Saturday, 3 October 2026

का????

 *का*??


ह्या एका प्रश्नार्थक शब्दाने फार घोळ होतात आणि  मनस्ताप होतो या एका शब्दाने आपल्याला, म्हणजे प्रत्येक मनुष्य प्राण्याला. 😀


म्हणजे असं हा शब्द जितक्या वेळा  आपण डोक्यात आणतो आपल्याला तो त्रास देतो.  म्हणजे आज ट्रेन का लेट? माझ्याच ऑफिस ला सुट्टी का नाही? आमचाच पगार का वाढत नाही? असे ऑफिस शी संबंधित  प्रश्न. हे सरकार काही का करत नाही, महागाई किती वाढतेय..  सगळे भ्रष्टाचार का करतात?  कोणी नियम का पळत नाही? असे आपल्याला न सुटणारे प्रश्न.  माझी मुलं माझे ऐकत का नाहीत? आपण जसे वागलो तसें ते का वागत नाहीत? हे प्रत्येक पालकांना पडलेले प्रश्न. ती माझ्याशी बोललीस का नाही?  ती आलीच का नाही? त्याने असंच का केलं?  माझ्याशी असाच का वागला? त्यांनी मलाच का फसवले? या लोकांनी मला काहीच का सांगितलं नाही? मला बोलावलेच का नाही?? असे अनेक का? दिवस रात्र आपल्या मनात घोळत असतात. ज्यांची उत्तरं आपल्या हातात नसतात पण त्यांचा विचार करता करता आपण मात्र थकून जातो.


हा छोटासा *का* जो प्रश्न असतो,  त्याच्या मागे पुढे वेगवेगळ्या गोष्टी लागतात  आणि हा "का" आपल्याला त्रासदायक ठरतो.

या का च्या उत्तरांचा पाठपुरावा आपण सतत करत राहतो, उत्तरं नाही सापडली तरी ही. पण काही काळानंतर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे हे  जास्त त्रासदायकच होत जाते. काही गोष्टी जाऊ देणे हेच आपल्या जास्त हिताचं असते... हे फार उशिराने लक्षात येते. तोपर्यंत आपण स्वतःला बराच त्रास करून घेतलेला असतो.


हा का एका अर्थाने चांगला होऊ शकतो... हा का त्रासदायक प्रश्नाच्या  रूपात  डोक्यात आला की प्रथम मनात आणायचं हा विचार  आपण का ककरतोय किंवा मी का करतेय? हा विचार नाही केला तर काय फरक पडणार आहे मला? आणि या कायच उत्तर एकदा सापडलं या *का*  पासून आपण आपोआपच लांब होतो.


शाळेत असताना आपण हा का  प्रश्नार्थक शब्द शिकलो,  पण आयुष्यात आपल्याला तो इतका त्रासदायक ठरेल हे मात्र तेव्हा लक्षात नव्हतं आलं.


 जर आपल्याला खरंच  मनशांती हवी असेल तर  या अश्या  त्रासदायक का पासून आपल्याला लांब राहता आले पाहिजे.  आपल्या आयुष्यात हे असे का  जितके कमी किंवा आपल्या दैनंदिन जीवनात जेवढा या अश्या कां चा वावर कमी  तेवढा त्रास आपल्याला कमी. 


 पण जसं जसं वय वाढत जातं तसं आपण या का पासून आपसूकच  दूर होतो आणि सुखाच्या शोधाकडे वळतो. किंवा  आपल्या मनःशांतीचा आपण जास्त विचार करतो.  अशा का ना दुर्लक्षित करायला शिकतो. अनुभवाने शहाणपण येते.....हेच खरं.


हा का चांगल्या अर्थाने.... जेव्हा तो एखाद्या शास्त्रज्ञाच्या मनात येतो. तेव्हा तो एका शोधाची जननी असतो.

मी लिहायला हा विषय का निवडला याचा विचार मी ही केला नाही... तुम्ही ही करू नका.

मी तुम्हांला विचारणार नाही हा लेख का वाचला नाही?  तर मी असं विचारणार वाचला ना माझा लेख आवडला का नाही....😀

सौ. मिलन राणे - सप्रे 🖋️

 

No comments:

Post a Comment