Sunday, 24 February 2019

एक भेट सुमीत राघवन शी

ज्यादिवशी माझा हॅम्लेट नाटकवरचा ब्लॉग लिहिला त्या दिवशी च काही जणांची अशी प्रतिक्रिया होती की बघ म्हणे यावर सुमीत नक्की कंमेंट करेल ( सॉरी सुमीत सर एकेरी उल्लेख केल्याबद्दल)
मला अजूनही आठवतोय तो दिवस जेव्हा पहिल्यांदा हॅम्लेट पाहिले ५ जुलै २०१८. अतिशय अप्रतिम नाटक. नाटक सुटल्यावर कलाकारांना हि भेटलो सगळेच खूप छान  बोलले. पण माणसांचा इतका गराडा असूनही प्रत्येकाशी एक दोन शब्द तरी बोलू फोटो काढणारा तो कलाकार म्हणजे "सुमित राघवन". त्यांना भेटायला आलेल्या एका काकांना जास्त वेळ ताटकळत ठेवायला लागू नये म्हणून ते आधी त्यांना भेटायला गेले आणि मग परत सगळ्या चाहत्यांना भेटले. मी निघताना त्यांना म्हटलं की आजही फास्टर फेणे म्हटले की आम्हाला सुमीत राघवनच येतो डोळ्यासमोर.

ते नाटक पाहून आल्यावर मी इतकी भारावले होते कि  त्या नाटकावर एक लेख लिहिला. "हॅम्लेट एक रोमांचक नाट्यानुभव". खूप इच्छा होती की त्या टीम पर्यंत हा लेख पोहचावा अशी. आणि माझ्या सुदैवाने आमच्या फेसबुक वरच्या एका ग्रुप मधल्या मैत्रिणींमुळे तो लेख सुमितजींपर्यंत पोहोचला. आणि चक्क त्यांनी प्रतिक्रिया  हि दिली त्यावर ( प्रतिक्रिया खाली पोस्ट केली आहे). तसे त्या नाटकातल्या एक- दोन कलाकारांनी माझी ब्लॉग लिंक शेअर केली पण मला पर्सनल अशी कंमेंट नव्हती आली कुणाचीच. पण आता तर साक्षात सुमीत राघवन ची प्रतिक्रिया ती ही इतकी मस्त. मला तर आज मै उपर आसामान नीचे असे झाले होते. माझ्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर मी ती कंमेंट पोस्ट करत सुटले होते. कसले भारी वाटत होते. इतकेच  नाही तर त्यांनी तो लेख त्यांच्या टीम बरोबर शेअर हि केला.

त्यांचा या कौतुकाने मला आणखी  जोश आला आणि मी तो लेख स्वहस्ताक्षरात लिहून त्यांना भेट करायचा ठरवला. त्यासाठी आणि अजून एका कारणासाठी मला ते नाटक परत पहायचे होते. आधी मी साध्या फुलस्केप वर लिहिलं होतं. आणि मग ताई ला फोन केला ही मस्त बातमी सांगायला , तिने म्हटलं अगं इतकी क्रीएटीव्ह तू मग फक्त कव्हर देणार नुसते? काहीतरी छान बनवून दे." झाले ताई ने कीडा सोडला डोक्यात. आता जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसेल ती मिलन कसली. आणि हातात एकच दिवस २४ चा. त्याच दिवशी मनाशी काहीतरी जुजबी ठरवून काही वस्तू आणून ठेवल्या. आणि मग घरातील काही वस्तू आणि आणलेल्या वस्तू यांचा मेळ साधून  छानसा एक बॉक्स बनवला( मिलिंद काकांनी बनवला होता त्याची कॉपी करायचा प्रयत्न😄). रात्रभर बसून गुलाबी रंगाच्या कागदावर तो ब्लॉग परत एकदा लिहून काढला. मग त्याची छान पैकी गुंडाळी करून त्याला रेड रिबीन बांधून त्या बॉक्स मध्ये ठेवला. हुश्श !!!! झाले गिफ्ट तयार. आता वाट बघत होते २५ ऑगस्ट ची.  सुमीत राघवन ला भेटायचे ते ही स्वतःच्या नावाची ओळख देत किती भारी होते हे..  परत एकदा बायकांना पडतो तो यक्षप्रश्न समोर उभा.  आता नाटकाला जाताना काय घालून जायचे?  आता सुमीत सारख्या सेलिब्रिटी ला भेटायचे म्हणजे जरा छान नटून जायला हवे ना. मग पुन्हा एकदा १० जणींना विचारून शेवटी आपला भारतीय पेहराव साडी नेसून जायचे ठरले. आम्ही शाळेचे काही मित्र मैत्रिणी मिळून गेलो होतो. आणि अजून एक स्पेशल व्यक्तीच्या मेहेरबानीमुळे आम्हाला अगदी पुढे बी लाईन ची तिकीटं मिळाली होती.( Thanks ).  तो दिवस बहुतेक आमचाच दिवस होता . माझ्या पुढच्या खुर्चीवर चक्क सचिन खेडेकर.. इतकं मस्त वाटत होते. पहिला अंक झाल्यावर मी त्यांना त्यांच्या आवाजबद्दत त्यांना कॉम्प्लिमेंट ही दिली.  ते म्हणाले ही मस्त झालेय ना नाटक , मी पहिल्यांदाच पाहतोय. मला गंमत वाटत होती किती मस्त बोलतात ही लोकं.  एकीकडे वाटत होते नाटक संपूच नये तर दुसरीकडे वाटत होते लवकर संपले तर पटकन सुमीत ला भेटता येईल.

तिसरा अंक संपला आणि मी कधी एकदा मागे जाते सुमीत सरांना भेटायला असे झाले होते. माझ्या पुढे एक आजी होत्या त्या हळू हळू चालत होत्या मी हि त्यांच्या मागून हळू हळू चालत होते पुढे जायचा प्रयत्न करत पण खूप गर्दी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. शेवटी माझा तो आटापिटा बघून नाटक बघायला माझ्या शेजारी बसलेल्या माणसाने मला जागा करून दिली पुढे जायला. मी इतकी घाईत होते कि तेव्हा लक्षात आले नाही पण तो माणूस एक मिमिक्री कलाकार होता जो सचिन तेंडुलकरची खूप छान मिमिक्री करतो. हाश्श !!! शेवटी पोचले बरे तिथे. दोनच मिनिटात सुमीत सर तिथे आले. हा गराडा त्यांच्या आजूबाजूला मला पुढे जाऊ कि नको असे झाले होते. परत एक टेन्शन काय बोलतील. माझी ती छोटीशी भेट स्वीकारतील कि नाही. आता आमची भेटायची वेळ आली. त्यांना भेटले आणि तो बॉक्स हातात देत इतकेच म्हटले सर तो लेख लिहिला होता मी, त्यावर त्यांनी   लगेच म्हटले कि " मिलन सप्रे " ना. मी उडालेच. चक्क माझे नाव लक्षात मी इतकी शॉक होते कि काय बोलावे तेच कळेना मला. मी त्यांना म्हटले कि " सर, मी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिला आहे , जर व्याकरणाच्या काही चुका असतील तर समजून घ्या " त्यावर ते म्हणाले " भावना महत्वाच्या चुका नाही ." इतके मस्त वाटले ना. या पुढे काय बोलणार ? माझे ततपप होत होते माझ्या मित्राने सावरून घेतले म्हणाला कि तुम्हाला भेटून काही सुचत नाहीये तिला तेव्हा त्यांनी एकदम गोड स्माईल दिले. मग आम्ही २-३ फोटो काढले त्यांच्या सोबत आणि त्यांना पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निघालो. मी तर जमिनीतून एखाद इंच वरच असें त्या दिवशी खूपच भारी वाटत होते.  

त्यानंतर हि जेव्हा माझ्या मिस्टरांनी नाटक पाहिल्यावर त्यांची भेट घेतली तेव्हा हि त्यांनी लेख म्हटल्यावर त्यांना माझे नाव आठवले आणि खूप मिश्किलपणे  म्हणाले म्हंजे तुम्ही मिस्टर मिलन सप्रे का?
खरेच ग्रेट माणूस.  रोज त्यांना कितीतरी नवीन नवीन लोक भेटत असतील. पण तरीही इतक्या मोठ्या कलाकाराने आपल्या लाख चाहत्यांनपैकी कुणाला  नावाने लक्षात ठेवणे ही किती कौतुकाची गोष्ट. एका सामान्य चाहतीला असे लक्षात ठेवणे म्हणजे कौतुकच . मला मनापासून आभार मानायचे आहेत सुमितजींचे तुमच्यासारख्या मोठ्या कलाकाराने माझे नाव लक्षात ठेवले , आणि मला एका खूप खूप मोठ्या आनंदाची अनुभूती दिली.   

त्यानंतर मी सुमितजींना फेसबुक वर फॉलो करायला सुरवात केली. एक गोष्ट आहे या कलाकारांची कि ते फक्त स्वतःचा नाही तर सगळ्यांचा विचार करतात. हल्ली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची पोस्ट असते. नाटकाच्या आधी साऊंड चेक च्या निम्मिताने ते नाटकातल्या कलाकारांना घेऊन मस्त गाण्याचा कार्यक्रम करतात अगदी २-३ मिनिटाचाच पण ऐकायला आणि बघायला खूप मस्त वाटते. पुलवामा च्या स्फोटात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली द्यायला त्यांनी गायलेलं गाणे ऐकल्यावर अंगावर शहारा आला आणि डोळ्यात पाणी.   त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं की आता पूर्वीसारखे  लेजंट राहिले नाही. पण मी असे म्हणेन कि तुमच्या सारखे तयार ही होत आहेतच कि ज्यांचा आदर्श येणारी पिढी घेईल. 

एक अप्रतिम नट. उत्तम गायक, सूत्रसंचालक. एक सर्वगुणसंपन्न आणि कुटुंबवत्सल असा नट.  त्यांच्या हास्यात एक वेगळीच निरागसता आहे. आपल्या प्रसिद्धी वलयाचा जराही गर्व नसणाऱ्या एखाद्या कलाकाराला तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर एकदा तरी " सुमीत राघवन"  ला नक्की भेटा. यशाच्या शिखरावर  असताना पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे सुमीत सरांकडून शिकण्यासारखे आहे.



Friday, 15 February 2019

आता पुरे झाले.... एक सामान्य नागरिक


परवाच री पिक्चर पाहून आले आतंकवाद्यांनी उरी मध्ये आपल्या जवानांवर केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून आपण केलेले सर्जिकल स्ट्राइक यावर तो पिक्चर आहे,  पिक्चर बघताना अंगावर शहारा आला
ज्यावेळी आतंकवादी आपल्या जवानांवर गोळीबार करत होते तेव्हा असे वाटत होते आपणास बंदूक घ्यावी आणि त्यांना गोळ्या झाडाव्यात.  सर्जिकल स्ट्राइक नंतर आपल्या सगळ्या जवानांना सुखरूप परत आलेले बघून आपोआप टाळ्या वाजवल्या आम्ही. 

पिक्चर बघताना वाटलं जशास तसे केले खूप छान झाले आणि मुळातच सर्जिकल स्ट्राइक मध्ये आपले सगळे जवान सुखरूप परत आले आतंकवाद्यांना कंठस्नान घालून.

पिक्चर बघून आल्यावर जाणवलं उरीचा हल्ला मोठा होता म्हणून त्याचा बदला पटकन घेतला गेला पण असेच सीमेवर रोज एक दोन एक दोन जवान आपले शहीद होत असतात, त्यांच्या सगळ्यांचा ना एकदाच काय तो बदला घ्यायला हवा. सिनेमा  बघून येऊन आज दोनच दिवस झाले आणि आता टीव्हीवर बातमी पाहिली  काश्मिरात एका सुसाईड बॉम्ब  कारने जवानांनीं भरलेल्या बस वर हल्ला केला.  जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जवान शहीद.  ती बातमी ऐकल्यापासून मनात एक वेगळीच खळबळ माजली आहे ज्यांच्यामुळे आपण अगदी निवांत आपल्या घरात झोपतो, आपला देश ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, थंडी वारा ऊन कशाचीही परवा न करता आपल्या देशासाठी सीमेवर तैनात असतात अशा आपल्या सैनिकांना अशा भ्याड हल्ल्यामध्ये शहीद व्हावे लागते कि दुदैव आहे आपले.   

कधीतरी वाटतं किस सगळ्यांनी एकत्र यावे आणि सरकारकडे मागणी करावी की आपल्या जवानांना द्या  मुक्तपणा , जसे ते आतंकवादी काहीही विचार न करता हल्ले करतात ना, जवानांना द्या की मोकळीक त्यांना घुसून मारण्याची.  आतंकवाद्याला दहशत वाद्याला  फाशी न देता त्याला द्या आपल्या जवानांच्या हवाली आणि असे हाल करून मारू देत त्यांना कि पुन्हा हल्ला करताना त्यांनी विचार करायला हवा हजार वेळा कि भारतीय सैनिकांशी  पंगा घेतल्यावर काय होतं. आपणही त्यांच्या सारखे असे हल्ले करायला पाहिजेत ना जसा आपल्याला दहशतवादाची भीती वाटते ना तशी त्यांना भारतीय जवानांची भीती वाटली पाहिजे,  कदाचित आताही वाटत असेल म्हणून ते युद्धासाठी समोर न येत असे भ्याड हल्ले करतात.

उरी साठी एक सर्जिकल स्ट्राइक केला ना तसे इतके करायला हवेत ना कि हि आतंकवाद्यांची जमातच मुळापासून नष्ट करायला हवी. 

टीव्हीवरच्या  एका मुलाखतीत एकएका  निवृत्त कर्नल यांचे एक वाक्य खूप आवडले "Our soldiers are not trained to die they are trained attack and kill."
 
किती दुर्दैव आहे आपलं कोणीच येतो तिसऱ्या देशातला माणूस येतो आपल्या लोकांना आपली असा जीवानिशी मारतो घरी सुट्टी आनंदात व्यतीत करून करायला जाणाऱ्या माणसांवर हल्ला आणि आपण काहीच करू शकत नाही. देशासाठी प्राण द्यायची तयारी असली तरी युद्धात वीरगती हसत हसत पत्करणाऱ्या आपली सैनिकांना असे मरण नक्कीच आवडणार नाही. 

एक गाणं आहे 'ए मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी'.  खरंतर आताही वेळ ना डोळ्यात पाणी आणण्याची नाही घरात घुसून मारण्याची त्यांनी ४० मारले ना तुम्ही ४००० मारा अशी मागणी आपण  प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे.  आपली सहनशीलता म्हणजे आपला भेकडपणा नाही हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे.  नुसतं  भावपूर्ण श्रद्धांजली इतकच लिहून थांबण्याची वेळ गेलीय आता. 
९/११ च्या हल्ल्यानंतर जसे ओसामा ला त्याच्या घरात घुसून मारले ना तसेच या सगळ्यांना मारले पाहिजे अगदी निवडून निवडून.

कधीं आपल्या सामान्य नागरिकांची हि चीड येते , असे काही झाले कि आपले सगळ्यांचेच राष्ट्रप्रेम उफाळून येते. पण काही जणांचे हे प्रेम इतके तकलादू वाटते ना , साधेच उदाहरण आहे   जेव्हा चित्रपटगृहात  राष्ट्रगीत लागते माणसे उभी तर   राहतात पण शंभरातले चार-पाच लोक असतात जे आपल्या राष्ट्रगीत म्हणतात मोठ्याने. त्या मल्टिप्लेक्स मध्ये  राष्ट्रगीत म्हणायची लाज वाटते ती काय या लोकांना? अशी लोक काय देशप्रेम दाखवणार? त्यांचं ते बघतील अशा प्रवृत्तीने वागतो कधीकधी आपण, पण हा विचार आपले सैनिक नाही करत. आपण इथे जात धर्म करून लढतो तिथे ते सगळ्या जाती धर्माचे फक्त देशासाठी लढतात एकत्र . असं म्हणतात ना की घरात प्रत्येक घरातला एक माणूस देशाच्या पाठवला पाहिजे खरंच आहे

खरं तर असं काही झालं आपण  व्यक्त होतो, लिहितो.  काही जण म्हणतात की आपण नुसतं श्रद्धांजली वाहून गप्प राहतो.  पण कदाचित  आपल्याला माहीत असतं की आपल्या हातात काहीच नाहीये तरी आपण एखाद्याला जाऊन गोळ्या नाही घालू शकत कदाचित तोच राग आपण व्यक्त करतो आपल्या या लिहिण्या बोलण्यातून.


कुणीतरी एक सुंदर वाक्य लिहिले आहे तो हि आज प्रेमाच्या रंगांत रंगला फरक फक्त इतकाच होता कि तो रंग देशप्रेमाचा होता. आणि काय तो विचित्र योगायोग लाल रंग प्रेमाचे प्रतीक पण हाच लाल रंग आमच्या शहीद जवानांच्या रक्ताचा हि होता ज्यांनी सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम निर्माण केले पण तितकीच चीड निर्माण केलीय शत्रू राष्ट्र विषयी.  

एक सामान्य नागरिक म्हणून मी इतकेच म्हणेन कि कदाचित  आम्ही बंदूक घेऊन सीमेवर लढायला नाही जाऊ शकणार पण तुम्ही दिलेले हे तुमच्या रक्ताचे बलिदान व्यर्थ नाही जाऊ देणार. 
 




Friday, 4 January 2019

भाई व्यक्ती कि वल्ली अफलातून सिनेमा

 (खरंतर एका महान व्यक्तीबद्दल लिहिण्याची पहिलीच वेळ. खूप काही अनुभव गाठीशी नाहीये. पण प्रयत्न अगदी प्रामाणिक आहे. काही चुकले तर क्षमा असावी. सुरवातीलाच सगळ्यांची माफी मागूनच लेखाला सुरवात करतेय.  )

आधी मनात आले एकच भाग पाहिला आहे  दुसरा भाग पाहिल्यावर लिहू...पण नंतर वाटलं नको लिहूनच टाकते एक महिना अजून थांबण्याची तयारी नाही....
लहानपणापासून आजपर्यंत पहिल्यांदा असे झाले की फर्स्ट डे फर्स्ट शो पहिला. हल्लीच कुठलातरी सिनेमा पाहिला गेलो होतो तेव्हा मध्यंतरात जाहिरात आली" भाई व्यक्ती की वल्ली" येतोय ४ जानेवारी ला आणि तेव्हाच ठरवले की नक्की पहायचा.

त्यांनतर आलेला त्या सिनेमाचा प्रत्येक प्रोमो अगदी पुन्हा पुन्हा पहिला . फेसबुक वरच्या स्मृतिगंध पेजवरची प्रत्येक पोस्ट वाचली, पहिली.  टीव्ही वर ज्या ज्या कार्यक्रमात या सिनेमाच्या कलाकारांचा सहभाग होता तो प्रत्येक कार्यक्रम पहिला. म्हणजे मनाशी अगदी शंभरदा पाठांतर केले होते कि हा सिनेमा पहिल्याच दिवशी पाहायचा. म्हणजे कुणी काही सांगायच्या लिहायच्या आधी  बघायचा त्यातली उत्सुकता घालवायची नव्हती. किंवा कोणी काही लिहिलेले वाचण्याआधी मला लिहायचे होते. 

जसे हॅम्लेट नाटक पाहून आल्यावर मी भारावून गेले  होते आज पुन्हा तसेच झालेय सगळीकडे दिसतात ते फक्त "  पु. ल ". आजच्या पिढीतहि असे कुणीही नसेल कि ज्यांना पु. ल. देशपांडे. माहित नाहीत. कारण नाच रे मोरा गाण्यावर लहानपणी नाच केला नाही असे एकही मूल नसेल. ज्यांना पु. ल ना प्रत्यक्षात पाहता आले नाही अशा बऱ्याच जणांना पु.ल चे दर्शन घडवणारा हा सिनेमा आहे. अर्थात त्याने खूप व्हिडिओ आहेत एकपात्री प्रयोगांचे , मुलाखती आहेत पण त्यांचा जीवनपट उलगडणारा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. या साठी महेश मांजरेकरांचे मनपूर्वक आभार.  हा चित्रपट पाहताना आपण समरसून जातो अगदी. म्हणजे घडणारी घटना हि आपल्यासमोरच घडतेय कि काय असेच वाटते. 

 सुनीताबाईंनी  पु.ल साठी किंवा त्यांच्या संसारासाठी आपल्या मातृत्वाचा केलेला त्याग खूप मोठा आहे. तो प्रसंग पाहताना आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. असे म्हणतात व्यसन वाईट असते पण सुनीताबाईंनी भाईंशी लावलेली पैज. कि अंमलदार नाटक पूर्ण लिहून झाल्याशिवाय सिगारेट देणार नाही. आणि भाईंनी अंमलदार चा दुसरा अंक एका रात्रीत लिहून काढला.  म्हणजे व्यसनासाठी काही चांगल्या गोष्टी हि घडू शकतात. म्हणतात ना यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तश्याच सुनीताबाई वाटल्या मला. कशाचीही तक्रार ना करता नवऱ्याला सांभाळून घेणाऱ्या, वेळीच त्यांना शिस्त लावणाऱ्या. आपल्या नवऱ्यातले गुण ओळखून त्यांना पूर्णपणे साथ देणाऱ्या. 

पु. ल. च्या लहानपणापासून सुरु होणारा हा सिनेमा. हळू हळू त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा उलगडत जातो. कुठेही थांबत नाही कि कंटाळवाणा होत नाही. सिनेमातले संवाद हि इतके सहज आणि सुंदर आहेत कि खूप आपलेसे वाटतात. त्या दोन तासात आपण त्या काळात जातो.  आपण इतके एकरूप होतो तो सिनेमा पाहताना कि त्या घडणाऱ्या ना त्याप्रमाणे नकळत आपल्या प्रतिक्रिया हि येत जातात अगदी आपसूकच. म्हणजे भाईंच्या आठवणींनी त्यांच्या भावाला गलबलून येणे, त्यांच्या वडिलांचे निधन अशा काही क्षणी डोळे आपोआप पाणावतात. तर भाईंच्या चुटकुल्यांवर पटकन हसू येते. गाण्याच्या वेळी मान आपोआप डोलायला लागते. 

रंगभूषाकार आणि कलादिग्दर्शक याचे हि तितकेच कौतुक. अगदी तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. तर त्यांच्या कलाकारांच्या वेषभूषेवरूनच लक्षात येते कि हि व्यक्तिरेखा कुणाची असेल इतका अफलातून मेकअप. त्यात कलाकारांनी केलेलं काम भूमिका जिवंत केल्या सगळ्या. 

कलाकारांबद्दल तर काय लिहावे आणि कुणा  कुणा  बद्दल लिहावे. सचिन खेडेकर या माणसाच्या आवाजातच अशी काही जादू आहे ना कि सुरवात केली कि मंत्रमुग्ध व्हायला होते. त्यात त्यांचे पु. ल. च्या वडिलांचे काम. अप्रतिम, मुलावर अतोनात विश्वास असणारे, त्याला हवे तसे जगू देणारे, मुलाला संगीताची आवड आहे म्हणून त्याला महागडी हार्मोनियम आणून देणारे प्रेमळ वडील. अश्विनी गिरी पु. ल. च्या आई .... नऊवारी मधली त्याकाळातली स्त्री , मुलांना दटावणारी, सुनेचे लाड करणारी आणि प्रसंगी भावुक होणारी आणि तरुण ते वयस्कर ह्या दोन्ही काळात होणारे बदल खूप छान दाखवलेत. महेश मांजरेकर नाथा कामत , आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सुनील बर्वे तितकीच लाडकी भूमिका करतोय डॉ. जब्बार पटेलांची. दोघांमध्ये साम्य दोघेही चिरतरुण. श्री.वसंतराव देशपांडे , कुमार गंधर्व, प. भीमसेन जोशी, पद्मनाभ, स्वानंद किरकिरे, अजय पुरकर छान छबी उमटवली आहे. इरावती हर्षे सहज अभिनय , तरुण सुनीता बाई अत्यंत उत्कृष्ट. प्रेम, लग्न, भाईंचा थोडासा चंचलपणा सांभाळून घेणारी , वेळीच कठोर निर्णय घेणारी बायको खूप सुंदर अभिनय. आणि सागर देशमुख भाईंच्या भूमिकेत अगदी चपखल निवड म्हणायला हरकत नाही. इतक्या मोठ्या माणसाची भूमिका खूप ताकदीने पेलली आहे. बोलणे, देहबोली अगदी हुबेहूब. नक्कल नाही पण अनुसरण खूपच छान. 

पु. ल. च्या आसपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रेखाटन खूप विचारपूर्वक, आणि चोखंदळपणे केले आहे. अरे !!! या व्यक्तिरेखेसाठी हा कलाकार शोभला असता असे कुठेच येत नाही मनात, किंवा आपण इतके गुंतलेलो असतो कि दुसऱ्या कुणाचा विचारच येत नाही डोक्यात असे म्हणायला हि हरकत नाही.

नाथा कामत, अंतू बरवा , रावसाहेब  या पु. ल. च्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या व्यक्ती त्यांना कुठे आणि कशा भेटल्या याचे प्रसंग इतके खूप अप्रतिम गुंफले आहेत. इतर लोकांमध्ये आपले वेगळेपण जपणारी हि माणसे भाईंना भेटली , त्यांना त्यांचे ते वेगळेपण भावले आणि त्यांनी ते अजरामर केले.


सिनेमात  सगळ्यात शेवटी प. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि पेटीवर पु. ल. देशपांडे यांची मैफिल .. वसंतराव गाणे म्हणतात " कानडा राजा पंढरीचा " आणि त्यात गंधर्व आणि पंडितजी त्यांना साथ देतात. पडद्यावर पाहताना मला वाटत होते कि खरेच मी एखाद्या मैफिलीतच बसलेय कि काय? गाणे सुरु असताना आपोआप आपणही ते गाणे गुणगुणायला सुरवात करतो. ते गाणे जिथे संपले तिथे मी अक्षरशः टाळ्या वाजवल्या. उठून उभीच राहणार होते पण लक्षात आले हे नाटक नाही सिनेमा आहे. 

महेश मांजेकरांनी खरेच कलाकारांची भट्टी इतकी अप्रतिम जमवून आणली आहे कि त्याला तोड नाही. प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलंय . भरपूर नवीन चेहेरे आहेत पण  ते हि इतके अप्रतिम मिसळले आहेत या चित्रपटात. मला ऋषिकेश जोशींचे वाक्य आठवले एका मुलाखती मधले कि कितीतरी जणांचे पदार्पण आहे या सिनेमातून. 

या सिनेमाबद्दल कुणाला काय काय वाटेल ते प्रत्येक जाणकार  लिहीतीलच पण मी या चित्रपटाचे एकाच शब्दात वर्णन करेन "अफलातून". 

पूर्वार्ध बघितल्यावर आपली उत्कंठा इतकी शिगेला पोचते कि आता कधी उत्तरार्ध बघतो असे होऊन जाते. आणि नक्कीच प्रत्येक जण वाट पाहिलं ८ फेब्रुवारी २०१९ ची. 

आज पु. ल.  असते तर या सिनेमाला शाबासकी म्हणून  व्यक्ती आणि वल्ली भाग २ नक्की लिहिले असते या सगळ्या कलाकारांसाठी. 

पुन्हा एकदा पु. ल. देशपांडे या महान अवलियाला आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल महेश मांजरेकरांचे खूप खूप आभार. आणि ८ फेब्रुवारी ची वाट बघतेय उत्सुकतेने ......

या सिनेमातला एक संवाद मला फार आवडला आपल्याकडचा दुःखाचा कोटा लवकर संपवला तर उरतो तो फक्त आनंद.




आज "भाई व्यक्ती कि वल्ली" या चित्रपटाच्या रिलीज च्या निमित्ताने आमच्या मिलिंद सप्रे काकांनी रेखाटलेले  पु. ल. देशपांडे याचे चित्र.



Tuesday, 1 January 2019

न्यूनगंड


न्यूनगंड म्हणजे नक्की काय? आपल्यात काहीतरी उणीव आहे याची मनाला असलेली एक सल असेच ना?

आपल्या प्रत्येकालाच कसला न कसला न्यूनगंड असतोच. गरिबाला आपण श्रीमंत नसल्याचा, सावळ्या माणसाला आपण गोरे नसल्याचा, ढ व्यक्तीला आपण हुशार नसल्याचा अशी बरीच उदाहरणे देता येतील.
पण खरंच असा न्यूनगंड घेऊन जगण्याची गरज असते का? आपल्या कडे जी गोष्ट नाही आणि समोरच्या कडे आहे तर तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ हे कोण ठरवतो आपणच ना?  ती व्यक्ती आपल्यापेक्षा एका बाबतीत उजवी असली म्हणून तिचे श्रेष्ठत्व आपण गृहीत धरतो. असेही असू शकते कदाचित आपल्याकडे असणारा एखादा गुण हा त्या व्यक्ती कडे काडीमात्र ही नाही. 

प्रत्येक ठिकाणी , क्षेत्रात एकतरी व्यक्ती असते की त्या व्यक्तीला जवळजवळ सगळेच अवगत असते पण त्या व्यक्तीला सगळं येते मग आपल्याला काहीच येत नाही किंवा मी तिथपर्यंत पोहचू शकत नाही असा विचार जर सगळ्यांनीच केला असता तर जगातल्या कितीतरी उत्तम कलाकृती ना , कलाकारांना , उद्योजकांना, खेळाडूंना आपण मुकले असतो....खरं आहे ना हे?

पण तरीही कधीतरी असे होते की कुणीतरी आपला आपल्यातल्या एखाद्या कमीपणावरून आपला अपमान करतो आणि मग आपण त्या अपमानापेक्षा आपल्यातल्या त्या कमतरतेचा जास्त विचार करतो. ती व्यक्ती म्हणाली म्हणून आपण ही हे गृहीत धरतो की आपल्याला ही कमतरता भरून काढताच येणार नाही किंवा मी अशीच किंवा असाच आहे मला हे जमणारच नाही.आणि त्याच चुकीच्या मार्गाने दिशेने आपण स्वतःला ओढत नेतो. आपल्याला दिलेले हे एक आव्हान म्हणून आपण त्या कडे बघत नाही. त्या अपमानाने चरफडत बसण्यापेक्षा किंवा रडत बसण्यापेक्षा हीच संधी असते स्वतःला सिद्ध करायची. आपल्यातल्या त्या कमी ला पूर्ण करायचा प्रयत्न करायची.
  
काही वेळा न्यूनगंड हा क्षणिक असतो म्हणजे कुणीतरी आपल्यापेक्षा जास्त चांगले काहीतरी करून जाते आणि मग आपल्याला वाटतं की आपण असे उत्तम करूच शकत नाही. त्यावेळी गरज असते आपण       आपल्यावर विश्वास ठेवायची. त्या गोष्टींची बरोबरी ना करता त्यातले वेगळे पण शोधायची आणि आपण तसे स्वतःला घडवायची.


मला खरेच कौतुक वाटते जेव्हा कुठेतरी वाचते किंवा बघते एखाद्या अपंग व्यक्ती जेव्हा खूप छान कलाकृती निर्माण करते. आपल्यातल्या कमतरतेला आपली लाचारी न बनवता जिद्दीने काही करून दाखवतात. रांगोळी, चित्र, गायन अशा कितीतरी कला ते उत्तमपणे सादर करतात. मी या ठिकाणी एकच उदाहरण देईन ते म्हणजे संगीतकार श्री रवींद्र जैन. 

आपल्या सगळ्यांमध्ये एक सगळ्यात जास्त  आढळणारा न्यूनगंड म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलता न येणे किंवा न समजणे. या गोष्टी मूळे खूप जण स्वतःला कमी लेखतात. बापरे ती कसली छान बोलते ....मला मेले एक वाक्य धड यायचे नाही. नको रे बाबा तिथे सगळे फाडफाड इंग्लिश बोलतात मला काही कळणार नाही. अशी वाक्य नेहमीच कानावर पडतात. इंग्रजी ही भाषा आहे ते ज्ञान नाही असे वाचले होते कुठेतरी. आपली मातृभाषा येते ना आपल्याला मग का न्यूनगंड?? परकी भाषा येत नाही म्हणून?? कुठे काही अडत नाही तिच्याशिवाय आणि अडले तर मदत करणारे आहेतच की...आणि जर प्रयत्न केला तर ती शिकायला ही कठीण नाही. पण आपण त्याचा बाऊच इतका करतो की मला जमणारच नाही ही खूणगाठ मनाशी पक्की करून ठेवतो. आणि तेच मनात ठेवून प्रयत्न ती शिकायचा प्रयत्न करणे ही सोडून देतो.

अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते आताही जेव्हा पिकनिक किंवा गेट टू गेदर साठी आम्ही विचारतो आमच्या शालेय मित्रमैत्रिणी ना तेव्हा कधी कधी नको ग तुम्ही सगळे हुशार मुले आहात आम्ही कुठे येणार किंवा तुमच्या इतके पुढारलेले नाही अशी कारणे ऐकायला मिळतात. इतकचं कशाला तर परिस्थिती ची ही तुलना केली जाते. मला वाटतं आपण शाळेतच शिकतो की भेदभाव करू नये आणि आपण तेच करतो.  का असे नको ते न्यूनगंड मनात ठेवता? मैत्री मध्ये कमी जास्त हे नसतेच कधी. 

एखादी व्यक्ती जर अडखळत बोलत असेल तर आपण त्यांच्यासमोरच हसतो, अरे! हे काय बोलतात कळतच नाही..असे बोलून मोकळे होतो. कधी शांतपणे ऐकून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. त्यांच्या भावना समजून घेतल्या तर संवाद आपोआपच साधला जातो.

आपल्याकडे सगळ्यात जास्त मनाला खुपणारी गोष्ट असते एखाद्या स्त्री ला मुल न होणे. लग्नानंतर लगेच विचारणा होऊ लागते आता पाळणा कधी हलणार. मग हळू हळू कुजबुज सुरू होते तिच्यातल्या दोषांची.  मग दोघांतल्या दोषांची. हजार सल्ले दिले जातात.  मुलं न झालेल्यांना समारंभात पण थोडे लांब ठेवले जाते.  कधी कधी तर त्याची इतकी चर्चा  होते की त्याचा परिणाम त्यांच्या संसारिक जीवनावर होतो. दोघांना कुठे जाणे येणे नको होते. आपसातले वाद वाढतात. आपल्या कडे आज या गोष्टी साठी ही बरेच चे उपाय आहेत अगदीच काही नाही तर दत्तक घेणे हा ही एक पर्याय आहेच. पण आपली मानसिकताच आहे की दोषांवर बोट ठेवायचे.

खरे तर न्युनगंड येण्याला आपल्या आजूबाजूचे लोक जास्त कारणीभूत असतात. एखादी व्यक्ती मध्ये जर काही उणीव असेल तर तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करून त्या उणिवेवरच बोट ठेवले जाते. मग त्या व्यक्तीला आपोआपच आपल्यातल्या त्या उणिवेची लाज वाटायला लागते आणि त्या गोष्टींचा न्यूनगंड येतो. कुणीतरी आपल्याला कमी लेखले म्हणून आपण कुणीच नाही असाही न्यूनगंड आपल्या सगळ्यात बऱ्याच वेळा येतो, आणि आपोआपच ती व्यक्ती सगळ्यांपासून लांब लांब राहू लागते.
आज नवीन वर्षाच्या निमित्ताने एक संकल्प सोडू की निदान एका तरी व्यक्तीला न्यूनगंडातून बाहेर पडायला मदत करू. कुणाच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्यातल्या गुणांचे कौतुक करू. आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने जगासमोर उभे राहू.
एक वाक्य आपण नेहमी लक्षात ठेवावे हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्याचे प्रत्येकाचे एक वेगळेपण आहे आणि वेगळे वैशिष्ट्य ही.  



Sunday, 23 December 2018

नूतन ताई - माझी रोल मॉडेल

खरं तर  महाराष्ट्र टाईम्स मध्ये तिच्याविषयी  लिहून झालेय पण २५० शब्दात नूतन ताईचे  वर्णन म्हणजे फारच  कमी शब्द आहेत.  तिच्यासाठी माझा हा एक ब्लॉग हि कमीच पडेल.
नूतन ताई माझी अगदी लहानपणापासूनची  रोल मॉडेल.  तीच जितकी  सुंदर आहे ना, तितकीच हुशार .   जवळजवळ सहा फूट उंची, म्हणतात ना ते चाफेकळी सारखं नाक आणि शुभ्र दंतपंक्ती , काळे कुरळे ,घनदाट आणि लांबसडक केस,  त्याचा मानेवर सैलसर अंबाडा ,  छोटेसे कानातले,  कपाळावर मोठी टिकली , ओठांवर हलकी गुलाबी रंगाची लिपस्टिक , डोळ्यात काजळ . अंबाडा घालून झाल्यावर दोन्ही बाजूने एक एक बट कानावर खेचायची तिची ती स्टाईल माझ्या अजूनही लक्षात आहे आजही तयारी करताना ती ही गोष्ट करतेच.   तिला बघितल्यावर प्रथमदर्शनी कोणी तिच्या प्रेमात पडेल अशीच.नाही नाही मी हे नुसतं म्हणत नाहीये खरच अगदी तशीच आहे
 आता आपण अगदी माझ्या लहानपणा  पासून सुरुवात करुया मी जेव्हा एक दोन वर्षाची होते ना तेव्हा माझ्याकडे म्हणे काळा आणि गुलाबी  रंगाचा फ्रॉक होता त्यात मी अगदी बाहुली दिसायचे असे ती म्हणते  म्हणून तिने माझं नाव तिची जपानी डॉल असं ठेवलं आता या डॉल चा डॉल हाऊस झाला आहे तरीही ती मला अजूनही तिची जपानी डॉल च म्हणते.
लहानपणी बऱ्याच वेळा आशाताई आणि ती मला त्यांच्या सोबत फिरायला घेऊन जायचं. मलाही मजा यायची त्यांच्या बरोबर फिरायला कारण दोघीही माझ्या खूप आवडत्या . त्यांनी मला त्यांच्या बरोबर फिरायला नेले  की बरेच जण विचारायचे तुमची धाकटी बहीण का? मी बरीच त्यांच्या सारखी दिसत असावी . जशीजशी मोठी झाले   तशी नूतन ताई मला जास्तच आवडायला लागली.  तिचं व्यक्तिमत्व असा आहे ना की समोरच्याला भारावूनच टाकेल. ती पंजाबी ड्रेस मध्ये छान दिसते, जीन्स मध्ये छान दिसते आणि साडी मध्ये तर क्या बात है!!!!
जितकी दिसायला छान आहे ना तितकीच कडक स्वभावाची आहे.  आशाताई   साधी होती ती कधी रागवायची नाही ,  पण नूतन ताई जास्त रागवायची. भर  दुपारी आम्ही जेव्हा  पत्ते खेळायलाबसायचो ना गॅलरीमध्ये तेव्हा आम्ही खूप आवाज करायचो  आणि तेव्हा ती आम्हाला  बऱ्याच वेळा ओरडायची ." खाली जाऊन खेळा  जरा झोपायला देत नाही ".  ती ओरडून गेली कि आम्ही अगदी हळू हळू आवाजात बोलायचं तिच्या भीतीने पण खेळणे काही सोडायचो नाही . 

मला एक प्रसंग आठवतोय मी एकदा लग्नाला जात होते आणि मी ताई ला दाखवायला गेले बघ कशी  दिसतेय. तर ते सांगायचे सोडून मला तिने तिचा नवीन ड्रेस दिला घालायला. आणि तो कायमचा मलाच दिला. मी नेहमीच तयार झाले कि तिला दाखवायला जायचे कशी दिसते? कारण मला तिचे दिसणे , तयार होणे नेहमीच आवडायचे. मी बऱ्याच वेळा तिची नक्कल करायचा प्रयत्न करायचे आणि अजूनही करते .
तेव्हा आम्हाला पाचवी पासून इंग्लिश विषय असायचा. माझा शाळेचा अभ्यास आशा मावशी करून घ्यायची. पण शाळेच्या व्यतिरिक्त माझे  जे काही  इंग्रजी चांगले आहे ते तिच्यामुळे. तेव्हा त्यांच्या घरी स्टारडस्ट मॅगझीन, टाइम्स ऑफ इंडिया पेपर यायचे. मी ती मॅगझीन नुसती चाळत बसायचे त्यातले फोटो पहायचे . तेव्हा ताई ने मला एक अट मॅगझीन पाहायचे असेल तर त्यातला कुठलाही एक लेख वाचायचा आणि त्याचे मराठीत भाषांतर करायचे.    डिक्शनरी घेतली तर चालायची ,पण कुणालाही विचारायचं नाही. स्वतःचे स्वतः करायचे. त्यामुळे मला स्पेल्लिंग लक्षात राहायला लागल्या. बरेच शब्द कळायला लागले. आणि मुळात इंग्लिश वाचायची आवड लागली. आजही मी इंग्लिश बोलायला थोडी कचरते म्हणून ती नेहमी माझी शाळा घेते. ती बऱ्याच वेळा माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलते आणि मी मात्र अजूनही मिंग्लिश मधेच बोलते.
 मराठी माध्यमातून शिकलेल्या ताईचे इंग्लिश वर प्रचंड प्रभुत्व आहे. तिला वेळ असेल तेव्हा ती सतत काही ना काही वाचत असते, किंवा कुठलेतरी चांगल्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकत बसते.  ताईचे वाचनही खूप दांडगे आहे. मराठी असो वा इंग्लिश ती सतत काहीतरी वाचत राहते.  त्यामुळेच तिचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. सायकॉलॉजि मध्ये मास्टर्स केलेली ताई काही वर्ष कॉलेज मध्ये प्रोफेसर होती. त्यानंतर तिने कॉऊंसिलर म्हणून हि काम केले. ती जे करते ते उत्तम करते. 

ताईला खरे तर स्वयंपाकाची आवड नाहीये असे ती म्हणते खरे पण तिच्या हाताला अप्रतिम चव आहे. व्हेज असो किंवा नॉन व्हेज ती सगळेच अतिशय चविष्ट बनवते.  ताईला टापटीपपणा आणि साफसफाई ची खूप आवड आहे. बेशिस्तपणा तिला अजिबात खपत नाही.  ताईला इतर गृहिणीसारखं टीव्ही वरच्या मालिका बघायला हि आवडते. पण दिवसभराचा तिचा कार्यक्रम आखलेला असतो, सकाळ संध्याकाळ चालायला जाणे, नियमित योगा करणे इतर सगळी कामे त्यामुळे तिला आवडणाऱ्या मालिका ती रेकॉर्ड करून ठेवते आणि मग रात्री आरामात त्याचा आस्वाद घेते. तिला जुनी गाणी, जुन्या काळातल्या हेरॉईन खूप आवडतात. साधना आणि रेखा तर तिच्या ऑल टाईम आवडत्या आहेत.

ताईचे मिस्टर संदीप दादा, हसायला आले ना ताईचा नवरा आणि दादा???  भावोजी म्हणायला हवे ना ... पण संदीप दादा ताई चा मित्र म्हणूनच लहानपणापासून पाहिलेलं. आणि भावोजी म्हणावे असा लांबचा तो कधी वाटलाच नाही. संदीपदादा हि खूप हुशार. स्वतःच्या हुशारीच्या बळावर आज तो एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर च्या पदावर आहे. त्या दोघांची हि हुशारी त्यांच्या मुलाने समीर ने घेतली आहे.  खूप हुशार, आणि छान असे हे त्रिकोणी कुटुंब.

समीर एकदा लहान असताना आम्ही त्याच्या सोबत खेळत होतो आणि तो इथे तिथे पळत होता. अचानक तो पळता पळत पडला , त्याला लागले आणि तो रडायला लागला जोरजोरात. आम्ही जाम टरकलो होतो आता काही खैर नाही ताई ओरडणार. आम्ही त्याला जवळ घेऊन कुठे लागले ते बघत होतो.. त्याला रडू नको रडू नको म्हणून समजावत होतो. इतक्यात ताई बाहेर आली तिने पहिले तर समीर ला जास्त काही लागले नव्हते आपटल्यामुळे थोडे लाल झाले होते. आम्ही आपले त्याची समजूतच काढत होतो भीतीने. तर ताई रागावलीच आमच्यावर म्हणे पडू दे जरा, लागू दे थोडेसे. पडल्याशिवाय मोठा कसा होणार तो? आणि त्याला हि कळेल कि काय केले कि आपल्याला त्रास होतो. आम्ही सगळे चाट होऊन ताई कडे पाहतच राहिलो. किती वेगळेपण इतर आईवडील मुलाकडे लक्ष दिले नाही म्हणून ओरडले असते पण ताईने वेगळेच कारण दिले. म्हणूनच ताई आम्हाला जास्त आवडते.

दिवाळीतही आमची भरपूर मजा असायची. ताईच्या घरी भरपूर मिठाई असायची, मग त्यातला एक बॉक्स ती आमच्याच्यासाठी तिच्या दाराजवळच्या कपाटावर ठेवायची. आम्ही खेळून आलो कि त्यातली मिठाई न विचारता घ्यायची.  आम्ही तर तो बॉक्स एका दिवसात फस्त   करायचो , पण ती कधी आमच्यावर रागावली नाही.  देण्याच्या बाबतीत ताईचा हात कुणी धरू  शकत नाही.   तिला शक्य तेवढी आणि शक्य तशी मदत ती नेहमीच करत असते. गरीब श्रीमंत असा भेदभाव तिने कधीच केला नाही. कि आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा बडेजाव तिने केला नाही.
मी नोकरी सोडल्यानंतर माझ्या आयुष्यात एक दोन गोष्टी अशा घडल्या होत्या कि मी डिप्रेशन मध्ये गेले होते. स्वतःचाच राग येत होता. त्यावेळी मी ताईला भेटले. तिच्याकडे गेल्यावर आधी एक मोठी बहीण म्हणून तिने माझे स्वागत केले पण नंतर चे दोन तास ती एक कॉऊन्सिलर होती आणि मी तिची पेशंट. त्या दोन तासात तिने मला खूप काही गोष्टी समजावल्या . त्या दोन तासाच्या आमच्या चर्चेनंतर मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या. ती भेट माझ्यासाठी खूप महत्वाची ठरली होती. तिच्या त्या समजावण्याने कसलेतरी अनामिक बळ आले होते. खूप पॉझिटिव्ह  विचार घेऊन मी तिथून बाहेर पडले होते. आताही जेव्हा कधी हरल्यासारखे वाटते तेव्हा मी तिचे त्या वेळेचे बोलणे आठवते.
जेव्हा हॅम्लेट वरच्या ब्लॉग वर सुमीत ची कमेंट आली तेव्हा ती खूप खुश झाली होती. मी त्याला ब्लॉग लिहून भेट करायचे ठरवल्यावर तिनेच मला म्हटले होते " अगं , इतकी क्रिएटिव्ह आहेस तू मग काहीतरी छानसे बनवून दे त्याला " आणि म्हणून मी मस्त तो खलित्यासारखा बनवून दिला तिला. माझ्यापेक्षा जास्त तिला कौतुक होते ... आजही ती जेव्हा म्हणते ना कि " I  am  proud  of you " .. तेव्हा खूप मस्त वाटते. आणि थोडे टेन्शन हि येते कि तिच्या या विश्वासाला नक्की पात्र आहे ना मी ?  माझ्यासाठी माझ्या ब्लॉग वर येणारी तिची प्रतिक्रिया हि खूप खास असते.

माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर स्त्री कोण असे विचारले तर माझे उत्तर नेहमीच असेल " नूतन ताई" कारण दिसायला आणि वागणुकीत   दोन्ही गोष्टीत सुंदर असणाऱ्या व्यक्ती फार दुर्मिळ असतात त्यातलीच एक आमची ताई. तिला कशाचाही अजिबात गर्व नाही, कि कधी ती दिखाऊपणा करत नाही.   ती एक उत्तम गृहिणी आहे, आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मैत्रीण आहे, मुलगी आहे, एक उत्तम कॉऊन्सिलर आहे, प्रोफेसर आहे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती एक उत्तम माणूस आहे. 

माझे दिलखुलास कौतुक करणारी, माझे काही चुकले तर मला समजावणारी, वेळीच माझा कान पकडणारी , चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करून देणारी, माझ्या चुकीच्या निर्णयावर मला खडसावणारी, अजूनही लहान मुलीसारखे माझे लाड पुरवणारी. आणि मी हि कुणीतरी स्पेशल आहे याची जाणीव करून देणारी, माझ्या छोट्या छोट्या प्रगतीवर खुश होणारी, माझी रोल मॉडेल सर्वगुणसंप्पन नूतन ताई. मी देवाची शतशः आभारी आहे कि माझ्या आयुष्यात तिला पाठवले.

तिला न भेटताच माझे बरेच मित्र मैत्रिणीही तिचा आदर करतात. आणि ती हि नावाने सगळ्यांना ओळखते आणि आवर्जून सगळ्यांची चौकशी करते.

तिने सांगितलेली एक गोष्ट माणसाने स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेतली तर तुमच्यावर कुठल्याच वाईट गोष्टींचा प्रभाव पडणार नाही.



Sunday, 25 November 2018

मैत्री कि आकर्षण


कुणीतरी हवे आपल्याला मनापासून समजून घेणारे. आता तुम्ही म्हणाल तसे तर खूप जण असतात कि आपल्याला समजून आपले आई बाबा आजी आजोबा नवरा बायको, मुलेहो ते हि आहेच कि. पण खरेच हे सगळे आपल्याला मनापासून समजून घेतातकितीतरी अशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्या जोडीदारासोबत हि नाही वाटून घेऊ शकत. कितीतरी गुपिते जी कुणालाही नाही सांगता येत
अशा वेळी हवे असते कुणीतरी आपले. आता त्यावर आहेच उत्तर कि आपले मित्र मैत्रिणी असतातच ना ज्यांच्या सोबत आपण सगळे काही वाटून घेऊ शकतो. हे हि खरेच आहे कि.... मग आता घोडं अडले कुठे?

आता प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा कि कोण आहे आपल्यावर अगदी मनापासून समजून घेणारे? ज्यांना ठामपणे एक नाव घेता येईल ते खरेच नशीबवान. तरीही प्रत्येकाची समजून घेण्याची व्याख्या काही वेगळीच असते

अर्थात ते मिळतेच असे नाही. पण प्रत्येकाला कुणीतरी असे हवे असते ज्या व्यतींशी आपण अगदी मोकळेपणाने काही हि बोलू शकतो. जेव्हा कधी एकटे वाटते त्या व्यक्तीशी दोन शब्द बोलल्यावर एकटेपणा कुठल्या कुठे निघून जातो. असे कुणीतरी हवे जे आपल्यातल्या लहान मुलाला सहन करणारेकितीही बालिशपणा केला तरी आपल्याला समजून घेणारकाय हा पोरकटपणा? किंवा आता काय लहान आहे का तू असे वागायला ? असा कधीही प्रश्न ना करता तुम्ही जे वागलं ते खपवून घेणारे. अर्थात आपणही समोरच्या व्यक्तीचा बालिशपणा खपवून घेतला पाहिजे. तुम्हाला कधीही गरज लागली तरी हातातली कामे सोडून तुमच्यासाठी वेळ देणारे. आता बिझी आहे मग बोलू .... म्हणजे माणूस मारतोय आणि तुम्ही पाणी पाजायला तुमच्या सवडीने जाणार असेच झाले ना ते

आता असा प्रश्न मनात आला असेलच ना कि असे फक्त प्रियकर प्रेयसी असू शकतातअसू दे ना मग ... पण दोन मैत्रिणी, दोन मित्र किंवा मित्र मैत्रीण कुणीही असू शकतो ना. पण दोन मैत्रिणी किंवा मित्र ,अगदी प्रियकर प्रेयसी हि आपण समजूच शकतो

पण कधीतरी असे होते जेव्हा एक मित्र आणि मैत्रिणी असे असतात तेव्हा? त्यांच्या भावना कितीही शुद्ध असल्या तरी लोक नवे ठेवतातच. माझा दादा म्हणाला होता मला कि मैत्रीला नात्याचे नाव दिले कि त्याला बंधने येतात. खरेच आहे

पण आपल्याकडे दुर्देव असे कि हे कुणी मानतच  नाही. इतकेच कशाला त्या मैत्रीतही बऱ्याच वेळा असे होते कि समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप मोकळेपणाने बोलते म्हणजे तिच्या मनात काहीतरी वेगळेच आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. एखाद्या व्यक्तीशी आपण अगदी नियमित बोललो कि ती व्यक्ती आपल्याला खूप जवळची वाटू लागते. जरी भेटलो नाही तरी एक आपुलकीचे नातं तयार होतेपण कधी कधी काय होते ना कि त्यातल्या एखाद्याच्या मनात काहीतरी वेगळेच विचार येतात. समोरची व्यक्ती अगदी मोकळेपाणाने बोलते म्हणजे तिला सगळेच चालू शकते असा विचार करू लागतात. एका अर्थाने गृहीत धरू शकतात

मग बोलण्यातले विषय भलतीकडे जायला लागतात. समोरच्या व्यक्तीच्या मनातही नसतात असे विषय बोलले जातात. काही वेळा वेगळे विषय म्हणून त्यावर चर्चा हि होते पण तेच विषय जेव्हा खऱ्या विषयाकडे वळतात तेव्हा त्यातली एक व्यक्ती नेहमीच दुखावली जाते कारण तिच्या भावना तशा नसतात.  

आपल्याला एखादी व्यक्ती मोकळेपणाने भेटते किंवा बोलते तेव्हा ते फक्त शारीरिक आकर्षणच असेल असे नाही ना. दोन विरुद्ध लिंगी व्यक्ती जर जवळ आल्या तर त्याची वाट एकाच ठिकाणी का धरण्याचा आग्रह केला जातो हे आता पर्यंत उलगडणारे कोडे आहेएखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याची , कामाची स्तुती करणे  हे फार स्वाभाविक असते पण कधी कधी हे काही विशिष्ट कारण समोर ठेवूनच केले जाते. तर कधी कधी एखादी व्यक्ती हि निर्मळ  मनाने कुठलीही अपेक्षा ना ठेवता फक्त आपुलकी खातर करत असेल हा विचारच केला जात नाही
एखादी व्यक्ती आपल्याशी मोकळेपणाने बोलली कि आपण त्या व्यक्तीला काही अंशी गृहीत धरायला लागतो. कदाचित ती व्यक्ती आपल्यात एक चांगला मित्र किंवा मैत्रीण शोधात असेल हा साधा विचारही मनाला शिवत नाही. आपल्या मनात असणाऱ्या भावना अतिशय उथळपणे मांडल्या जातात आणि असलेल्या मैत्रीचा हि बळी दिला जातो
फार कधीतरी हे आकर्षण दोन्ही कडून असते. पण अगदी फारच कमी वेळा. आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन मित्र किंवा मैत्रिणींमध्ये आपण तो कंफर्ट  झोन शोधत असतो जो काही वेळा आपल्याला कुणातही मिळत नाही. किंवा आपल्या अगदी जवळची दोस्त मंडळी इतकी लांब गेलेली असतात कि आपल्याला वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांना नाही सांगू शकत. आता काही व्यक्ती होतच नाहीत व्यक्त पण ९९% व्यक्तींना कुणीतरी लागतेच जवळचे
एक साधी सरळ गोष्ट कि मैत्रीचा हात पुढे करून त्याआडून काहीतरी वेगळे अपेक्षित ठेवण्यापेक्षा आणि समोरच्या व्यतीच्या भावनांना दुखावण्यापेक्षा, स्पष्ट राहून मैत्री करा म्हणजे एकतर मैत्री होणारच नाही किंवा तुमचे मत बदलेल
एख्याद्याकडे एक शरीर म्हणून बघण्याची मानसिकता बदलली ना तर बऱ्याच मैत्री या सुलभ होतील. आणि आपला हि दृष्टिकोन बदलेल







 






-