Saturday, 6 July 2019

गाणे

गाणे म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर आपल्या आवडीच्या गाण्यांचा स्लाईड शो सुरु होतो. किती महत्वाचे स्थान आहे ना गाण्यांना आपल्या आयुष्यात. आपल्या सगळ्यांचेच  अगदी खूप आवडीचे असे एक तरी गाणे असतेच, ते गाणे आपल्या आयुष्याच्या खूप जवळचे असते.  खरंतर आवडीचे असे एक गाणे सांगणे खूप कठीण असते म्हणूनच कदाचित गाण्याची प्लेलिस्ट असते.  प्रत्येक प्रसंग, व्यक्ती, ऋतू सगळ्याचे एक वेगळे गाणे. 

आपण अगदी एकटे असताना आपल्याला बऱ्याचदा गाणे गुणगुणायची सवय असते  कदाचित त्यामुळे आपल्याला थोडा वेळ का होईना आपल्या एकटेपणाचा विसर पडतो.   आपल्यापैकी बरेच जण बाथरूम सिंगर असतो. कधी कधी गम्मत होते कुणीतरी कुठेतरी एखादे गाणे गुणगुणत असते आणि ते चुकून आपल्या कानावर पडते आणि थोड्या वेळाने आपणही तेच गाणे गुणगुणायला सुरवात करतो. अगदी ते आवडीचं नसले तरीही आणि मग " काय हे कुठले गाणे म्हणतेय मी ?" असे स्वतःलाच दोष देऊन एकटेच हसतो. 

कधी कधी एखाद्या गाण्याच्या ओळी आपल्याला आपल्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगांची आठवण करून देतात, तर कधी तरी पटकन एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते. आणि आपण एकदम भावनिक होऊन जातो.  आपल्या प्रत्येक मूड आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक एक   गाणे बनलेले असते असे नाही का वाटत तुम्हाला?   कधीतरी असेही होते कि एखाद्या विशिष्ट व्यक्तीमुळे आपण एखादे गाणे ऐकले असते आणि ज्यावेळी  आपल्याला त्या व्यक्ती ची प्रकर्षानं आठवण येत असते तेव्हा साहजिकच आपण ते गाणे लावतो. कधीतरी एखादा प्रसंग घडतो जेव्हा मागे गाणे सुरु असते किंवा एखाद्या प्रसंगाला एखादं गाणे अगदी चपखल बसते. 

प्रत्येक गाणे आपल्याला वेग वेगळ्या कारणाने लक्षात राहते. कधी त्याचा गीतकार , कधी संगीतकार, कधी गायक,तर कधी त्यातल्या पात्रांमुळे.  तर काही गाणी ते लिहिताना किंवा चित्रित करताना घडलेल्या गोष्टींमुळे हि लक्षात रहातात . देशभक्तीपर गाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ती गाणी ऐकताना आपल्या समोर त्या काळाचे चित्र उभे राहते. लता दीदींचे " ए  मेरे वतन के लोगो" ऐकताना तर डोळ्यातून पाणीच येते. कुठेही राष्ट्रगीत लागले कि आपण सगळे सोडून उभे राहतो. देवाची गाणी ऐकताना आपण इतके तल्लीन होती कि त्या देवाची मूर्ती समोर असल्याचा भास होतो कधीतरी आपल्याला.  हि ताकद असते गाण्यांमध्ये, सगळे विसरून आपण त्यात समरस होऊन जातो. 

गाणे म्हणजे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अगदी साधंच उदाहरण घ्यायचे झाले तर आपण कुठे पिकनिक ला गेलो  किंवा फिरायला गेलो तर गाणी म्हणणे हा उत्तम विरंगुळा असतो. विडंबनपार काव्य  म्हणायला जास्त मजा येते. गाण्याच्या भेंड्या खेळताना तर अजून मजा .. अशी आपल्याला भरपूर गाणी आठवतील पण त्या वेळी मात्र एक एक गाणे आठवताना मारामार. आणि आठवली तरी त्याची सुरवातच आठवत नाही असे होते. पण बऱ्याच वेळा असे होते कि भेंड्या खेळताना आपल्याला जुनीच गाणी जास्त आठवतात. नवीन गाणी पटकन आठवली जात नाही. शेवटी जुने ते सोने. 

आणखी एक गम्मत अशी कि एखाद्या गाण्यात एखाद्या नायिकेने घातलेला ड्रेस किंवा साडी पटकन लक्षात राहते. बऱ्याच स्त्रियांच्या तोंडात हे वाक्य असते " अगं !! त्या गाण्यात तिची साडी काय सॉलिड आहे ना !!!" .  इतकेच कशाला तर काही गाणी त्या सिनेमाच्या प्रसंगाला इतकी एक वेगळीच गोडी देतात. बऱ्याच वेळा गाण्यांमुळे आपल्याला सिनेमा लक्षात राहतो. एखादा सिनेमा अगदीच टुकार असतो पण त्यातले गाणे मनाला अगदी स्पर्शून जाते.

दोन पिढ्यामध्ये या गाण्यावरूनही वाद होतात. जुनी पिढी म्हणते " आमच्या वेळी काय गाणी होती अर्थपूर्ण, सुंदर संगीत, शब्द  आणि आताची गाणी नुसती धांगडधिंगा ". तर नवीन पिढी म्हणते " काय तुमची ती ओल्ड सोन्ग्स,  बोअरिंग  .. नुसती स्लो " . प्रत्येक पिढी प्रमाणे गाण्याच्या चालीही बदलल्या. पण जुनी पिढी जेवढी तन्मयतेने गाणी ऐकतात तेवढीच नवीन पिढी हि. पूर्वी  गाण्यातून काही संदेश हि दिला जायचा , हल्लीची गाणी बरीचशी फक्त "ट" ला "ट " जोडून तयार केलेली असतात. अर्थात सगळीच नाही. काही नवीन गाणी अगदी जुनी पिढी हि गुणगुणते. काही म्हणा जुनी गाणी ऐकायला मिळणे हि वेगळीच पर्वणी  आहे. फेसबुक च्या 'स्मृतिगंध' नावाच्या पेज वर या अशा जुन्या गाण्यांचा खजाना आहे.  जुनी गाणी कधी जुनी वाटतच नाही. दार वेळी ऐकताना ती अजून तरुण वाटतात. 

जशी गाण्यात जादू आहे ना तशी ते गाणे बनविणाऱ्या प्रत्येकात जादू आहे. बऱ्याच वेळा एखादे गाणे आपल्याला त्या गायक किंवा गायिकेमुळे लक्षात राहते. सिनेमात गाणी गाणारे गायक आपल्याला लक्षात राहतातच पण शास्त्रीय संगीत गाणारे गायकही आपल्याला त्यांच्या शैलीमुळे लक्षात राहतात. आपल्या आधीच्या पिढ्या खूपच नशीबवान त्यांनी खूप मोठ्या मोठ्या गायकांना, संगीतकारांना ऐकले. आताच्या काळात राहुल देशपांडे, महेश काळे, आनंद भाटे, आरती अंकलीकर याना , आणि अशा बऱ्याच गायकांना ऐकणे म्हणजे मंत्रमुग्धता.  या सगळ्यांनाच काहीतरी अचाट दैवी शक्ती लाभली आहे असेच वाटते. म्हणूनच कदाचित संगीत हि एक उपचार पद्धती पण आहे.

गाणी हि नुसती गाणी नाहीत ती एक भावना आहे, जी ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या प्रिय व्यक्ती येतात. कधी तरी त्या गाण्याचे बोल इतके आपलेसे असतात कि असे वाटते "अरे हेच बोलायचे होत मला." आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती पासून दुरावलेले असतो आणि अशा वेळी एखादे प्रेम गीत किंवा विरह गीत कानावर पडले तर आपल्या समोर ती व्यक्ती येते, त्या व्यक्ती बरोबरच्या आठवणींचा एक पट आपल्या डोळ्यासमोरुन जातो. आणि डोळे आपोआप भरून येतात. असे वाटते कि हे गाणे त्याही व्यक्तीने ऐकावे कि जेणेकरून त्या हि व्यक्तीला आपल्या भावना कळतील .  

आपल्यामध्ये असे खूप जण असतील (माझ्यासारखे) ज्यांना कदाचित गाण्यातलं जास्त काही काळात नाही पण गाणी ऐकायला मनापासून आवडते. चांगल्या गाण्याला दाद द्यायला आवडते. सगळीच गाणी मी आवडीने ऐकते पण अभंग मला जास्त भावतात (किंवा तो एकाच प्रकार मला 🙂). आवडते गाणे एकाच वेळी १० वेळा ऐकायला आवडते, मग ते जुने असो किंवा माझ्या आजोबांच्या काळातले असो. कितीतरी वेळा आपण गाणे म्हणताना चुकीचे शब्द अगदी बिनधास्त गातो कधी कधी ते खपूनही जातात. पण समोर कुणी जाणकार असेल तर मग आपली फजिती लक्षात येते. गाण्याचा प्रकार कळण्यापेक्षा त्यातले भाव हृदयाला भिडणे जास्त महत्वाचे आहे.

आपल्या मनातील भावना उलगडण्याचे एक उत्तम मार्ग म्हणजे गाणे.  कदाचित हि गाणी आहेत म्हणूच आपले जीवन थोडे सुखकर आहे. त्या गाण्यांच्या ओघात आपण कधी कधी आपले सगळे दुःख विसरून जातो आणि नकळत आपल्या ओठावर हसू फुलते. गाणे कुठल्या प्रकारात मोडते हे माहित असण्यापेक्षा ते गाणे मनापासून ऐकणारे कान असावेत .  गाणे ऐकताना डोळे मिटून तल्लीन होणारी व्यक्ती हि गाण्याची खरी दर्दी. 

                            " जीवन गाणे गातच जावे , झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे" 






Tuesday, 2 July 2019

गंमत भीतीची

आजचा लेख हा अगदी सहज सुचलेला लेख आहे काहीच लिहायला नव्हते म्हणून केवळ वेळ जावा म्हणून हा लेख. 

आता चहा पीत खिडकीत उभी असताना  सहज म्हणून खाली पाहिले तर लहान मुले क्लास हुन सुटली होती. कंपाऊंड मध्ये साचलेल्या पाण्यात त्यांची मजा सुरू होती, एकमेकांवर पायाने पाणी लोटताना एकाचा दुसऱ्याला पाय लागला तर त्याने लगेच त्याला नमस्कार केला ( लोटांगण नाही त्याच्या अंगाला ओझरता स्पर्श करून तो हाथ आपल्या माथ्याला लावला) अगदी साधी सरळ क्रिया पण मला यातून वेगळेच आठवले.

अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या परंपरेने आपल्याला त्याची भीती घातली जायची आणि आपणही तीच भीती आपल्या मुलांनाही घालत आलो. अशाच काही जुन्या गोष्टीना उजाळा.

आपण लहान असताना आपल्याला भीती घातली जायची असा कुणाला पाय लावला की देवबाप्पा रागावतो हा म्हणून लगेच नमस्कार करायला लावायचा.  यात संस्कारापेक्षा भीती जास्त दाखवली जायची . आणि आपणही तेव्हाही आणि अजूनही कुणाला पाय लागला की लगेच नमस्कार करतो. कधी कधी मस्करी मध्ये एखाद्याला म्हणतो ही की मुद्दाम लाथ मारायची आणि मग हे नाटक किंवा एकदाच काय ते लाथा मारून घे आणि एकदाच काय तो साष्टांग घाल.😊

 मुलं जेवत नसले की लवकर जेव नाहीतर बुवा पकडून नेईल, ही सगळ्यात पहिली भीती...नंतरही बरेच वेळा हे करू नकोस बुवा येईल , ते करू नकोस बुवा येईल. गंमत म्हणजे हा बुवाला कधी कुणी पाहिलेला नसायचा आणि हा बुवा नक्की कोण हे विचारायची अक्कल आणि हिंमत आमच्या पिढी पर्यंत नव्हती (आताची मुले खूपच स्मार्ट आहेत).  कधी कधी बुवा म्हणून दाखवला जायचा तो म्हणजे घरातलेच कुणीतरी डोक्यावर पांघरूण घेऊन यायचे, सगळे लाईट घालवले जायचे आणि मग विचित्र आवाज काढून घाबरवले जायचे.

मारामारी करताना डोक्याला डोकं आपटले की कुणीतरी म्हणायचे "आता तुम्हाला शिंग येणार" आणि शिंग येऊ नयेत म्हणून परत एकदा एकमेकांच्या डोक्यावर डोकं आपटायचे. ते दोन घाबरलेले जीव आपल्याला शिंग कसे दिसेल या विचाराने अजून जोरानं टक्कर द्यायचे. या मागचे लॉजिक अजून कळलेलं नाहीये. एकदा मारून एक येणार तर दोनदा मारून दोन यायला हवेत ना? नाही येणार म्हणजे ते उगवणारे शिंग दुसऱ्यांदा आपटून लगेचच आत टाकून द्यायचे असे का??? किंवा आलेच तर एक वाईट दिसेल म्हणून दुसरे😀😀😀

अजून एक भीती ती तर गंमतच. कुठलेही फळ खाताना त्याची बी गिळली की पोटातून म्हणे त्याचे झाड उगवते. अर्थात फळं खाताना ती नीट बघून खावीत म्हणून हे सांगितले जायचे हे कळायला फार उशीर होतो. तोपर्यंत आपण बऱ्याच वेळा चिकू, पेरू, कलिंगड अशी बरीच झाडे आपल्या पोटातून आपण उगवताना  आपण कल्पना करून झालेले असतो.  किती वेळा तर बेंबीतून झाड (वेल) आलीय असे चित्र ही काढून झाले असेल वहीच्या शेवटच्या पानावर.

आपण सगळेच लहान असताना पोलिसांना घाबरतो याला कारण ही आपल्याला घातलेली भीती.  घरातली मुले खूप मस्ती करत असली अजिबात ऐकत नसली की मग कुणीतरी म्हणते " आता मस्ती थांबवा नाहीतर पोलीस पकडून नेतील". ही धमकी तर  वारंवार दिली जायची. रस्त्यातून जाताना पोलीस दिसले की धडकी भरायची. कित्येकदा तर आईच्या मागे लपून राहायचे. 
माझ्या सारख्या बऱ्याच डरपोक लोकांना अगदी खरी वाटावी अशी गोष्ट म्हणजे भूत. आता माणसेच भुतासारखी वागतात ती गोष्ट वेगळी. रात्रीच्या वेळी बाहेर पडायचे असले की अरे तिथं जाऊ नको भूत असते. कींवा रडू नको हा तो राक्षस येईल आणि तुला खाऊन टाकेल. आणि जरा कुणी विचित्र आवाज केला की आपली इथे टरकायची. आणि कुणीतरी सांगितले असायचे की रामाचे नाव घेतले की भुतं पळून जातात म्हणून  भीती वाटली रे वाटली की राम नामाचा जप सुरू करायचा.

सगळ्यात गंमत होती ती खोटे बोललं की सांगितले जाणारी... खोटं बोललो की बाप्पा कान कापतो...असे कुणीही नसेल की ज्यानी हे वाक्य ऐकले नसेल. पण तरीही कधीतरी लबाडी केली जायचीच आणि मग झोपताना कानावर हाथ धरून झोपायचे किंवा उठल्यावर आधी कान तपासायचे आहेत का?  प्रत्येक वेळी खोटं बोललो की ही भीती मात्र कायम असायची.

अजूनही काही गोष्टी आहेत ज्या भीती कमी आणि अंधश्रद्धा जास्त अशा आहेत त्यावर नंतर कधीतरी....

पण काहीही म्हणा त्या खोट्या भीती ची ही भीती वाटायची.  पण आता खरेच रोजच्या आयुष्यात इतक्या गोष्टी वाईट घडतात की माणसांची भीती पळून चालली आहे.  रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतका व्यग्र झालाय की माणसाला सगळ्यात जास्त वाटणारी मृत्यू ची भीती ही वाटेनाशी झाली आहे. 













Friday, 28 June 2019

चहा - तुमचा माझा...सगळ्यांचा

छान पाऊस पडतोय , गरमागरम भजी आणि कडक आले घातलेला चहा होऊन जाऊ दे ... असा संवाद आता पावसाळ्यात आपल्याला सर्रास ऐकायला मिळतो. तर "चहा,  नको रे बाबा!! मला ऍसिडिटी होते " हे वाक्य तर दहातली नऊ जण म्हणताना आपण ऐकतो. तरीही चहा हे नक्कीच एक अमृतपेय आहे.  काही म्हणा पण या मुसळधार पावसात गरमागरम वाफाळता चहाचा कप घेऊन गॅलरीत किंवा खिडकीत बसून त्याचा आस्वाद घेण्याचे सुख काही औरच.

मला कॉफी हे श्रीमंतांचे पेय वाटते, तर चहा गरिबांपासून श्रीमंतांचे सगळ्यांचे लाडके पेय आहे.  एखाद्या मोठ्या कॉफी शॉप मध्ये जाऊन २५०-३०० रुपयाची ती कडू कॉफी पिण्यापेक्षा , टपरीवरचा १० रुपयाचा चहा जास्त चांगला वाटतो. अर्थात प्रेस्टिज म्हणून कधीतरी ते हि करायला हरकत नाही.

भरपावसात गाडीतून लांब फिरायला जावे आणि वाटेत असणार्‍या चहाच्या टपरीवर गरम गरम चहा आणि कांदा भजी खावी काय ते  स्वर्गीय सुख. तुम्ही कधी अनुभवलं आहे का ? आपल्या कुठल्याही पिकनिकचे किंवा कुठल्याही प्रवासाची सुरुवात आणि शेवट हा टपरीवरच्या चहानेच होतो.

प्रत्येक नाक्यावर अशी एक तरी टपरी असते जिथे चार मित्रांची टोळकी जमतात, तिथे मित्रांचे कट्टे  लागतात. गप्पा होतात, मोठे  मोठे डिस्कशन होतात. कटिंग आणि वडापाव किंवा कटिंग  आणि भजी ची पार्टी होते, लाखोंच्या उलाढालीत होतात , नाटक सिनेमाची बोलणी, आखणी होतात, कितीतरी कलाकार अशाच टपऱ्यांवर लहानाचे मोठे झाले असतील. कोणाच्या घरची  टेंशन तेथे शेअर केली जात असतील तर कोणाचे आनंदाचे क्षण साजरे केले जातात. 

 आपल्यातल्या बहुतेक जणांची दिवसाची सुरुवात ही सकाळच्या चहाने होते. एक  ठराविक प्रकारच्या स्वादाचा  चहा मिळाला  की दिवस कसा भन्नाट जातो.  "अरे सकाळी चहा घेतल्याशिवाय मला  प्रेशर येत नाही " येत नाही  असं वाक्य म्हणणारा प्रत्येक घरात एक तरी माणूस असतोच. घरात कधी कधी प्रत्येकाला वेगळा चहा लागतो म्हणजे कुणाला बिनसारखरेचा, कुणाला दुधाचा, कुणाला खूप उकळवलेला तर कुणाला  बिना दुधाचा. एक चहा पण घरातल्या घरातही त्याचे किती प्रकार. म्हणे हवा तसा चहा मिळाला नाही तर किक बसत नाही. बरे जसे चहा चे प्रकार वेगळे तसा प्रत्येकाचा चहाचा कप हि वेगळा असतो ठराविक कपात चहा प्यायल्या शिवाय तो प्यायची मजा येत नाही.

 खरेतर चहाचे म्हणजे चहा पावडर चे हि खूप प्रकार असतात पण  आपल्या सामान्य माणसांसाठी चहा म्हंटला कि तो टाटा, लिप्टन , सोसायटी किंवा ताज हेच डोळ्यासमोर येतात. आमच्या लहानपणी ताजमहल चहाची जाहिरात लागायची या जाहिरातीत दस्तुरखुद्द पं. झाकीर हुसेन असायचे, त्यामुळे  मला नेहमी वाटायचं हा चहा फक्त श्रीमंतांसाठी असावा. एवढा मोठा माणूस जाहिरात करतोय म्हणजे. कारण  बाकीच्या चहाच्या जाहिरातीत कोणीतरी अगदी आपले सामान्य चेहरे असायचे.  आमच्याघरी  आई पूर्वी ममरी चहा घेऊन यायची , तेव्हा हे ब्रँड वगैरे चे प्रस्थ जास्त नव्हते. नंतर मात्र तिची गाडी सोसायटी  चहावर जी वळली की अजून पर्यंत त्याच्यावरच होती. 

चहा म्हणजे दोन मनांना एकत्र आणणारा दुवा होतो कधी कधी. चहा पिता पिता आपण खूप साऱ्या गप्पा मारतो  समोरच्यासोबत . एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी भेटली कि " चल , कुठेतरी बसून मस्त चहा पिऊ आणि गप्पा मारू. " हे वाक्य अगदी ठरलेले असते. चहा फक्त बहाणा असतो , तो  वेळ असतो जो आपल्याला समोरच्यासोबत घालवायचा असतो. लग्नाच्या आधीहि चहा आणि कांदे पोह्यांचा कार्यक्रमच होतो. पहिली भेट हि चहा पासूनच सुरु होते (आता कॉफी ने).  चहासोबत आपण बऱ्याच विचारांची हि देवाणघेवाण करतो. एक चहा दोघात मिळून प्यायची मजा हि न्यारीच. एकाने चहा कपात तर एकाने बशीत चहा प्यायचा. 

आपल्याकडे कुठल्याही वेळी पाहुणे आले तरी आपण आधी हेच विचारतो चहा घेणार ना. हल्ली सीजन प्रमाणे विचारणे बदलले आहे हि गोष्ट वेगळी. पण सुरवात मात्र चहानेच होते. " अहो जास्त नाही , अर्धा कप तरी घ्या " म्हणून आग्रह केला जातो. दुपारचे जेवण कितीही उशिरा झाले असले तरी ४-४.३० ला घरातल्या पुरुष मंडळींचे फर्मान येतेच "चला चहा टाका आता चहाची वेळ झाली."  ऑफिस मध्ये काम करून कंटाळा आला कि मित्रांसोबत टी टाइम म्हणून टपरी वर जाऊन एक कटिंग आणि सोबत एक सिगारेट ... . डोळ्यावर झोप आली कि पटकन एक अर्धा कप चहा मारायचा सगळी झोप गायब. काही म्हणा चहा म्हणजे पण एक नशा आहे , वेळेत नाही मिळला कि जीव कासावीस होतो. आणि एकदा सवय लागली कि ती सुटणे फार कठीण. ह्या चहाचे ज्याला व्यसन लागते ना त्यांना तुम्ही कधीही विचारा चहा घेणार का ? हो अर्धा कप चालेल असे त्यांचे उत्तर ठरलेले असते. 


एरवी हायजिन म्हणून ठराविक ठिकाणीच खाणारी लोक हि चहा मात्र कुठेही पितात. मग ती सायकल वर किटली घेऊन येणाऱ्या पोऱ्या कडची असो , कि एखाद्या कळकट्ट टपरी वरची , कि चाय गरम, चाय म्हणत ट्रेन मध्ये ओरडत येणाऱ्या त्या माणसांकडची असो. चहाला कसलेच बंधन नसते. जसे चहा कुठे प्यायचा यावर बंधन नाही तसे चहा बरोबर काय खायचे याला हि मर्यादा नाही. म्हणजे चहा सोबत काही खपून जाते म्हणजे चहा सोबत वडापाव खा, किंवा खारी खा , किंवा फरसाण खा. सगळे चांगलेच लागते. शिळी चपाती तुपावर गरम करून ती चहा सोबत खाणे हा बऱ्याच जणांचा नाश्ता असेल बालपणी. चहा सोबत भरपूर बटर लावलेला पाव असेल तर त्याची मजा काही औरच ... सुटले ना तोंडाला पाणी.
 
आम्ही मैत्रिणी जेव्हा जमतो तेव्हा रात्रभर जागरण असते, पण मी लवकर झोपते ,  त्याची शिक्षा म्हणून मला मध्यरात्री कधीतरी उठवून चहा बनवायला सांगतात. मी आपली  अर्धवट झोपेत चहा बनवते पण ह्या आपल्या चहाला नाव ठेवायला तयार. साखरच जास्त झालीय, दूधच जास्त आहे, आले कमी झालेय नीट उकळला नाहीये. थोडक्यात काय तर मला चहा नीट बनवायला जमत नाही. आता हे वाक्य इथे टाकण्याचे कारण तुम्ही सुज्ञ वाचकांनी जाणलेच असेल. (बरोबर हे वाचून कधी येऊ चहासाठी असे विचारायला नको म्हणून 😃😃😃😃

चहा जसा सगळ्या वर्गातल्या लोकांचा तसाच तो सगळ्या ऋतूंचा हि आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात चहा हि गरज असते. पण उन्हाळ्यात उकडतेय म्हणून चहा न पिणारे लोक विरळाच. दिवसातून एखादा चहा झाला नाही तर दिवस सार्थकी लागत नाही आपला. मला चहा ना आवडणाऱ्या लोकांचे नवल वाटते. एका अमृतपेयाला मुकतात असे वाटते. 


माझ्या बकेटलीस्ट मधली अजून एक इच्छा आहे कि एकदा तरी ताज हॉटेल ला जाऊन चहा प्यायचा. कारण तोच बहुधा परवडणारा असेल 😃😃. कधीतरी नक्कीच होईल पूर्ण हि इच्छा. 

खरेतर चहा वर खूप तज्ञ लोकांचे लिहून झालेय म्हणून विचार करत होते लिहू कि नको. पण मला वाटते कि हे जे लिहिले आहे ते आपल्या सामान्य माणसांच्या मनातला चहा आहे.  आणि जिच्यामुळे  हा ब्लॉग लिहायची माझी इच्छा प्रबळ झाली  ती "हर्षा पेणकर" , आमचे दोन चहा प्रेमी " विकी" आणि "आकांक्षा" हा ब्लॉग खास तुमच्या साठी. 💖 

" चहाला वेळ नसते .... पण वेळेला चहाच लागतो "  

चला तर मग सगळ्या चहा प्रेमींनी एखादी "टी " पार्टी करायाला हरकत नाही.  मौसम भी है दस्तूर भी है  . . . . . . . . . . . . काय म्हणताय मग येताय ना चहा प्यायला.







Wednesday, 5 June 2019

म्हातारपण

म्हातारपण शीर्षक वाचून जरा टेन्शन आले असेल ना पण काय करणार आपल्या आयुष्यातला न टाळता येणार टप्पा. बऱ्याच वेळा नको रे बाबा लवकरच काही ते होऊ दे , इतके वय नको असा संवाद ऐकायला मिळतोच मिळतो. पण तरीही आता जर आपल्या आजूबाजूला पहिले तर हा काळ पण आपल्याला सुखकर करता येतो याची खूप उदाहरणे आजू बाजूला दिसतील. असे म्हणू शकतो कि आपल्यापेक्षा   आपल्या आई बाबांची पिढी जास्त उत्साही आहे. तुम्ही कधी सकाळी चालायला जा तरुण आणि मध्यमवयीन लोकांबरोबर म्हातारी माणसे हि त्याच प्रमाणात असतात. अंतराअंतरावर त्यांची टोळकी असतात. छान गप्पा रंगलेल्या असतात. ट्रॅक  पॅन्ट आणि टी शर्ट घालून मस्त जॉगिंग हि सुरु असते.  कुठे प्राणायाम योगा हि सुरु असतो. लाफ्टर क्लब मध्ये तर सगळे सिनिअर सिटीझन असतात.

या सगळ्याच काका काकूंच्या कट्ट्यावर अगदी ऑलराऊंडर चर्चा होतात. किती विषय असतील त्यांच्याकडे , इतका अनुभव, आयुष्याचे सगळे उतार चढाव पाहिलेले. सगळ्या मोहपाशातून मुक्त होऊन फक्त आयुष्य जगायचे.  त्याने लहानपण, तरुणपण, मुलांचे आयुष्य आणि आता नातवंडं कितीतरी बोलण्यासारखे.  खरेच पण या पिढीचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. म्हणजे घरात नातवंडांना सांभाळ्यापासून, लग्न कार्याला हजेरी लावणे, घरातली छोटी मोठी कामे करणे . सगळ्या जबाबदाऱ्या ते कंटाळा न करता पार पडतात.
हल्ली चे आजी आजोबा नवीन टेकनॉलॉजि हि तितक्याच तत्परतेने शिकतात. त्यांचे हि व्हाट्सअँप वर ग्रुप हि आहेत. हल्ली जितके आता शाळा सोडून गेलेल्या मुलामुलींचे जितके स्नेहसंमेलन होत नाही तितके सत्तरीला पोहचलेल्या आजी आजोबांचे होते.

आजही मी व्हाट्सअँप वर एका अशा ग्रुप चा हिस्सा आहे तिथे सगळे ७०च्या वरचे तरुण तरुणी आहेत. त्या ग्रुप मध्ये हि प्रत्येकाच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला आवर्जून शुभेच्छा दिल्या जातात. कुणी कुठे फिरायला गेले, कुणाच्या घरी काही कार्यक्रम असला तर त्याची फोटो पाठवले जातात. आपल्यात असतो तितकाच उत्साह त्यांच्यातही असतो. हल्ली सगळ्या टूर कंपन्यांचे हि सिनिअर सिटीझन स्पेशल अशा बऱ्याच टूर असतात. माझ्या बाबांचा तळ्यावर बसणाऱ्या सिनिअर सिटीझन चा ग्रुप आहेत. सगळे ना चुकता ४. ३० - ५ पर्यंत तिथे जमतात. प्रत्येक महाशिवरात्रीला त्यांची पापडखिंड येथे असणाऱ्या शंकराच्या मंदिरामध्ये एक छोटीशी पिकनिक असते.त्यांचे नुसतेच भेटणे नसते तर एकमेकांना गरजेला मदत करणे हे हि त्यांचे कर्तव्य समजतात. एकमेकांच्या अडीअडचणींना मदत करतात. एकमेकांच्या सुख दुःखात सोबत करतात.

मी या सिनिअर लोकांबरोबर एकदिवसाची ट्रिप केली होती. सुरवातीला वाटले कि काय करणार मी इतक्या म्हाताऱ्या लोकांमध्ये? पण तिथे गेल्यावर कळले कि हे सगळे तर आमच्यापेक्षा जास्त तरुण आहेत. त्यांना एका जागी बसायचा कंटाळा आला होता म्हणून आम्ही भर उन्हात जेट्टीवर फिरून आलो. तिथे सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढले आणि माझ्याकडून काढून घेतले.  त्यांच्या गप्पा जेव्हा रंगल्या ना तेव्हा तर गम्मतच वाटली अगदी त्यांच्या शाळेच्या आठवणी त्यांना जशाच्या तशा आठवत होत्या. सगळे एकमेकांची मस्करी करत होते. शाळेत कुणाला कुठल्या टोपण नावाने हाक मारायचे याची हि उजळणी झाली.

माझे सासरे वयाच्या ७९ व्या वर्षापर्यंत दुकानात जात होते. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत ते दुकानात उभे राहत असत. त्यांचे एक काका १०० वर्षाचे, आत्या ९५, ९२ वर्षाचे, त्यांची मावशी ९० आणि मामी हि जवळपास त्याच वयाचे आहेत. सगळे अजूनही चालते फिरते आहेत.  आम्ही गावी जेव्हा आमच्या कुलदेवतेच्या उत्सवाला जातो तेव्हा तिथे तयारीसाठी म्हणून जे जातात ते सगळे ७०च्या पुढचे काका असतात. त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो. मधुकाकांसारखे सकाळी उठल्यापासून रात्री पर्यंत न थकता सगळी कामे त्याच एनर्जी ने करणे विशीतल्या तरुणांना हि शक्य होणार नाही. ते नुसतीच कामे करत नाहीत तर पालखी नाचवणे , आरत्या म्हणणे, आणि अगदी मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घेणे सगळे अगदी आवडीने करतात.

कधी कधी आपण ऐकतो कि घरातल्या वृद्धांचा त्रास होतो. असे म्हणतात ना कि लहानपण आणि म्हातारपण अगदी सारखे असते. त्यामुळे ती माणसे हि लहानमुलांसारखे वागतात. इतकी वर्षे त्यांना घरावर त्यांचे राज्य असते त्यामुळे आताही घरातल्या सगळ्या लहान सहन गोष्टी त्यांना कळाव्यात असा त्यांचा अट्टाहास असतो. घरातील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते हि लहान मुलांसारखे काही ना काही करत असतात. पथ्याचे खायचे टाळून बाकी गोष्टींचा गुपचूप आस्वाद घेणे हे हि सगळे करतात. त्यामुळे घरातले त्यांच्यावर रागावतात , पण तसे दोघेही त्यांच्या जागी योग्य असतात कारण मुले रागावतात ती त्यांच्या तब्बेतीची काळजी म्हणून तर चटपटीत खायची इच्छा सगळ्यांचा होते त्यात ते तरी अपवाद कसे असणार.

हेच म्हातारपण शाप वाटते जेव्हा वृद्धाश्रमात ठेवलेल्या आजी आजोबांना बघतो. कुणाची मुले बाहेरगावी आहेत , तर कुणाच्या घरच्यांशी पटत नाही तर कुणाला त्यांच्या आजारपणाचा कंटाळा आलेला म्हणून तिथे आणून टाकलेले. खरंतर त्यांच्या घरच्यांचा नाकर्तेपणाची शिक्षा ते भोगत असतात. पण त्या वृद्धाश्रमात पण आपल्या एकाकी आयुष्याला सुखकर बनविण्यासाठी ते लोक तिथे काही ना काही कार्यक्रम करत असतात. एकमेकांची काळजी घेत असतात. एक मात्र नक्की आपल्या तरुणपणात मेहनत करून आपल्या म्हातारपणाची पैसे साठवून ठेवणे खूप गरजेचं आहे.

आयुष्याच्या अशा टप्प्यावर असतात कि आलेली त्यांना कसलीही बंधने नको असतात. आतापर्यंत कष्टात काढलेले त्यांचे आयुष्य त्यांना त्यांच्या मनासारखं  जगायचे असते. त्यामुळे कधीतरी आपण मुलांनीही त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू द्यावे. एकमेकांची काळजी घेणे, आपली तब्बेत सांभाळणे , आणि आपले मन रामावणे इतकेच काय त्या त्यांच्या अपेक्षा असतील. बऱ्याच वेळा घरात वाद होतो कि आजी आजोबांचे लाड नातवंडांना बिघडवतात. पण आपण हा विचार करतो का कि आपणही बऱ्याच वेळा आपल्या आई बाबांच्या लाडापेक्षा आजी आजोबांच्या लाडाचे गोडवे गातो. म्हणतात ना दुधापेक्षा साईवर माया जास्त तेच पिढ्यानपिढ्या सुरु राहणार. आपणही त्यांच्या वयाचे झालो कि तेच करणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणे म्हणजे एक वेगळी गम्मत असते कितीतरी छान छान गोष्टीनी त्यांची पोतडी भरलेली असते. खरे तर आपल्या मुलांना जुनी गाणी कविता गोष्टी या त्यांच्या मुळेच कळतात. हल्लीच्या मोबाईल युगात ते जिवंत यू ट्यूब चॅनल आहेत असे म्हणायला हरकत नाहीत.

मला यांची सगळ्यात जास्त भावणारी गोष्ट म्हणजे यांचा आत्मविश्वास. अगदी आम्ही हि एकमेकांचा निरोप घेताना पुन्हा भेटू म्हणताना , बघू काही झाले नाही तर नक्की भेटू असे म्हणतो मस्करीत. पण ते मात्र अगदी वर्षभरानंतर भेटायचे असेल तरी म्हणतात कि हा कुठे जायचे नसेल तर गेट टू गेदर ला नक्की येऊ. किती पॉसिटीव्ह असतात हि लोक आपल्या आयुष्याबद्दल .

पण खरेच लहानपण देगा देवा असे हल्ली म्हणायचे म्हणजे आपले बालपण मोबाईल  मध्ये हरवून घेणे असे समीकरण झालेय हल्ली. ९०% मुले मोबाईल च्या आहारी गेली आहेत. त्यापेक्षा आता म्हातारपण दे गा देवा असे म्हणायची वेळ आली आहे.

आपण किती जगू त्यापेक्षा आपण कसे जगू याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे हल्लीच्या काळात. आणि त्यामुळेच आपले जगणे जास्त सुखकर होईल .

वयाच्या शेवटच्या टप्प्यावर हि यांची आशा किती मजबूत असतात. नाहीतर आम्ही वयाच्या चाळिशीतच पुढे किती जगू कसे जगू याचा विचार करतो. बोलता बोलता आता आमचे किती दिवस राहिले म्हणणारी हि माणसे जेव्हा निरोप घेताना उद्या भेटू म्हणतात ना तेव्हा एक म्हण आठवते….

                                               उम्मीद पे दुनिया कायम है




                    



Saturday, 1 June 2019

आमचे आईसक्रीम प्रेम


 किती उकाडतेय ना , चल मस्त आईसक्रिम खाऊन येऊ . हो !! कुठे जाऊया नॅचरल्स मध्ये कि मायनस ३० डिग्री मध्येमला ना आज टेंडर कोकोनट खायचे आहे ... हा संवाद हल्लीच्या दिवसात सर्रास ऐकायला मिळतो . आता ह्या कडकडीत उन्हाळ्याच्या दिवसात  आईसक्रिम चे नाव काढले कि तोंडाला पाणी सुटते. आता काय गल्लोगल्ली तुम्हाला आईसक्रिम मिळते. ते हि हजार प्रकारचं, आणि हजारो चवींचे. अगदी नेहमीच्या किराणा मालाच्या दुकानातही आईसक्रिम मिळायला लागले आहे.

आमच्या लहानपणी अशी काही आमची चंगळ नव्हती. त्यावेळी चार आण्यांचा पेप्सीकोला मिळणे हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आईसक्रिम म्हटले कि फक्त लग्नात इतकेच असायचेलग्नात आईसक्रीम खाणे म्हणजे एक पर्वणीच असायची. कोण किती आईसक्रीम खाते याची शर्यत असायची. लहान नाही तर अगदी मोठी माणसे ही आईसक्रीम वर ताव मारायचीसुट्टीत एखादी लग्न पत्रिका घरी आली की आम्ही लहान मुले खुश व्हायचो.. त्या निमित्ताने भरपूर आईसक्रीम खायला मिळणार याच विचाराने

उन्हाळ्याच्या सुट्टीत डोक्यावर मडक्यात गारेगार कुल्फीsssssss असे ओरडत कुल्फीवाला  यायचा. मग घरातल्या मोठ्या लोकांकडे आमचा बालहट्ट सुरु व्हायचा . एक तरी कुल्फी घेऊ या ना. बस एकच आम्ही सगळे वाटून खाऊ. कधी कधी पटकन तर कधीतरी खूप मिनातवारीने मंडळी तयार व्हायची मग त्याच्याकडून २रुपयाची ती कुल्फी पानावर घ्यायची त्याचे तीन ते चार तुकडे करायचे आणि ते भावंडांमध्ये वाटून खायचे.  ज्यादिवशी कुल्फी खायला नाही मिळायची आणि दुसरे कुणी खाल्ले कि त्यांच्या कडे अगदी कधी खायला मिळत नाही असे पाहायचो. ( आता हसू येतेय पण तेव्हा परिस्थितीच तशी होती) एखाद्या दिवशी जर कुणी पाहुणे आले असतील आणि त्यांनी हातावर खाऊ साठी काही पैसे टेकवले असतील तर त्यावेळी प्रत्येकाला एक कुल्फी मिळायची. किंवा अगदीच केसर, मलई, पिस्ता असे काही कुल्फीचे प्रकार जे अगदीच ठराविक ठिकाणी मिळायचे. पण त्या कुल्फीची चव जी जिभेवर रेंगाळते आहे. त्या चवीची सर आजच्या तुमच्या कुठल्याही भारीतल्या आईसक्रीमला नाही इतके मात्र नक्की. 

जरा मोठे झाल्यावर क्वालिटी आईसक्रीमचे रुपये पाच वाले कप मिळायचे व्हॅनिला फ्लेवर वाले, ते ही अगदी सणावाराला. तो कप हातात आला की  आधी त्यांच्यावरचे झाकण काढून ते जिभेने चाटून घ्यायचे नंतर त्या कप मधले आईसक्रीम त्या लाकडी चमच्याने खाऊन घ्यायचे मग तो कप तोंडात उलटा करून त्यातला थेंब थेंब टिपून घ्यायचा आणि मग त्या कप मध्ये बोट फिरवून उरलेले आईसक्रीम चाटून घ्यायचे. अगदी पुरेपूर आस्वाद घ्यायचा त्या आईसक्रीम चा . कॅण्डी आणली कीं ती खाताना बशी घ्यायची कारण सांडले तर जमीन खराब ही व्हायला नको आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचे आईसक्रीम फुकट जायला नकोखाताना हातावर ओघाळलेला एखादा थेंब जिभेने चाटून घ्यायला ही मागे पुढे बघत नसू. आता हे सगळं आठवून हसू येते पण ती मजा काही औरच होती. आता "शीss असा काय तो घाणेरडा पणा करायचा" म्हणून नाक मुरडणाऱ्या लोकांनीही हा प्रकार कधीतरी नक्कीच केला असेल.

अजून  एक गंमत अशी की भरपूर पाऊस पडत असताना भर पावसात भिजत आईसक्रीम खाणे या सारखे स्वर्गसुख नाही. म्हणजे ते जाहिरातीत दाखवतात ना दहा रुपयांच्या शीतपेया साठी काहीतरी अचाट करतात तसे काहीतरी केल्याचा अनुभव आम्ही एकदा सोसायटी मधले सगळे असेच भर पावसात निघालो आणि अचानक आईसक्रीम खायचा मूड झाला आणि पैसे कुणाकडेच नव्हते तेव्हा चक्क उधारी वर घेतले आईसक्रीम आणि दुसऱ्या दिवशी त्याचे पैसे नेऊन दिले नशीब तो आईसक्रीम वाला ओळखीचा होता.

 मला अजूनही आठवतेय माझे आईसक्रीम प्रेम माहीत असल्याने आमच्या बाजूला सुळे काकी होत्या त्यांनी त्यांच्या घरी नवीन फ्रिज घेतल्यावर एक लिटर दुधाचे आईसक्रीम करून दिले होते. त्यावेळी घरी आईसक्रीम म्हणजे काय तर दूध चांगले उकळवून त्यात वेलची जायफळ आणि सुकामेवा घालून फ्रिजर मध्ये ठेवून द्यायचे. आणि गम्मत म्हणजे ते कडक झालेय की नाही हे पाहायला प्रत्येक अर्ध्या तासाला फ्रिजर उघडून त्या चमचा घालून बघायचेकाकांचा फ्रिज नवीन असल्यामुळे तेवढे केले नाही तेव्हा पण काकींना हैराण केले होते कधी होईल हे दहा वेळा विचारून.

खरे तर आईसक्रीम आवडत नाही असे फार कमी जण असतील ना! अगदी नाक गळत असले तरी नाही ग ऊन खूप आहे ना म्हणून थोडेसे खाल्ले आईसक्रीम... किंवा खूपच ऍसिडिटी झाली होती म्हणून खाल्ले अशी करणे द्यायला हि आपण मागे पुढे पाहत नाही. मी हि एकदा असेच केले होते दोन दिवस तापाने फणफणत होते. डॉक्टरांकडून औषध आणून झाले होते. ताप गेला होता पण अशक्तपणा खूप होता. परीक्षा हि जवळ आली होती त्यामुळे सालाबादप्रमाणे आशामावशी घरी आली होती राहायला. मला बरे नाही म्हणून बघायला माझा मित्र चेतन (दुर्दैवाने तो आता आमच्यात नाही ) आला होता मला पाहायला. मावशी आली होती म्हणून त्याने मला सोडून बाकी सगळ्यांसाठी आईसक्रीम आणले. मला इतके वाईट वाटले कि मी रडायलाच लागले कि मला सोडून तुम्ही कसे खाऊ शकता आईसक्रीम. मला तुमच्या कुणाशी बोलायचे नाहीये. त्यावर आई मावशी मला ओरडून झाले कि   आता कुठे ताप गेलाय तुझा आणि काय लगेच आईसक्रीम हवे. पण माझे रडणे काही थांबेना .. शेवटी वैतागून मला आईसक्रीम आणून दिले. आणि नंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून गरम पाणी हि मिळाले. त्यावरून नंतर कितीतरी दिवस मी ओरडा खात होते पण त्या दिवशीच्या आईसक्रीम साठी तो हि खाऊन घेतला मी.

यापेक्षा हि भारी किस्सा तर आता आहे. मी अगदीच लहान होते म्हणजे ५-६ वर्षाची असें. मी , माझी आजी (आईची आई) आणि मोठी आजी (आजीची मोठी बहीण) आम्ही सिनेमाला जाऊन आलो होतो. येताना आम्हाला शोभा हॉटेल लागले जिथे कुल्फी मिळायची. मी आजीला सांगितले मला आईसक्रीम हवेय. आजी म्हणाली आता पैसे नाहीयेत माझ्या कडे , घरी गेल्यावर देते. पण मी काही ऐकायला तयार नाही. सारखे तेच मला इथलेच आईसक्रीम हवेय. दोघी आज्या मला समजावत होत्या. पण नाहीच मी हट्टाला पेटले होते. ते दुकान मागे गेले तरी माझे रडणे सुरूच. त्यावेळी आम्हाला रेल्वे रूळ (चेंबूर स्टेशनचे) ओलांडून यावे लागत असे. दोन्ही हाताला दोन आज्यांनी धरले होते आणि तसेच मला ओढत आणत होत्या. माझे रडणे आता टिपेच्या सुरात सुरु झाले होते. आणि त्या रुळावर आल्यावर मी हाताला झटका देऊन खाली बसले त्या रूळांवरच. आणि मला आईसक्रीम हवेय चा जप सुरूच. दोघीनी ओरडून झाले पण तरी मी गप्प झाले नाही. शेवटी माझी आजी " राहा तू इथेच " असे म्हणून वैतागून पुढे चालायला लागली ( माझी आजी म्हणजे शांततेचा महामेरू , तिला राग आला म्हणजे मी किती हट्टीपणा केला असेल याची जाणीव खूप उशिरा झाली ). तेव्हाच स्टेशन वर एक ट्रेन आली होती. शेवटी मोठी आजी माझ्या आजीला म्हणाली " अग इंदू , लोकांची पोर आहे , काय झाले तर उगाच नको ते " . आजी मागे फिरली आणि पुन्हा दोघीनी  मला उचलून घेतले आणि घरी गेल्या. माझे रडणे तरीही थांबले नव्हते. बिल्डिंग जवळ आल्यावर आजी ने मला शरदच्या दुकान समोर सोडले. तर मी तिथे उभी राहून रडायला सुरवात केली. दोघी मला सोडून घरी गेल्या. आणि मग आमची आशा मावशी हातात पट्टी घेऊनच खाली उतरली. हा हा तिला पाहताच रडणे गायब आणि ती येत होती त्याच्या ऊलट दिशेने मी घरी धूम ठोकली. नंतर मार पडला ती गोष्ट वेगळी. पण तरीही आईसक्रीमप्रेम म्हणा किंवा आईसक्रीम साठीचा हावरटपणा काही कमी झाला नाही.

तर असे हे माझे आईसक्रीम प्रेम... जे अजूनही यकिंचितही कमी झालेले नाही आणि कधी कमी होणार नाही. सॉलिड आईसक्रीम  प्रेमी आहे मी आईसक्रीम साठी  काहीहि करू शकते. हो हो सगळेच असे असतात थोड्याफार फरकाने फक्त कुणी व्यक्त होते कुणी मन मारून राहते.

आणि हो कंमेंट मध्ये तुमच्या ही अशा काही गमती असतील तर लिहा म्हणजे लोकांना ब्लॉग सोबत त्यांना अजून बऱ्याच गंमती वाचायला मिळतील.

हो आणि सोबत तुम्हा सगळ्यांसाठी मस्त गारेगार आईसक्रीम पाठवत आहे भरपूर खाऊन घ्या.