Friday, 15 June 2018

प्रीती शेणॉय


प्रिती म्हणजे नाकासमोर चालणारी सरळ साधी आणि नाकासमोर चालणारी मुलगी. असे एका वाक्यात तिचे वर्णन करता येईल.  तिच्यासोबत माझ्या भरपूर आठवणी आहेत. खरे तर विरार मधली ती माझी पहिली मैत्रीण. शाळेत जाता येताना सतत आम्ही एकत्र असायचो. आम्ही क्लास ला ही एकाच होतो आणि कॉलेजलाही. जसा संदिती चा माझ्यावर विश्वास आहे तसा तिचा ही आहे नक्कीच म्हणून तर कॉलेज ला जाईन तर मुंबईत आणि ते ही मिलन असेल त्या यावर ती ठाम राहिली.
आम्ही दोघी जवळ राहायचो त्यामुळे आम्ही शाळेत एकत्र.  दहावीत वर्गच सेम आल्यामुळं तर वर्गापर्यंत सोबत. प्रीती चे अक्षर म्हणजे मोत्याचा दाणा. प्रिती खूप मेहनती मुलगी. मला तिची फार मजा  वाटायची परीक्षेचे  इतके टेन्शन घ्यायची ना ती की बापरे , मला वाटायचं आपण इतके निष्काळजी आहोत की काय ? पण नंतर हळू हळू सवय झाली तिच्या स्वभावाची. तशी इतरांना अबोल वाटणारी प्रिती माझ्या सोबत फार बोलते.
आम्ही कॉलेज ला होतो तेव्हाची गोष्ट तिचे ऍडमिशन थोडे लेट झाले त्यामुळे तिचा कॉलेज चा पहिला दिवस होता तेव्हा आम्ही रुळलो होतो कॉलेजमध्ये. अगदी गेटवर मुले असली तरी ही मला पुढे करायची. आणि मग ती बाजूला झाली की ती आत यायची. इतकी लाजाळू. कॉलेजमध्ये मी आणि सारिका मला वाटते आम्ही दोघीच मैत्रिणी होतो तिला. सारिका आणि तिचा एक ड्रेस अगदी सेम होता तिचा काळा आणि सरीकचा जांभळा. दोघी एकाच दिवशी तो घालून आल्या होत्या आम्ही किती हसलो होतो बापरे. तसे पाहायला गेले तर आम्ही दोघी तशा अंधश्रद्धाळू होतो तेव्हा. म्हणजे आमचा एक एक ड्रेस होता तो unlucky आम्हाला. कुठे जाताना मांजर आडवे गेले की थांबायचो. एक साळुंखी दिसली की एकनेकींना बघू नको म्हणून सांगायचो. मजा होती सगळी.
ट्रेन मध्ये तर वेगळीच गंमत. पाच वर्षे आमची जायची आणि यायची अशा दर वर्षी दोन ट्रेन निश्चित असायच्या. आम्ही अशा होती ती ना की ट्रेन रिकामी असली की दारात हवा खायला उभे राहायचे आणि भरलेली असली की आम्हाला सीट हवी असयाची. ११वी-१२वी संध्याकाळी कॉलेज सुटायचे एकदा का कॉलेज सुटले की आम्ही चक्क धावतच अंधेरी स्टेशन गाठायचो. नेहमीची ट्रेन मिळावी म्हणून धावपळ. आम्हाला सगळे राजधानी विरार लोकल असे चिडवायचे. ट्रेन मध्ये आम्हाला  एक सीट ही पुरायची मी तिच्या मांडीवर बसून यायचे. तिची उंची कमी असल्यामुळे गर्दीत तिला नेहमी त्रास व्हायचा.
ट्रेन मधली अजून एक गंमत अशी की परीक्षेच्या वेळी प्रीती ना जो पेपर असेल त्याच्या नोट्स वाचायला घ्यायची. आणि ट्रेन मध्ये अंधेरी येईपर्यंत तिचे वाचन सुरू असायचे. बाकी जणी मला विचारायच्या अग तुम्ही एकाच वर्गात ना मग तू का अभ्यास करत नाही. मग मी म्हणायचे की ती आम्हा दोघींचा अभयास करतेय. प्रीती ला जरा मोठ्याने वाचायची  सवय होती त्यामुळे ती जे वाचायची ते मला ही ऐकू यायचे.
जाताना आम्ही नेहमी एकत्र पण येताना ती आधी  यायची मी नंतर माझा ग्रुप होता म्हणून जरा टाईम पास करून मग घरी. एकदा दुपारी ती कन्सेशन च्या लाइन मध्ये उभी होती आणि मी निघाले. मी घरी आले आणि जेवायला बसणार इतक्यात प्रीती चा भाऊ शक्ती घरी आला आणि म्हणाला आका कुठेय अजून घरी आली नाही मी म्हटलं अरे ती कन्सेशन घेऊन निघाली असेल. हातातला घास तसाच ठेऊन मी त्याच्या सोबत निघाले. तिचे दोन चुलत भाऊ आले होते घरी तिची आई तर पार घाबरून गेली होती. मलाही टेन्शन आले करण प्रीती अशी न सांगता कुठे जाणारी मुलगी नाही. तिच्या एका भावाने रेल्वेच्या इथे जाऊन पण चौकशी केली की काही अकॅसिडेंट ची केस आलीय का? नशिबाने तसे काही नव्हते. वाट पाहून आम्ही हैराण शेवटी ५.३० ला या बाई आल्या. कन्सेशन फॉर्म संपले होते म्हणून ती लायब्ररी मध्ये जाऊन बसली होती आणि फॉर्म आल्यावर घेऊन घरी आली. सगळ्यांच्या जीवात जीव आला. ती पहिली आणि शेवटची वेळ की तिने असे आम्हाला घाबरवून सोडले नंतर नशिबाने जेव्हा जेव्हा काही गोंधळ झाले आम्ही एकत्रच होतो.
आमच्या त्या ७-८ वर्षाच्या सोबती मध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या. मग ते टायपिंग क्लास ला जाणे असो किंवा परीक्षेचे सेंटर असो. अगदी एम्प्लॉयमेंट चे कार्ड काढण्यापासून , पोस्टात भरती आहे म्हणून तिथे जाऊन अर्ज करणे असो. पण हे सगळे करताना आम्ही  आमचा व्यवहार मात्र क्लिअर ठेवला. अगदी कॉलेज च्या कन्सेशन फॉर्म चे २५ पैसे ही आम्ही एकमेकींना देत असू.
प्रीती च्या घरी अभ्यासाला जाणे म्हणजे मजा होती. तिला एखादी गोष्ट ( अभ्यासातील अडचण) समजावण्यात अर्धा वेळ जात असे मग थोडा अभ्यास आणि मग तिच्या आईने केलेल्या पदार्थांवर ताव मारणे. माझा रविवारी सकाळचा नाश्ता त्यांच्याच घरी. प्रीती ला मासे खूप आवडतं मग तिची आई खास तिच्यासाठी बनवत असे.
प्रितीने कॉलेज ला कधी जास्त मजा मस्ती केलेली आठवतच नाही. कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज बस इतकेच. कॉलेज मधले काही ठराविक डेज ला ती येत असे. पण कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मात्र ती आवर्जून येत असे. ते झाले की खाऊ गल्ली , गेट वे ऑफ इंडिया अशी आमची भटकंती करून मग विरार हे दर वर्षीचे आमचे रुटीन होते.
आमच्या कॉलेज च्या रस्त्यावर बस स्टॉप होता. तिथे उभे राहणारया माणसांना बघून प्रीती नेहमी म्हणत असे की आपण कधी जाणार ग असे बस ने कामावर. देवाने तिचे म्हणणे लवकरच ऐकले पण ज्यावेळी खरेच बस ने जायची वेळ आली तेव्हा मात्र तिला ब्रह्माड आठवले. सगळ्याला मिलन सोबत लागणारी प्रीती जेव्हा एकटी अगदी पार उत्तर मुंबई मध्ये जॉब ला लागली तेव्हा मला खूप छान वाटले.
आम्ही इतकी वर्षे एकत्र होतो पण आमचा दोघींचा एकत्र असा एकही फोटो नाही. कधी कधी ज्यांच्या सोबत आपले खूप फोटो असतात त्यांच्या पेक्षा ज्यांच्या सोबत आपल्याला फोटो काढायची आठवण राहत नाही असे लोक आपल्या जास्त जवळचे असतात.
इतक्या वर्ष  आम्ही एकत्र होतो पण कधी अमच्यात वाद झाले नाहीत . रुसवे फुगवे गैरसमज याला कधी जागा होऊच दिली नाही. पण अभ्यासावरून मात्र प्रिती नेहमी बोलायची मला. तिचे आणि तिच्या आईचे ह्याबाबतीत एक मत होते. माझ्याकडे हुशारी होती पण मेहनत कमी , आणि प्रीती कडे मेहनत खूप होती. कॉलेज सोडून आज २१ वर्ष झाली या २१ वर्षात आम्ही जेमतेम १० ते १२ वेळा भेटलो आणि अगदी वर्षातून एकदा ते दोनदा बोलतो फोन वर. प्रीती त्याही वेळी मनात असून काही गोष्टी एन्जॉय करत नसे आणि आजही नाही करत. घर संसार हेच तिचे सर्वस्व आहे . भले ती मी १० वेळा बोलवून ही कुठेही गेट टू गेदर ला येत नाही. पण ते फक्त तिच्या जबाबदारी मूळे. मला गर्व आहे की देवाने मला एक सच्ची, मनाने अगदी साफ आणि एक उत्कृष्ट गृहिणी असलेली मैत्रीण दिली.


Monday, 11 June 2018

रिप्लाय


खरेतर मला या लेखाचे नाव उत्तर असे ठेवायचे होते पण उत्तर म्हटले की  प्रश्न आला आणि प्रश्न म्हटलं की सगळयांनाच भीती वाटते . म्हणून म्हटले आपल्या  सगळ्यांना जवळचे किंवा परिचित असलेले नाव देऊ म्हणजे आवडीने लेख वाचाल 😉.
एक असा शब्द जो आपल्यासगळयांनाच हवा हवासा आहे . आता तर हा शब्द  रोजच्या वापरातला शब्द झालाय. पूर्वीच्या उत्तर या शब्दाची जागा ' रिप्लाय' ने घेतली असे म्हणू शकतो आपण. 
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दोन रिप्लाय जास्त महत्वाचे असतात एक म्हणजे नोकरी साठी येणारा आणि दुसरा लग्नाच्या वेळेचा.  
आताच्या काळात या वाढत्या सोशल मीडिया मुळे या रिप्लाय ला अंमळ जास्तच महत्व प्राप्त झाले आहे. आपण एखादा मेसेज किंवा पोस्ट टाकली की त्यावर कुणाकुणाचा आणि काय रिप्लाय आला आहे हे पहायची आपल्याला खूप उत्सुकता असते.
सगळ्यात कठीण असते या रिप्लाय ची वाट पाहणे. आपण एखाद्याला मेसेज केला त्या व्यक्तीने तो मेसेज वाचल्यावरही त्याचा रिप्लाय न येणे आणि आपण त्याची वाट पाहत राहणे या सारखे दुसरे कंटाळवाणे काम नाही.
खूप जणांची अशी अपेक्षा असते कि त्यांचा मेसेज आला की त्याला ताबडतोब रिप्लाय करावा. पण हेच जेव्हा कोणी त्यांच्या कडून अपेक्षा  ठेवते तेव्हा ते मात्र बिझी असतात. आमच्या शाळेच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर हा अनुभव आम्ही खूप वेळा घेतो. पिकनिक असो किंवा काही इतर आम्ही अगदी रोज मेसेज टाकतो पण काही ठराविक लोक सोडले तर कुणालाही वेळ नसतो रिप्लाय करायला.तर काही जण असेही असतात की मेसेज वाचतात पण रिप्लाय देणे सोईस्कर पणे टाळतात. अणि अशा लोकांना विचारले की काय झाले रिप्लाय नाही दिला तर यांची कारणे  ही ठरलेली असतात अरे पहिलाच नाही किंवा उशिरा पहिला , किंवा मग रिप्लाय करू च्या नादात राहून गेला. आता यावर काय बोलणार ना आपण😕
पूर्वी बरे होते एकदा पत्र पाठवले की ते पोचून परत तिथून त्याचे उत्तर येईपर्यंत वाट पहायची. त्या वाट पाहण्यात ही एक वेगळीच मजा होती. कोणी गेले किंवा वाईट बातमी असली की तार  करायची. तार आली की घरातले सगळेच घाबरायचे.  हल्ली मात्र जरा काही झाले की मेसेजेस टाकले जातात. आणि  त्यावर पटापट सगळ्यांचे रिप्लाय ही येतात.
कुणी गेल्याच्या बातमीवर आपण RIP रिप्लाय देतो, साधे भावपूर्ण श्रद्धांजली इतकेही आपण लिहू शकत नाही. वाढदिवसाला HBD रिप्लाय करतो.  ओके ला फक्त 'K' , थँक्स ला फक्त 'ty'  असे लिहिणाऱ्यांचा मला राग येतो. काय इतके जड असते या लोकांना दोन शब्द जास्तीचे लिहायला. कुणीतरी आपल्याला केलेल्या अभिनंदनाचा हा असा रिप्लाय करावा. सगळ्यात जास्त राग येतो ते *hmm* असा जेव्हा समोरून रिप्लाय  येतो. आपण काहीतरी पोटतिडकीने लिहीत असतो त्यावर नुसते hmm hmm. फोनवर बोलताना ही बऱ्याच वेळा असेच असते आपण बोलत राहतो आणि समोर्चाई व्यक्ती हूं की चू करत नाही. नक्की फोन सुरू आहे का ठेवला हेच कळत नाही.  तर कधी कधी एखादी व्यक्ती इतके बोलते ,मेसेज करते की त्याना काय रिप्लाय द्यावा हा मोठा यक्षप्रश्न असतो.
मला तर या रिप्लाय मधल्या ईमोजी प्रकारचे काही कळतच  नाही. नक्की कुठला ईमोजी कशाला पाठवायचा हेच कळत  नाही.  एकदा गंमत झाली माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलाचा कराटे चा एक व्हिडिओ टाकला होता मी त्याला डोळे मोठे वाली म्हणजे आश्चर्य वाली ईमोजी टाकली. तिचा रिप्लाय आला का ग लाल केला चेहरा?? मग मी तिला सांगितलं की मी आश्चर्य वाली आहे म्हणून टाकली आणि तिला वाटले ती रागाची आहे. तिने आणि मी दोघींनी कबुल केले की नक्की काय आहे माहीत नाही. आणि आम्ही दोघी स्वतःच्या अज्ञानावर मनसोक्तपणे हसलो( अर्थात ते ही ईमोजी मध्ये). 
पण काही वेळा या रिप्लाय तितकाच रोमँटिक असतो जेव्हा प्रियकर किंवा प्रेयसीने लिहिलेल्या Love you ला me too असा रिप्लाय येतो. किंवा एखाद्या छानश्या फोटो ला kiss चे ईमोजी येतात. दिवसभराच्या त्यांच्या गप्पा झाल्यावर येणार सी यू आणि टेक केअर चा रिप्लाय. खूप वाद झाल्यानंतर येणारा सॉरी चा मेसेज.
खरेतर आपण या व्हर्चुअल जगात इतके समरस झालोय ना की कधी कधी नुसत्या येणाऱ्या ईमोजी आणि हं च्या रिप्लाय वर आपण  समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हे असे येणारे कोरडे रिप्लाय त्यावरच आपण समाधान मानायला लागलो आहे. कसलाही अतिरेक वाईटच.

आधी पत्राला उत्तर देणे होते, मेल ला रिव्हर्ट करणे होते, लग्नाला होकार नकार कळविणे होते, उत्तराला प्रतिउत्तर होते, खळखळून हसणे होते, भरभरून रडणे होते, रागावणे होते, रुसणं होते, कौतुकाने कुरवाळणे होते, पाठीवर थाप देणे होते, भेटणे होते बोलणे होते बऱ्याच गोष्टी होत्या ज्यात जिवंतपणा होता , आता मात्र त्या सगळ्याची जागा या *रिप्लाय* ने आणि मोबाईल मधल्या हसऱ्या रडक्या निर्जिव इमोजीनी घेतली. या व्हर्चुअल जगातून बाहेर येऊन खरी *उत्तरे शोधुया.

आणि हो माझ्या या ब्लॉग वर नक्की रिप्लाय करा हा😉





Friday, 18 May 2018

कंटाळा

काय झालंय हल्ली कळत नाही कुठल्या कामात उत्साह वाटत नाही. काही करावंसं वाटत नाही. नुसते आरामात बसून राहवेसे वाटत. पुस्तक वाचायला घेतले की १०-१२ पाने वाचून झाली कि कंटळा येतो. मनात विचार खूप असतात पण लिहायला घेतले की एक वाक्य ही पूर्णसुचत नाही. सगळीकडे मन ब्लॉक झाल्यासारकखे झालेय. नको नको ते  विचार येतात मनात. कधी कधी स्वयंपाक करायचा ही  कंटाळा  येतो. पॉसिटीव्ह  असे काही वाटतच नाहीये. असे वाटते सगळे सोडून कुठंतरी लांब निघून जावे. सगळ्यांपासून लांब एकांतात कुठेतरी.  पण आपण सामान्य माणसे असे नाही करू शकत ना!! आपले संसार आपल्या जबाबदाऱ्या असे अचानक सोडून नाही जाता येत ना. शी बाई खूप कंटाळा आलाय म्हणत एक एक दिवस ढकलायचा.
प्रत्येकाच्याच आयुष्यात असे क्षण येत असतीलच ना? म्हणजे आपल्या सामान्य माणसांना असा कंटाळा वारंवार येतो. मला आठवतंय मी लहान असताना अशी वाक्य जास्त कानावर पडत नव्हती. म्हणजे फार क्वचितच. हल्ली मात्र रोज दिवसातून एकदोन जणांकडून तरी ऐकायला  येतेच हे वाक्य" अरे यार!! जाम कंटाळा आलाय!!
रोज ऑफिस ला जाणारी  व्यक्ती असो, ट्रेन ने प्रवास करणारी व्यक्ती असो , शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुले असोत किंवा गृहिणी.
माझी एक मैत्रीण आहे तिला विचारले ना की काय ग काय  करते आहेस तर तिचे उत्तर ठरलेले असते काही नाही ग नेहमीचे काम . कंटाळा आलाय रोज उठा ऑफिस ला या घरी जाऊन परत सगळी कामे करा. रोज तीच कामे करून एक प्रकारचा एकसुरी पण येतो ना.   असेच आपल्यातल्या  बऱ्याच जणांचे होत असते.
अगदी आपण कुठेतरी मस्त सुट्टी घेऊन फिरून आलो तरीही कधीतरी तो कंटाळा जात नाही. म्हणजे ते सुट्टीचे दिवस आपण मजेत घालवतो पण परत एकदा रुटीन ला सुरवात केली की पाहिले पाढे पंचावन्न.
ठीक आहे आपण नोकरदार माणसे कधीतरी कंटाळा आला तर ऑफिस ला सुट्टी घेऊ शकतो किंवा अगदी जेवणाचा कंटाळा आला तर खिचडी टाकू शकतो किंवा हॉटेल मधून मागवू शकतो.  पण मला कधी कधी प्रश्न पडतो समजा एखाद्या नामवंत कलाकाराला असे अचानक वाटले की आज जाम कंटाळा आलाय नाही जायचे शूटिंग ला मग ते लोक काय करत असतील?? म्हणजे त्यांच्या मूड साठी अख्ख शूटिंग रद्द, की त्यांच्याशिवाय बाकीच्यांचे पूर्ण करत असतील? . समजा एखादा क्रिकेटपटू आहे आणि ऐन मॅचच्या वेळी त्याला असे वाटले की आज मूडच नाही खेळायचा तर ??  पहिल्या बॉल ला विकेट टाकून येत असेल का? किंवा गोलंदाजला वाटले च्यायला खूप धुतला अपल्यायला आता गोलंदाजी नाही करायची.. मग तो आपण लहानपणी जा मला नाही खेळायचे म्हणून हातपाय आपटत निघून जायचो तसा निघून जात असेल काय?? की कंटाळा आला म्हणून मुद्दाम वाईट गोलंदाजी करत असेल परत नको द्यायला म्हणून??  किंवा एखाद्या डॉक्टर ला जर ऐन ऑपरेशन च्या दिवशी असे वाटले आज मूड नाही मग?? त्या पेशंट चे काय?? मला पडलेल्या गहन प्रश्नांपैकी हे काही प्रश्न. अजून आहेत पण वाचताना तुम्ही कंटाळून जाल म्हणून एक दोनच सांगितले.  कदाचित  असे प्रश्न सगळयांनाच पडत असतील. .
आताच्या काळात मन रमवायला बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी साधे व्हाट्सअप फेसबुक घेऊन बसलो तरी तास दोन तास असे निघून जातात. पण त्याच्या अति वापराने ही कंटाळा येतो. एखादा नवीन ग्रुप केला की त्यावर पाहिले काही दिवस खूप बडबड होते , आणि काही दिवसानी फक्त पाठवलेले मेसेज पुढे पाठवणे इतकेच. कधी कधी तर त्या ग्रुप ला कंटाळून लोक ग्रुप सोडूनच देतात.
हल्ली तर शाळा कॉलेज मधली मुले तर सर्रास म्हणत असतात "क्या बोर हो राहा है यार, कुछ मजा ही नही" .  सतत मोबाईल वर व्यस्त असणाऱ्या , मित्र मैत्रिणींसोबत प्रत्येक वीकएंड ला मजा करणाऱ्या या मुलाना कसला कंटाळा येतो तेच कळत नाही?  आम्हाला तर या वयात असताना शाळा कॉलेज अभ्यास आणि खेळणे यातून कंटाळा करायला वेळच मिळायचा नाही.पण हल्लीच्या मुलांना सगळे असून का कंटाळा येतो ही खरंच एक संशोधनाची बाब आहे.
हा कंटाळा जोपर्यंत आपल्या मूड शी निगडित असतो ना तो पर्यंत सगळे ठीक असते. कधी न कधी आपण त्या मूड मधून बाहेर येतो. पण हाच कंटाळा जेव्हा आपल्या आयुष्याशी जोडला जातो तेव्हा मात्र त्याचे रूप काही वेगळे असते. प्रेयसी किंवा प्रियकराने फसवले म्हणून आयुष्याला कंटाळून जीव देणारे ही लोक आहेत.  कर्ज झाले ते फेडता येत नाही म्हणून आयुष्य संपवणारे लोक ही आहेत. एखाद्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या आणि आजाराला कंटाळून लोकांनी आत्महत्या केलेल्या बातम्या ही आपण  ऐकतो वाचतो. आताच एक रागंडया पोलीस अधिकाऱ्याने अशीच आत्महत्या केली.  का बरं असे होत असेल?? शारीरिक व्याधीचे कारण असो वा कुणी सोडून जाण्याचे, कुणी आयुष्याला कसे कंटाळून जाऊ शकते?  ते ही इतके टोकाचे की ते संपविण्याची पाळी यावी.
आयुष्य खूप सुंदर आहे त्यापेक्षा ते खूप अनमोल आहे. असे कंटाळून ते संपवणे पूर्ण चुकीचे नाही का? कंटाळा आला कुणाशी तरी बोला. आपल्या आवडी निवडी जपा. मस्त गाणी ऐका , एकटेच स्वतःशी बोला. खूप काही गोष्टी असतात. पण आपण एकच गोष्ट धरून बसतो आणि कंटाळून जातो. कदाचित ह्या व्हर्च्युअल जगात माणसे माणसांना दुरावली आहेत म्हणून हे जास्त घडत आहे. कंटाळा तर प्रत्येकाला कधी ना कधी येतोच पण तो घालवायचा प्रयत्न आपला आपल्यालाच करायचा असतो. सतत काहीतरी नवीन करत रहा. एक करून कंटाळत दुसरी करा. तुमचा मूड आपोआप ठीक होईल.
चला खूप दिवसांनी इतके सगळे लिहून आता मला कंटाळा आला😉
आणि जास्त लिहीलं तर तुम्ही कंटाळा कराल वाचायला.....मला माहित आहे तुम्ही नाही कंटाळणार , फक्त जराशी गम्मत कंटाळा घालवायला😊😊



Tuesday, 3 April 2018

( थँक यू...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स ०२. ०४. २०१८ )

आज मला थँक यू म्हणायचे आहे माझी आई सौ. शीला राणे  आणि तिची खास मैत्रीण सौ मंदाकिनी पेणकर म्हणजेच आमची मंदा मावशी. मैत्री कशी असावी हे या दोघीनकडून शिकावे. माझ्या जन्माच्या आधी म्हणजे १९७६ पासून यांची मैत्री. गोरेगावच्या कदम वाडीत या शेजारी राहायच्या, तिथे झालेली त्यांची मैत्री आज ४१ वर्षानंतर हि तशीच कायम आहे. माझी आई तशी थोडी तापट  स्वभावाची पण तरीही अगदी आम्हाला कळायला लागल्यापासून मी कधी दोघींमध्ये वाद झालेले पहिले नाहीत कि एकमेकींच्या मागून काही बोलताना ऐकले नाही. एकमेकींच्या सुख दुःखात दोघी नेहमी एकमेकींना साथ देतात.   आमचे बालपण जितके आमच्या सख्ख्या मावश्यांकडे गेले तेवढेच हिच्या घरी हि. दोघीनींही एकमेकांच्या मुलांना कधी परकेपणाची  जाणीव होऊ दिली नाही. तिने आम्हाला किंवा आमच्या आई ने तिच्या मुलांना आपण नातेवाईक नाही याची कधीच जाणीव होऊ दिली नाही. आम्हीही अगदी हक्काने तिच्या घरी ८-१५ दिवस मुक्काम करायचो. तिच्या मुलांशी हि आमची आमच्या इतर भावंडांसारखेच नाते होते किंवा  त्यापेक्षा जास्त. सगळे सणवार आम्ही एकत्र साजरे करत असू. आजही कधी वेळे अभावी तिला फोन करता आला नाही किंवा भेटता आले नाही तर ती कधीच आमच्या वर रागवत नाही. आजही त्या दोघीना जरी तब्बेती मुळे वरचेवर भेटणं जमत नसले तरी वर्षातून २-३ वेळा तरी त्या एकमेकींना आवर्जून भेटतात. आणि आता मोबाईलमुळे संपर्कात राहणे आणखी सोपे झालेय . सगळ्या प्रतिकूल परिस्थितून खंबीरपणे वाट काढून   आज वयाची ६० उलटल्यावरही दोघी एकमेकींना धरून आहेत  याचे आम्हा सगळ्यांनाच खूप कौतुक आहे.  या दोघीना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची मैत्री हि अशीच निखळ निर्मल राहो.  प्रत्येकाच्याच  हि आयुष्यात एक तरी अशी मैत्रीण असावी, जी तुम्हाला पूर्णपणे समजून घेईल  अशी ईश्वरचरणी प्रार्थना  करते. 






Friday, 9 March 2018

दीप्ती मदाने ....एक गोड मैत्रीण

१३ फेब्रुवारी २०१५ मी अष्टविनायक ला निघाले होते. बोरिवली ला बस पकडली ट्रॅव्हल्स ची. अंधेरी सांताक्रूझ दरम्यानं एक मुलगी चढली माझ्या बाजूच्या रांगेच्या खिडकीच्या सीट वर बसली. तोंडाला स्कार्फ गुंडाळला होता. बस मध्ये आल्यावर तिने तो सोडला.  बॅग वैगेरे ठेवून झाली. आम्ही एकमेकींकडे पाहून एक स्माईल दिले ही आमची पहिली ओळख.
नंतर जास्त काही बोलणे झाले नाही. महडचा श्री वरद विनायकाच्या दर्शनासाठी आम्ही उतरलो. ती माझ्या पुढेच होती. बस मध्ये चढल्या पासून ती सतत मोबाईल वरच होती. देवळात ही तिचा फ़ोन सूरुच. लाईन पुढे गेली तरी ही तिथेच. मला थोडा राग आला होता देवळात तरी मोबाईल ठेवायचा.  दर्शन झाले आम्ही बाहेर आलो. तिथे नाश्ता करायला थांबलो. तेव्हा ती माझ्या शेजारी बसली होती तरीही आमचे जास्त काही बोलाणे झाले नाही. फक्त हाय हॅलो इतकेच. 
पुढचा गणपती होता पालीचा श्री  बल्लाळेश्वर. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पालीला पोहोचलो. देवळात आमचे दर्शन झाले आणि आम्ही निघणार होतो इतक्यात ही खिडकीतून  आमच्या टूर मॅनेजर ला हाक मारताना दिसली. पण त्याला काही ऐकू गेले नाही. मी तिला विचारले "काय झाले? "ती म्हणाली "अगं! मी पत्रिका ठेवायला आलेय देवळात आणि पत्रिका गाडीतच विसरले आता जाऊन आणायला उशीर होईल". मी म्हटले "थांब ,आपण बोलू त्याच्याशी ". मॅनेजर ला हाक मारली मी माझ्या दणदणीत आवाजात, पुढच्या मिनिटाला तो हजर. जरा आढेवेढे घेतले त्याने उशीर नका  करू , लवकर या वैगेरे. पण आम्ही त्याला थोडा दम भरला तसा तो तयार झाला. आम्ही सगळे बस कडे निघालो ती धावत जाऊन पत्रिका घेऊन आली आणि देवळात देऊन आली. ती बस मध्ये आल्याबरोबर थँक्स म्हणाली. बस मध्ये आमच्या सीट सामोरा समोर होत्या त्यामुळे थोडे फार बोलणे झाले.
आम्ही परत महड ला आलो जेवायला. त्यावेळी मात्र ती माझ्या सोबतच होती. त्यावेळी मग आमचा खऱ्या अर्थाने संवाद सुरू झाला. तिचे नाव होते दीप्ती मदाने . मूळची नाशिक ची ही मुलगी . मुंबई मध्ये नोकरी साठी आली होती आणि मैत्रिणीसोबत अंधेरीला रहात होती. आता तिचे लग्न ठरलं होते. मुलगा बाहेरगावी राहणारा होता लग्नानंतर ती ही त्याच्यासोबत जाणार होती. तिच्या सतत फोनवर असण्याचे कारण माझ्या ध्यानात आले. आता ती अष्टविनायाकाला पत्रिका ठेवायला आली होती.
बोलायला खूप गोड होती. सुरवातीला मला ती थोडी मॉड आणि अखडू  वाटली पण जेव्हा तिच्याशी बोलायला लागले असे वाटत होते की किती वर्ष आम्ही एकमेकींना ओळखतोय.
संध्याकाळी आमची गाडी जेव्हा एका पेट्रोल पंप वर चहा प्यायला थांबली तेव्हा तिने मला विचारले " तू नेहमीच अशी सजून असतेस का?" मला हसायला आले म्हटले " नाही ग,  देवाला आलेय ना म्हणून". म्हणे मला नाही जमणार असे. खरेच एक साधा कुर्ता आणि सलवार , पण त्यातही खूप गोड दिसत होती ती. त्यादिवशी रांजणगावच्या श्री  महागणपतिचे दर्शन करून आम्ही निघालो. आम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले. मला वाटले होते की ती खाईल की नाही. पण आवडीने खाल्ले. तिचा घसा दुखत होता म्हणून मी तिला आल्याची गोळी दिली होती. नंतर तिनं अजून एक मागितली आणि म्हणाली चालेल ना मागितले तर. 
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आधी थेऊरच्या श्री चिंतामणी ला  गेलो. दर्शन करुन आल्यावर तिथे चणे शेंगदाणे वाल्याची गाडी होती  , तिला ते रंगीत  वाटाणे  खायचे होते पण मी म्हटले "घसा दुखतोय मग का खातेस?" मग ती म्हणाली की "चणे खाते " पण शनिवार म्हणून मी तिला ते ही घेऊ दिले नाही. ती ते ही अगदी आज्ञाधारक मुलीसारखे ऐकत होती. तिथून आम्ही सिद्धटेक चा श्री  सिद्धिविनायक केला मग पुढे मोरगाव च्या श्री मयुरेश्वराच्या दर्शनाला गेलो.  त्या दिवशी व्हॅलेन्टाईन डे होता म्हणून आम्ही तिला खूप पिडत होतो.  त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही जेजुरीच्या श्री  खंडेरायाच्या दर्शनाला  गेलो. मला वाटतं होते की मला नाही चढता येणार. पण पूर्ण गड  चढे पर्यंत दीप्ती  माझ्या सोबतच होती. ती पुढे जाऊ शकत होती पण नाही गेली. आम्ही जेव्हा खाली उतरत होतो ना तेव्हा एका दुकानात खंडोबाची गाणी लावली होती , हल्ली जे नवीन  म्युझिक अल्बम येतात तशी. तर ही त्या दुकानासारमोर टीव्ही पाहत थांबली. मी तिला चल म्हटलं तर म्हणे थांब मला आवडलं गाणे नाचावेसे वाटतेय. मला खूपच हसायला येत होते. एकदम लहान मुलीसारखी बोलत होती ती. जेजुरी नंतर प्रति बालाजी करून आम्ही हॉटेल ला परत निघालो. आता उद्या आमची ट्रिप संपणार होती ती म्हणाली की "किती पटकन दोन दिवस संपले कळलेच नाही. फक्त उद्याचा दिवस मग आपण भेटणार नाही , मी रात्री येते तुझ्याकडे गप्पा मारायला". आम्ही साधारण ९- ९.३० ला हॉटेल ला पोहोचलो.  तिची रूम तिसऱ्या मजल्यावर होती आणि माझी पहिल्या. ती पुढे गेली मी जिने चढत होते इतक्यात काउंटर  वर आमच्या मॅनेजर ला कुणीतरी विचारले की रूम नंबर ३०१  मध्ये कोण आहे तुमचे? त्यांचे पार्सल आहे. मला पटकन आठवलं अरे ही तर दीप्ती ची रूम. मी मॅनेजर ला सांगितलं. तो दीप्ती ला हाक मारायला लागला. मी धावत वर गेले ती जिन्यातच होती तिला सांगितले "दीप्ती. अगं! तुझ्यासाठी पार्सल आले आहे." ती मला म्हणाली की "सकाळपासून पिडते आहेस ते पुरे नाही का? आता अजून हे काय नवीन" मी म्हटले "अगं! आपले मॅनेजरच बोलले काउंटर वर पार्सल आलेय दीप्ती चे".  तरी तिला विश्वास बसत नव्हता. शेवटी मॅनेजर ने ते पार्सल आणून दिले तेव्हा तिला विश्वास बसला. आकाशी निळ्या रंगाच्या परडी मध्ये चॉकोलेट, गुलाब आणि ग्रीटिंग होते. ते बघून ती खूप खुश झाली. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने मेहुल ने अमेरिकेत राहून भारतात तिच्या साठी व्हॅलेन्टाईन डे चे गिफ्ट पाठवलं होते. ते पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.  रात्री जेवायला सगळे जमलो तेव्हा तिची खूप फिरकी घेतली होती. मी रात्री ११.३० पर्यंत तिची वाट  पहिली पण ही काही आली नाही.  'का?? ते सांगायची गरज नाही ना!!!
तिसऱ्या दिवशी सकाळी दोन गणपती करून आम्ही परत मुंबई गाठणार होतो. माझी तयारी झाल्यावर मी दीप्ती ला बोलवायला गेले. पहाटे ३.३० पर्यंत मेहुल शी गप्पा मारून झोपल्यामुळे बाई उशिरा उठल्या. तरी पटकन तयार होऊन ती नाश्त्याला आली. तिथे ही तिला गिफ्ट वरून सगळे सतावतच होते. साधारण ७.३० ला आम्ही निघालो तिने  सकाळी आम्हाला सगळ्यांना चॉकोलेटस दिली. आम्ही घेत नव्हतो ते तिचे गिफ्ट होते ना. पण तिने बळेच दिली. मग ओझरचा श्री  विघ्नेश्वराचे  दर्शन झाल्यावर आम्ही दोघीनि वडापाव आणि आईसक्रीम खाल्ले. तिथून पुढे आम्ही लेण्याद्री श्री गिरिजात्मज ला गेलो. तिथे ही ती पूर्ण वेळ माझ्यासोबतच होती. आज आम्हाला आठवण झाली की ह्या तीन दिवसांत आम्ही एकही फोटो काढला नव्हता. तिथे आम्ही मोजून एक दोन फोटो काढले. आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आता एकमेकींना सोडून जाणार म्हणून चुटपुट लागली होती. आम्ही आता परत भेटण्याचे चान्स कमीच होते. ती लग्नानंतर अमेरिकेत जाणार होती. तसे तिने लग्नाचे आमंत्रण दिले होते. पण लग्न नाशिक ला असल्यामुळे ते ही जवळजवळ अशक्य होते मी जाणे. ठाण्याला मी उतरले , शेवटचे टाटा बाय बाय झाले. बऱ्याच छान छान आठवणी घेऊन आम्ही घरी परतलो. एखाद्या लहान बहिणीने मोठ्या बहिणी सोबत करावा असा पूर्ण प्रवास आम्ही एकमेकांसोबत केला.
दोन तीन दिवस झाले तिचा ही काही मेसेज नाही आणि मी ही केला नाही. मला वाटले विसरली बहुतेक.  मी तिला फेसबुक वर शोधले. तिला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली. आणि सहज म्हणून तिचे फोटो पाहायला लागले. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये ती नोकरी करते इतके ठाऊक होते. पण त्याच्याशिवाय ती एक उत्तम गायिका ही आहे हे मला तिचे फोटो पाहिल्यावर कळले. ती क्रिकेट ही खेळते. इंडियन आयडल मधल्या राहुल वैद्य  बरोबर तिने गाण्याचा कार्यक्रम केला होता. तिच्या गाण्यांचे अल्बम ही प्रसिद्ध झाले होते. आणि महान संगीतकार यशवंत देव यांच्याकडून तिला पुरस्कार ही मिळाला होता. बापरे!!! किती हुशार आहे ही मुलगी.. इतकी मोठी असून तिने त्याचा मोठेपणा कधीच मिरवला नाही. मला खूप छान वाटले की अशी मैत्रीण मला मिळाली. पण नंतर विचार केला की मी तिला हे करू नको ते करू नको सांगत होते काय विचार केला असेल तिने?  एकदा मनात विचार आला रिक्वेस्ट कॅन्सल करावी. नंतर म्हटले नको थोडी वाट पाहू आणि मग करू.
तिने माझी रिक्वेस्ट स्वीकारली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तिची लग्नपत्रिका आली. आणि लग्नाच्या  ३-४ दिवस आधी तिचा मेसेज आला नक्की ये असा. लग्नाला जाणे काही जमले नाही. पण नंतर तिचे आणि माझे मेसेजेस वर बोलणे सुरू च राहिले. ती अमेरिकेत गेल्यावर तिने तिचा तिथला नंबर ही मला आठवणीने दिला. तिची आई होण्याची चाहूल लागताच तो ही मेसेज केला तिने की मिलन तू मावशी होणार. आणि मी नेहमी प्रमाणे तिला अभिनंदन करून मग १०० सूचना दिल्या तिला.  अशी ही आमची तीन दिवसांची मैत्री आणि आता ती कोसो मैल लांब पण असे वाटते की किती जवळ आहोत आम्ही.
तिचा नवरा मेहुल मी काही पाहिले नाही  प्रत्यक्षात त्याला पण तो ही तिच्यासारखाच मनमिळावू असणार . फोटो मधून तसे जाणवते. आणि आता त्यांच्या संसारवेलीवर छोटेसे फुल आलेय " रुही" . खूप गोड मुलगी. दिसायला सेम टू सेम मेहुल. ( असा माझा अंदाज). हल्लीच दीप्ती ने ती रियाज करताना आणि रुही ते ऐकतानाचा व्हिडिओ टाकला. रुही इतक्या तन्मयतेने तिचे गाणे ऐकत होती की ते पाहताच माझ्या मनात आले की रुही बहुतेक बोलायला नाही तर  डायरेक्ट गायलाच लागेल. आतापर्यंत आम्ही ऑल राऊंडर दीप्ती पहिली , थोड्या वर्षांनी आपण सगळे ऑल राऊंडर रुही पाहू.  दीप्ती तुला, मेहुल आणि रुही ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. 
खरंच त्या गणपतीबाप्पा चे खूप आभार की त्यांनी इतकी गोड मैत्रीण मला दिली. कधी कधी अनेक वर्ष ओळख असून सुद्धा जी मैत्री होत नाही ती कधी अशा क्षणभराच्या ओळखीने होऊन जाते.   अजून एक योगायोगाची गोष्ट अशी की तिचा आणि माझा वाढदिवस, तिच्या लग्नाचा आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस सगळे एकाच महिन्यात "मार्च".
दीप्ती तुझ्या वाढदिवसानिम्मित ही छोटीशी भेट माझ्याकडून... नक्की सांग हा आवडली का??







Wednesday, 14 February 2018

( रिटर्न गिफ्ट...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स १४. ०२. २०१८ )

 मी दुसरी किंवा तिसरी मध्ये होते. चेंबूर ची 'आमची शाळा' माझी शाळा. रास्ता क्रॉस केला की माझ्या शाळेची इमारत होती. माझी आजी मला शाळेत सोडायला यायची. आजी सोडायला नसेल येणार तर मला शाळेत जायचा कंटाळा येत असे. नेहमी आजी शाळेत सोडून गेली की मी रडायचे, आजीला सोडून शाळेत बसायला नको असायचे. म्हणून थोडा वेळ थांबून मग  आजी घरी जात असे. माझा वर्ग पहिल्या मजल्यावर होता तरी मी तळमजल्यापर्यंत आजीच्या मागून येत असे. असेच एक दिवस आजी मला शाळेत सोडून गेली. आधी रडून झाले मग मी आमच्या वर्गाच्या दुसऱ्या दरवाज्यातून खाली आले. कोणाचे लक्ष नाही बघून ग्राउंड मधून रस्त्यावर धूम ठोकली. पण आमचे बाबाजी काका जे बाहेर ग्राउंड साफ करत होते (त्यांची झाडू घेऊनच) आणि जाधव बाई दोघे माझ्या मागे धावत आले. तो पर्यंत मी रस्ता ओलांडून घरी पोचले होते आणि आशा मावशी मारेल या भीतीने लपून बसले होते.  बाबाजी काका घरी आले आणि मावशीला सांगितले की मी शाळेतून पळून आलेय. मावशीने मला मी लपलेल्या जागेवरून खेचून बाहेर काढून मला त्यांच्या सुपूर्त केले. 
मग भोकाड पसरलेली मी , मावशी, बाबाजी काका आणि जाधव बाई अशी आमची वरात शाळेत पोचली. बाईनी खूप समजावले पण काही केल्या मी शाळेत बसायला तयार नव्हते. तो दिवस जेमतेम शाळेत बसले नंतर जवळजवळ आठ दिवस शाळेत गेले नाही. बाई एकदा घरी ही येऊन गेल्या आणि म्हणाल्या की तू नीट शाळेत आलीस ना तर मी तुला गंमत देईन.  पण मी काही ऐकेना. कसेबसे समजूत काढून, तर थोडेसा दम देऊन एक दिवस मला शाळेत नेले. मला अजूनही आठवतात त्या बाई घारे डोळे , कुरळे केस. बोलणें अगदी मृदू. सातपुते बाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या त्या. शाळेत गेल्यावर त्यांनी मला जवळ बोलावले. मला खूप भीती वाटत होती एक तर मार तरी पडेल नाहीतर ओरडा बसणार. पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले सांगितल्या प्रमाणे बाईनी मला पूर्वी मिळत ना मोठ्या मागे रबर असलेल्या आणि पंजाच्या आकाराचे टोपण असणाऱ्या दोन पेन्सिल दिल्या आम्ही त्याला 'हातवाल्या पेन्सिल' म्हणायचो. म्हणाल्या अशीच शाळेत शहाण्या बाळासारखी येत जा. मी खूप खुश होते. सगळ्यांना  त्या पेन्सिल दाखवत सुटले होते. गिफ्ट म्हणजे काय असते हे न कळणाऱ्या वयात मला आमच्या बाईनी मला  छान रिटर्न गिफ्ट दिले होते. त्या गिफ्ट च्या निमित्ताने का होईना मला शाळेची भीती गेली ती कायमची. परत मात्र अगदी आजारी असतानाही कधी शाळा किंवा कॉलेज ला दांडी मारली नाही.


Tuesday, 13 February 2018

माणुसकी

ही एक सत्य घटना आहे. त्या व्यक्तीचे  नाव न लिहिता माझ्या शब्दात मी ही मांडत आहे.
एक वयस्कर जोडपे. मुलबाळ काही नाही. बाईंनी नेमाने आपले घर सांभाळले. आणि नवरा किती तरी वर्षे भिक्षुकी चे ( पौरोहित्य) काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. वयपरत्वे दोघेही थकले होते. काकांना तितके काम होत नव्हते. पण आधी साठवून ठेवलेल्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. तसेच जवळ असलेली भावंडे ही थोडी थोडी मदत करत होते.
काकांचा एक रिक्षावाला ठरलेला होता.  काकांना कुठेही पूजेला जायचे असेल, काही सामान आणायचे असेल तर तो रिक्षावाला सतत त्यांच्या सोबत असायचा. उतरत्या वयामुळे काका काकू दोघांमध्ये ही चिडचिडेपणा आला होता. आणि आता दोघांनाही बाहेर जाणे झेपत नव्हते त्यामुळे त्यांच्या बाजारहाटाची जबाबदारी ही त्या रिक्षावल्यावर आली होती. तो ही नेटानं सगळी कामे करत होता.
काकांचे घर  तळमजल्यावर वरच होते आणि घराच्या गॅलरी ला ही एक दरवाजा होता त्यामुळे त्यांना बाहेर पडताना जिन्यापर्यंत जाण्याची गरज पडत नव्हती. काकांना स्थूलपणामुळे जास्त चालता येत नसल्याने ते त्या मागच्या दाराने बाहेर येऊन एक दोन फेऱ्या मारत.
‌असेच एक दिवसभराची कामे आटपून दोघे काका काकू झोपायला गेले. काका नेहमी त्या मागच्या दाराच्या जवळच्या बेड वर झोपत. सकाळी नेहमी प्रमाणे काकू उठल्या बघतात तर काका जागेवर नव्हते. आधी त्यांनी घरात शोधलं. बाथरूम टॉयलेट सगळे बघितले पण काका नव्हते. मग झेपत नसतानाही त्या घराबाहेर पडल्या आजूबाजूला पाहिले पण काका कुठेच नव्हते. त्या घाबरल्या काका कुठे गेले? नक्की काय झाले असेल? हजार प्रश्न. रिक्षा शिवाय काका कुठे जात नसत,  मग नक्की गेले कुठे? त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन केले .  सगळीकडे काकांची शोधाशोध सुरू झाली. आजूबाजूच्या सोसायटी मध्ये, नातेवाईक , मित्र मंडळी  सगळ्या  ठिकाणी फोन करून विचारून झाले . पण काकांचा कुठेच पत्ता नाही . सीसीटीव्हीत मध्ये पाहून झाले पण फक्त गेटपर्यंत जाताना दिसले. पुढे काय ? कुठे गेले? आता मात्र सगळेच घाबरले. शेवटी काकांचा फोटो घेऊन पोलीस ठाणे गाठले. तिथे हरवले आहे मध्ये काकांचे नाव आणि फोटो दिला. आधी कुणी तसेच कुठे सापडले आहे का पाहिले , बाकी शक्यता ही पडताळून पहिल्या. पण तशी काही नोंद नव्हती.  पोलिसांनी नियमाप्रमाणे २४ तासांनी तक्रार नोंदणी करू असे सांगितले. काका मिळतील या एकमेव आशेवर हतबल होऊन सगळे घरी निघाले. हे सगळं करताना काकांचा नेहमीचा रिक्षावाला ही सोबत होता.
‌दुपार टळून गेली, संध्याकाळ होत आली. रडून रडून काकी अर्ध्या झाल्या. आपल्या परीने शोध घेणे आणि वाट पाहणे इतकेच हातात. सगळे हताश होऊन बसले होते. इतक्यात काकांच्या भावाचा फोन वाजला. समोरून आवाज आला मी आरे कॉलनी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमचे कोणी हरवले आहे का? त्यांनी नाव सांगितले पण नाव चुकीचे होते पण आडनाव मात्र त्यांनी बरोबर घेतले. काकांच्या भावाने सांगितले हो माझा भाऊ हरवला आहे. पण नाव हे नाही. मग पोलिसाने फोन त्या सापडलेल्या माणसाकडे दिला. आवाजावरून काकांच्या भावाने त्यांना लगेच ओळखलं.  त्यांनी पोलिसां ना सांगितले की ते माझे भाऊ आहेत मी त्यांना घ्यायला येतो. काकांचे भाऊ काकांच्या रिक्षवाल्याला घेऊन निघाले.  संध्याकाळची वेळ ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे त्यांना पोचायला उशीर होत होता. त्यात त्या पोलिसांचा सारखा फोन येत होता . कधी येणार न्यायला? नक्की येताय ना? त्यांचे ही बरोबर होते. असे कितीतरी लोक असतील ज्यांना कळवूनही त्यांचे  नातेवाईक त्यांना घ्यायला येत नाही.  शेवटी सगळे पोचले पोलीस स्टेशनमध्ये. काका समोर बसले होते. कुठेतरी शून्यात नजर होती. सगळ्या फॉर्मलिटीएस झाल्यावर काकांना घेऊन निघाले.
जेव्हा ते काकांना घ्यायला गेले तेव्हा त्या पोलिसाने त्यांना साधारण काय घडले ते सांगितले. १००% असेच नसेलही. पण काकांनी जितके सांगितले होते त्यावरून त्यांनी अंदाज बांधला. पहाटे काका उठले. गेटबाहेर येऊन त्यांनी एक रिक्षा थांबवली. रिक्षवाल्याला गोरेगाव ला न्यायला सांगितलं. गोरेगाव ला काकांची एक बहीण राहत होती  .  रिक्षावाल्याने गोरेगाव आल्यावर काकांना विचारले नक्की कुठे जायचे आहे. पण त्यांना नीट सांगता येईना. आणि काकांकडे पैसे ही नव्हते . त्या रिक्षवाल्याने काकांना आरेच्या जंगलात सोडले जिथे आसपास कोणी भटकण्याची शक्यता नव्हती. पण रात्री गस्त घालणारी पोलिसांची गाडी तिथे आली. त्यांनी काकांना पाहिले. जवळ जाऊन त्यांची चौकशी केली. त्यांना नीट काही सांगता येईना. त्यांना त्यांचे नाव विचारले तर नाव त्यांनी चुकीचे सांगितले पण आडनांव मात्र दोन्ही वेळी एकच सांगितले. कुठे राहता याची माहिती विचारली तर एकदा शिवडी म्हणाले एकदा पार्ले . शिवाडीला त्यांचा भाऊ राहतो. त्यांना ते आठवले असेल. शेवटी पोलिसांनी ठरवले की याना घेऊन जाऊ. पोलीस स्टेशन ला नेल्यावर पोलिसांनी काकांना खायला दिले. मग परत चौकशी सुरू केली. पण काकांना काही नीट सांगता येत नव्हते ते आधीचेच परत सांगत होते. त्या पोलिसांनी मग ठरवले की काकांचे बोटांचे ठसे घ्यायचे आणि त्यांच्या आधारकार्ड वरून त्यांची माहिती शोधायची. त्यासाठी त्यांनी जवळच्या आधारकार्ड सेन्टर ची माहिती ही काढून ठेवली. परत एकदा काकांना विचारले की कुणाचा फोन नंबर आठवतेय का? काकांनी खूप प्रयत्न करून एक नंबर सांगितला. पण तो मोबाइल नंबर होता आणि काकांना आठच नंबर आठवले होते. खूप प्रयत्न करूनही त्यांना पुढचे दोन नंबर आठवेनात. मग त्या पोलिसांनी ठरवले या आठ नंबर च्या पुढे १-१, १-२ असे नंबर लावून फोन करायचे. शक्य तितके प्रयत्न करायचे या काकांना घरीं पोचवण्याचे असे त्यांनी ठरवलेच होते. त्यांनी फोन लावायला सुरवात केली. ८-१० चुकीचे नंबर लावल्यावर मात्र एक नंबर लावला तो काकांच्या भावाचा. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले होते. आणि असे हे काका त्यांच्या घरी सुखरूप पोहचले.
काका जरी सापडले असले तरी काही प्रश्न मात्र अनुत्तरित च आहेत. जसे घराबाहेर पडल्यावर लगेच रिक्षात बसणारे काका इतके चालत बाहेर कसे गेले? नुसत्या हाफ पॅन्ट आणि बनियन वर असणाऱ्या काकांना रिक्षात बसवताना त्या रिक्षावाल्याच्यत काहीच शंका कशी आली नाही? त्याला जर असे सोडायचे होते तर त्याने परत त्या जागीच का सोडले नाही? प्रवेश बंदी असलेल्या भागात तो गेलाच कसा?? दिवसभर काका जर त्या जंगलात होते तर त्यांना काही झाले नाही हे नशीब. सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त काकच देऊ शकतात. पण दुर्देवाने त्यांना त्या दिवशी ते रिक्षात बसले त्यानंतरचे काहीच आठवत नाहीये.
हा लेख लिहिण्याचा उद्देश इतकाच की अजूनही या जगात माणुसकी शिल्लक आहे त्या पोलिसाच्या रुपात . देव कधी कुणाच्या रुपाने मदतीला येईल हे सांगता येत नाही.




Tuesday, 6 February 2018

"मितेश "

याच्याविषयी लिहायला कुठून सुरवात करू कळत नाहीये. आम्ही एका शाळेत होतो पण शाळेतली मैत्री असे म्हणता येणार नाही. त्यावेळी एकमेकांवर खुन्नस जास्त. माधवी चा भाऊ इतकीच शाळेतली त्याची ओळख खरे तर. खूप नंतर कळले कि मला जे वडिलांसारखे आहेत त्या पाटील काकांचा हा मुलगा. 
शाळेत असतानाचा मितेश मला आठवतोय तो अगदी " अँग्री यंग मॅन ".  खूप जण नक्कीच घाबरत असतील त्याला शाळेत असताना. सतत पारा चढलेला असायचा. आम्ही एकदा ग्राउंड वर खेळात असताना त्यांच्या वर्गातल्या एका मुलाला माझा धक्का लागला हा लगेच आला होता ओरडायला. मला अजूनही त्याचा तो चिडलेला चेहरा स्पष्ट आठवतोय. एकदा आम्ही शाळेत येत असताना त्याच्या आई ने त्याची जीवशास्त्राचे प्रयोगवाही आम्हाला दिली होती त्याला द्यायला तो घरी विसरला होता. ती वही शाळेत जाईपर्यंत आम्ही पूर्ण चाळून पहिली. त्याला बाईंनी दिलेले ग्रेड , त्याची ड्रॉइंग्स. आणि शाळेत बाई मुलांना जास्त चांगले मार्क देतात असा निष्कर्ष हि काढला.  पण शाळेत गेल्यावर ती वही त्याला न देता माधवीच्या हातात दिली आणि तिला सांगितले " तुझ्या भावाला दे ". भीतीच वाटायची त्याच्याशी बोलायला ( अजूनही थोडी वाटतेच). शाळेत असताना त्याच्या ग्रुप ने केलेल्या कारामतींचे एक एक किस्से ऐकायला यायचे तेव्हा राग यायचा कशी हि मुले आहेत मस्तीखोर असे वाटायचे. पण आता तीच मुले इतकी बदलली आहेत. 
खरेतर आम्ही एकाच एरियात राहायचो पण कधी एकमेकांशी बोललो नाही. शाळेतली "अ" वर्ग विरुद्ध "ब " वर्ग खुन्नस होती ना. फार कमी मुले मुली होते जे एकमेकांशी बोलायचे.
आम्ही कधी बोलायला लागलो नीटसे आठवत नाही. पण २०११ मध्ये जेव्हा मंदार च्या नवीन घरी जायचे होते तेव्हा त्याच्या गाडीतून गेलो होतो. ती त्याची मुंबईतली पहिली ड्राईव्ह होती. आमच्या सोबत ज्या दीपाली आणि रत्ना होत्या, त्यांना याची कल्पना नव्हती. पण भाईंदर च्या ब्रिज यानंतरच्या सिग्नल ला जेव्हा तो थोडासा गडबडला,  तेव्हा पटकन म्हणाला की, मी पहिल्यांदा मुंबईत आणतोय गाडी ...त्यावर मागे दोघींची जी रीऍक्शन होती.... त्या दोघी शॉक होत्या... आणि मी हसत होते(मनात आले होते काय गरज होती हे बोलायची ) ,  पण मस्त ड्राईव्ह होती ती. त्यावेळी GPS चे प्रस्थ नसल्याने वाट चुकत विचारत आम्ही पोचलो होतो मंदार कडे.  पहिल्यांदा मितेश ला इतके बोलताना ऐकले होते आम्ही.
‌त्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्या गाडीतून फिरणे झाले कुठे गेट टू गेदर असले की आमचे ईस्ट वाल्यांचे लटांबर त्याच्या गाडीत. सगळयांना घरपोच सर्विस. २०१२ मध्ये जेव्हा आम्ही शाळेला बेंचेस दयायचे ठरवले होते त्यावेळी त्याच्या ओळखीने बेंचेस ची किंमत थोडी कमी झाली होती.
‌२०१३  जुलै मध्ये आम्ही लोणावळा गेलो होतो पिकनिक ला. हा जोरदार पाऊस . वाटले होते बहुतेक कॅन्सल. पण गेलो. त्या धुमदार पावसात पण मस्त चालवली गाडी त्याने. त्या दिवशी रात्री माधवी आणि मितेश ची पत्ते खेळताना चाललेली जुगलबंदी ऐकून मज्जा येत होती. दोघांपैकी एकही बोलण्यात मागे हलायला तयार नाही. एकमेकांचा एकही शब्द खाली पडू देत नव्हते. आम्ही सगळे मस्त एन्जॉय करत होतो त्यांचे संभाषण.
त्याच वर्षी डिसेंबर मध्ये नंदनवन रिसोर्ट ला गेलो होतो. त्यावेळी मुली खूप आणि मुले तीनच असे होते. ती पिकनिक ही त्याच्यासोबत मुक्ता ने गाजवली होती. आमच्या छोट्या कंपनी सोबत सकाळी बॅडमिंटन खेळणारा हा मितेश मामा सगळ्यां बच्चेकंपनी चा लाडका झाला होता.  या दोन्ही पिकनिक आमच्यासाठी खूप खास आहेत.
त्यानंतर आमचे बऱ्याच वेळा भेटणे झाले गेट टू गेदर च्या वेळी.  प्रत्येक वेळी त्याचा नवीन पैलू पाहायला मिळायचा.  शाळेत अँग्री यंग मॅन असलेला हा मुलगा आता खूपच बदलला आहे. खूप शांत संयमी आणि समजूतदार.
त्याला फोन केल्यावर त्याची " हा बोला मॅडम" म्हणायची पद्धत मला जाम आवडते. त्याला फोन करून म्हटले ना अरे काही नाही तुला डिस्टर्ब करायला फोन केला की याचे उत्तर ठरलेल " मी कधी डिस्टर्ब होत नाही." आता खरे खोटे तो आणि देवच जाणे. काही असो पण त्याच्याशी बोलल्यावर खूप बरे वाटते.
तो जरी शांत असला तरी आपण जर एखादी चूक केली तर तिथल्या तिथे आपल्याला टोकायला कमी करत नाही. रागावल्यानंतरचा जमदग्नी चा अवतार त्याच्या सगळ्या जवळच्या व्यक्तींनी एकदा तरी अनुभवला असेल. याची अजून एक खासीयत अशी की याच्या मनाचा ठाव घेणे म्हणजे एक अशक्य गोष्ट. कुणाचे कौतुक करताना ही हा फार मोजून मापून करेल. मला याचे खूप कौतुक आहे पण आतापर्यंत त्याने माझे असे मनमोकळे कौतुक केलेलं मला आठवत नाही. एकदा माझ्या ब्लॉग वर याची 'खूप छान अशी कंमेंट आली तेव्हा मला जरा आश्चर्य वाटले इतक्या लगेच वाचला ब्लॉग म्हणून मी त्याला तसे विचारले ही. आणि अपेक्षित उत्तर मिळाले. म्हणे खरं सांगू नाही वाचला ब्लॉग पण मी कधीच काही लिहीत नाही आणि तुला वाईट वाटते म्हणून लिहिले. बरे वाटले चला इतका तर विचार येतो या मैत्रिणीचा. इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या दोन आर्टिकल नंतर " तू काय लेखिका होणार की काय?" असे प्रश्नार्थक का होईना पण माझ्या लिखाणाचा हुरूप वाढवणारे वाक्य तो बोलून गेला आणि एक दोन करता करता ४० लेख झाले.  लेखिका होईन की नाही माहीत नाही पण लिहिण्याची इन्स्प्रिंरेशन मात्र मिळाली. 
मंदार मितेश ला मुलांचा बॉस आणि कधी कधी डॉन म्हणतो. का ते माहित नाही? पण माझा असा अंदाज कि सगळे त्याचे ऐकतात म्हणून असेल.  एक गोष्ट मात्र नक्की कि तो स्वतःची कुठलीही गोष्ट समोरच्याला अशा प्रकारे पटवून देतो कि ती टाळणे त्या व्यक्ती साठी अशक्य असते.
मितेश चा अजून एक गुण म्हणजे तो जे काही करतो ते मनापासून असते मग ती मैत्री असो की त्याचे काम किंवा एखादी ऍक्टिव्हिटी. १७ सप्टेंबर २०१७ मध्ये याने पहिली ५ की मी ची मॅरेथॉन पूर्ण केली. आणि त्यानंतर कदाचित विरार वसई मधली एकही मॅरेथॉन त्याने चुकवली नाही.  मला वाटते अगदी पूर्ण नाही पण या गोष्टीचे ५०% श्रेय याची बायको " जस्मिता" हिचे असणार. एकदा आम्ही बोलत असताना याचे बाबा मला म्हणाले होते " मितेश मुलगा म्हणून सतत माझ्या पाठीशी उभा राहतो". आई वडिलांकडून असे उद्गार निघणे म्हणजे किती भाग्य. त्यादिवसपासून त्याच्याबद्दल चा आदर जास्त दुणावला.
मितेश जशी मॅरेथॉन धावतोस आणि ती पूर्ण करतोस तसाच आयुष्यात खूप पुढे जा आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर अशी मनापासून इच्छा.

खूप बिझी असणाऱ्या, सतत माणसांच्या गराड्यात असणाऱ्या या मित्राला या मैत्रिणीची कधी आठवणही येत नसेल पण माझ्यासाठी खूप स्पेशल मित्र आहे हा आणि कायम राहील.





Sunday, 28 January 2018

सुरांची मैफल - एक अनुभव

सगळ्यात प्रथम तर महाराष्ट्र टाईम्स चे आभार. त्यांच्या उपक्रमामुळे आम्हाला " सूर नवा ध्यास नवा" च्या सेट वर जायची संधी मिळाली.  एक नवीन अनुभव आणि तोच अनुभव मी आता सांगणार आहे. माझ्या शब्दात.
रविवारी पेपर मध्ये आले की ज्यांना सूर नवा ध्यास नवा च्या सेट वर जायचे आहे त्यांनी नाव नोंदणी करा. एक उत्सुकता म्हणून मी नाव नोंदणी केली. शूटिंग बुधवारी होते. सोमवार गेला,  मंगळवार दुपारपर्यंत काही फोन आला नाही. मी म्हटले झाले बहुतेक आपला नंबर नाहीं लागला. पण ५.३० च्या दरम्यान फोन आला की उद्या ९.३० वाजता बोरीवली ला भेटा. माझा विश्वासच बसेना. इतका आनंद झाला होता. माझी सगळी कामे बाकी होती पण मी आपली वेड्यासारखी त्या फोन चा च विचार करत होते. नक्की नेतील ना? खरेच जायचे आहे का? माझा विश्वास बसत नव्हता. फक्त नाचायचे तेवढे बाकी राहिले होते. मग अजून गडबड सुरू झाली , उद्या काय घालून जायचे हा यक्ष प्रश्न..... शेवटी बरचे ड्रेस, साड्या उलट पुलट करून झाल्यावर एक साडी नक्की केली, मग त्यावरचे सगळे म्याचिंग चे काढून झाले. २-३ फ़ोन करून झाले.
त्या रात्री धड काही झोप लागली नाही. काय असेल ? कसे असेल??  परत तिथे सगळेच अनोळखी , एकटे बसून काय करायचे?? असे हजार प्रश्न.... आणि त्याही पेक्षा उत्सुकता आणि आनंद.
झाली बाबा सकाळ एकदाची.. घरातली काम आटपून निघायची तयारी केली. तिथे उशीर नको म्हणून लवकरच निघाले भीती मनात उशीर झाला आणि आपल्याला सोडून गेले तर.. तिथे पोचता पोचता फोन आला त्यांचा ... हुश्श वेळेत आहोत आपण. तिथे गेले तर आधीच ४-५ जणी होत्या तिथे.  सगळेच उत्सुक होते. तसे त्यातल्या काहींनी आधी असे प्रोग्राम पाहिले होते. आम्ही जे पहिल्यांदा जाणारे होतो ते त्यांचे अनुभव ऐकत होतो.  आम्ही ७-८ वेगवेगळ्या वयोगटातील बायका होतो तिथे पण आम्ही सगळ्या एकमेकींना एकेरीच संबोधत होतो. वयाच्या मर्यादा ओलांडून आम्ही छान मैत्रिणी झालो होतो. बस मध्ये ही मजा करत होतो. नेहमीप्रमाणे सेल्फी काढायला सुरवात झाली होती. पुरुषही उत्साही होते. एक काका वाशी तर एक काका कल्याण हुन आले होते. आणि गंमत म्हणजे सगळेच तिथे कोणाच्या ना कोणाच्या लांबच्या किंवा जवळच्यांच्या ओळखीचे होते. जग किती लहान आहे याचा प्रत्यय येतो अशा वेळी.
१०.१५- १०.३० ला पोचलो स्टुडिओत. अजून उत्सुकता. तिथे गेल्यावर श्री. महेश काळे आणि शाल्मली बाहेरच दिसले. त्यांच्याशी बोलायला जाणार इतक्यात ते तयारीला गेले. मग नाश्ता करून आम्ही आत सेट वर गेलो. आधी जागा पकडून घेतली. मग ५-१० मिनिटे बसल्यावर आम्ही सगळ्यांनी स्टेज वर आक्रमण केले .. हो आक्रमणच जवळ जवळ. सगळेजण फोटो काढायला स्टेज वर. आधीच त्या स्टेज वर किती माणसे. ते वादक, लाईट वाले, सेटिंग वाले, आणि त्यात आम्ही. काय मस्त होता तो सेट. किती लाईट्स, कॅमेऱ्याची मोठी ट्रॉली. ते चालवणारी माणसे. सगळ्यांच्या कानाला ते हेडफोन लावलेले. माणसांची नुसती धावपळ सुरू होती. त्या सेटवर शिरताना एक छोटीशी रूम होती त्यात ७-८ मोठे मोठे टीव्ही होते. आणि पूर्ण स्टेज त्यात दिसत होता. दोन तीन माणसे तिथे काहीतरी करत होती . हो!! काहीतरी,  कारण हे सगळेआमच्यासाठी नवीनच ना. कोण काय करतोय काही कळत नव्हते. फक्त त्यांचे संवाद ऐकताना गम्मत येत होती. आणि सगळीकडे वायर्स चे जाळे होते.
आधी स्टेज वर जिथे गायक उभे राहतात तिथे उभे राहून फोटो झाले. काही सेल्फी काही ग्रुप. नुसता उत्साह ओलांडून जात होता. मग तिथे एक स्पर्धक आला मग त्याच्या सोबत . हळू हळू एक  एक स्पर्धक येत गेले मग त्यांच्या सोबत फोटो आम्हाला ६४ जी. बी पण कमी पडले असते त्यादिवशी जर पूर्णवेळ बसलो असतो. त्या स्पर्धकांना सुद्धा खूप छान गाता. तुमचे ते गाणे खूप आवडले , आज कुठले गाणे? अक्षरशः भंडावून सोडले त्यांना. (असे आम्हाला मनात वाटले) ते सगळेच खूप छान हसून उत्तर देत होते. मग आम्ही आमचा मोर्चा  वादकांकडे वळवला . आधी त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यांचे भरपूर कौतुक केले. त्यांनी ही आमच्या प्रश्नांची मस्त उत्तर दिली. त्यातला तबल्यावर साथ देणारा प्रसाद पाध्ये मला जास्त आवडला. इतक्यात अवधूत , महेश आणि शाल्मली आले म्हणून आम्हाला जागेवर बसायला सांगितले. आम्ही सगळे अय्या!! अवधूत ने बघ काय घातलंय, महेश किती साधा आहे, शाल्मली ची हेअर स्टाइल बघ करत जागेवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात आम्हाला परत स्टेज वर बोलावलं महाराष्ट्र टाईम्स साठी फोटो काढायला. आधी कॅप्टन बरोबर फोटो काढून झाल्यावर स्पर्धकांबरोबर फोटो काढले. फोटो काढता काढता तेजश्री ला हळूच तू खूप गोड दिसतेस सांगून झाले. फोटो काढताना मोबाईल नाही घ्यायचा असे सांगितले होते पण फोटो काढून झाल्यावर पटकन मोबाईल आणला आणि महेश काळे ना गाठले. अवधूत ला आधी भेटले होते म्हणून त्याला सतवायला गेले नाही परत. महेश ला माझ्या मुलीने दिलेला निरोप दिला की तिला त्याचे गाणे खूप आवडते. तर त्याने सांगितले की माझा प्रोग्रॅम आहे षण्मुखानंद ला त्याला घेऊन या , आणि मला भेटायला आणा तिला. नवीन पिढीतील शास्त्रीय गाण्याची ओढ पहिली की बरे वाटते.  त्याला मी सहज विचारले तुमचा हात कसा आहे आता??  तर त्याने लगेच त्याला लागलेले दाखवले आणि म्हणाला की बघा ना ४-४ खिळे ठोकून ठेवले आहेत. मला हसूच आले. इतका मोठा माणूस पण किती साहजिक बोलत होता. खरेच ग्रेट. डोके आभाळाला टेकलेले असताना पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे अशा माणसांकडून शिकावे.
झाले आता शूटिंग सुरू होणार. आम्हाला परत जागेवर पळवले. आम्ही बसलो आणि तिथे एक माणूस आला आणि म्हणाला की मी सांगेन तेव्हा त्या स्टेज वर बघून टाळ्या वाजवा. आम्ही शाळेत म्हणायचो तसे एका सुरात होsss म्हणालो. मग आकाशवाणी व्हावी तसा कुठूनतरी आवाज आला वन, टू, थ्री ऍक्शन.. आणि आम्ही टाळ्या वाजवायला लागलो. मला तर खूप हसायला येत होते रिकाम्या स्टेज कडे पाहून टाळया वाजवताना. मग तेजश्री आली स्टेज वर तिने त्या स्क्रोल वर पाहून वाचायला सुरवात केली. वाचताना तिच्या लक्षात आले की तिचा आवाज स्पीकर वर येत नाहीये. मग तिची ड्रेसर आणि तो माईक वाला दोघे येऊन ते नीट करून गेले. मग परत तोच अदृश्य आवाज ऍक्शन म्हणाला आणि खरे शूटिंग सुरू झाले. त्या आधी जिचे पाहिले गाणे होते तिने त्या वादकांसोबत एकदा मुखडा गाऊन पहिला. त्या वादकांना सूचना देणाऱ्या माणसाने बऱ्याच सूचना केल्या.  सुरवातीचे सगळे झाल्यावर प्रमुख पाहुणे " संगीतकार प्यारेलाल" जी आले. सगळे उठून उभे राहिलो. तो मगाशी आम्हाला सूचना देणारा माणूस म्हणाला की ते आले की उभे राहून टाळ्या वाजवाल का?? आम्ही म्हटले अर्थातच इतका मोठा माणूस न सांगताच करू आम्ही. ते स्टेज वर येण्याआधी त्यांच्या स्वागतासाठी काय वाजवायचे याची चर्चा झाली त्या वादकांमध्ये आणि त्या सूचना देणाऱ्या माणसामध्ये. मग आपल्या सगळ्यांचा आवडता कर्मा सिनेमा चा तो पिस वाजवण्यात आला. प्यारेलालजी आल्यावर स्टेज वर वेगळेच चैतन्य आले. टाळ्यांचा कडकडाट, सगळे उभे राहिले होते.  इतका अनुभवी माणूस पण किती   आल्या आल्या म्हणाले की मी आज येथे नवीन पिढी करून शिकायला आलो आहे. इथून नवी सुरवात. ते स्थानापन्न झाल्यावर गायिकेला सुरवात करण्यास सांगितली. गाणे झाल्यावर कॅप्टन ना गाणे कसे झाले असे विचारले गेले. त्यावर अवधूत ची टिप्पणी खूप छान होती. किती अभ्यास करून येतो तो माणूस. प्रत्येक गाण्याचा त्याचा परिपूर्ण अभ्यास असतो. आणि महेश बद्दल काय सांगायचे, त्याचे मराठी तर अप्रतिमच. जे बोलतो ते किती तळमळीने. त्याच्या बोलण्यातून त्याची गाण्यावरची श्रद्धा दिसून येते. नंतर प्यारेलालजी ची वेळा गाण्याबद्दल बोलायची. किती आठवणी त्या प्रत्येक गाण्यामागच्या.  त्या माणसाला खरेच मानायला हवे आज लक्ष्मीकांत जगात नाहीत पण त्यांची आठवण काढली नाही असे एकही वाक्य प्यारेलालजी नी उद्गारले नाही. सलाम त्यांच्या मैत्रीला आणि सलाम लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीला.
तिथे स्पर्धकांमध्ये ही किती खेळीमेळीचे वातावरण. एकमेकांशी स्पर्धा करायला हे आले आहेत असे अजिबात वाटत नव्हते. प्रत्येक जण एकमेकांशी मस्त हसून खेळून बोलत होते. सगळेजण एकमेकांना गुडलक देत होते. गाण्याला दाद देत होते. तिथे आलेल्या दोन स्पर्धकांच्या छोट्या गोंडस मुलीं सोबत खेळत होते. तेजश्री साठी असणारी वाक्य जेव्हा एक स्पर्धक म्हणत होती तेव्हा परत त्या अदृश्य आवाजाने सूचना केली की स्पर्धाकांसाठी स्क्रोल नाही. मला अजूनही कळलं नाहीये की तो आवाज नक्की कुणाचा होता आणि कुठून येत होता.
प्रत्येक गाण्यानंतर थोडी विश्रांती असायची त्यात सगळ्यांचे मेकअप चे टचअप. वादकांची एक रिहर्सल होत होती. शेवटी आमची निघायची  वेळा झाली. पण आम्हाला अजून एक गाणे ऐकायचे होते , ज्या स्पर्धकांचे गाणे होते त्याची मावशी आमच्या सोबत होती. त्यांनी त्या आयोजकांना विनंती केली आणि अजून थोडा वेळ  आमच्या पदरी पडला. मस्तच झाले ते गाणे. शेवटी इच्छा नसताना तिथून निघालो. खूप नवीन आणि अविस्मरणीय अनुभव घेऊन. खूप मजा आली. एक दिवसाची आमची छोटी पिकनिक झाली ती.
म्हणतात ते खरच छोटा पडदा असो वा मोठा ही चंदेरी दुनिया म्हणजे जादुई स्वप्न नगरी. या स्वप्न नगरी मध्ये आम्ही एक छोटासा फेरफटका मारून आलो.

बरे ही गम्मत इथेच संपत नाही हा.......
ज्यावेळी तिकडचे फोटो मी सगळीकडे पोस्ट केले. तेव्हा किती जणांनी विचारले अगं!! तू कशी गेलीस? आम्हाला सांगायचे आम्ही आलो असतो.. वा मस्त महेश काळे!!! कसा आहे ग तो?? अवधूत बरोबर फोटो का काढले नाहीत?? हजार प्रश्न. पण जाम भारी वाटत होते. सगळयांना सरप्राइज होते. मी सगळ्यांना मेसेज केले होते की सोमवारी कलर्स वर ९.३० वाजता " सूर नवा ध्यास नवा" नक्की पहा. जे नेहमी पाहत होते त्यांनी म्हटले आम्ही पाहतोच , जे पाहत नव्हते त्यांनी म्हटले तुझ्यासाठी नक्की बघू. कधी सोमवार उजाडतो असे झाले होते. आणि ज्या दिवशी टीव्ही वर कार्यक्रम दिसला त्या दिवशी तर फोन आणि मेसेजेस ... जराही उसंत नव्हती. सगळे भरभरून कौतुक करत होते. माझी एक मैत्रीण चक्क मोजत होती की मी किती वेळा दिसले.  काही जण म्हणाले की तू काय त्या कॅमेरामन ला पैसे दिलेस ?? की तो ओळखीचा होता ?? सतत तुझ्यावर कॅमेरा.  म्हणे काळ्या साडीत उठून दिसत होतीस ते किती जाडी दिसतेस ते काय नुसती हसून टाळ्या वाजवत होतीस इथपर्यंत सगळे कंमेंट. काहींनी म्हटले बघ हा चुकून एखादी ऑफर यायची काम करायची..तर एक काका म्हणाले मला वाटले तू गाणार आहेस की काय? मी म्हटले की मी गायले ना तर ती कट्यार मलाच मिळेल. माझा आवाज ऐकून पळून जातील सगळे मग काय कट्यार माझीच. माझा नवरा म्हणाला तू तर टी आर पी वाढवलास कार्यक्रमाचा. त्याच्या ही मित्रमैत्रिणी नि त्याला मेसेजेस केले. त्याच्या एका अमेरिकेतल्या मैत्रिणीने ही फ़ोन केला होता. खूप कौंतुक झाले. नातेवाईक, मित्रमैत्रिणी , आजूबाजूचे सगळेच खुश. काही न करता सेलिब्रिटी झाले होते. टिव्ही वर यायची इच्छा मात्र पूर्ण झाली. 
 माझे गुडलक आणि सगळ्यांचे आशीर्वाद. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. 










Thursday, 25 January 2018

( रिटर्न गिफ्ट...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स २५. ०१. २०१८ )


रिटर्न गिफ्ट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एखादी वस्तू येते पण आमच्या वाढदिवसाला आम्हाला मिळले एक वेगळेच रिटर्न गिफ्ट.  
आम्ही कॉलेज ला होतो तेव्हा  मार्च १९९३. माझा आणि माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस लागोपाठ असतो. अकारावीचे पहिलेच वर्ष कॉलेजमधला पहिलाच वाढदिवस म्हणून खूप आनंदी होतो. एक वेगळीच उत्सुकता होती. शाळेत गिफ्ट वैगेरे प्रकार नव्हते तितके पण कॉलेजमध्ये गेल्यावर ही प्रथा सुरू व्हायची साधारण. आमचे दोघींचे वाढदिवस म्हणून आमचा एक  मित्र खास आम्हाला गिफ्ट आणायला म्हणून चर्चगेट ला गेला होता.  तारीख होती १२ मार्च १९९३. साधारण ३-३.३० च्या दरम्यान बातमी आली की मुंबईत म्हणे खूप ठिकाणी बॉम्ब स्फोट झालेत.  म्हणजे अगदी दादर पासून चर्चगेट पर्यंत. बातमी ऐकून काळजात धस्स झाले. अरे बापरे!! आमचा मित्र तर चर्चगेट लाच गेलाय. त्या वेळी मोबाईल नव्हते आणि फोन ही आशा वेळी लगेच बंद व्हायचे. काय झाले असले?? आमचा मित्र सुखरूप असेल का ? या धकधूकीत घरी गेलो. बातम्या पाहिल्यावर टेन्शन अजून वाढले होते.  तो जिथे जाणार होता तिथे ही एका ठिकाणी स्फोट झाला होता. वाढदिवसाचा सगळा उत्साह निघून गेला होता. डोळ्यासमोर फक्त तोच दिसत होता. 
दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज ला जायची तयारी केली.  अगदी जीवावर येऊनच. नवीन ड्रेस घालून जायची ही इचछा नव्हती. रडूच येत होते पण जेमतेम आवर घातला होता.  जड पायांनी आणि जड मनाने कॉलेज ला गेलो. सगळीकडे कालच्या बातमीची चर्चा त्यामुळे अजून भीती वाढत होती. माझी मैत्रीण जिचा वाढदिवस होता आदल्या दिवशी ती तर गळून गेली होती. आम्ही एकमेकांना त्या मित्राबद्दल विचारत होतो पण कुणाला काही माहीतच नव्हते. आशा वेळी वाईट विचारच जास्त येतात ना मनात. आम्ही दोघी कॉरिडोअर मध्ये उभ्या राहून गेट कडे पाहत होतो. दोघींच्या पोटात गोळा आला होता. कालपासून सतत देवाचा धावा सुरूच होता. त्याच्या सोबत येणारे हीकुणी ही आले नव्हते म्हणून डोळ्यात प्राण आणून आम्ही दोघी गेट वर नजर ठेवून होतो.  आणि नेहमीप्रमाणे अगदी कॉलेज भरता भरता आमच्या त्या मित्राने गेट मधून एन्ट्री केली. हुश्श!! जीव भांड्यात पडला. आम्हा दोघींच्या डोळ्यात पाणी होते. आमचा मित्र सुखरूप होता आणि तो नेहमीप्रमाणे खालून हसत हसत आम्हाला हात करत होता. त्याच्या हातात आमच्यासाठी गिफ्ट होते. पण त्याहीपेक्षा अनमोल गिफ्ट देवाने आम्हाला दिले होते. आपोआपच आमचे हात जोडले गेले देवाचे आभार मानायला.
त्यावेळी त्याला पाहून झालेला आनंद शब्दात सांगणे फार कठीण. आजही वाढदिवसाच्या दिवशी तो प्रसंग आठवला की डोळ्यात पाणी, अंगावर शहारे आणि ओठावर हसू या तिन्ही गोष्टी एकाच वेळी असतात. 

Sunday, 14 January 2018

अधुरी कहाणी भाग २

सना ला जवळ घेऊन त्याने ठरवलं खरे की इतिहासाची पुनरावृत्ती द्यायची नाही. पण कसे? काय? हजार प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. सनाचा रडका चेहरा आणि तिची अवस्था पाहून त्याचा जीव कासावीस होत होता. त्याला तिची आठवण झाली त्याने ही तिच्याशी नाते तोडल्यावर परत वळून पाहिले नव्हते. तिचे काय झाले असेल याचा त्याने विचारही केला नाही. आता मात्र त्याला त्या त्रासाची जाणीव होत होती. आणि मग जीव जास्तच घाबरून जात होता.
आज कोणालाही धड जेवण गेले नव्हते. बायकोची धुसफूस सुरू होती. सना जेमतेम दोन घास खाऊन झोपायला गेली. हा मात्र अस्वस्थ होऊन हॉल मध्ये फेऱ्या मारत होता. काय करावे सुचत नव्हते आधी तिचा मग सनाचा चेहरा समोर येत होता. दोन तासानंतर त्याच्या डोक्यात काहीतरी आले. बऱ्याच वेळानी तो शान्त बसला आणि घड्याळ पाहिले तर १ वाजून गेले होता. तो झोपायला गेला. सकाळी उठल्यावर ऑफिस ला निघायच्या आधी तो सनाच्या खोलीत गेला रडून रडून हाल झाले होते तिचे. त्याने सनाला सांगितले बेटा दोन दिवस सुट्टी टाक ऑफिस ला आपण जरा बाहेर जाऊन येऊ. सनाने फक्त मान हलवली. तिने बाबाला उलटून एकही प्रश्न विचारला नाही , तिचा बाबांवर पूर्ण विश्वास होता. त्याने बायकोला सांगितले " अगं ऐक मी आणि सना दोन दिवस गावी जातोय" कपाळावर आठ्या आणत तिने विचारलं "का?" . त्याने तितक्याच शांतपणे उत्तर दिले " तिला आपली आता जास्त गरज आहे. तिने थोडे विशालच्या विचारातून बाहेर पडावे म्हणून तिला नेतोय गावी. तू येणार आहेस का?". ती मानेनेच हो म्हणाली.
 सकाळी तिघे निघाले. नेहमी बाबाच्या बाजूला पुढे बसायचे म्हणून हट्ट करणारी किंवा मीच चालवणार कार म्हणून मागे लागणारी सना आज एकटी मागे जाऊन बसली होती. त्याने डोळ्यानेच बायकोला काही बोलू नको म्हणून खूण केली. गाडी चालवताना त्याचे अर्धे लक्ष सना कडे होते. अधून मधून तो तिला काही ना काही सांगत होता . पण सना चे अजिबात लक्ष नव्हते ती नुसते हम्म हू अशी उत्तर देत होती. तिचे लक्ष फक्त तिच्या मोबाईल मध्ये होते आणि डोळ्यात पाणी. संध्याकाळ होता होता ते घरीं पोहोचले. थोडी साफसफाई केल्यावर बायकोने किचन चा ताबा घेतला.  तो आणि सना बाहेर अंगणात खुर्च्या टाकून बसले. सना चे लक्ष अजूनही मोबाईल मधेच होते. ती विशाल चे फोटो पाहत होती. आणि डोळ्यांच्या कडापाणावलेल्या होत्या. त्याने सना ला सांगितले उद्या आपण दोघे जरा बाहेर जाऊ मला बोलायचे आहे तुझ्याशी. सना मानेने हो म्हणाली. जेवण आवरून ते झोपायला गेले. दोघी झोपायला गेल्यावर याने विशाल ला फोन करायचे ठरवले.  त्याने विशाल ला फोन केला दोनदा रिंग झाल्यावर त्याने कट केला. थोडा वेळ वाट पाहून त्याने परत फोन केला परत तेच. त्याने आधी त्याला मेसेजेस ही केले होते पण रिप्लाय नाही. साधारण त्याला अंदाज आला होता विशालच्या वागण्याचा. सकाळी फ्रेश होऊन सना आणि तो समुद्रावर गेले फिरायला. त्याने बोलायला सुरुवात केली सना बेटा मला आज तुला काहीतरी महत्वाचे सांगयाचे आहे. माझ्या भूतकाळाबद्दल. इतका वेळ मोबाईल मध्ये गढून गेलेल्या सना ने डोके वर केले आणि बाबा कडे आश्चर्य वाटून पाहायला लागली. आता तो फक्त बोलत होता आणि सना ऐकत होती. त्याने तिला सांगितले की त्याच्या ही आयुष्यात अशी व्यक्ती होती जी त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती. पण माझ्या करीयर च्या वाटेवर तिला वेळ देऊ शकलो नाही मग एक दिवस असाच सगळी नाती तोडून फक्त कामावर लक्ष केंद्रित केले. त्या दिवसात तिचा पूर्ण विसर पडला. त्यानंतर मी लग्न केले आणि एक दिवस कळलं की ती गेली माझी वाट पाहून . त्यावेळी मला थोडा धक्का बसला बस.... मी इतका तुमच्या सगळ्यात गुंतलो होतो की तिच्या जाण्याचे जास्त दुःख ही झाले नाही. पण त्यादिवशी जेव्हा विशाल साठी तुला रडताना पाहिले तेव्हा  मला तिची प्रकर्षाने आठवण झाली.  तिच्या यातना मी तुझ्या डोळ्यात पाहिल्या. तिच्या प्रेमाची जाणीव त्यावेळी जाणवली मला. खूप अपराधी वाटले. सना बेटा मी माझे प्रेम गमावून बसलो , मला तुला नाही गमवायचे. तो रडू लागला. सना ला काय करावे कळेना. तो पुढे म्हणाला सना बेटा माहीत आहे खूप कठीण आहे पण यातून बाहेर पड. आम्ही आहोत तुझ्या सोबत. तो पुढे म्हणाला आपण नूतन मावशी कडे जाऊ, तुला मदत होईल . नूतन मावशी आईची खास मैत्रीण , कॉउन्सलर, सनाची लाडकी, आईपेक्षा तिची मावशी शी गट्टी जास्त. सनाला ला खरेतर काही कळत नव्हते. बाबाला इतके अगतिक तिने पाहिल्यानंदा पाहिले होते. बाबाचा भूतकाळ तिच्यासाठी धक्कादायक होता. त्याच्या अश्रूंनी त्याची तगमग बोलून दाखवली होती.  एकीकडे विशालची आठवण दुसरीकडे बाबाची काळजी. ती फक्त हो जाऊया म्हणाली. थोड्या वेळाने ते घरी परतले. दोघेही शांत, बायकोला काही कळेना. त्याने नंतर सांगतो म्हणून तिला टाळले. दोन दिवस राहून ते परत आले. सना मध्ये थोडा बदल होता ती मध्येच बाबाशी स्वतःहून बोलायला येत होती. रुटीन सुरू झाले. रविवारचा दिवस साधून ते तिघे नूतन मावशी कडे गेले. तोवर त्याने बायकोला साधारण गोष्टी सांगितल्या त्यामुळे ती ही कटकट ना करता तयार झाली. जेवण आटोपल्यावर तिने सनाला बेडरूम मध्ये बोलावले. आणि म्हणाली बाबाने कल्पना दिलीय मला पण एक कॉउन्सलर म्हणून मला तुझ्याकडून ऐकायचं आहे.  तू सांग परत एकदा. सनाने पहिल्यापासून सगळे सांगितल. आणि रडत रडत च म्हणाली मावशी खूप प्रयत्न करते पण नाही विसरता येत आहे. सगळ्या गोष्टी आठवतात पुन्हा पुन्हा.  मावशी ने सगळे शांतपणे ऐकून घेतलं मग म्हणाली सना  आता मी सांगेन ते नीट ऐक. मी आता फक्त तुला दिशा दाखवतेय त्यावर चालायचे की नाही हे तूलाच ठरवावे लागेल. पण यातून बाहेर पडायला तुझी मदत फक्त तूच करू शकतेस. सगळ्यात आधी मोबाईल मध्ये , कॉम्पुटर मध्ये त्याचे जेवढे फोटो आहेत सगके डिलिट कर. त्याला ब्लॉक नको करुस पण सोशल मीडियावर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्याच्याशी डिस्कनेक्ट हो. त्याचे नंबर ही डिलिट कर फोनमधून तरी डोक्यातून नाही होणार कदाचित पण निदान इथे तरी. कामात व्यस्त राहा , आईला मदत कर. बाबांशी गप्पा मार, मित्र मैत्रिणींना भेट मजा कर पण त्याचा विषय शक्य तितका टाळ. एखादी आवड जप. इतकी मोठी हो की विशाल ला पश्चात्ताप होईल तुला नाकारल्याचा. खूप कठीण आहे हे सगळे पण कर. एकदम नाही पण जमेल हळूहळू.  सना सगळे ऐकत होती, काही गोष्टी पटत होत्या तर काही कठीण वाटत होत्या. पण मावशी बरोबर तासभर बोलून तिला बळ आले होते. आणि बाबाचे शब्द तिला आठवत होते. तिने मनाशी निर्धार केला, विशाल ला विसरणे जरी शक्य नसले तरी ती त्याला आता स्वतःच्या आयुष्यातून दूर ठेवणार होती. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती.
ते घरी आले जातानाची सना आणि येतानाची सना यात फरक होता, तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आला होता. मनाशी काहीतरी पक्के करून ती बाहेर पडली. थोड्या दिवसातच दोघांना सना मधला फरक जाणवू लागला होता.  नेहमीप्रमाणे नूतन मावशीची जादू काम करत होती.  आता  ८-९ महिने होत आले सना विशाल च्या विचारातून बाहेर पडली होती. मावशीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिने अंमलात आणली होती. मधूनच कधीतरी तिच्या डोळ्यात पाणी दिसे पण ते तेवढ्या पूरताच असे.  ऑफिस मध्ये ही सना ची प्रगती होत होती. तिला एक मोठे प्रोजेक्ट चे काम देण्यात आले होते. सगळे आलबेल होत होते. तो आणि बायको दोघेही खुश होते. त्याला हायसे वाटत होते पण त्याने केलेल्या चुकीची खंत मात्र त्याला सलत होती. असेच एका रात्री जेवण आटोपल्यावर तिघे गप्पा मारत बसले होते , गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. तो जोशात दोघींना काहीतरी सांगत होता. इतक्यांत सना चा फोन वाजला. सनाने फोन घेतला समोरून एक आवाज , सना म्हणाली " हा, बोल विशाल." विशाल चे नाव ऐकून दोघे शांत झाले. त्यांना टेन्शन आले आता कुठे सना सावरत होती आता परत. सना पुढे म्हणाली , " मी तुला कधीच माफ केलेय , पण आपल्यात जे होते ते केव्हाच संपलेय. मला परत नको त्या गोष्टी. " इतके बोलून तिने शांतपणे फोन ठेवला. दोन सेकंद फोन कडे पाहत राहिली आणि मग परत बाबा कडे वळून म्हणाली " हा बाबा बोल , पुढे काय झाले?" . तिला नॉर्मल पाहून दोघे सुखावले. तुम्ही गप्पा मारा मी पटकन कॉफी करून आणते म्हणत बायको उत्साहाने स्वयंपाक घरात गेली. त्याने सना कडे पाहिले ती हसत होती. त्याने तिचा चेहरा हातात घेतला आणि हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आता ही त्याच्या डोळ्यात पाणी होते......एकीकडे मुलीला सावरल्याचे आनंदाश्रू तर दुसरीकडे तिच्या आठवणींचे दुखाश्रु.........

Sunday, 31 December 2017

व्यसन

व्यसन  शब्द उच्चरला कि आपल्या डोळ्यासमोर कुठलातरी अमली पदार्ध सेवन करणे  हेच येते. पण खरंच फक्त एखादी झिंग अण्णांरी गोष्ट घेणे म्हणजेच व्यसन का ? 
 पिढी दार पिढी आपली व्यसने बदलत असतात. आपल्या आधीच्या पिढीला दारू, पान , तंबाखू अशी व्यसन होती. आपल्या ९०च्या दशकातल्या मुलांना होते ते टीव्ही चे व्यसन. नवीनच आलेल्या ह्या इडियट बॉक्स ने सगळ्यांचं वेड लावले होते. त्यावर येणाऱ्या अड्वर्टाइस मुले नको नको त्या गोष्टी हि मुलांपर्यंत पोचायला लागल्या. पानपराग , गुटखा अश्या गोष्टींची  भर पडत गेली. पण त्यावेळी रिमोट प्रकार नसल्यामुळे थोडेसे बंधन होते त्यावर. पण आता ह्या इडियट बॉक्स पेक्षा एक भयंकर व्यसन लागलेय सगळ्यांना. अगदी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच ते म्हणजे " मोबाइल". या विषयावरून सगळ्याच घरात थोड्या फार प्रमाणात सारखेच वातावरण असते. सतत वाद होतच असतात. " काय हि आज कालची मुले सतत त्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून असतात " असे संवाद जिथे तिथे ऐकायला येतात. दिवस असतो रात्र असो सतत सगळे मोबाइलवर. या मोबाइल मुले आपली मुले अजून कशाकशाच्या आहारी जातील हे सांगणे कठीणच. हल्ली ब्लू व्हेल सारख्या गेम चे हि व्यसन लागू शकते मुलांना. कुणी आले गेले संभाषण नाही, कुठल्या समारंभात गेले तिथे हि नुसते सगळे " सेल्फी" काढण्यात व्यस्त असतात. मोबाइल मुले एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद कमी झालेत आणि नुसते व्हर्च्युअल अटॅचमेंट वाढल्यात.
 आत्ताच्या परिस्थितीत लोकांना अजून एक गंभीर व्यसन लागले आहे ते म्हणजे " काम " करण्याचे. हल्ली कुणालाही विचार  " काय आहेत कुठे ?" " नाही यार !! खूप काम आहे रे ऑफिस मध्ये " . जो तो कामात बुडालेला . वेळ, काळ, घरदार सगळे सोडून फक्त काम आणि काम. हे हे एक  व्यसनच ना? अशी माणसंही जर एखाद दिवस ह्यांना चुकून आराम मिळाला ना तर कासावीस होतात.
माझ्या एका मित्राने मला म्हटले कि "अगं !!! किती बोलतेस जरा कमी बोल मी" त्याला उद्धटपणे उत्तर दिले "तू किती पितोस जरा कमी पी" तर तो हसून म्हणाला कि " मी कमीच पितो" मग मी हि म्हटले कि जसे तुला वाटते ना तसे मला हि वाटते कि मी कमीच बोलते. हि खरेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात करणे हे एक व्यसनच ना.कुठलीही गोष्ट अति प्रमाणात करणे हे एक व्यसनच ना.
काही जणांना सट्टा , जुगार व्यसन असते. त्याचा आहारी ते इतके जातात कि त्यात सगळेच गमवून बसतात आणि मग त्या टेन्शन ला विसरायला अजून कसलेतरी व्यसन मागे लावून घेतात. 
कितीतरी वेळा या व्यसनांमुळे संसार तुटले जातात. घरातल्या वादांमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. घरादाराची राखरांगोळी होते. आणि मग शेवटी डोक्याला हात लावून बसण्याशिवाय पर्याय नसतो.
पण खरंच व्यसन करणे इतकं गरजेचं असते?. जी काही टेन्शन  असतात ती जातात का व्यसने करून? अशा वेळी देवानंद चे गाणे आठवते मैं जिंदगी का साथ निभाता चला गया .... हर फिक्र को धुवे मे उडाता  चला गया
मला हेच कळत नाही का लोकांना आपल्या माणसांपेक्षा ही व्यसने जवळची वाटतात. ह्यात पराभव नक्की कुणाचा त्या व्यसनी माणसाच्या इच्छाशक्तीचा की त्याच्या जवळच्या माणसांचा जी त्या व्यक्तीला समजून घ्यायला कमी पडली. की विजय त्या सगळ्या निरुपयोगी वस्तूंचा जी माणसांपेक्षा वरचढ ठरली.
का बरे लोकांना ही व्यसने जवळची वाटतात.  जगात एकही माणूस नाही की ज्याला टेन्शन नाही म्हणून प्रत्येक जण व्यसनी होते का?? जसे विचार करून आपली दुःख कमी होत नाहीत तशी या निरुपयोगी वस्तूंच्या सेवनानेही नाही होत.   जसे आपण म्हणतो की येणाऱ्या अडचणीना सामोरे जायचे टेन्शन घ्यायचे नाही तसेच व्यसन ही करायचे नाही.
कुठल्याही व्यसनाचे आपल्या शरीरावर वाईट परिणामाच होतात. कुठलातरी असाध्य आजार होण्याची शक्यता ही असतेच. पण आपण हे जर कुणाला समजवायला गेलो तर म्हणणार की निर्व्यसनी व्यक्तींना ही होतात की असे आजार. खरे आहे पण तरीही ज्या गोष्टींचे दुष्परिणाम माहीत आहेत त्या सवयी लावूनच का घ्या?
प्रत्येक व्यसनी माणसाकडे लोकांचा दृष्टिकोन वेगळाच असतो. ते कितीही नीट वागले तरी त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवणे कठीणच.
पण एख्याद्या माणसाला एखादे व्यसन आहे म्हणून आपण त्याला पूर्णपणे वाईट नाही ठरवू शकत. कदाचित ती व्यक्ती आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या अगदी नेटाने पार पडत असेल. पण कितीही चांगली व्यक्ती असली तरी बोलताना माणसे आधी त्याचे दुर्गुणच आठवतात.
तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे शक्य होईल तितके व्यसनांपासून दूर राहा. जगा आणि जगू द्या. सिगारेटच्या धुरात किंवा दारूच्या ग्लासात आपली दुःख लपवण्यासपेक्षा ती आपल्या माणसासोबत राहून विसरायचा प्रयत्न करा.

असाही नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प आज सगळेच करणार जमले तर हा संकल्प करा जमले तर एक तरी व्यसन सोडू. 

नूतन वर्षाभिनंदन 

 

Thursday, 21 December 2017

संदिती

संदिती
आमची मैत्री नेमकी कशी आणि कधी   झाली ते आठवत नाही. पण दहावीत असताना ती माझ्या मागच्या बेंचवर बसायची. शाळेत जाता येताना ही आम्ही जास्त कधी एकत्र नासायचो. पण दहावीच्या त्या वर्षात आम्ही एकत्र आलो. आमच्या दोघींची कॉलेज वेगवेगळी होती पण आम्ही कायम एकत्र असायचो. माझा एक दादा आम्हाला " चंगू  मंगू " म्हणायचा.  कॉलेज ती ५ वर्ष . दिवसातून एकदा तरी आम्ही भेटायचोच. सकाळी किंवा संध्याकाळी . माझ्या दिवसभराच्या गमती जमती कधी तिला सांगते असे व्हायचे. बऱ्याच वेळा माझा संध्याकाळचा चहा तिच्याच घरी असायचा. तिच्या आई साठी हि मी घरातली चौथे अपत्य झाले होते. तिच्या घरी २-३ तास गप्पा मारल्यावर ती मला खाली सोडायला यायची मग तिथे परत तासभर गप्पा. मग थांब तुला थोडे पुढे सोडायला येते म्हणून ती घरपर्यंत यायची. मग मी परत तिला अर्ध्या रस्तात सोडायला जायचे. जेव्हा कुठे बाहेर जाऊन आलो कि हे चक्र उलट असायचे मी तिला सोडायला जायचे. त्या जीवदानी रोड ला हि आमच्या सगळ्या गप्पा पाठ असतील इतका वेळ आम्ही रस्त्यात गप्पा मारायचो. माझी आई मला नेहमी रागवायची कि तुमच्या गप्पा कधी संपणारच नाही म्हणून. पण तिची आई मात्र कधी रागावलेली मला आठवत नाही.  आम्ही ना जेव्हा एकमेकांना बाय म्हणताना ना दोन बोटे जुळवून मग शेक हॅन्ड करतात तसे करायचो, म्हणजे आता फायनल बाय  असे पण त्या नंतर हि आमच्या गप्पा चालूच राहायच्या. असे निदान ३-४ वेळा म्हणायचो कि " ए , आता हे फायनल हा!" पण ते फक्त बोलण्यापुरताच. माझा दादा मला म्हणायचं अरे झाले ३ वेळा जा आता. आम्ही एकमेकींच्या इतक्या जवळ होतो तरी कधी आम्ही एकमेकींच्या घरी राहायला गेलो नाही. जे काही असेल ते रात्री ८.३० पर्यंत. मग दुसऱ्या दिवशी. 
 माझ्या आयुष्यातली एकही घटना किंवा गोष्ट नाही जी तिला माहित नाही. माझी सगळी सीक्रेट तिला माहित आहेत आणि तिची मला.माझे पहिले प्रेम, पहिली नोकरी, पहिला पगार, माझ्या सगळ्या आवडी निवडी अशी एकही गोष्ट नाही जी तिला माहित नाही. ज्यावेळी मी अगदी बावळट, दोन वेण्या घालणारी , कुणाच्याही खिजगणतीत नसणारी होते ना तेव्हापासून तिला मात्र माझ्यावर काहीतरी वेगळाच आत्मविश्वास होता. तेव्हा हि ती माझे नेहमीच कौतुक करायची. माझी एकूण परिस्थिती त्यातून मी केलेला स्ट्रगल सगळ्याची ती साक्षीदार आहे. 
आम्ही दोघी सोबत अर्धी मुंबई भटकलो आहोत. सिद्धिविनायक, महालक्ष्मी, फॅशन स्ट्रीट. खूप मज्जा करायचो. खूप भटकायचो. फॅशन स्ट्रीट वरून तिला घेतलेले दोन स्कर्ट मला अजूनही आठवतात. आयुष्यात पहिल्यांदा तिने घासाघिस केली असेल. आणि सांगितलेल्या भावापेक्षा कमी भावात कपडे घेऊन आल्यामुळे भलतीच खुश होती ती. एकदा ती पाटकर कॉलेज ला असताना ची गोष्ट. मी तिच्यासोबत तिच्या कॉलेज ला गेले होते मग तिथून थोडी खरेदी करून आम्ही गोरेगावलाच एका हॉटेल मध्ये गेलो. तिथे आम्ही डोसा ऑर्डर केला होता. आणि तो वेटर असा शंकू सारखा भाला मोठा डोसा डिश मध्ये घेऊन आला . मला तो काही काट्याचमच्याने खाता येईना म्हणून आम्ही तो हाताने खायला सुरवात केली. मग लक्षात आले कि समोरच्या टेबल वर बसलेली दोन मुले आमची ती त्रेधातिरपीट बघून हसत होते. इतके लाजल्यासारखे झाले. आम्ही पटापट तो डोसा संपवून बाहेर आलो. आणि वेड्यासारख्या हसत होतो. त्या मुलांना घाबरून असे बाहेर येण्यावर आम्हाला आमचेच हसू येत होते. 
अजून एक प्रसंग आहे जो तिला आठवत नसेल. एकदा तिला दिवाळीला दोन ड्रेस मिळाले होते तेव्हा तिने ते दोन्ही ड्रेस मला दिले होते कारण होते तिला ते आवडले नव्हते. पण खरे कारण होते कि त्या वेळी माझ्याकडे नवीन ड्रेस नव्हता हे तिला माहित होते म्हणून तिने मला ते ड्रेस दिले होते.
त्याकाळात एकत्र असणाऱ्या आम्ही तिच्या लग्नानंतर खूप दूर झालो होतो. मनाने नाही तर फक्त शरीराने.  कितीतरी वर्षे  आमचा एकमेकांशी अजिबात कॉन्टॅक्ट नव्हता. साधे फोनवर बोलणेही झाले नाही आमचे. पण तरीही जेव्हा तिच्या बाळाला बघायला आम्ही गेलो होतो असे वाटलेच नाही कि इतकी वर्षे आम्ही लांब होतो.  ती माझ्यावर कधी रागावली नाही कि मी तिला फोन केला नाही कि सगळीकडे भटकते पण तिला भेटायला गेले नाही. कसली म्हणून तक्रार नसते तिची. आताही तिला भेटायला येते म्हणून कितीतरी वेळा मी जात नाही पण ती गेल्यावर मागचे कधीच बोलून दाखवत नाही.
मला तिच्या लग्नाला ही जाता आले नव्हते पण तिच्या साखरपुड्याची मेहंदी मी काढली होती.
मला तिच्या बोलण्याची पद्धत जाम भारी वाटते म्हणजे मी एखादी गोष्ट तिला सांगितली नसेल आणि म्हटले कि अग बोलले होते तुला तर तिचे उत्तर असणार " साली , नालायक कधी बोललीस मला ? हे मला माहीतच नाही " आणि एखादे चांगले काम केले तर म्हणेल " मेले , काय काय उद्योग करत असतेस." आता माझ्या भटकंती करण्यावरून मला नवीन नाव ठेवलेय " भिंगरी" . ती काही बोलली ना तरी मला राग नाही येत. तिच्या शिव्याहि (नॉर्मल) गोड वाटतात मला. कारण त्यात तिचे प्रेम असते.
संदिती विषयी एक गोष्ट कदाचित  जास्त कुणाला माहीत नाहीये ती म्हणजे ती खूप छान गाते.  शाळेत असताना " शिशा हो या दिल हो " हे गाणे तिच्या कडून खूप वेळा ऐकले आहे. आता बहुतेक गाणे सोडलय तिने. ज्या वेळी माझ्या चपात्या म्हंजे देशाचे नकाशे असायचे तेव्हा  तिच्या चपात्या अगदी गोल गोल असायच्या. तिच्या हाताचा स्वयंपाक हि अप्रतिमच. तिच्या आईच्या हाताची चव तिच्या हातात उतरली आहे.
मला तिच्याबद्दल एक खूप वेगळंच फीलिंग आहे. खूप खंबीर , सहनशील आहे ती. असे म्हणतात की बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म पण हीचा तीसरा जन्म होता तो. बाळंतपणाच्या वेळी झालेले ट्यूमर चे ऑपेशन,  त्यातून आलेले पॅरॅलीसिस पण. बाळापासून ८-१० दिवस लांब ठेवले होते तिला. पण या सगळ्यावर मात करून जिद्दीने उभी राहिली ती. . खरे तर युग मुळे तिला पुनर्जन्म मिळाला. तीन महिन्यांच्या युग ला घेऊन जेव्हा ती विरार ला आली होती मी आणि दीपाली तिला बघायला गेलो होतो. खूप अशक्त दिसत होती पण तरीही सगळे करत होती. तिच्या माने वरचा तो ऑपेशन चा कट पाहून काळजात एक चमक उठून गेली. तिच्या शारीरिक त्रासाचे दुःख तर होतेच पण त्यापेक्षा जास्त मनात सल होती की माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणींच्या गरजेच्या वेळी मी तिच्या जवळ तर नव्हतेच पण मला काही माहिती ही नव्हते. ज्या वेळी ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा माधवी तिला बघून अली होती. आणि आम्ही तिला जास्त फ़ोन करून तिला त्रास देऊ नका असे स्पष्ट बजावले होते. त्यावेळी माधवी मैत्रीण कमी आणि डॉक्टर जास्त होती. त्यामुळे तिचे ते म्हणणे आम्ही निमूटपणे ऐकले होते. आता हि ती पडली तिच्या पायात रॉड टाकावा लागला पण त्याही अस्वस्थेत तिचे काम करणे काही  थांबले नाही. दोन -तीन महिन्यातच ती व्यवस्थित चालायला लागली. तिच्या या जिद्दीला मनापासून सलाम. सगळी दुखणी सहन करून तिच्या चेहऱयावर सतत एक स्माईल असते. देवाने तिला भरपूर बळ दिले आहे. 
असे म्हणतात ना की सगळ्या जगाने पाठ फिरवली तरी अशी एक व्यक्ती असते जी आपल्या सोबत राहते आणि मी खात्रीने सांगते की माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती म्हणजे संदिती. ती माझ्यावर ओरडेल, रागावेल पण मला एकटे पडणार नाही.  माझी चूक असली तरी ती आधी ती मी का केली ते समजून घेईल. पण मी चुकले म्हणून मला वाळीत टाकणार नाही. कारण माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती कि तेव्हा ती एकटीच माझ्या बाजूने बोलली होती.
माझ्या आयुष्यातली संदिती अशी एकमेव व्यक्ती असेल जिच्या विषयी मी कधीच काहीच वाईट बोलले नसेन अगदी तिच्या पाठीमागे हि नाही . तिच्यातल्या उणीवा मला कधी जाणवल्याचं नाहीत किंवा मला त्या जाणून घ्यायची इच्छा झाली नाही. आम्ही कधी भांडलो नाही , तिने मला कधीच रडवले नाही आणि मी तिच्या समोर कधी रडले नाही. पण आज  लिहिताना मात्र माझ्या डोळ्यात पाणी आहे कारण देवाची मी  खूप खूप आभारी आहे मी त्याने मला पूर्णपणे समजून घेणारी मैत्रीण दिली. इतके असूनही आता जेव्हा ती विरार ला आलेय तर मी विरार सोडून गेलेय. मला तिच्यासाठी काहीच करता येत नाही हि गोष्ट मनाला सारखी खटकत राहते.
माझा हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्या बऱ्याच जवळच्या व्यक्तींची मने दुखावली असतील, तुम्ही सगळेच माझ्या जवळचे आहात पण कदाचित जी नाळ संदितीशी जोडली गेली ती कुणाशीही जोडली नाही जाणार. तिचे आणि माझे नाते म्हणजे दुधात मिसळलेल्या साखरेसारखे आहे कधीही वेगळे न होणारे.


Friday, 8 December 2017

१४ डिसेंबर १९९४

१४  डिसेंबर १९९४ (बुधवार) माझ्या आयुष्यातील कटू दिवसांपैकी एक दिवस. ज्या दिवशी माझी लाडकी आजी आम्हाला सोडून गेली. अजूनही तो दिवस जसाच्या तास आठवतोय . 
मला नीट आठवत नाहीये पण सोमवार का मंगळवारी आजीचा फोन आला होता कि आज आजोबांबरोबर चेंबूर स्टेशन ला जाऊन आले नवीन मंगळसूत्र घेतलेय तर तू येऊन बघून जा. पण मी नाही म्हटले म्हणाले "अगं ! रविवारी येते म्हणजे राहायला मिळेल. उद्या आले तर परत सकाळचे कॉलेज ." तिने दोन तीन वेळा परत सांगितले पण मी माझ्या नाही वर ठाम माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे. मग म्हणाली ठीक शनिवारी ये कॉलेज हुन डायरेक्ट. तस माझ्या आजीला दागिन्यांचा सोस नव्हता तिला कसलाच सोस नव्हता खरंतर . खूप साधी भोळी होती. सगळे तिला " बाई" म्हणायचे. आणि आजोबा "इंदू". कधी कधी आम्ही तिला हाक मारायचो " इंदू आजी". आजी आजोबानी खूप लाड केले माझे. 
मी F.Y.B.Com ला होते सकाळचे कॉलेज आम्ही ५.२५ ची ट्रेन पकडायचो.  त्यादिवशी आमच्या कॉलेज चा पिंक डे होता. मस्त पूर्ण पिंक पंजाबी ड्रेस घालून अगदी तयार होऊन कॉलेज ला गेले. साधारण १०-१०.३० ची वेळ ऑफ पिरियड होता म्हणून आम्ही बाहेर कॉरिडोर मध्ये टाइमपास करत उभे होतो. मी, नमा, सोनाली, आशु, शिल्पा सगळेच. इतक्यात आशु म्हणाला "मिलन तुझी आई आलीय बघ. " मी मागे वळून न बघताच त्याला ओरडले कि "प्लीज अशी काहीतरी मस्करी करू नको". तेवढ्यात अजून कुणीतरी म्हणाले "अरे तुझे भाऊ , बहीण पण आलेत."  तेव्हा मात्र मागे पहिले तर खरंच आई , अमोल , शीतल तिघेही आले होते. आईचा चेहरा रडवेला वाटत होता. आई म्हणाली चल निघायचे आहे चेंबूर ला जायचे आहे. मला काही कळेना पण जास्त प्रश्न ना विचारात मी बॅग घेऊन आई बरोबर निघाले. कॉलेज च्या बाहेर आईने टॅक्सी केली. टॅक्सी म्हटल्यावर लक्षात आले कि नक्कीच काहीतरी झालेय वाईट. कारण टॅक्सी ची चंगळ परवडणारी नव्हती त्या काळात. गाडी सुरु झाल्यावर वैतागून आईला विचारले काय झालेय सांग तरी. मग आई म्हणाली कि सकाळी 'जो' अंकल आले होते त्यांनी सांगितले कि आजी गेली. त्या वेळी फोन असला तरी एखाद कुणाकडे तरी. आणि नेमके सगळे फोन बंद होते म्हणून ते चेंबूर हुन विरार ला आले होते. पण मला विश्वास बसत नव्हता कि आजी गेली. दोन दिवस आधी तर बोललो होतो आम्ही. पण 'जो' अंकल खोटे का सांगतील?  
तरी एकदा मी आई ला म्हणाले कि तू चुकून  आजी ऐकले असेल आजोबा म्हटले असतील ते. कारण आजोबाना दोन अटॅक येऊन गेले होते. पण आई म्हणाली आजीचं गेली. मला तरीही विश्वास बसत नव्हता. आई सारखी रडत होती. मला काही केल्या रडायला येत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डोळ्यातून पाणी येत  माझ्या पण त्या वेळी जराही नाही. माझा विश्वासच नव्हता त्या गोष्टीवर. आजीचे असे अचानक जाणे माझ्या पचनी पडत नव्हते. आईचे रडणे सुरु होते , मध्ये मध्ये ती आजीच्या जुन्या आठवणी सांगत होती. त्यात मला ओरडून हि झाली तुला बोलावले होते ना तू गेली का नाहीस. मला कळतंच नव्हते का आई अशी का करतेय? माझा विश्वास नव्हताच बसत काही केल्या.  शेवटी आमच्या बिल्डिंग समोर गाडी थांबली. बरीच गर्दी होती खाली. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे दिसत होते. टॅक्सितून उतरल्यावर आई जोरजोरात रडायला लागली. मी मात्र अजूनही शांतच होते. घर कडे जाताना सगळे डोक्यावरून हात फिरवत होते. सगळेच रडत होते मी सोडून. जिने चढून वर गेलो आई धावत आमच्या खोलीत गेली  आतली रडारड जास्त जोरात सुरु झाली तरी मी मात्र अजूनही रडत नव्हते. कदाचित त्या वेळी लोकांना वाटले असेल कि जिच्यावर आजीचा सगळ्यात जास्त जीव होता तिला साधे तिच्या जाण्याने रडू हि येऊ नये. पण माझे फक्त मला आणि मलाच माहित होते. मी मान्यांच्या दारात पोचले आणि एकदम आजोबा समोर आले मला जवळ घेऊन म्हणाले " मिनू, तुझी आजी गेली ग" . त्या क्षणी असे वाटले कि पायाखालची जमीन सरकतोय कि काय. आजोबाना घट्ट मिठी मारून मी जोरजोरात रडायला लागले. इतक्यावेळची माझी खोटी अशा संपली होती. खरंच माझी आजी हे जग सोडून गेली होती कायमची. त्या क्षणी वाटले का नाही आले मी  ती बोलावत होती तेव्हा. खरंच तिला कळले होते का तिचे मरण? तिची मला भेटायची शेवटची इच्छा हि मी पूर्ण केली नाही.  मान्यांचे घर ते आमचे घर जेमतेम १० फुटांचे अंतर पण ते हि १० मैलांसारखे वाटत होते. आजोबानी मला आत नेले. सगळेच जोरजोरात रडायला लागले. म्हणे बघ बाई तुझी लाडकी नातं आलीय. आजीला त्या आराम खुर्चीत बसवले होते. समोर आशा मावशी होती तिची अवस्था तर बघवत नव्हती. काही वेळ वाटले सगळे म्हणत आहेत तसे खरंच मी आलेय म्हणून उठेल का एकदा आजी. मी जाऊन तिच्या जवळ बसले. तिचा हात हातात घेऊन तिची बोटे फोल्ड करायचा प्रयत्न केला. तिच्या हाताला जेव्हा फ्रॅक्चर झाले होते तेव्हा मी अशीच तिची बोटे फोल्ड करायचे आणि मग ती म्हणायची नको ग दुखतंय  वाटले कदाचित आताही बोलेल ती. पण नाही सगळे संपले होते. 
देवाने तिला हवे तसे मरण दिले होते. चालता फिरता पहिल्याच अटॅक मध्ये ती गेली. कधी कधी देवाचा राग येतो मला किती लवकर नेले माझ्या आजीला. आमचे कुणाचे शिक्षण हि पूर्ण झालेलं पहिले नाही तिला. ताईचा तर लास्ट वर्ष होते. डॉक्टर होणार होती ती. पण म्हणतात ना कि जो माणूस सगळ्यांना आवडतो तो देवालाही आवडतो म्हणून नेले असेल त्याने आजीला. त्यादिवसापासून आज पर्यंत जेव्हा जेव्हा तो दिवस आठवतो डोळ्यात पाणी येते. डोळ्यासमोरून तो दिवस काही जात नाही. आजही १४ डिसेंबर ला सकाळी उठले कि मनात एक भीती दाटते. २३ वर्ष उलटली पण जखम काही सुकत नाही , दरवर्षी तिच्यावरचे खपली निघतेच. आजी गेल्यानंतर कितीतरी वर्ष तिचे अस्तित्व जाणवत होते. चेंबूर हुन निघाले कि मागच्या खिडकीत ती नेहमीच उभी राहून टाटा करायची अगदी आम्ही दिसेनासे होईपर्यंत. खूप वेळा ती तिथे आहे असेच वाटायचे. खालून खेळून आल्यावर मी बाहेरच्या खोलीत बसून राहायचे कि आता आजी आतून चहा घेऊन येईल. पण बराच वेळ झाल्यावर लक्षात यायचे कि आता मागितल्याशिवाय चहा नाही मिळणार. सगळे हातात द्यायची आजी. माझी आवडीचे काही बनवले कि मला ते नेहमी जास्त मिळायचे. शैला मावशी कधी कधी म्हणायची मुलींवर केले नाही तितके प्रेम तुम्ही नाती वर करता. खरेही होते ते. मला कुणी ओरडले तरी आजीला वाईट वाटायचे. मग जवळ घेऊन समजवायची ती. आजही कधी कधी खूप एकटे वाटले कि आजीचं आठवते सगळ्यात आधी, असे वाटते कि तिच्या मांडीत डोके ठेऊन झोपावे. आजी आजोबा दोघेच असे होते कि ज्यांनी निस्वार्थी प्रेम केले. माझ्या चुकांना प्रेमाने पोटात घेणारे. मी कितीही हट्टी , जिद्दी असले तरी मायेने समजावणारे. माझे एकूण एक लाड पुरवणारे. 

आम्हाला तिच्यासारखे साधी राहणी , उच्च विचार असे नाही जगाता येणार,  तिच्यासारखे सगळ्यांचे सगळेच निरपेक्ष भावनेने नाही करता येणार पण तिच्या सारखे कायम माणसे जोडून राहण्याचा नक्की प्रयत्न करू.
 
 आजी खूप आठवण येते ग तुझी  ....... .......