Tuesday, 1 July 2025

हरवलेल्या मी चे सापडलेल्या स्वतःला पत्र


प्रति,

माझी प्रिय 

हरवलेली मी ,


खरंतर तुला हे पत्र लिहायची गरजच नाही असे तुला ही एक क्षण वाटून जाईल.....पण बरंच काही आहे जे सांगायचे राहून गेलेय.  स्वतःच स्वतःला काय ते पत्र लिहायचं? पण मोकळं होण्यासाठी पत्र यापेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही.


कुठून सुरवात करू कळतच नाहीये, कारण सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जसं सुचेल, आठवेल तसं लिहिते.


जेव्हा पासून कळायला लागलं , तेव्हा पहिली जाण झाली ती परिस्थिती ची. परिस्थिती नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या इच्छा मारून जगत राहिलीस. कधी कसली मागणी नाही की कसला हट्ट नाही. दिवाळीच्या वेळी एक नवीन ड्रेस असायचा, बाकी वर्षभर कुणाचे ना कुणाचे कपडे घालून समाधान मानलेस. सगळंच कुणाचे न कुणाचं जुने वापरले. कधीतरी एखादं वर्षी नविन पुस्तकं, नवीन दप्तर मिळायचे. त्यावेळीचा आनंद चेहऱ्यावर दिसायचा.


मुलगी असून नट्टापट्टा केला नाही. चापून चोपून बांधलेले केस. कपाळावर टिकली ती ही लालच , त्याखाली देवाचे कुंकू अशीच राहिलीस कायम. कधीतरी न्हाऊन आल्यावर हळूच आरश्यात डोकवायचीस पण ते ही चोरून. मोकळ्या केसांत स्वतःला न्याहाळायचे  सुख ही मनसोक्तपणे घेतलं नाहीस.


घरातील वातावरण पहिल्यापासून  कडक शिस्तीचे असल्यामुळे मुलांशी बोलायची चोरी. शाळेत काय किंवा कॉलेज मध्ये काय  कधी मुलांशी मैत्री नाही. आजूबाजूच्या मुली  जेव्हा बिनदिक्कत मुलांसोबत बोलायच्या,  हसायच्या तेव्हा कधी कधी त्यांचा हेवा वाटायचा.  कॉलेजमध्ये गेल्यावर प्रत्येकाचा छोटासा तरी ग्रुप होता.  त्या ग्रुपमध्ये तरी मुलगा असायचा,  पण आपल्या ग्रुपमध्ये मात्र चार मुलीच.  कधी हिम्मत झाली नाही कुठल्याही मुलाशी स्वतःहून बोलायला जायची.  खूप वाटायचं, पण त्या वाटण्यापेक्षा मनात असलेली भीती जास्त होती त्यामुळे तसं पाऊल त्या दिशेने कधी गेलेच नाही.


त्यादिवशी आपल्याच जवळच्या नातेवाईकाने केलेला तो किळसवाणा स्पर्श, जोरात ओरडून त्या काकांच्या श्रीमुखात लगावायची होती , पण गप्प राहून ते सहन केले चूकच झाली. त्यानंतर तसे घडणार नाही म्हणून स्वतःला सांभाळत राहिलीस. घरची गोष्ट म्हणून अगदी जवळच्या मैत्रिणीला ही कळू दिलं नाही.


बोहल्यावर चढताना मनातल्या राजकुमाराची  प्रतिमा बाजूला ठेवून आईबाबांनी ठरवून दिलेल्या मुलाशी लग्न केलेस.   मनात बरीच सुखी संसाराची स्वप्न घेऊन. सुरुवातीचे काही दिवस नव्याची नवलाई म्हणून अगदी आनंदात गेले पण हळूहळू एक एक करून सगळी स्वप्नं खोटी ठरू लागली. इथेही परिस्थिती सारखीच हे कळायला लागलं. सगळीच स्वप्नं खरी व्हावीत असा अट्टाहास नव्हताच पण संसाराच्या सगळ्याच संकल्पना खोट्या ठरत गेल्या.


पहिल्या गरोदरपणात कौतुक झाले, पण पहिली मुलगी झाली आणि ते कौतुक टोमण्यात बदललं. पण तरीही आपल्याला लागलेली झळ मुलीला लागू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. दुसरा मुलगा झाला आणि सगळ्यांचा रोष कमी झाला. पण तुझ्या मनावरची जखम कायम राहिली.


तू सतत मुलांच्या सुखामध्ये स्वतःचे सुख शोधत राहिलीस. मुलीला बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिले. वेळेला तिच्या मागे उभी राहिलीस. मुलांना काही कमी पडू दिले नाहीस. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून , स्वतःचा व्यवसाय केलास. पैसे साठवून ते मुलांसाठी खर्च केलेस. नंतर कधीतरी उपयोगी पडतील म्हणून स्वतःसाठी कधीच खर्च केले नाहीस.


मुलं शिकली, बाहेर गेली आणि  नोकरीला लागली. मुलांची लग्न ही झाली. मुलाने वेगळं घर घेतलं पण नवऱ्याच्या हट्टापायी तू जुन्या घरात त्याच्यासोबत राहिलीस. त्याने ही पहिल्यापासून तुझा विचार केला नाही. कधी बसून चार शब्द गोड बोलला नाही. तुला काय कळतेय? याच नजरेनं सतत पाहिले गेले तुझ्याकडे. पण तरीही तू तुझी एकनिष्ठाता सोडली नाहीस. अगदी मन लावून प्रामाणिक पत्नीची भूमिका पार पाडलीस.


स्वतः सगळीकडे जायचा पण तुला मात्र बंधनं घातली. नातेवाईक, घरातले सण समारंभ, कार्यक्रम यात सहभागी होणे हे तुझ्या वाट्याला होते. कधी कधी ईच्छा नसताना त्या गोष्टी इमानेइतबारे केल्यास. कधी मित्रमैत्रिणींची भेट घ्यायची झाली की मात्र तुला वेळ काढता आला नाही. स्वतःच्या मौजमजेसाठी तू वेळ काढला नाहीस. आणि तुला ही मित्रमैत्रिणींची गरज आहे, याची जाणीव कधी कुणाला झाली नाही. अगदी तुझ्या मुलांना सुद्धा. ते ही दर वेळी तुला गृहीत धरत आले.


आतपर्यंत सगळं आयुष्य दुसऱ्यांची सेवा करण्यात, बाकीच्यांचे नखरे सांभाळण्यात गेलं. कधी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा यांना महत्व दिलंस नाही.  अगदी खाण्यापिण्याच्या बाबतीतही समोरच्या व्यक्तीचा विचार केलास.  अगदीच कधी काही पदार्थ खावासा वाटला तरी तो दुसऱ्या कुणाला तरी हवा असेपर्यंत वाट पाहिली. मनातली ही साधी इच्छा ही कधी बोलून दाखवली नाहीस.


आता आयुष्याच्या या टप्प्यावर खरंच तुला सांगावेसे वाटतंय की आता तरी वेळ घालवू नको, सगळ्या जबाबदाऱ्या झाल्या निभावून,  आता तरी स्वतः कडे लक्ष दे. जिथं मनापासून वाटतं तिथे व्यक्त हो. दिवसांतून एकदा तरी वेळ काढून आरशात बघ. कधीतरी स्वतःसाठी तयार होऊन बघ. कुणाची परवानगी न घेता जरा बाहेर फिरून येत जा.  कुणाचीही तमा , लाज न बाळगता मस्त रस्त्याच्या कडेला असणाऱ्या त्या भेळपुरी वाल्याकडे पाणीपुरी खा. खूप वर्षांपासून होतं ना मनात! बाजारात जाता येता किती तरी वेळा तिथे वळणारे पाय मुश्किलीने थांबवलेस. 


साठवलेले पैसे आता तरी स्वतःवर खर्च कर. छान छान कपडे घाल. पंजाबी ड्रेस आवडतो ना घालायला, पण घरात परवानगी नाही म्हणून साडीच नेसत आलीस. एखादा ड्रेस घालून तरी बघ. जगाला दाखवायला नाही पण आरशात  पाहताना स्वतःला पंजाबी ड्रेस मध्ये  पहायची नुसती कल्पना करत राहिलीस, ते प्रत्यक्षात पाहून घे.


मित्रमैत्रिणींना भेट. त्यांच्या सोबत वेळ घालव. एकदा मनसोक्त, मनमुराद , खळखळून हसून घे. गालातल्या गालात दाबून ठेवलेलं ते हसू बाहेर पडू दे. वाटलंच तर मोठ्यांदा रडूनही घे. पदराने गुपचूप पुसल्या अश्रूंना मोकळी वाट करून दे.


आतापर्यंत दुरून पाहिलेल्या त्या लोभसवाण्या पावसात भिजून घे. चिंब चिंब भिजून , त्या पाण्यात उडी मारून घे. कित्येक वर्षे मनातल्या मनात भिजत राहिलीस दुःखाने, आतातरी या आनंदात भिजण्याचा प्रयत्न तरी कर. जमेल न जमेल  ते पुढचं पुढे. धावता नाही आलें तरी चालेल पण निदान चालायचा प्रयत्न कर. कुणाचाही हात न धरता.


आज या पत्राच्या निमित्ताने हरवलेली मी , मलाच सापडले. खूप हलकं हलकं वाटतेय. अगदी हवेत उडणाऱ्या त्या पांढऱ्याशुभ्र पिसासारखे. नेहमीच त्याच्यासारखे होण्याची इच्छा होती ना तुझी. 


खरंच आधी का नाही सुचलं हे?  मग हे असे सांगायचं राहून नसते गेलं ना! पण यानंतर नक्कीच जेव्हा जेव्हा काही सांगावेसे वाटेल तेव्हा असेच पत्र लिहीन. तोपर्यंत सांगितलेलं लक्षात ठेव, आणि अंमलात ही आण.

आणि हो काळजी घे. आणि मस्त हसत रहा.


प्रेषक,

तुझीच लाडकी

सापडलेली स्वतः♥️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️