Saturday, 1 June 2019

आमचे आईसक्रीम प्रेम


 किती उकाडतेय ना , चल मस्त आईसक्रिम खाऊन येऊ . हो !! कुठे जाऊया नॅचरल्स मध्ये कि मायनस ३० डिग्री मध्येमला ना आज टेंडर कोकोनट खायचे आहे ... हा संवाद हल्लीच्या दिवसात सर्रास ऐकायला मिळतो . आता ह्या कडकडीत उन्हाळ्याच्या दिवसात  आईसक्रिम चे नाव काढले कि तोंडाला पाणी सुटते. आता काय गल्लोगल्ली तुम्हाला आईसक्रिम मिळते. ते हि हजार प्रकारचं, आणि हजारो चवींचे. अगदी नेहमीच्या किराणा मालाच्या दुकानातही आईसक्रिम मिळायला लागले आहे.

आमच्या लहानपणी अशी काही आमची चंगळ नव्हती. त्यावेळी चार आण्यांचा पेप्सीकोला मिळणे हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आईसक्रिम म्हटले कि फक्त लग्नात इतकेच असायचेलग्नात आईसक्रीम खाणे म्हणजे एक पर्वणीच असायची. कोण किती आईसक्रीम खाते याची शर्यत असायची. लहान नाही तर अगदी मोठी माणसे ही आईसक्रीम वर ताव मारायचीसुट्टीत एखादी लग्न पत्रिका घरी आली की आम्ही लहान मुले खुश व्हायचो.. त्या निमित्ताने भरपूर आईसक्रीम खायला मिळणार याच विचाराने

उन्हाळ्याच्या सुट्टीत डोक्यावर मडक्यात गारेगार कुल्फीsssssss असे ओरडत कुल्फीवाला  यायचा. मग घरातल्या मोठ्या लोकांकडे आमचा बालहट्ट सुरु व्हायचा . एक तरी कुल्फी घेऊ या ना. बस एकच आम्ही सगळे वाटून खाऊ. कधी कधी पटकन तर कधीतरी खूप मिनातवारीने मंडळी तयार व्हायची मग त्याच्याकडून २रुपयाची ती कुल्फी पानावर घ्यायची त्याचे तीन ते चार तुकडे करायचे आणि ते भावंडांमध्ये वाटून खायचे.  ज्यादिवशी कुल्फी खायला नाही मिळायची आणि दुसरे कुणी खाल्ले कि त्यांच्या कडे अगदी कधी खायला मिळत नाही असे पाहायचो. ( आता हसू येतेय पण तेव्हा परिस्थितीच तशी होती) एखाद्या दिवशी जर कुणी पाहुणे आले असतील आणि त्यांनी हातावर खाऊ साठी काही पैसे टेकवले असतील तर त्यावेळी प्रत्येकाला एक कुल्फी मिळायची. किंवा अगदीच केसर, मलई, पिस्ता असे काही कुल्फीचे प्रकार जे अगदीच ठराविक ठिकाणी मिळायचे. पण त्या कुल्फीची चव जी जिभेवर रेंगाळते आहे. त्या चवीची सर आजच्या तुमच्या कुठल्याही भारीतल्या आईसक्रीमला नाही इतके मात्र नक्की. 

जरा मोठे झाल्यावर क्वालिटी आईसक्रीमचे रुपये पाच वाले कप मिळायचे व्हॅनिला फ्लेवर वाले, ते ही अगदी सणावाराला. तो कप हातात आला की  आधी त्यांच्यावरचे झाकण काढून ते जिभेने चाटून घ्यायचे नंतर त्या कप मधले आईसक्रीम त्या लाकडी चमच्याने खाऊन घ्यायचे मग तो कप तोंडात उलटा करून त्यातला थेंब थेंब टिपून घ्यायचा आणि मग त्या कप मध्ये बोट फिरवून उरलेले आईसक्रीम चाटून घ्यायचे. अगदी पुरेपूर आस्वाद घ्यायचा त्या आईसक्रीम चा . कॅण्डी आणली कीं ती खाताना बशी घ्यायची कारण सांडले तर जमीन खराब ही व्हायला नको आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचे आईसक्रीम फुकट जायला नकोखाताना हातावर ओघाळलेला एखादा थेंब जिभेने चाटून घ्यायला ही मागे पुढे बघत नसू. आता हे सगळं आठवून हसू येते पण ती मजा काही औरच होती. आता "शीss असा काय तो घाणेरडा पणा करायचा" म्हणून नाक मुरडणाऱ्या लोकांनीही हा प्रकार कधीतरी नक्कीच केला असेल.

अजून  एक गंमत अशी की भरपूर पाऊस पडत असताना भर पावसात भिजत आईसक्रीम खाणे या सारखे स्वर्गसुख नाही. म्हणजे ते जाहिरातीत दाखवतात ना दहा रुपयांच्या शीतपेया साठी काहीतरी अचाट करतात तसे काहीतरी केल्याचा अनुभव आम्ही एकदा सोसायटी मधले सगळे असेच भर पावसात निघालो आणि अचानक आईसक्रीम खायचा मूड झाला आणि पैसे कुणाकडेच नव्हते तेव्हा चक्क उधारी वर घेतले आईसक्रीम आणि दुसऱ्या दिवशी त्याचे पैसे नेऊन दिले नशीब तो आईसक्रीम वाला ओळखीचा होता.

 मला अजूनही आठवतेय माझे आईसक्रीम प्रेम माहीत असल्याने आमच्या बाजूला सुळे काकी होत्या त्यांनी त्यांच्या घरी नवीन फ्रिज घेतल्यावर एक लिटर दुधाचे आईसक्रीम करून दिले होते. त्यावेळी घरी आईसक्रीम म्हणजे काय तर दूध चांगले उकळवून त्यात वेलची जायफळ आणि सुकामेवा घालून फ्रिजर मध्ये ठेवून द्यायचे. आणि गम्मत म्हणजे ते कडक झालेय की नाही हे पाहायला प्रत्येक अर्ध्या तासाला फ्रिजर उघडून त्या चमचा घालून बघायचेकाकांचा फ्रिज नवीन असल्यामुळे तेवढे केले नाही तेव्हा पण काकींना हैराण केले होते कधी होईल हे दहा वेळा विचारून.

खरे तर आईसक्रीम आवडत नाही असे फार कमी जण असतील ना! अगदी नाक गळत असले तरी नाही ग ऊन खूप आहे ना म्हणून थोडेसे खाल्ले आईसक्रीम... किंवा खूपच ऍसिडिटी झाली होती म्हणून खाल्ले अशी करणे द्यायला हि आपण मागे पुढे पाहत नाही. मी हि एकदा असेच केले होते दोन दिवस तापाने फणफणत होते. डॉक्टरांकडून औषध आणून झाले होते. ताप गेला होता पण अशक्तपणा खूप होता. परीक्षा हि जवळ आली होती त्यामुळे सालाबादप्रमाणे आशामावशी घरी आली होती राहायला. मला बरे नाही म्हणून बघायला माझा मित्र चेतन (दुर्दैवाने तो आता आमच्यात नाही ) आला होता मला पाहायला. मावशी आली होती म्हणून त्याने मला सोडून बाकी सगळ्यांसाठी आईसक्रीम आणले. मला इतके वाईट वाटले कि मी रडायलाच लागले कि मला सोडून तुम्ही कसे खाऊ शकता आईसक्रीम. मला तुमच्या कुणाशी बोलायचे नाहीये. त्यावर आई मावशी मला ओरडून झाले कि   आता कुठे ताप गेलाय तुझा आणि काय लगेच आईसक्रीम हवे. पण माझे रडणे काही थांबेना .. शेवटी वैतागून मला आईसक्रीम आणून दिले. आणि नंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून गरम पाणी हि मिळाले. त्यावरून नंतर कितीतरी दिवस मी ओरडा खात होते पण त्या दिवशीच्या आईसक्रीम साठी तो हि खाऊन घेतला मी.

यापेक्षा हि भारी किस्सा तर आता आहे. मी अगदीच लहान होते म्हणजे ५-६ वर्षाची असें. मी , माझी आजी (आईची आई) आणि मोठी आजी (आजीची मोठी बहीण) आम्ही सिनेमाला जाऊन आलो होतो. येताना आम्हाला शोभा हॉटेल लागले जिथे कुल्फी मिळायची. मी आजीला सांगितले मला आईसक्रीम हवेय. आजी म्हणाली आता पैसे नाहीयेत माझ्या कडे , घरी गेल्यावर देते. पण मी काही ऐकायला तयार नाही. सारखे तेच मला इथलेच आईसक्रीम हवेय. दोघी आज्या मला समजावत होत्या. पण नाहीच मी हट्टाला पेटले होते. ते दुकान मागे गेले तरी माझे रडणे सुरूच. त्यावेळी आम्हाला रेल्वे रूळ (चेंबूर स्टेशनचे) ओलांडून यावे लागत असे. दोन्ही हाताला दोन आज्यांनी धरले होते आणि तसेच मला ओढत आणत होत्या. माझे रडणे आता टिपेच्या सुरात सुरु झाले होते. आणि त्या रुळावर आल्यावर मी हाताला झटका देऊन खाली बसले त्या रूळांवरच. आणि मला आईसक्रीम हवेय चा जप सुरूच. दोघीनी ओरडून झाले पण तरी मी गप्प झाले नाही. शेवटी माझी आजी " राहा तू इथेच " असे म्हणून वैतागून पुढे चालायला लागली ( माझी आजी म्हणजे शांततेचा महामेरू , तिला राग आला म्हणजे मी किती हट्टीपणा केला असेल याची जाणीव खूप उशिरा झाली ). तेव्हाच स्टेशन वर एक ट्रेन आली होती. शेवटी मोठी आजी माझ्या आजीला म्हणाली " अग इंदू , लोकांची पोर आहे , काय झाले तर उगाच नको ते " . आजी मागे फिरली आणि पुन्हा दोघीनी  मला उचलून घेतले आणि घरी गेल्या. माझे रडणे तरीही थांबले नव्हते. बिल्डिंग जवळ आल्यावर आजी ने मला शरदच्या दुकान समोर सोडले. तर मी तिथे उभी राहून रडायला सुरवात केली. दोघी मला सोडून घरी गेल्या. आणि मग आमची आशा मावशी हातात पट्टी घेऊनच खाली उतरली. हा हा तिला पाहताच रडणे गायब आणि ती येत होती त्याच्या ऊलट दिशेने मी घरी धूम ठोकली. नंतर मार पडला ती गोष्ट वेगळी. पण तरीही आईसक्रीमप्रेम म्हणा किंवा आईसक्रीम साठीचा हावरटपणा काही कमी झाला नाही.

तर असे हे माझे आईसक्रीम प्रेम... जे अजूनही यकिंचितही कमी झालेले नाही आणि कधी कमी होणार नाही. सॉलिड आईसक्रीम  प्रेमी आहे मी आईसक्रीम साठी  काहीहि करू शकते. हो हो सगळेच असे असतात थोड्याफार फरकाने फक्त कुणी व्यक्त होते कुणी मन मारून राहते.

आणि हो कंमेंट मध्ये तुमच्या ही अशा काही गमती असतील तर लिहा म्हणजे लोकांना ब्लॉग सोबत त्यांना अजून बऱ्याच गंमती वाचायला मिळतील.

हो आणि सोबत तुम्हा सगळ्यांसाठी मस्त गारेगार आईसक्रीम पाठवत आहे भरपूर खाऊन घ्या. 







12 comments:

  1. लहानपणी आम्हाला K Rustam चर्चगेट येथील ice क्रीम चे खूप आकर्षण होते अजून सुद्धा आहे

    ReplyDelete
  2. "पण नाहीच मी हट्टाला पेटले होते. ते दुकान मागे गेले तरी माझे रडणे सुरूच."
    --
    Hatti tar aahech, aani aata hi ice cream sathi radtes aani 2/3 khates, aamchya vatanine pan 🍦🍦

    ReplyDelete
  3. मस्तच �� ice cream प्रेमी आहेस g tu. तुझा ice cream प्रेमी sobat एक गुण दिसून येतोय की तूखूप hहट्टी आहेस �� ते. पण छान मस्त अनुभव आले आहेत तुला. आम्ही lलहानपणी मटका कुल्फी मस्तच टेस्ट होती ती पण आता नाही तशी चव तेव्हाचे सगळे काही मस्त miss करतो ते दिवस खूप आता पण....

    ReplyDelete
  4. Mastach!!
    We now get various varities of amul family packs... Really enjoyable in summer.

    ReplyDelete
  5. तुझं आईस्क्रीम प्रेम वाचलं अन् क्षणभर बालपण तरळून गेलं बघ. आत्ता जसं आईस्क्रीम मुबलक आणि व्हरायटी मध्ये मिळतं (अगदी लग्न समारंभात देखील बरं का)तसं लहानपणी मिळत नसे.आईस्क्रीम खायला मिळणे म्हणजे आनंदयात्राच असायची.एक मात्र खरंय आता आईस्क्रीमचे जितके ब्रॕण्ड अन् फ्लेवर मिळतात ना त्याची सर लहानपणी खाल्लेल्या आईस्क्रीमला नाही.
    तुझा हट्टी पणाचा किस्सातर मस्तच शब्दबद्ध केला आहेस.

    ReplyDelete
  6. Mi pan the ice cream premi. Ani bhar thandit mhanje December mahinyat 4-5 degree temp. Aste tya veles ice cream khanyachi majach aur.

    ReplyDelete
  7. Mastach milan.. Tu सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी aplya vayachya मित्रमंडळी नी अनुभवल्या असतिल.. तुझ्या या लेखाने त्या आठवणी पुन्हा जशाच्या तशा डोळ्यासमोरून गेल्या.. Aplya लहानपणी ice-cream cha family pack vaigare ati ati श्रीमंतीच्या goshti hotya... Jya aaya agdich shullak jhalya ahet... Pan majja aali.. Tujha हट्टीपणा bharich.. Jo ajun tu tasach japla ahes 😜😜

    ReplyDelete
  8. Khup chhan lekh Milan 👌keep it on
    👍

    ReplyDelete
  9. tuzya ice cream che varnan ekun pani sutal tondala.

    ReplyDelete