्या संसारात जेव्हा तिची भूमिका करतो तेव्हा सगळे आठवते.

दुर्दैवाने आज माझी आई माझ्या सोबत नाही. तसा मला माझ्या आईचा सहवास फार कमी लाभला. लहानपण आजी आजोबांकडे गेले, मग कॉलेज आणि लगेचच लग्न. त्यामुळे हवा तसा वेळ तिच्या सोबत नाही घालवता आला. लांब राहिल्यामुळे मला वाटायचे कि माझ्यावर आई चे प्रेम कमी आहे माझ्या इतर दोन भावंडांपेक्षा. पण हे किती चूक होते हे कळायला उशीर झाला .

तश्या आईच्या आठवणी आहेत खूप पण तिचा मला जास्त सहवास आठवतो तो तिच्या शेवटच्या दिवसातला. तिच्या बरोबर घालवलेले ते हॉस्पिटल मधले २० दिवस. माझ्या आईला इतके खचलेले मी कधीच बघितले नव्हते. तिला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर दिसायचा पण काही करण्याची वेळ निघून गेली होती. आणि आताही कधी आई स्वप्नात आली तरी ती हॉस्पिटलमध्येच असते. 

एकच समाधान कि मला त्या शेवटच्या दिवसात माझ्या आईची सेवा करायला मिळाली. नाहीतर आयुष्यभर स्वतःचे मन खात राहिले असते कि आई साठी आपल्याला काहीच करता आले नाही. आज माझ्या कितीतरी मित्र मैत्रिणींच्या आई या जगात नाही. कुणी अगदी अचानक निघून गेल्या, त्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना आता येते कि त्यांना कितीतरी करायचे असेल आई साठी आणि काही करायची संधीच मिळाली नाही . त्यावेळी त्यांना सांगायचो कि तिचे आयुष्यच तेवढे. पण जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा जाणवले. कि आई आहे तोपर्यंत खरेच तिची खरी किंमत कळात नाही पण ती गेल्यावर जाणवते कि किती मोठी पोकळी तयार झालीय. 

आईच्या हातच्या स्वयंपाक हा आपल्या सगळ्याच्या आवडीचा विषय. माझ्या आईसारखा स्वयंपाक दुसऱ्या कुणाचाच नसतो हि आपल्या सगळ्यांचीच भावना. आमचेही तसेच , माझ्या आईच्या हाताचे चिकन, वडे, पुरणपोळ्या, शिरा, रव्याचा लाडू याची चव आहाहा !!!!. अगदी साधी डाळतांदूळाची खिचडी केली तरी ती हि सुंदरच. दिवाळीच्या फराळात चकल्या , कधीच नरम नाही झाल्या अगदी कुरकुरीत . तिच्या रेसिपीने मी करून पहिले पण आमच्या क्षणिकच कुरकुरीत. आणि करंज्या तर अगदी पांढऱ्या तरी अजिबात कच्च्या नाहीत. तसे सगळेच जेवण खूप रुचकर.. आंबोळ्या आणि काळ्यावाटाण्याचं सांबार ... सगळेच. आजही मी काही बनवले तर माझी मुलगी लगेच म्हणते शीलू आजी ची टेस्ट नाही याला.

आता हि काही जणांचे म्हणणे असते move on हे घडतच राहते. खरे आहे पण आई ती आई असते आयुष्यात किती पुढे गेलो तरी तिच्या कौतुकाची नेहमीच कमी जाणवते. अडत कुणाचेही कुठेही नाही पण तिची उणीव वेळो वेळी जाणवते. 

माझ्या  नशिबाने मला आईसारखी माया करणाऱ्या अजून तीन व्यक्ती मिळाल्या अर्थात आईची उणीव नाहीच भरून निघू शकत पण त्या तिघी आई समान आहेत मला. एक तर माझ्या सासूबाई . दुर्दैवाने त्याही नाहीत आता पण सूनेपेक्षा मुलीसारखे जास्त वागवले त्यांनी मला. त्याच्या सोबत खूप फिरले. विरार ला आल्या कि त्यांच्या हातचे स्पेशल पदार्थ नेहमीच करून देत. सासुरवास मधला सा हि कधी जाणवू दिला नाही त्यांनी. दुसऱ्या म्हणजे पांचाळ काकी ... खरे तर या माझ्या शेजारी पण अगदी आईसारख्या. घरातले कुणाचे आजारपण असो, काही अडचण असो सतत पाठीशी. माझ्या आजारपणात जसे माझ्या आईने माझ्या हातात सगळे दिले तसे त्यांनी माझ्या आजारपणात केले. अगदी मनापासून. माझ्या घरी काही कार्य असले कि माझ्या पेक्षा त्यांनाच चिंता जास्त. आईसारखा त्यांचा ओरडा हि गोड वाटतो. त्यामाझ्या आईसारख्या आहेत म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मी त्यांची मानसकन्या आहे. आणि तिसऱ्या आमच्या शेलारकाकी. कौतुकाच्या ठिकाणी कौतुक आणि चुकले कि तिथेच ओरडणाऱ्या. दिवाळीला न चुकता भेटवस्तू देणाऱ्या. कडक शिस्तीची आई असे म्हणू शकतो आपण. 

खरेच जाणारा माणूस जातो आपले आयुष्यही सुरळीत सुरु राहते. पण त्या आठवणी सतत आपल्या मनात ती ज्योत तेवत ठेवतात. आणि आईशी तर आपली नाळ जोडलेली असते. मग move on असे म्हणून ती अशी कशी तुटेल ना?

खरेच आहे पण आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. 

आणि आपण सगळे निबंधामध्ये लिहायचो तसे म्हणून माझी आई मला खूप आवडते ...... 

अजून खूप सारे होते लिहिण्यासारखे पण लिहिताना डोळे जास्तच भरून येत असल्यामुळे शक्य नाही लिहिणे...